ch00पूर्णवेळ गृहिणींना आर्थिकदृष्टय़ा परावलंबीच राहावं लागतं. कोल्हापूरमधल्या ७६ टक्के गृहिणींचा आर्थिक स्रोत पती आहे. स्वत:साठी घरखर्चातून वाचलेले पैसे वापरावे लागतात. नोकरी-व्यवसाय करून आर्थिक सक्षम होण्यापेक्षा चांगला संसार करून दाखवणंच लहानपणापासून मनावर बिंबवलं जातं. या गृहिणींच्या मानसिकतेत ते घट्ट रुतलं आहे.
‘‘हा फॉर्म घे गं, भरून दे पटकन’’ मी.
‘‘काय आहे?’’ ती.
‘‘वाच ना.’’
मैत्रिणीने प्रश्नावलीचा फॉर्म नजरेखालून घातला. ती जरा तुच्छतेने म्हणाली, ‘‘घरकामाचे कशाला लागतात गं पैसे. आपल्याच घरातून आपणच मोबदला घ्यायचा? काहीतरी नवीनच असतं तुझं.’’
‘‘ठीक आहे. तुला मोबदला नको असेल तर तो पर्याय निवड, पण फॉर्म भर. ती पेन सरसावून बसली. काही वेळाने तिने फॉर्म भरून दिला. मी उत्सुकतेपोटी त्यातील फक्त दोन प्रश्नांच्या उत्तरावर नजर टाकली. हे दोन्ही प्रश्न मत आणि दृष्टिकोन तपासणारे असल्याने माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते. एक होता, ‘मोबदला कशा स्वरूपात मिळावा?’ त्यासाठी तिने ‘मोबदला दरमहा पत्नीच्या खात्यावर जमा करावा’ हा पर्याय निवडला होता. तर दुसरा होता, ‘स्त्रिया कुटुंबासाठी करीत असलेल्या श्रमाचे आर्थिक मोल होणे योग्य आहे का?’ या प्रश्नालाही ती सहमत होती. तिच्याकडे बघून मी खुशीत हसले, अर्थात याचं कारण तिला कळलंच नाही.
घरकामाचा आर्थिक मोबदला असावा का, याबद्दलच्या थेट प्रश्नाला ‘आम्हाला नको’ असे उत्तर देणाऱ्या ८२ टक्के गृहिणींपैकी ८८ टक्के गृहिणींनी ‘मोबदला कशा स्वरूपात पाहिजे’ या प्रश्नावर दरमहा पतीने हातात द्यावे, दरमहा पत्नीच्या खात्यात जमा करावे, नोकरीच्या ठिकाणी पत्नीच्या नावे जमा व्हावे, हे पर्याय निवडले. तर उर्वरित १२ टक्के गृहिणींनी पर्याय निवडताना गोंधळ उडाल्याने ‘सांगता येत नाही’ हे उत्तर दिले.
निर्णयक्षमतेवर शिक्षणाचा वा मानसिकतेचा पगडा असल्याचे जाणवले. फॉर्मची माहिती आणि गुप्ततेची हमी देऊनही एक गृहिणी नवऱ्याला विचारल्याशिवाय फॉर्म भरू शकली नाही, तर दुसरी, ‘फॉर्म भरून देऊ का ते नवऱ्याला विचारून येते’ असे सांगून गेली ती परत आली नाही. साक्षर असलेल्या एका बाईने तो नवऱ्याकडूनच भरून घेतला, तर आणखी एकीने नवरा सांगेल तशी आणि तीच उत्तरे भरून दिली. दुसरीच्या पतीने तिचे मत विचारात न घेता (उत्साहाच्या भरात) स्वत:हून सगळा फॉर्म भरला आणि ‘मोबदला नको’ हाच पर्याय त्याने निवडला आणि त्यावरच तो शेवटपर्यंत ठाम राहिला. हे सगळे फॉर्म नव्याने भरून घ्यावे लागले. एकीचा नवरा फॉर्म मित्राकडे घेऊन गेला आणि तो भरल्यास इन्कम टॅक्सच्या कचाटय़ात तर आपण सापडणार नाही ना याची खात्री करून घेऊन आला. मगच त्याने तो बायकोला भरायला दिला. तरी बरं, यातील कुठल्याच माहितीचा गैरवापर होणार नाही, याची मी पूर्वकल्पना आणि खात्री दिली होती. कमी शिकलेल्या एकीने मुलीची मदत घेऊन तिच्याकडून मनासारखा फॉर्म भरून घेतला. एका पदवीधर महिलेने मात्र मैत्रिणीकडे बसून फॉर्म सोडवला, कारण घरी नेल्यावर नवऱ्याच्या पन्नास शंकांचे निरसन करावे लागेल हे तिला माहीत होते. शिक्षणामुळे तिला आलेले धाडस (!) आणि स्वयंनिर्णय तुलनेने मला महत्त्वाचे वाटले.
ch18
पूर्णवेळ गृहिणीने कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे ९५ टक्के गृहिणी घरातीलच नव्हे तर बाहेरीलही कामे करतात. १०० टक्के गृहिणींना वैयक्तिक खर्चासाठी, वैयक्तिक औषधोपचारासाठी आणि भविष्यातील तरतुदींसाठी पैशांची गरज लागते. असे सगळे असूनही बहुतेक स्त्रियांनी आपल्या श्रमाचे मूल्य वा घरकामाचा मोबदला या विषयावर कधीच विचार केलेला नाही, असे कबूल केले. ‘मोबदला हवा’ असा प्रस्ताव नवऱ्यासमोर मांडला तर त्याची प्रतिक्रिया काय असेल?’ या प्रश्नाला ३२ टक्के गृहिणींनी ‘आम्ही असा प्रस्ताव मांडणारच नाही’ असा नवीनच पर्याय उत्स्फूर्तपणे लिहिला. ४८ टक्के गृहिणींना असा प्रस्ताव मांडल्यास नवरा मोबदला देईल असे वाटते. मग तसा प्रस्ताव का मांडत नाहीत किंवा मांडणार का, यावर मौन बाळगले अथवा नकारार्थी मान हलवली.
मूल होण्यापूर्वी २८ टक्के गृहिणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे अर्थार्जन करत होत्या. त्यातील केवळ दोन टक्के गृहिणींनी स्वनिर्णयामुळे ते करणे सोडले, तर २६ टक्के गृहिणींनी कुटुंबाच्या पालनपोषणाला प्राधान्य देऊन अर्थार्जन करणे बंद केले. आता ते त्यांच्या इतक्या अंगवळणी पडले आहे की, २० टक्के गृहिणींना ते आपले नैसर्गिक काम आहे असे वाटते, तर ८० टक्के गृहिणींना ती आपली जबाबदारी आहे, असे वाटते. अर्थात एकीलाही ती कटकट आहे किंवा आपण फुकट राबतो, असे वाटत नाही. अगदी मनापासून ते त्यांनी स्वीकारले आहे. ६० टक्के गृहिणींना झोपेचे ८ तास सोडून किमान सतत ९ ते १२ तास काम करावे लागते आणि ६८ टक्के गृहिणींना आजारपणातही काम करावे लागते किंवा स्वत:च्या आवडीसाठी वेळ काढता येत नाही. त्याचमुळे असेल कदाचित, ५६ टक्के गृहिणींना कुटुंबाचे पालनपोषण एकटय़ा स्त्रीची जबाबदारी नाही याची कुठेतरी जाणीव आहे. त्यामुळे घरकामाची समान विभागणी हवी, असे त्यांना वाटते. स्त्रियांच्या मानसिकतेत होणारा हा फार मोठा बदल आहे आणि ती संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. ही आशादायक बाब वाटते.
प्रकृती ठीक नसताना २४ टक्के गृहिणींना उठून कामे ही करावीच लागतात. फक्त मासिक पाळीचे ३ दिवस काही जणींना विश्रांती मिळते. ‘सासूला चालत नाही, त्यामुळे मला चांगला आराम मिळतो’, असे एकीने सासूसमोरच सांगितले. सासूनेही स्मित हास्य करत संमती दर्शवली. ‘मग महिन्यातून दोनदा मासिक पाळी यावी असे वाटत असेल तुला’ अशा मी केलेल्या तिच्या चेष्टेला सासूसह फॉर्म भरायला बसलेल्या सगळय़ाच गृहिणींनी मोठय़ांदा हसून दाद दिली.
‘तुमच्या घरात कामाची विभागणी स्त्री-पुरुषांसाठी समान आहे? या प्रश्नाचे ३६ टक्के गृहिणींनी होकारार्थी दिले. मात्र कुठल्याही घरकामात ‘आम्हाला नवऱ्याची मदत होते’ असे एकाही स्त्रीने सांगितले नाही. मग ही समानता कशी, कोणत्या आधारावर, या प्रश्नावर त्या काहीच बोलल्या नाहीत. किंबहुना या प्रश्नाने त्यांना नव्याने विचार करायला भाग पाडले असावे, असे दिसले. आजही स्त्री-पुरुष यांच्या कामाची झालेली आखणी काटेकोरपणे तशीच आहे.
हे सर्वेक्षण करताना एक धक्कादायक अनुभव आला- तो म्हणजे पदवीधर, उच्चपदवीधर आणि व्यावसायिक  पदवीधर असलेल्या स्त्रियांचा अर्थार्जनाबाबत वा करिअरबाबत असलेला उदासीन दृष्टिकोन. या सर्वेक्षणात ५८ टक्के पदवीधर आणि १२ टक्के उच्च व व्यावसायिक पदवीधर स्त्रिया होत्या. ‘आपल्या पदवीचा अर्थार्जनासाठी कसा उपयोग होऊ शकतो?’ असा मी प्रश्नावलीच्या पलीकडचा प्रश्न पदवीधर गृहिणींना विचारला. त्याचे उत्तर फक्त एकीने दिले, ‘हो, टय़ूशन क्लास काढता येतील. बाकीच्यांना बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. पदव्या अर्थार्जनासाठी कुचकामी वाटत होत्या. तसेच केवळ ‘चांगले स्थळ मिळावे’ या हेतूने त्यांना पदवीपर्यंत शिकवले होते आणि आता त्यांच्या दृष्टीने पदवीचा उपयोग संपला होता. व्यावसायिक पदवीधर स्त्रियांमध्ये दोन वकील, एक बी.सी.ए., एक आहारतज्ज्ञ अशा आणि काहींनी एम.कॉम., एम.ए.चे पदव्युत्तर शिक्षणही घेतलेले होते. त्यातील एका ४५ वर्षांच्या गृहिणीने तर आपण एल.एल.बी. आहोत हेही विसरल्याचे तिने कबूल केले. या वास्तवाचा स्वीकार करणे कठीण होते. याचमुळे उच्च शिक्षणाचा फायदा तरी त्या आपल्या कुटुंब व्यवस्थापनात करत असाव्यात का, हा प्रश्नच आहे.
कामाचं कौतुक झालं, घरात मान मिळाला तरी गृहिणींना पुरेसे वाटते. कौतुकाच्या त्या भुकेल्या आहेत. १०० टक्के गृहिणी कौतुक झाले नाही तर नाराज होतात. काही जणी नवऱ्यापेक्षा आपले जास्त कौतुक होते यावरच खूश आहेत. कौतुक केल्यावर घराबद्दल ओढ वाटते आणि अधिक काम करण्याला प्रोत्साहन मिळते. ‘आई छान करते’ हे ऐकून अभिमान वाटतो, ‘मटण खावे तर आमच्या बायकोच्या हातचेच’ हे ऐकल्यावर आभाळ ठेंगणे होते. कौतुक झाले की आपण दखलपात्र आहोत असे वाटते, हे सांगतानाही या गृहिणींचा चेहरा फुलला होता. असं कौतुक व्हावं यासाठी १०० टक्के गृहिणी जीवाचे रान करतात, पण फक्त ८० टक्के गृहिणींच्या वाटय़ाला हे कौतुक येते, ही खेदाची बाब आहे.
तुमच्या या घरकामाचे मूल्य करायचे झाले तर किती कराल? तुम्ही करत असलेले काम दुसऱ्या व्यक्तीकडून करून घ्यायचे झाल्यास किती पैसे मोजावे लागतील, या प्रश्नाचे उत्तर ६० टक्के गृहिणींना देता आले नाही. तसा विचारच कधी मनात आला नाही, अशी एकीने प्रांजळ कबुली दिली. दुसऱ्या बाजूने त्या स्वत: अर्थार्जन करू लागल्या. नोकरी, क्लास घेतले तर किती कमवू शकतील याचाही त्यांना अंदाज नाही. व्यावसायिक पदवीधरांनी मात्र किमान २५ ते ३० हजार मासिक इतके कमवू शकतो, असे सांगितले.
७६ टक्के गृहिणींचा आर्थिक स्रोत नवरा आहे, तर २० टक्के गृहिणींचा घरखर्चातून वाचलेले पैसे हा आहे. कधी नवऱ्याने ते दिले नाहीत किंवा तो देऊ शकला नाही किंवा एखाद्या महिन्यात पैसे वाचवता आले नाहीत तर ८८ टक्के गृहिणींना आपल्या गरजा तशाच ठेवायची अथवा पुढे ढकलण्याची किंवा त्या मॅनेज करण्याची सवय लागली आहे. ४ टक्के गृहिणीं कोटय़धीश गटातील आहेत. पण त्यांच्यातही आपलंही आयुष्य आहे आणि ते आपल्यासाठीही एकदाच मिळालं आहे ते जरा स्वत:साठीही जगावं, असा सकारात्मक दृष्टिकोन आढळला नाही. अगदी तिशी-पस्तिशीतल्या स्त्रियांनाही फक्त आणि फक्त मुला-बाळांसाठीच माझे आयुष्य असे वाटते.
१०० टक्के गृहिणींमध्ये कोणत्या न कोणत्या स्वरूपात अर्थार्जन करण्याचे ज्ञान-क्षमता-कौशल्य आहे, तरीही त्यांनी स्वत:ला घराच्या कोशात गुरफटून घेतले आहे. परिणामी, कोणतंही काम पुढे होऊन करण्यातला आत्मविश्वास त्या हरवून बसलेल्या जाणवल्या. भित्रेपणा वाढल्याचे जाणवले, तसेच स्वत:चे व्यक्तिमत्त्व हरवून बसलेल्या जाणवल्या. अर्थार्जन करण्याची त्यांची इच्छा अक्षरश: मेली आहे. आर्थिक सुरक्षितता हे त्यांच्या उदासीनतेचे मूलभूत कारण आहे. अगदी १० ते २० हजार मासिक उत्पन्न असणाऱ्या गृहिणींनीही आपल्या कुटुंबाच्या राहणीमानाचा दर्जा ठरवून घेतला आहे, तो त्यांना बदलायचा नाही. ‘नवरा कमवतो ना, भागते त्यात’ असा त्यांचा स्वत:चा दृष्टिकोन आहे. सुरक्षित क्षेत्राच्या, कम्फर्ट झोनच्या  बाहेर यायला त्या तयार नाहीत. त्या हे मुद्दाम करतात असे नाही, तर त्यांना सवय लागून गेली आहे.
स्वत:च्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी बाहेर पडावे असे या गृहिणींना वाटत नाही, हेच या सर्वेक्षणातून दिसते आहे. काही जणी सहज सांगून गेल्या की, करिअर केले पाहिजे याऐवजी संसार चांगला सांभाळता आला पाहिजे हे आमच्या मनावर लहानपणापासून बिंबवले आहे. इथे मला त्यांच्या उदासीनतेचे दुसरे कारण सापडले. अर्थार्जनात केवळ पैसाच नाही तर व्यक्तिमत्त्व विकास लपलेला आहे हे त्यांना लहानपणापासूनच शिकवले गेलेच नाही.
मुलींनी नोकरी, व्यवसाय करून अधिकार पद मिळवून मुलग्यांसारखे समाजासाठी भरीव योगदान देऊन गौरव मिळवण्यापेक्षा चांगला संसार करून (?) दाखवून पालकांचे नाव राखावे हीच आजही पालकांच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. त्यांनी मुलींनाही तसेच घडवले आहे.
कुटुंबात कौतुक होत असले तरी आजही तिचा दर्जा दुय्यम आहे. तो बदलण्यासाठी ती घरात बसून आपल्या मुला-मुलीवर समानतेचे संस्कार करते का? तर तसेही दिसत नाही.
घरात बसून ती स्वत:च्या आरोग्याकडे तरी लक्ष देते का, तर तसेही दिसत नाही. प्रत्येक गृहिणीला सरासरी ४ ते ५ तास मोकळे मिळतात. त्याचा उपयोग ती स्वत:ची काळजी घेण्यासाठी, फीट ठेवण्यासाठी करत नाही. ‘कामे करून कंबर दुखते, थकवा येतो’ अशी अनेकींची तक्रार होती. अनेक वर्षांपासून त्यांनी स्वत:चे हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम तपासले नाही. ना त्या फिरायला जातात, ना व्यायाम करतात. त्यांच्या फुरसतीचे हे चार-पाच तास टी.व्ही. मालिका, पाककलेचे टीव्हीचे कार्यक्रम, भिशी यात जातात. फक्त एक गृहिणी वाचनगटाची सभासद आहे. फक्त १०-१२ टक्के गृहिणी वर्तमानपत्रे वाचतात. शारीरिक आणि बौद्धिक आरोग्यापेक्षा महिलांना जास्त रस हा टीव्ही मालिकांमध्ये पुढे काय होईल यात आहे. त्याची चिंता आहे.
त्यांनी स्वत:कडे ‘स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा माणूस’ या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यांची आणि परिणामी समाजाची परिस्थिती झपाटय़ाने बदलेल असे वाटते.
राजश्री साकळे – कोल्हापूर -rajashreesakle@gmail.com

salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Military persecution in Jammu and Kashmir will stop but policy will change
जम्मू-काश्मीरमधला लष्करी छळ थांबेल, पण धोरण बदलेल?
Constitution of India
संविधानभान: संविधानाचे चिरंतन मूल्य
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!