ch00उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिन.. प्रत्येक दिवस त्याचं त्याचं वैशिष्टय़ घेऊन येतो. या दिवशी स्त्रीच्या आत्मभानात भर पडावी, तिला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव व्हावी आणि त्यात तिला असलेल्या  स्थानाची ओळख पटावी, हा उद्देश असतो. ‘पूर्णवेळ गृहिणी आणि तिचे श्रममूल्य’ हा विषय देऊन ‘चतुरंग’च्या व्यासपीठातर्फे केलेले हे सर्वेक्षण त्याच निमित्ताने. यासाठी आम्ही राज्यातल्या पाच महत्त्वाच्या शहरांची निवड केली. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि औरंगाबाद. यातल्या तीनशेपेक्षा जास्त पूर्णवेळ गृहिणींकडून प्रश्नावली भरून घेतली आणि त्या प्रश्नांच्या आधारे जे निष्कर्ष हाती आले तेच मांडायचा इथे प्रयत्न केला आहे.
 या तीनशे जणींची निवड करताना वयोगट, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरातील निम्न, मध्यम आणि उच्च असे तीनही गट निवडले, ज्यामुळे सगळ्या स्तरातील गृहिणींचे चित्र हाती आले.
‘पूर्णवेळ गृहिणी आणि तिचे श्रममूल्य’ हा विषय देताना मूळ उद्देश तिच्या मानसिकतेचा मागोवा हाच होता. तिला तिच्या दिवसभराच्या श्रमाचे मूल्य मिळावे का? ते मूल्य किती असावं? कशा प्रकारे असावं? कुणी द्यावं? त्याचा विनियोग नेमका कसा करता येईल? हे प्रश्न खूप नंतरचे आहेत. मुळात या निमित्ताने स्त्री आपण घरी करीत असलेल्या कामाचा,  श्रमाचा नेमका कसा विचार करते, किंबहुना करते का? तिच्या या श्रमांकडे कुटुंबीयांची बघण्याची मानसिकता कशी आहे हेच शोधण्याचा हा प्रयत्न होता.
हा विषय जेव्हा आम्ही गृहिणींसमोर मांडला तेव्हा खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. असा प्रश्न असूच शकत नाही इथपासून सुरू झालेली गाडी नंतर कुटुंबाचे पालनपोषण हे स्त्रीचे नैसर्गिक, पारंपरिक काम आहे. त्याचा मोबदला कसा काय मिळणार, ते आमचं कर्तव्य, आमची जबाबदारीच आहे, असा मोबदला मिळायला लागला तर आमची आणि घरी येणाऱ्या मोलकरणीशी आमची बरोबरी होईल, असं म्हणत म्हणत जर मोबदला मिळाला तर आमच्या स्वत:च्या खर्चासाठी सोय होईल इथपर्यंत आणि शेवटी तर आम्हाला आमच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी त्याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. इथपर्यंत येऊन पोहोचली. कारण अनेकींना आपल्या भवितव्यासाठी, वृद्धापकाळासाठी काही रक्कम हवी हे पटलं आहे. मात्र सुरुवातीला अनेक जणी गोंधळल्या, गांगरल्या असा विचारच केला नाही कधी, असं म्हणत म्हणत मला नको असा मोबदला पण गृहिणींना मिळायला हवा, तसा कायदा होणार आहे का, झाला तर फायद्याचे ठरेल इथपर्यंत बोलू लागल्या.
  प्रत्येकाच्या घराची आर्थिक बाजू, त्याचे व्यवस्थापन विविध प्रकारचे असू शकते. काही घरे अशीही आहेत जिथे कमवता पती आपला पगार बहुतांशी पत्नीच्या हाती सुपूर्द करतो. सगळे व्यवहार तूच बघ म्हणून सांगतो. काही घरातल्या गृहिणीकडे पतीच्या बँक अकाऊंटचं एटीएम कार्ड असतं. त्यामुळे तिला हवे तेव्हा ती पैसे काढू शकते, अर्थात पैसे काढल्याचा एसएमएस त्यालाच मिळणार असल्याने ती किती पैसे काढते याकडे त्याचं लक्ष असतंच. पण निदान तिला काही प्रमाणात ते स्वातंत्र्य आहे. काही घरात घरखर्चाला लागणारी ठरावीक रक्कम दरमहा पत्नीच्या हातात दिली जाते. आणि त्याचा हिशेबही विचारला जात नाही परंतु काही घरांत तिला स्वत:च्या खर्चासाठी पैसेही दिले जात नसल्याचेही या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. अनेकदा घरखर्चातून राहिलेल्या पैशातूनच तिला आपले खर्च करावे लागतात. ते एखाद्या महिन्यात उरले नाहीत तर आपल्या गरजा तिला पुढे ढकलाव्या लागतात, त्यांचा विचार सोडून द्यावा लागतो किंवा काही तरी मॅनेज करावं लागतं. काही घरात ‘मागितलेलं सगळं’ नवरा आणून देतो त्यामुळे कशाला हवेत पैसे असंही बोललं गेलं. स्वत:साठी किती पैसे खर्च करता दरमहा, यावर शून्य ते ५०० रुपये असे आकडेही सांगितले गेले.
या सर्वेक्षणातून जाणवलेली एक गोष्ट म्हणजे आज पूर्णवेळ गृहिणी असलेल्या अनेक जणी लग्नापूर्वी किंवा पहिलं मूल जन्माला येईपर्यंत नोकरी, व्यवसाय करीत होत्या. पण नंतर कुटुंबांचे पालनपोषण फक्त आणि फक्त स्त्रीचीच जबाबदारी आहे हे गृहीतक मान्य करून अनेकींनी नोकरी सोडली. काहींना सोडावी लागली, काहींना सोडायला भाग पाडले गेले. अर्थात तो प्रत्येकाचा वैयक्तिक वा कुटुंबाचा निर्णय असू शकतो. तो मान्य करायला हवा, मात्र ते करत असताना एखादीवर अन्याय होत नाही ना? हेही कुटुंबातील सदस्य म्हणून पाहिलं पाहिजे, ते अनेक कुटुंबांत पाहिलं जात नसल्याचंही या सर्वेक्षणातून दिसून आलं.
आणखी एक मुद्दा म्हणजे आजही स्त्रीची कुटुंबाकडे, त्याच्या व्यवस्थापनाकडे पाहण्याची वृत्ती बहुतांशी भावनिकच आहे. अर्थात ते असण्यामागे तिला अपेक्षित मान- सन्मान अनेकींना मिळत नाही. घरीच तर असतेस, तुला काय काम असतं घरात? बाहेर पड मग कळेल जग किंवा आम्ही किती कष्ट करतो हे तू कर म्हणजे कळेल, यासारखी वाक्यं घरातूनच ऐकायला मिळतात. त्यामुळे आपल्या कामाचं चीज होत नाही, कौतुक होत नाही अशी खंत अनेकींनी बोलून दाखवली आणि म्हणूनच ‘माझ्या बायकोच्या किंवा माझ्या आईच्या हाताची चव कुणाला नाही.’ असं वाक्य ऐकलं की तिला भरून पावल्यासारखं वाटतं. म्हणूनच असेल कदाचित पण अनेकींनी मोबदला नाही मिळाला तरी चालेल परंतु घरात मान मिळावा, किंमत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. अनेक जणींनी आपल्याला गृहीत धरलं जातं याची खंत व्यक्त केली. त्यामुळे कितीही आजारी असलं तरी खिचडी तरी टाक किंवा टाकते, हे तिचं प्राक्तन ठरतं. म्हणूनच एकीने तर आपल्या घरात मासिक पाळीत तीन दिवस बाहेर बसायला लागण्याच्या प्रथेचं स्वागतच केलं.
या सर्वेक्षणासाठी आम्हाला मदत झाली ती नाशिकच्या सुलभा शेरताटे यांच्या अभ्यासाची. त्यांनी या विषयाच्या अनुषंगाने एम. फिल. अभ्यासांतर्गत सामाजिक संशोधन पद्धतीचा वापर करून एक समान प्रश्नावली तयार केली, जी आम्ही पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि औरंगाबादच्या आमच्या प्रतिनिधींना पाठवली आणि त्यातूनच हे निष्कर्ष काढता आले.
  उच्चशिक्षित, व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या अनेक गृहिणी आपल्या शिक्षणाचं मूल्य विसरल्या आहेत, असंही या सर्वेक्षणातून दिसतं. आपण आता काही करू शकू ही कल्पनाही अनेकींना कानाआड करावीशी वाटते. जे चालू आहे ते योग्य आहे. आम्हाला वेगळं काही करायची इच्छा नाही, असं काहींनी मत व्यक्त केलं. काहींनी तर आपले छंद, आवडी जोपासायलाही वेळ नाही म्हणून सांगितलं. इतकं त्यांनी स्वत:ला कुटुंबात अडकवून टाकलं आहे. तर काहींनी मात्र छोटा-मोठा उद्योग व्यवसाय करायची इच्छा व्यक्त केली.  
 आणखी एक निष्कर्ष म्हणजे पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या नवऱ्याच्या हातभाराची अपेक्षा आहे मात्र ती फारच नगण्य मिळते. तिचं काम करणं तेही १४ ते १८ तास गृहीत धरलं जातं. पुण्यातील पुरुषाकडून मदतीचा थोडा तरी हात मिळतो. इतरत्र मात्र फक्त मुलांना शाळेतून नेणे-आणणे, काही वेळा त्यांचा अभ्यास, उपकरण दुरुस्ती कधी तरी बाजार आदीच कामे केली जातात. औरंगाबादच्या दुष्काळप्रवण राज्यात तर पाणी भरणे ही स्त्रीचीच जबाबदारी असल्यासारखं वातावरण दिसतं.
 तरी आम्ही इथे नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या श्रममूल्याचा अजिबात विचार केला नाही. याचं कारण तिला आर्थिक स्वातंत्र्य आहे वा असावं, असं आम्ही गृहीत धरलं आहे.  
एकूण काय, पूर्णवेळ गृहिणी असणं हे चुकीचे नक्कीच नाही, परंतु ती करत असलेल्या श्रमाच्या मूल्यांची जाणीव कुटुंबातल्या इतरांना आहे ना याची, तिच्या अपेक्षांची जाणीव करून देणे हाच या सर्वेक्षणाचा मूळ उद्देश आहे. हा विषय मांडण्यामागे त्यातून घरात कोणतेही वाद होणं आम्हाला अपेक्षित नाही, मात्र आपल्या पूर्णवेळ गृहिणी पत्नीकडे, तिच्या श्रमांकडे, ती कुटुंबासाठी देत असलेल्या योगदानाकडे सकारात्मक नजरेने बघणे गरजेचे आहे, असे वाटते. ज्यांच्या घरी तिचा सन्मान होतो, कौतुक होतं, तिच्या आर्थिक स्वातंत्र्याचा विचार केला जातो, तिला कामात आवर्जून मदत केली जाते त्याचं स्वागतच आहे. मात्र नसेल तर उद्याच्या महिला दिनाच्या निमित्ताने तो करायला हवा.
उद्याच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा!!!    

 सर्र्वेक्षणातून हाती आलेले ठळक निष्कर्ष-
 पूर्णवेळ गृहिणींची मानसिकता व अपेक्षा
*  आजही घराची-संसाराची-मुलांची जबाबदारी हे ‘स्त्री’चेच कर्तव्य आहे. ती आपली भारतीय संस्कृती आहे. परंपरा आहे.
*  स्वरुपात मोबदला नाही मिळाला तरी किमान कुटुंबात सन्मानाची,आदराची वागणूक मिळावी.
*   घरकामात स्त्री-पुरूष समानता असावी.
*  ‘गृहिणी’ म्हणून गृहीत धरले जाऊ नये.  कौतुकाचे दोन शब्द कुटुंबातील सदस्यांकडून व खास करून पतीकडून मिळावेत.
*  मोबदला घेतला तर घरकाम करणारी मोलकरीण आणि घरातील स्त्री यात फरक काय राहील?
*   वैयक्तिक खर्चासाठी, वैयक्तिक औषधोपचारासाठी आणि भविष्यातील तरतुदींसाठी पैशांच्या नियोजनासाठी गरज.
*   घराच्या गरजा भागवूनच गृहिणी वैयक्तिक खर्चासाठी पैशांची तजवीज करु शकतात.
*  घरातल्या कामासाठी  नवरे किंवा कुटुंबातील इतर पुरुषांचं योगदान नगण्य.
*  घरकाम ही एकटय़ा स्त्रीची जबाबदारी नसून ती सर्वाचीच आहे हे आमच्या मत्रिणींना पटतं, पण प्रत्यक्षातील चित्र आणि अनुभव  पूर्णत  वेगळे आहेत.
*  मासिक पाळीचे तीन दिवस काही जणींना विश्रांती मिळते, ती अनेकींना हवीशी वाटते.
*   अनेक घरात पुरुष आपल्या पत्नीला मोठय़ा महत्वाच्या खरेदीत, निर्णयात सामील करून घेतात.
*   अनेक घरात मालमत्ता पत्नीच्या नावे आहे.
*   अनेक घरात मोठय़ा गुतंवणुकीची, व्यवहाराची माहिती गृहिणीला असते.
*  कुटुंबाच्या आíथक स्रोताची, मालमत्तेची माहिती अनेक गृहिणींना आहे.