News Flash

भूमिका बदलताना..

घेतलेल्या शिक्षणाचा फायदा करून घेत आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं, स्वत:चं स्थान निर्माण करणं, हा मुलींसाठी प्राधान्यक्रम ठरतो आहे..

मुली शिकल्या.. समर्थ झाल्या.. त्यांच्या महत्त्वाकांक्षेचा वारू आता सुसाट दौडत निघाला आहे..

डॉ. लिली जोशी – drlilyjoshi@gmail.com

मुली शिकल्या.. समर्थ झाल्या.. त्यांच्या महत्त्वाकांक्षेचा वारू आता सुसाट दौडत निघाला आहे..  घेतलेल्या शिक्षणाचा फायदा करून घेत आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं, स्वत:चं स्थान निर्माण करणं, हा त्यांच्यासाठी प्राधान्यक्रम ठरतो आहे.. त्यांना थांबवणं आता शक्य नाही, आणि योग्यही नाही. त्यांचा जोडीदार आणि बाकीचा समाज हे वास्तव जितक्या लवकर स्वीकारेल, ‘आई’ आणि ‘बाप’ या ठरीव भूमिका बाजूला ठेवेल तेवढं चांगलं.  उद्याच्या (१० मे) जागतिक मातृदिनानिमित्तानं आजच्या ‘आई’ची कै फियत मांडणारा लेख..

दुपारी बाराचा सुमार. फोन वाजतो. मधुराचा कॉल. ‘‘अमित, शार्दूलच्या शाळेतून फोन आलाय. त्याला ताप भरलाय, आणि एक उलटी पण झाली. घरी घेऊन जा म्हणताहेत.’’

‘‘मग , जातेयस ना तू?..’’ अमित.

‘‘अरे, आज दोनपासून सहापर्यंत एकामागून एक मीटिंग्ज आहेत. कशा रद्द करू मी? गेल्या खेपेलाही मलाच जायला सांगितलंस.’’ मधुरा काहीशी करवादून म्हणाली. ती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करते.

‘‘अगं, नसतं सांगितलं, पण आत्ता मी एका ‘ट्रायल’च्या मध्येआहे. ती पुरी होईपर्यंत मला हलता येणार नाही.’’ अमित समजावणीच्या सुरात म्हणाला. तो एका नामांकित भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ आहे.

मधुराचा संताप झाला. आज तिनं मीटिंग्जमध्ये असणं महत्त्वाचं होतं. नाइलाजानं सर्व रहित करून तशीच फणफणत ती निघाली. तेव्हा तिला अमितचा राग येत होता, घरात कुणाचा पाठिंबा नसल्याचा राग येत होता, वेळीअवेळी आजारी पडणाऱ्या शार्दूलचाही राग येत होता. ती शाळेत पोचली तेव्हा शार्दूलच्या वर्गशिक्षिकांनी त्याला एकटय़ालाच ‘सिक रूम’मध्ये बसवलं  होतं. तापानं चेहरा लाल पडलेलं चार वर्षांंचं पोर. त्याचं तोंडही स्वच्छ पुसलेलं नव्हतं. आईला बघताच तो मुसमुसू  लागला. मधुराचा राग क्षणात विरघळला. तिनं त्याला जवळ घेतलं. अंग चांगलंच गरम झालं होतं. पूर्ण बरं व्हायला काही दिवस लागणार होते. त्या दिवसांची काय व्यवस्था? तिच्या डोक्यात विचारांची गर्दी झाली..

त्याच विचारात ती शार्दूलला घेऊन घरी पोचली. शार्दूलला तिनं ओल्या टॉवेलनं पुसून काढलं. कपडे बदलले. औषध दिलं. डबा सगळा टाकून दिला होता. म्हणून थोडं खायला घातलं. आश्वस्त होऊन तो झोपला. तिनं घडय़ाळाकडे पाहिलं,    चार वाजून गेले होते. निदान घरी बसून ‘पिअर रिवू’ तरी लिहूया म्हणून तिनं लॅपटॉप पुढे ओढला. पण तिचं मनच लागेना..  घडलेल्या प्रसंगानं तिची चिडचिड होत होती.. अमितचा घरात पाहिजे तेवढा सहभाग नव्हता. पूर्ण साथ नव्हती. आजारी मुलाला आईचीच जास्त गरज असते, हे त्याचं लाडकं तत्त्वज्ञान होतं. कुणी ठरवलं हे? मुलाचा जन्म आणि अंगावर पाजणं सोडलं तर बाकी सर्व वडील नाही का करू शकत? मूल व्हायचा निर्णय घेताना म्हणाला होता,‘‘आपण दोघं मिळून वाढवू त्याला.’’ ते मिळून वाढवणं म्हणजे काय याचा अर्थ तिला कळत नव्हता.. त्याला तरी कळला का, हा खरा प्रश्न होता.

रात्री तिनं शार्दूलला गरमगरम भात भरवून अंथरुणात झोपवलं आणि रोजच्या सवयीनं ती त्याच्या शेजारी आडवी झाली. नकळत त्या चार वर्षांंच्या पोराला तिची दुपारी झालेली धावपळ सांगू लागली. थोडय़ा वेळानं शार्दूल गंभीरपणे म्हणाला, ‘‘ममा, तू खूप ‘टायर्ड’ झालीस का? तू जा झोपायला. पण बाबाशी भांडू नको प्लीज.’’ मधुरा चमकली. अजाणतेपणी याला काय काय ऐकवत बसलो आपण? तिला जराशी टोचणी लागली. मधुराचे सासू-सासरे खरं तर गावातच आहेत, पण तिचं आणि त्यांचं फारसं जुळत नाही. सासूबाई स्वत: ‘एलआयसी’त अधिकारी होत्या. तरीही तिची ‘डिमांडिंग’ नोकरी, एकसारख्या ‘डेडलाइन्स’, अधूनमधून करावा लागणारा प्रवास याबद्दल त्या कधी उघड तर कधी तिरकसपणे काहीतरी शेरे मारतातच. त्यांच्या मते, शार्दूल मोठा होईपर्यंत तिनं आपलं करिअर थोडं ‘बॅक बर्नर’वर  ठेवावं. आणि त्यांना रोजची येण्याजाण्याची दगदग सहन होणार नाही, हे तर त्यांनी सरळच सांगून टाकलंय. पाहिजे तर तिनं रोज शार्दूलला त्यांच्याकडे आणून सोडावं,  ते मधुराला शक्य नव्हतं.

आपल्याला माहीत आहे, की ‘हंटर-गॅदरर’ अर्थात ‘शिकार करणारा’ आणि ‘गोळा करणारा’ ही संस्कृती अश्मयुगातच सुरू झाली. तेव्हा माणसं कुठेतरी गुहेत वगैरे आसरा घेऊन राहात होती. दिवस उजाडला की पुरुषांनी बाहेर पडायचं, शिकार करून आणायची, शत्रूचा सामना करायचा, बायकांनी शक्य झाल्यास झोपडं बांधायचं, कंदमुळं गोळा करायची, मुलाबाळांना  वाढवायचं. हे भूमिका वठवणं (‘रोल प्लेइंग’) होतं. काळ बदलला, पण भूमिका बदलल्या का? जग बदललं, समाज बदलला, सगळंच पर्यावरण बदललं, पण समाजमनात भूमिका त्याच राहिल्या. या बदलांना अनुसरून  भूमिकाही बदलणं आवश्यक नाही का?  आजच्या युवती सुशिक्षितच नव्हे, उच्चशिक्षित आहेत.  गुणवत्तेच्या बाबतीत त्या तरुणांच्या तुलनेत तसूभरही कमी नाहीत. त्यांना नोकरी-व्यवसायाच्या संधीही भरपूर उपलब्ध आहेत. या मुली आपल्या नोकरीकडे केवळ पैसा मिळवण्याचं साधन किंवा उपजीविका म्हणून बघत नाहीत. त्यांच्यासाठी ते ‘करिअर’ असतं. त्यांची ओळख, स्वत्व असतं. त्यांचं काम हे त्यांच्या क्षमतेचा कस पाहणारं, आव्हानात्मक आणि त्यांच्या वैयक्तिक प्रगतीला प्रोत्साहित करणारं असतं. असं काम जिथे मिळेल तिथे त्या जातात. मग अनेकदा त्यांच्या जोडीदाराची नोकरी कुठेही असो. याची परिणती

म्हणून आपण पाहतो ती लांब राहून जपली जाणारी नाती, ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप्स’!  जिथे एकमेकांशी नातं टिकवणं हेच आव्हान आहे, त्यात मूल होऊ देण्याचा निर्णय घेणं किती अवघड. त्यामुळे ‘‘आमच्या ‘प्लॅनिंग’मध्ये मुलाला जागा नाही,’’ असं म्हणणारी कितीतरी जोडपी आपल्या आसपास दिसू लागली आहेत.

अमित-मधुराच्या घटनेसारख्या घटना ‘आई, बाबा आणि मूल’ अशा छोटय़ा, विभक्त कुटुंबात वरचेवर घडतात. बहुतेक वेळा तरुणींना आपण स्त्री असल्यानं आपल्या कामाला दुय्यम लेखलं  जातंय, तेसुद्धा आपल्याच कुटुंबीयांकडून, अशी भावना येते, आणि ती वैतागून जाते. शहरांमध्ये आपलं ‘करिअर’ बाजूला ठेवून घरी राहणारी, सर्वकाळ आनंदानं मुलांची काळजी घेणारी तरुण आई सापडणं तुलनेनं आता दुर्मिळ झालंय. ज्या मुलींनी विचारपूर्वक असा निर्णय घेतलाय त्यांनाही तो शांतपणे निभावून नेणं कठीण आहे, विशेषत: त्यांचं काम त्यांच्यासाठी खरोखर महत्वाचं, आव्हानात्मक असेल तर. आपलं ऑफिस, काम, सहकारी, मेंदूला चालना मिळणं, हे सगळं त्या ‘मिस’ करतात, आणि त्याच वेळी त्यांच्या जोडीदाराच्या आयुष्यात फारसा फरक पडलेला नाही हे जेव्हा बघतात तेव्हा त्यांना चक्क मत्सर वाटतो. आपल्या आईपणाचा, या भूमिकेमुळे ‘लादल्या’ गेलेल्या बंधनांचा राग येतो. आणि मग ज्या बाळामुळे ही परिस्थिती उद्भवली त्याच्याबद्दलही सूक्ष्मशी नाराजी वाटू शकते, जी मनाच्या तळात कुठेतरी धुमसत राहते. कधी ना कधी चिडण्यातून, रागवण्यातून ती उमटते. गंमत अशी, की एखादा बाबा पूर्ण वेळ घरी राहून मुलांकडे पाहतो म्हणाला, तर ते फार कमी स्त्रियांना आणि पुढे जाऊन समाजाला आवडतं.  पुन्हा भूमिका वठवण्याचा प्रश्न आलाच!

कधी कधी हा राग छोटय़ा मुलांवर निघतो. त्याच्या कोवळ्या वयात ती त्याला ऐकवते, ‘‘मी तुझ्यासाठी इतकं करते, तुझं खाणंपिणं, डबा,  घरचा अभ्यास, शिकवण्यांना सोडणं, आणणं, सगळं  बघते, तरी तू माझं मात्र काहीही ऐकत नाहीस आणि बाबाशी मात्र लाडीगोडी?..’’ माझ्या पाहण्यातल्या एका छोटय़ाचे हे उद्गार, ‘‘एकेकदा  आई चिडते, ते एक वेळ ठीक असतं, कधी-कधी बाबासुद्धा रागावला तरी ते ठीक. पण आईबाबा दोघंही रागवायला लागले तर मात्र मला रडू येतं.’’

आजच्या शहरी तरुणी, मुली मुक्त वातावरणात वाढलेल्या आहेत. बहुसंख्य घरांतून मुलगे आणि मुलींच्या संगोपनात भेदभाव केला जात नाही. किं बहुना अनेकदा एकु लत्या एक असल्याने मुलींचे लाडच होत असतात. अमुक गोष्ट मुलीच्या जातीला शोभत नाही, किंवा तमुक गोष्ट तुला मुलगी म्हणून आलीच पाहिजे, अशी वाक्यं आजच्या युवतींच्या कानावर पडत नाहीत. त्यांच्यासाठी शिक्षणक्षेत्रातल्या दशदिशा खुल्या आहेत. त्यांची क्षमता आणि आकांक्षांना पुरेपूर खतपाणी त्यांच्या पालकांनी घातलेलं असतं. ‘तू फक्त तुझ्या अभ्यासाकडे, करिअरकडे लक्ष दे,’ असा संदेश त्यांना स्पष्टपणे घरून मिळालेला  असतो.  घराबाहेरचं नोकरीच्या बाजारातलं वातावरणही मुलींच्या कष्टांना, गुणवत्तेला पूर्ण वाव देणारंच आहे. मुलींच्या कर्तृत्वाचा विकास होण्यासाठी  उत्तम संधी उपलब्ध आहेत. दर दिवशी अत्यंत अभिनव क्षेत्रात मुलींनी भरारी घेतल्याची वृत्तं आपण वाचतो. त्यामुळे अचानक जेव्हा या मुलींवर संसाराची जबाबदारी, तीही ‘बाई’ म्हणून टाकली जाते तेव्हा ती सहजपणे स्वीकारणं अनेकदा शक्य होत नाही. कारण काही मूलभूत गोष्टी शिकवणं राहूनच गेलं आहे.

जगण्यासाठी आणि तगण्यासाठी आवश्यक कौशल्यं शिक वायची अनेकदा राहून जातात, जी मुलगे आणि मुली दोघांनाही शिकवणं गरजेचं असतं. अगदी प्राथमिक स्वयंपाक, स्वच्छता, नेटकेपणा, आरोग्याची काळजी, घरची एकंदर व्यवस्था सांभाळणं वगैरे. तरुण पिढीशी बोलताना जाणवतं, की ते आणखी एका बाबतीत अजाण  राहिलेले आहेत, समानतेचा खरा अर्थ जाणून घेण्यात.  खरोखर स्त्री आणि पुरुष समान आहेत का? तर ते तसे नाहीत. ते वेगळे आहेत. जीवशास्त्र, शरीररचना आणि कार्य, संप्रेरकं, मानसिकता, प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. ते एकमेकांसारखे नाहीत, तर एकमेकांना पूरक आहेत.  गेल्या ४० वर्षांंत अशा मुलामुलींच्या अनेक पिढय़ा पाहिल्यानंतर  लक्षात आलं, की बऱ्याच  मुलांनी विवाह करण्यापूर्वी या असमानतेचा विचार केलेला नाहीये.  एकमेकांशी महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा केली नाहीये. आपल्याला घरचं अन्न हवंय, की रोज बाहेर जाऊन खायचं, की ‘झोमॅटो’- ‘स्विगी’ला हाक द्यायची ? तत्त्वत: चांगल्या तब्येतीसाठी  सात्त्विक अन्न हवं, पण ते तयार करायची जबाबदारी कोणाची? घराची एकंदर व्यवस्था कोण पाहणार? आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला मूल हवंय की नको, मुलाची जबाबदारी घेण्यात कोणाचा किती वाटा, आपल्याला मोठं घर, मोटार, नवनवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणं अशा  ‘वस्तू’ गोळा करण्यात रस आहे, की आपलं एक सुखी कुटुंब निर्माण करण्यात? यावर गंभीरपणे चर्चा के ली जात नाही आणि मग अधांतरी प्रश्नांच्या जाळ्यात ते कु टुंब हेलकावे खात राहतं..

ज्यांच्या घरात एकत्र कुटुंब आहे, आजी-आजोबा, काका, आत्या किंवा मामा-मावशी अशी मंडळी आहेत, त्यांचा हातभार मुलांच्या वाढीला नक्कीच लागतो. पण आज अशी घरं शहरात राहिलीयत कुठे? या आजच्या आजी-आजोबांना त्यांचे स्वत:चे उद्योग आहेत ते वेगळेच. आपल्याला गृहीत धरलं जाऊ नये, अशी या आजी-आजोबांची मागणी आहे. त्यांची तब्येत, पथ्य, औषधपाणी, व्यायाम, छंद, प्रवास या कार्यक्रमात नातवंडामुळे बाधा आलेली त्यांना कशी रुचणार? शिवाय अजूनही त्यांच्या पिढीला मुलांचं संगोपन हे आईचंच काम असं वाटतंय,‘तो भरपूर कमावतोय, हिला घरी बसून मुलाची काळजी घ्यायला काय हरकत आहे?’ असं या नूतन मातांना ऐकावं लागतंय, अशा परिस्थितीत एक मूल जन्माला घालणं हेसुद्धा अवघड काम  आहे. घराच्या जवळ असणारी, सुरक्षित, मान्यताप्राप्त, नोंदणी केलेली, इतर पालकांनी अनुकूल अभिप्राय दिलेली पाळणाघरं शोधणं हे वाटतं तेवढं सोपं नाही.  सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत अगदी तान्ह्य़ा बाळांपासून चार-पाच वर्षांंच्या मुलांना तिथे ठेवलं जातं. तिथे मुलाला कोणी सोडायचं, परत कोणी आणायचं, हाही अनेकदा वादाचा मुद्दा. थोडी मोठी मुलं शाळेतून येताच त्यांना भडाभडा शाळेत काय-काय झालं ते सांगायचं असतं. पण बरेचदा तोपर्यंत आई आलेली नसते. मला आठवतंय, माझ्या मुलीनं एका निबंधात लिहून ठेवलं होतं, ‘‘मला खूप वाटतं, शाळेतून घरी आल्यावर आईनं दार उघडावं, पण मला पाहायला लागतं नेहमी दारावरचं कुलूप आणि  टेबलावरचा  झाकून ठेवलेला दुधाचा ग्लास.’’ माझ्या लेकीनं कितीतरी वेळा मला अशी अपराधीपणाची भावना दिली.  मीही त्या ‘इमोशनल ब्लॅकमेल’ला बळी पडायचे. पण माझा इलाज नव्हताच. दवाखान्यात वेळेवर पोचायची बांधिलकी होती. गंमत म्हणजे आज अतिशय चांगलं करिअर करणाऱ्या याच मुलीला दोन मुलगे आहेत आणि त्यांना वाढवताना तिच्यापुढेही तेच प्रश्न उभे असतात. तरीही माझ्या तुलनेत ती आपल्या ऑफिसच्या कामाला जास्त महत्त्व देते, या बाबतीत तिचे विचार पक्के आहेत आणि तिच्या मनात अपराधीपणाची भावना नसते हेही मला दिसतं.  तिच्याबरोबरच्या कित्येक जणींना मी यशस्वीपणे ही आव्हानं पेलताना बघते, तेव्हा मला खरंच कौतुक वाटतं आणि आनंद होतो. या ‘करिअर’ करणाऱ्या आया मुलांबरोबर जाणीवपूर्वक वेळ घालवतात. पुस्तकं वाचून दाखवणं, वाचून घेणं, चित्रं काढणं, चित्र रंगवणं, बैठे खेळ , मुलांना पोहायला, सायकल चालवायला, बागेत, ‘हायकिंग’ला, वस्तुसंग्रहालयांमध्ये घेऊन जाणं, अशा अनेक गोष्टी व्यवस्थित नियोजन करून पार पाडतात हे लक्षात घेण्यासारखं आहे. अर्थात या सर्व गोष्टीत जोडीदारांची साथ महत्त्वाची आहे, आणि त्यासाठी दोघांमध्ये सामंजस्य पाहिजे. आणि हे सारं शक्य आहे हे नक्की सांगावंसं वाटतं.

काळाची ही बदलती पावलं आपल्याला काय सांगतात? मुली शिकल्या, समर्थ झाल्या, त्यांच्या महत्त्वाकांक्षेचा वारू सुसाट दौडत निघाला आहे. त्यांना थांबवणं आता शक्य नाही, आणि योग्यही नाही.  त्यांचा जोडीदार आणि बाकीचा समाज हे वास्तव जितक्या लवकर स्वीकारेल तेवढं चांगलं होईल. याचा अर्थ, मुलग्यांनी आता समजून घेतलं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे, मुलं, संसार आणि त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या दोघांनी सारख्याच उचलल्या पाहिजेत. त्यात पुरुषी अहंकाराला जागा नाही. घरकाम आणि पालकत्व या दोन्हींमध्ये स्त्री-पुरुष दोघांचा बरोबरीचा हिस्सा असेल तरच ही कुटुंबसंस्था टिकून राहील. मायलेकरांचंच नव्हे, तर

एकूण कुटुंबाचं वस्त्र घट्ट विणीचं होऊ  शकेल. आई आणि बाबानं एकेक धागा विणला तर आणि तरच कुटुंबव्यवस्था आबाधित राहू शकेल. कुटुंब सुखी, समाधानी, आनंदी राहू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 1:29 am

Web Title: international mothers day 10 may changing roles of family members todays mothers role dd70
Next Stories
1 जीवन विज्ञान : वाढवा प्रतिकारशक्ती
2 मनातलं कागदावर : असाही एक वाढदिवस
3 व्वाऽऽ हेल्पलाइन : पिंकशाही
Just Now!
X