ch00‘संसार दोघांचा आहे. ’ तेव्हा त्यातील जबाबदारी, गुंतवणूक, मिळकत, खर्च या गोष्टींचेही समान वाटप व्हायला हवे. तसेच स्त्री-पुरुष समानता ही दैनंदिन जीवनातही, प्रत्येक जबाबदारीत, कामांचे वाटप करतानाही ती दिसली पाहिजे. त्यात तुझं-माझं करून हिशोब लावत बसलो तर परकेपणा वाढेल, असं मत व्यक्त केलंय पुणे येथील पूर्णवेळ गृहिणींनी.
दरवर्षी नेहमी-प्रमाणे आनंदात- उत्साहात महिलादिन साजरा (!) होत असतो, त्यानिमित्ताने चर्चा-परिसंवाद-व्याख्याने-शिबिरं अशा अनेक माध्यमांतून वेगवेगळ्या स्तरातील स्त्रियांच्या समस्या व मूलभूत हक्क यांवर प्रकाश टाकला जातो. संगणकीय युगातील २१व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना आज प्रत्यक्षात किती प्रमाणात खरोखरीच सकारात्मक प्रतिसाद आहे? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.
 कुटुंबाच्या पालणपोषणासाठी ‘पूर्णवेळ गृहिणी’ हे पद स्वीकारून आपले आयुष्य त्यासाठीच समर्पित करणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. पदवीधर असतानाही नोकरी करून अर्थाजन न करण्याचा स्वत:च्या करिअरपेक्षा कुटुंबाला वेळ देण्याचा त्यांचा निर्णय अनेकदा त्यांचा स्वत:चा असतो, तर कधी कुटुंबाने लग्नानंतर, ‘मी आहे ना आता, भरपूर कमावतो आहे ना? मग तुला नोकरी करण्याची काय गरज?’ असे म्हणत घ्यायला लावलेला असतो. खरं तर ‘गृहिणी’ ही गृहव्यवस्थापक, अर्थतज्ज्ञ, समुपदेशक, उत्तम शिक्षक, आहारतज्ज्ञ, सल्लागार,  माता, पत्नी, कर्तव्यदक्ष सून अशा अनेक पदांवर एकाच वेळी काम करीत असते. तिने जर गृहिणीपदाचा मोबदला मागायचा ठरवला तर तो लाखांच्या घरात जाईल. तरीसुद्धा या पूर्णवेळ गृहिणीला, ‘तू काय रोज घरीच असतेस ना दिवसभर, मग काय तुला भरपूर वेळ असेल मोकळा. घरी असणाऱ्यांना काम काय असतं?’ अशा क्लेशदायक विधानाचा दररोज सामना करावा लागतो.
 खरंच ‘गृहिणीला’ तिच्या कामांचा ‘मोबदला’ मिळावा का? तिला एक व्यक्ती म्हणून कुटुंबात सन्मान आहे का? वैचारिक, आर्थिक स्वातंत्र्य आहे का? तिचे भविष्य सुरक्षित आहे का? तिला तिच्या स्वत:साठी वेळ आहे का? मोबदला मिळावा असं वाटलं तर तो कुठल्या स्वरूपात असावा असं तिला वाटतं? अशा प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पुण्यातील वेगवेगळय़ा रहिवासी भागांतून शैक्षणिक-आर्थिक-सामाजिक अशा वेगवेगळय़ा स्तरातील पूर्णवेळ गृहिणींशी संवाद साधला. सुरुवातीला ‘गृहिणींना मानधन’ हा प्रश्न, हा विचारच अनेकींना पटला नाही. ‘आपलेच घर-आपलीच माणसं-आपला स्वत:चा संसार आणि त्यातील घरकामाचा मोबदला मागण्याचा प्रश्नच येत नाही. ते तर प्रत्येक स्त्रीचे कर्तव्यच आहे. आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे.’ असा सूर अनेकींनी लावला. ‘उगाच असले प्रश्न निर्माण करून आम्हाला घरात वाद वाढवायचा नाहीये’ आणि ‘हे असले प्रश्न जर कुटुंबातील सदस्यांसमोर मांडले तर ते हास्यास्पद ठरून एक ‘पांचट विनोद’ म्हणून तो विचार धुडकावून लावला जाईल.’ अशी प्रतिक्रिया       २० टक्के पदवीधर गृहिणींकडून आली. त्यामुळे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे एक रिकामटेकडी बाई, काहीतरी टाइमपास म्हणून हे फार्म घेऊन फिरते आहे, तेव्हा उगाच आपल्या घरात हे लोण नको.’ असा असल्याचा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसूनही मी तो मनाआड केला. मात्र या मानसिकतेचं कारण म्हणजे, आजपर्यंत स्वत:चा-स्वत:शी सुसंवाद करायला वावच मिळाला नसेल का? की कुठेतरी भावनिक असुरक्षितता जाणवत असेल? असंही वाटून गेलं.
ch19 ch20
‘गृहिणी’ म्हणून घरातील कुठली कामे तुम्हाला करायला लागतात? या प्रश्नावर दिवसभरातील कामांची भलीमोठी लांब यादीच गृहिणी वाचतात, अपवाद फक्त भांडी घासणे व लादी पुसणे या कामांसाठी, तोसुद्धा फक्त ५० टक्के घरांमध्येच. झोपेचे ८ तास सोडले तर १४ ते १५ तास त्या सतत कार्यरत असतात. ५ टक्के स्त्रियांनी आम्हाला घरात पुरुषांची मदत काही कामांमध्ये – उदा. मुलांचा अभ्यास घेणे (काही वेळा), त्यांना कधीतरी शाळेतून आणणे-सोडणे, विविध उपकरणांची दुरुस्ती, भाजी इ. आणणे, शाळेतील पालक सभेला जाणे, काही आर्थिक व्यवहार, मोठी खरेदी, वेळ असेल तर पाणी भरणे, पूजा करणे इ. होते. बाकी दररोजची सर्व कामे-जबाबदाऱ्या तक्रार न करता, प्रसंगी स्वत:च्या इच्छा-छंद बाजूला ठेवून त्या करीत असतात, सदैव आनंदाने, उत्साहाने आणि तेसुद्धा विनामोबदला. सर्वेक्षणानिमित्ताने हे माझ्या मैत्रिणींच्या लक्षात आले तेव्हा ‘आपणही एक स्वतंत्र्य व्यक्तिमत्त्व आहोत, आपल्यालाही स्वत:चे वेगळे अस्तित्व आहे’ असा स्वत:शीच एक संवाद सुरू झाला. हेसुद्धा उद्याच्या महिला दिनाचे फलितच म्हणायला हवे.
पदवीधर स्त्रियांनी सुरुवातीला/लग्नापूर्वी अर्थाजन करीत होतो, पण मुलं झाल्यावर ते सोडले व ‘गृहिणी’ म्हणून राहाण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले. हा केवळ त्यांचा स्वत:चा निर्णय की कुटुंबाची इच्छा या विषयी मात्र फक्त एकाच स्त्रीकडून ‘स्वत:चा निर्णय’ असे ठाम उत्तर आले. बाकी कुणाकडूनच याचे स्पष्ट उत्तर मिळाले नाही. परंतु त्यात एकच चांगली आणि सकारात्मक बाजू दिसली ती म्हणजे या पदवीधर गृहिणींना त्यांचे पती व कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्याकडून कौटुंबिक दैनंदिन कामांमध्ये-जबाबदारीमध्ये भरपूर सहकार्य मिळते. तसेच नोकरी सोडण्याच्या त्यांच्या निर्णयाचे कौतुक तर आहेच; परंतु त्यातूनही स्वत:चे छंद-आवड जपण्यास, एखादी कला आत्मसात करण्यासाठी घरचे प्रोत्साहन देतात. एवढेच नाही तर रोजच्या धबडग्यातून आम्हाला वेळ मिळावा यासाठी प्रयत्न करतात, असे आवर्जून सांगितले. असे सामंजस्य-समानता अधिकाधिक कुटुंबात बघायला मिळावी ही सदिच्छा करून मी पुढच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे वळले.
‘घरकामाचा मोबदला मिळावा की नाही तसेच तो कोणत्या स्वरूपात असावा. तसेच मिळकतीत पत्नीचा किती हिस्सा असावा असे वाटते? याविषयी वेगवेगळय़ा स्तरातील उत्तरांमध्ये खूप संदिग्धता जाणवली. सुशिक्षित आणि कमी शिक्षण असणाऱ्या सर्वच स्त्रियांमध्ये एक उत्तर समान होते, ‘पैशाच्या स्वरूपात मोबदला नाही मिळाला तरी किमान कुटुंबात सन्मानाची वागणूक मिळावी. ‘गृहिणी’ म्हणून गृहीत धरले जाऊ नये. पसंती, कौतुकाचे दोन शब्द कुटुंबातील सदस्यांकडून व खास करून पतीकडून मिळावेत’ अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच ‘गृहिणीचे’ ही शारीरिक-मानसिक स्वास्थ्य- आनंद याची कुटुंबाने काळजी घ्यावी. ती करीत असलेल्या दिवसभराच्या कष्टांची प्रत्येकाने किमान जाणीव ठेवावी. घरातील ‘स्त्री’ जसे इतरांचे मन जाणून त्यांना आनंद देते तसेच तिचेही मन-इच्छा जाणून घ्याव्यात व न सांगता त्या पूर्ण व्हाव्यात.’ आजही कुणीतरी दुसऱ्याने कौतुक केले, चांगले म्हटले तरच आपण सुगृहिणी-आदर्श माता- आदर्श स्त्री आहोत या विचारांचा पगडा एकविसाव्या शतकातही ‘स्त्री’ मनावर तसाच आहे. हे प्रकर्षांने जाणवले.
पुरुषप्रधान संस्कृतीतून समानतेवर आपण कधी येणार? ४० टक्के स्त्रियांनी ‘आजही घराची-संसाराची-मुलांची जबाबदारी हे ‘स्त्री’चेच कर्तव्य आहे. ती आपली भारतीय संस्कृती आहे. परंपरा आहे. त्यात नवीन काहीच नाही. त्याचा मोबदला घेण्याचा प्रश्नच येत नाही’ असे सांगितले. तसेच मोबदला घेतला तर मग घरकाम करणारी मोलकरीण आणि घरातील स्त्री यात फरकच काय? त्यामुळे आमचे घरातले स्थान-सन्मान कमी होईल. या स्त्रियांच्या मतांवर सामाजिक पगडा जाणवला. स्वत:पेक्षा इतरांच्या मतांना आपल्या आयुष्याच्या रांगोळीत स्वैर रेखाटन करण्यास मुभा देणारी हीच का ती संगणकीय युगातील स्त्री! आदिशक्तीची प्रतिमा! कुशल गृहिणी?
 ‘स्वत:ला’ खर्च करायचे स्वातंत्र्य आहे काय? या प्रश्नावर २० टक्के गृहिणींनी उत्तर दिले की, ‘खर्चासाठी पूर्णत: पतीवर अवलंबून असलो तरी घरखर्चाशिवाय आम्हाला स्वत:च्या खर्चासाठी मागितली तर पतीकडून काही रक्कम मिळते आणि त्याचा हिशेबही विचारला जात नाही. याशिवाय घर खर्चातून वाचवलेले पैसे आम्ही स्वत:साठी खर्च करू शकतो. तसेच मोबदला देण्यापेक्षा दरमहा काही विशिष्ट रक्कम ‘स्त्री’ला तिच्या वैयक्तिक खर्चासाठी द्यावी असे वाटते. परंतु त्यासाठी आग्रही भूमिका घेण्याची गरज वाटत नाही.
 घरातील आर्थिक व्यवहारात तुम्हाला सहभागी करून घेतले जाते का? या प्रश्नाचे उत्तर पदवीधर गृहिणींपैकी ६० टक्केजणींनी तर कमी शिक्षण व कमी आर्थिक उत्पन्न गटातीलही ६० टक्के गृहिणींनी होकारार्थी उत्तर दिले. येथे शिक्षण-आर्थिक स्तरातील तफावत दिसून आली नाही. घरातील गुंतवणूकविषयक व करविषयक सर्व गोष्टीत त्यांचे मत घेतले जाते, माहिती दिली जाते. तसेच त्यांच्या नावे काही गुंतवणूकही केली जाते व गृहिणींना याची माहिती असते, परंतु त्यांचा विनियोग करण्याचे निर्णयस्वातंत्र्य मात्र त्यांना एकटय़ाला नाही असे सांगितले.
त्याचबरोबर २० टक्के गृहिणींनी घरातील आर्थिक व्यवहारांची संपूर्ण माहिती नसली तरी प्रसंगी मोठे खर्च व गुंतवणुकीत आमचे मत विचारात घेतले जाते असे सांगितले. ‘गृहिणी’ म्हणून कार्यरत असतांना कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागते? या प्रश्नाला उत्तर देताना १३ टक्के स्त्रियांनी पुढील मत मांडले- स्वत:साठी वेळ काढताना आम्हाला कुटुंबातील इतरांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. कधीतरी नाहीच जमवता आले तर आमचे छंद-प्राधान्य बाजूला ठेवायला लागतात. बरेचदा कुठे बाहेर कार्यक्रमाला अथवा खरेदीला, मैत्रिणीकडे गेलो तरी वेळेचे दडपण असते. याबाबतीत थोडे स्वातंत्र असावे असे वाटते. आज आम्ही नोकरी करीत असतो तर आम्हाला अशी वेळेची मर्यादा लागली नसती. मग आम्हा गृहिणीलाच या मर्यादा का असाव्यात? हा अगदी आतल्या मनाचा आवाज- प्रश्न या गृहिणींनी बोलून दाखवला.
मोबदला मिळावा की नाही यासंबंधी स्पष्टपणे आणि धीटपणे उत्तर देणाऱ्या २५ टक्के महिलांनी मोबदला द्यायचाच असेल तर तो, पतीकडून मिळावा व दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम पत्नीच्या खात्यात जमा करावी, अथवा प्रत्यक्ष हातात यावी असे म्हटले. शिवाय या रकमेचा विनियोग कसा करायचा याचे पूर्ण स्वातंत्र्य तिला असावे. याशिवाय १० टक्के स्त्रियांनी ती रक्कम भविष्यनिर्वाह निधी या स्वरूपात भविष्याची तरतूद म्हणून वेगळी जमा व्हावी. त्यावर फक्त त्या गृहिणीचाच हक्क असावा. विशेषत: कमी शिक्षण व कमी उत्पन्न गटातील ७० टक्के स्त्रियांनी पैशाच्या स्वरूपातच घरकामाचा मोबदला मिळावा, असे सांगितले. त्यातील स्वयंपाकात व काही विशेष पदार्थ बनवण्यात कुशल असणाऱ्या एकीचे उत्तर फारच व्यावहारिक वाटले. ‘‘बाहेर स्वयंपाकाची अथवा काही खास पदार्थ करून विकण्याची संधी मिळाली तर घरकाम आणि स्वयंपाक हे दोन्ही सांभाळून मी महिन्याला किमान १५ ते २० हजार मिळवू शकते. मग मला ‘गृहिणी’ म्हणून कामाचे किमान दहा हजार मिळायला काय हरकत आहे? रोख नाही तर माझ्या नावे सेवानिवृत्ती योजनेत जमा व्हावे.’’ ३० टक्के गृहिणींनी जर असा काही नियमच अस्तित्वात आला तर आम्हाला मोबदला घ्यायला आवडेल, असे सांगितले तर उर्वरित ३५ टक्के गृहिणी घ्यावे की नाही या संभ्रमात आढळल्या.
 एक विचार मात्र ठामपणे आढळला तो की, ‘संसार दोघांचा आहे.’ तेव्हा त्यातील जबाबदारी, गुंतवणूक, मिळकत, खर्च या गोष्टींचेही समान वाटप व्हायला हवे. तसेच स्त्री-पुरुष समानता ही दैनंदिन जीवनातही, प्रत्येक जबाबदारीत, कामांचे वाटप करतानाही ती दिसली पाहिजे. त्यात तुझं-माझं करून हिशोब लावत बसलो तर परकेपणा वाढेल असे वाटते. त्याचबरोबर ५ टक्के स्त्रियांनी परखड मत मांडले ते असे की, ‘स्त्रियांच्या समस्या, गरजा या नवीन नाहीत. परंतु ही चर्चा, हा संवाद घरातील     पुरु ष मंडळींबरोबर, कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर तुम्ही करायला हवा. त्यामुळे त्यांना या विषयावर विचार करण्याची, त्याला महत्त्व देण्याची मनोवृत्ती तयार होईल. त्यानंतरच या समस्यांचे निराकरण होण्यास आणि सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास सोपे होईल. या सर्वेक्षणाच्या निमित्ताने मिळालेली ही प्रतिक्रिया बरेच काही गर्भितार्थ सांगणारी आहे.
वसुधा कर्दळे- पुणे -vasudhakardale@yahoo.co.in
(संकलन साहाय्य -मंजूषा आचरेकर)

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
mumbai malad 14 year old girl dies first period stress How to maintain mental health of a girl during the first period What should be the role of parents doctor said
पहिल्या मासिक पाळीवेळी मुलीचं मानसिक आरोग्य कसं जपावं? पालकांची भूमिका कशी असावी? वाचा…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा