08 August 2020

News Flash

अधुरी एक कहाणी..

त्या काळात झालं असं की सक्तीच्या विश्रांतीने मी या घराकडे, मेघनाकडे एकंदरीतच तिच्या घर आणि मुलं यांच्यातील गुंतवणुकीकडे पाहू लागलो.

| March 7, 2015 01:55 am

त्या काळात झालं असं की सक्तीच्या विश्रांतीने मी या घराकडे, मेघनाकडे एकंदरीतच तिच्या घर आणि मुलं यांच्यातील गुंतवणुकीकडे पाहू लागलो. हळूहळू लक्षात येऊ लागलं की घर उत्तम रीतीने सांभाळत तिने आपलं एक वेगळंच विश्व निर्माण केलं आहे.
गेट उघडून काव्या आत शिरली. सभोवती फुललेल्या बागेकडे तिने नजर टाकली. थोडय़ा आश्चर्यानेच ती घराच्या दरवाजासमोर उभी राहिली. बेल वाजताच आतून ‘आलो आलो’ हा आवाज ऐकला. मग क्षणातच काकांनी दरवाजा उघडला.
‘‘ये काव्या, कधी आलीस दुबईहून? किती दिवस मुक्काम? आणि आज इकडे कशी?’’
‘‘काका, आठवडा झाला इथे येऊन, मध्येच दोन दिवस तुषार कामासाठी मुंबईला गेलाय तर थोडा वेळ होता. म्हणून आईला म्हटलं की तुम्हाला भेटून येते, कसे आहात तुम्ही?’’
‘‘मी कसा असणार आता? वेळ घालवतो काही कामात, काही तुझ्या मावशीच्या आठवणीत. बस तू, काय घेशील, पन्हं की िलबू सरबत? उन्हाची आलीयेस.’’
‘‘काका पन्हं? तुमच्या घरात? म्हणजे तसं नव्हे पण आता मेघनामावशी नाहीये तर?’’
‘‘अगं, मीच बनवून ठेवलंय.’’
‘‘तुम्ही? विश्वासच नाही बसत काका. मला अजूनही तेच लहानपणी पाहिलेले काका आठवतात, सारा वेळ ऑफिसच्या कामात बुडवून घेतलेले, चहासुद्धा स्वत:चा स्वत: न करणारे.’’
‘‘खरंय तुझं काव्या, तुमच्या लहानपणी होतोच मी तसा, तेव्हाच काय अगदी आता आत्तापर्यंत, पण बदललो. मेघनाने बदल घडवून आणला हा अगदी गेल्या पाच-सहा वर्षांत.’’ काव्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. आज इतक्या वर्षांनी काकांचं हे बदललेलं रूप, तेही मेघना मावशी गेल्यावर!
‘‘आहे ना गं वेळ काव्या, बस निवांत इथे, हे समोर पेपर आहेत, नाहीतर टीव्ही लावू का, ऊन फार वाढलंय, मी आपल्यासाठी पन्हं घेऊन येतो.’’
काका आत जायला वळले, काव्या थोडी निवांत होत सोफ्यात मागे सरकली. क्षणात अनेक वर्षांचं चित्र तिच्या डोळ्यांसमोर तरळून गेलं. मेघना मावशी तिच्या आईची मत्रीण अगदी त्यांच्या लहानपणीपासूनची. एकाच शाळेत, एकाच महाविद्यालयात आणि लग्नानंतर एकाच गावात. जिथे-तिथे दोघी सोबत, अगदी दोन वर्षांपूर्वी मेघना मावशी जाईपर्यंत.
 काव्याने या घरात काकांना नेहमी पाहिलं ते कामात बुडून गेलेले आणि बाकी वेळ मित्रांसोबत. घराला घरपण होतं ते फक्त मेघना मावशीमुळेच. रोहित आणि वीणा ही दोन मुलं आणि मावशी यांचं एक वेगळंच जग होतं. काका त्यात कुठेही नसत. काकांचा संबंध फक्त कदाचित पसे कमावणं आणि घर, गाडी इतर गुंतवणूक याबद्दलचे निर्णय घेणं इतकाच. मुलांचं शिक्षण, त्यांचं आजारपण, नातेवाईक, लग्नकार्य या साऱ्या मावशीने सांभाळलेल्या गोष्टी.
 तिची आई मावशीला नेहमी म्हणे, ‘‘मेघना, असं कसं चालतं तुला? काहीच कसं सतीशराव लक्ष घालत नाहीत घरात, मुलांत, हे सारं काय तुझ्या एकटीचं आहे का? कधीतरी तू बोलायला हवंस.’’
 अशा वेळी मेघना मावशी नुसतीच हसून, ‘‘अगं, चालायचंच, नसते एकेकाला आवड’’ असं म्हणत तो विषय संपवत असे. पण तिने अक्षरश: एकटीने अनेक गोष्टी सांभाळल्या. नाती जपली, आपल्या मत्रिणींचा ग्रुप जपला. रोहित आणि वीणा यांना अनेक गोष्टींची गोडी लावली, त्यांचा सर्वार्थाने विकास घडवण्यात तीच तर झिजली. ते दोघं शिकले, पुढच्या शिक्षणासाठी परदेशी गेले, यथावकाश अनुरूप जोडीदार मिळून त्यांची लग्नंही झाली. त्याच सुमारास काव्याही लग्न करून दुबईला गेली आणि तिथलीच झाली. मावशी कर्करोगाने गेल्यावरही तिला येता आलंच नव्हतं. फोनवरच ती रोहित आणि वीणाशी बोलली होती.
काव्या अशी आठवणीत गढून गेली असतानाच काका ट्रेमध्ये दोन ग्लास पन्ह्य़ाचे घेऊन आले.
त्यातला एक तिच्या हाती देत म्हणाले,
‘‘ काव्या तुला आश्चर्य वाटणं साहजिकच आहे गं, मला असं घरात काही काम करताना पाहून आणि तेही तुझी मावशी नसताना.’’
‘‘हो काका, कारण तुम्हाला फारसं कधी आम्ही घरीच पाहिलेलं नाही.’’
‘‘खरं तर मला घर-संसार, नातेवाईक या गोष्टींची मुळात कधी आवड नव्हतीच, त्यातून त्याकाळी आई-वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करावं लागलं याचा राग होताच. त्या काळी बायका शिकत पण नोकरी वगरे फारशा नसत करत. पण मला वाटे बायको नोकरी करणारी असावी, पण मेघनाची तशी इच्छाच नव्हती. एकंदरीतच माझ्यासाठी हे एक लादलेलं लग्न होतं. त्या रागापोटी घराकडे कधी लक्षच दिलं नाही. ऑफिसमधल्या परीक्षा देत पुढे जात राहिलो, उरलासुरला वेळ मित्र मंडळ होतंच सिंहगड, पर्वती किंवा बुद्धिबळाचे डाव मांडून बसायला. जेवायला, झोपायला फक्त घरी असाच त्याकाळी माझा दिनक्रम होता. मेघनाने हळूहळू घराचा ताबा घेतलाच होता, यथावकाश मुलं झाली, त्यांच्या मोठं होण्यातही माझा विशेष वाटा नव्हताच. तिने कधी या गोष्टीची तक्रार केली नाही, एकटीवर सारं पडतं म्हणत कधी त्रागा नाही केला ना कधी आमचं भांडण झालं. संवादच नसेल तर विसंवाद तरी कुठून येणार होता म्हणा. पुढे रोहित, वीणा शिकायला परदेशी गेले तेव्हा कुठं पहिल्यांदा मला जाणवलं हे सारं मेघनाचं कर्तृत्व आहे. दोघांनीही तिथेच शिकत असताना आपापले जोडीदार निवडले, तेही असेच उच्चशिक्षित, सालस. मेघनाचा गाढ विश्वास होता तिच्या संस्कारांवर. तिचा पािठबा होताच, सारं कसं छान, सुरळीत चालू होतं. पण मी त्यात कुठेच नव्हतो.’’
‘‘पण मी निवृत्त झालो आणि काही काळ तरी दिवसभराचा काळ मला घरात घालवावा लागू लागला. नकळत का होईना मेघना दिवसभर घरासाठी काय काय करते ते लक्षात येऊ लागलं. मी साठीत पोहोचलो म्हणजे तीही पंचावन्नची होतीच की. सकाळी उठून योगासनं, चहा-नाश्ता, मग पेपर वाचन, थोडं बागकाम, देवपूजा, रांगोळी मग स्वैपाक, इतर आवराआवर, मग दुपारी अंधशाळेत ती जात असे, तिथे लहान मुलांना गोष्टी सांग, लहानसहान गोष्टी करायला शिकवायला, तिथून परत आली की मग संध्याकाळचं चहापाणी, मग एखादी मत्रिणींबरोबर चक्कर, घरी येऊन पुन्हा स्वैपाक, रात्री टी. व्ही पाहून झोप. पण या तिच्या दिनक्रमात मी स्वत:ला कुठं आणि कसं बसवावं हेच मला कळत नसे. जो काही संवाद आमच्यात होता तो फारच कामापुरता असे.’’
‘‘तेव्हाच नेमका मी एकदा सकाळी पर्वतीहून येत असताना स्कूटरला एका गाडीने ठोकलं आणि पाय फ्रॅक्चर होऊन सलग चार महिने घरी बसून राहायची माझ्यावर वेळ आली. तेव्हा माझं करणं हे अजून एक वाढीव काम  होऊन बसलं तिच्यासाठी. हे सारं करताना काय त्रास आहे ही तिची भावना कधीच नव्हती. मुलांचा फोन येत असे, माझ्यापाशीच कोर्डलेस ठेवलेला असे, पण तो उचलताच तिकडून ‘‘बाबा कसे आहात, पाय बारा आहे का आता,’’ असं विचारून लगेचच ‘‘जरा आईला फोन देता?’’ असं विचारत, तिच्याकडे फोन गेल्यावर मात्र पुढचा कित्येक वेळ त्यांच्या गप्पा चालत. कुठेतरी दुखावला जात असे मी. पण त्या काळात झालं असं की सक्तीच्या विश्रांतीने मी या घराकडे, मेघनाकडे एकंदरीतच तिच्या घर आणि मुलं यांच्यातील गुंतवणुकीकडे पाहू लागलो. हळूहळू लक्षात येऊ लागलं की घर उत्तम रीतीने सांभाळत तिने आपलं एक वेगळंच विश्व निर्माण केलं आहे. ज्यात तिचे पुस्तक भिशीचे ग्रुप्स आहेत, अंध मुलांची शाळा आहे. मी पुरता नास्तिक. कळता झाल्यापासून कधी मी देवाला हात जोडले नव्हते, पण मेघनामुळे घरात देव होते, त्यांची रोज पूजा होत असे, घराच्या बागेतली फुलं त्यांच्यासाठी असत, दारात रांगोळी असे, सांजवात कधी चुकत नसे. दिवसेंदिवस मला तिच्या या सगळ्या गोष्टी इतक्या जीव लावून करणाऱ्या  स्वभावाचंच कौतुक वाटू लागलं, आणि कुठेतरी खंतदेखील, की हे विश्व आपलं होतं आणि आपण आपल्या हेकटपणाने या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलो.’’
‘‘पण याच जाणिवेने आमच्या दोघांतला संवाद कुठेतरी पुन्हा जुळून येऊ लागला. मेघनानेही हा माझ्यातला बदल लक्षात घेत मनापासून साथ दिली आणि साठीला पोहोचता आमचं खऱ्या अर्थाने सहजीवन सुरू झालं. मेघनासोबतचे दिवस एक अमूल्य ठेवा आहे, ज्याने मला खूप समृद्ध केलं. सकाळी पहिला चहा बनव, बागकाम कर, देवपूजेसाठी फुलं ठेव, घराबाहेर पडताना आवर्जून बाहेरून काही आणायचं आहे का ते विचारून घेऊन ये, दर रविवारी आठवडय़ाची भाजी आण अशी अनेक छोटी छोटी कामं करण्यात मी रस घेऊ लागलो. तिच्यासाठी महत्त्व मी ती कामं करण्याचं नव्हतंच, तर एकमेकांसोबत, एकमेकांसाठी ही कामं करण्याचं होतं.
 ‘‘अर्थात हे फार काळ नशिबी नव्हतंच. कारण त्यानंतर जेमतेम ३ वर्षांनी तुझ्या मावशीला कर्करोग  झाला. जिने इतक्या कष्टाने हे घर, ही माणसं घडवली तिच्या अखेरच्या काळात तिला थोडेतरी आनंदाचे क्षण वाटय़ाला आले. ते मी देऊ शकलो हेच फार झालं.’’
‘‘आज ती नाहीये. पण ती करत असलेली प्रत्येक गोष्ट तशाच पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तिच्याइतक्या चांगल्या नसतील जमत मला, पण.. जसं तिने ठेवलं होतं तसं घर, जी जी कामं ती या घरासाठी तन्मयतेने करे ते प्रत्येक काम करण्याचा मी प्रयत्न करतो’’
 ‘‘काका मी समजू शकते आता तुम्हाला नक्की काय वाटतं ते. आता सोडून द्या पूर्वी काय घडले ते कटू विचार. आयुष्यातील शेवटची काही वष्रे तुमच्या साथीने आनंदात गेली हाच आनंद तिच्यासाठी खूप असणार. मी निघू आता? काळजी घ्या.’’
असं म्हणून काव्या पाणावलेल्या डोळ्यांनी बाहेर पडली खरी, पण बाहेर पूर्वीसारखीच फुललेली टवटवीत बाग पाहताच चेहऱ्यावर पसरलेलं एक हसू घेऊनच.    
अनघा आपटे -anaghaapte95@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2015 1:55 am

Web Title: international womens day 5
Next Stories
1 संसार दोघांचा, मग..
2 आर्थिक स्वातंत्र्य हवंय कुणाला?
3 मान, सन्मान, आदर महत्त्वाचा
Just Now!
X