मुग्धा बखले-पेंडसे

शुभांगी जोशी-अणावकर

Jayjaykar20@gmail.com

अनेक शिक्षणतज्ज्ञ, मनोविकासतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ ‘मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत शिकू द्यावे,’ असे तळमळीने सांगत असतात. मात्र कधी समाजमनाचा रेटा, नातेवाईकांचा दबाव, मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा, तसेच आपला निर्णय चुकणार तर नाही ना याची भीती, इंग्रजी बोलताना आपल्या पाल्याला अडचण येऊ नये, त्याच्यात न्यूनगंड निर्माण होऊ नये, याची चिंता आजच्या पालकांना वाटत असते. त्या कात्रीत सापडलेल्या पालकांना निर्णय घेणे सुकर व्हावे, मातृभाषेतून शिकूनही चांगले करिअर करता येते, याची खात्री पटावी, यासाठी मराठी माध्यमातून शिकलेल्या व विविध क्षेत्रांत सर्वार्थाने यशस्वी असलेल्या व्यक्तींच्या मुलाखतीचं हे सदर दर पंधरवडय़ाने.

जग वेगाने पुढे जात असताना जागतिकीकरणाच्या रेटय़ात काही मूलभूत प्रश्न उपस्थित होत आहेत.  जगाची भाषा कोणती? ज्ञानभाषा कोणती? काळाबरोबर, जगाबरोबर चालायचे आहे तर आपल्या मुलाला कोणत्या भाषेतून शिक्षण द्यावे? मुलांच्या भवितव्याविषयी पालकांना काळजी वाटणे साहजिक आहे, त्यातून इंग्रजी माध्यमातल्या शाळेत घातले तर पुढील शिक्षण सुकर होईल का? आपण जसे मराठी माध्यमातून शिकलो तसेच त्यांना शिकवल्यास पुढील शिक्षण त्यांना ‘जड’ जाईल का? तसे झाल्यास भविष्यात त्याचा दोषारोप आपल्यावर येईल का? इंग्रजी माध्यमात शिकताना आपल्या संस्कृतीशी जोडलेली त्यांची नाळ तुटणार तर नाही ना? असे नानाविध प्रश्न आजच्या पालकांसमोर आहेत.

अनेक शिक्षणतज्ज्ञ, मनोविकासतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ ‘मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत शिकू द्यावे,’ असे तळमळीने सांगत असतात. तेसुद्धा काही पालकांना पटत असते. ‘आपणही मातृभाषेतूनच शिकलो, आपले काही अडले नाही,’ हेसुद्धा कळत असते, मात्र कधी समाजमनाचा रेटा, नातेवाईकांचा दबाव, मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा, तसेच त्या शाळांमधील विद्यार्थी आणि पालकवर्गाशी आपल्या पाल्याचे आणि आपले पटेल का अशा शंका, निर्णय चुकणार तर नाही ना याची भीती, इंग्रजी बोलताना आपल्या पाल्याला अडचण येऊ नये, त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये, याची चिंता, पाल्याचे करिअर नीट होईल ना याची काळजी, अशा अनेक खाचखळग्यांतून मुलांच्या शिक्षणाची गाडी कशी चालवावी, हे पालकांना कळेनासे होते.

काही वेळा मुलांचा शाळाप्रवेश हा विनाकारण पालकांच्या ‘स्टेटस’चाही प्रश्न बनतो. इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा समजली जाते. ही ‘साहेबी भाषा’ आपल्या मुलांसाठी जगाची दारं खुली करेल असा (गैर)समज काही जणांच्या मनात पक्का रुतून बसलेला असतो. याच समजापोटी शिक्षणाचा खर्च परवडत नसतानाही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या, वेगवेगळ्या बोर्डाच्या (आय.सी.एस.सी., सी.बी.एस.सी., आय.बी.) शाळांमध्ये घातले जाते. तर काही वेळा पालकांच्या फिरतीच्या नोकरीमुळे, वारंवार बदली होत असल्याने मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह सोडून देत पाल्याला शाळांच्या उपलब्धतेनुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे भाग पडते. एका बाजूला पालकांची ही स्थिती तर दुसऱ्या बाजूला ‘मराठी शाळा बंद पडत आहेत’, ‘त्यांची पटसंख्या रोडावत आहे,’ अशा बातम्या येत असतात.  यामुळेही बरेच पालक आपल्या पाल्याला मराठी शाळेत घालायला धजावत नाहीत. अशा कात्रीत सापडलेल्या पालकांना निर्णय घेणे सुकर व्हावे, मातृभाषेतून ‘शिकूनही चांगले करिअर करता येते’, याची खात्री त्यांना पटावी, त्याच वेळी मुलांनाही शिक्षण सुलभ, आनंददायी वाटावे, त्यांच्या जीवनविकासासाठी पूरक ठरावे, मराठी भाषेला व शाळांना पुन्हा चांगले स्थान प्राप्त होण्यासाठी आपला हातभार लागावा, असा या सदराचा- पालक, मुले व मराठी भाषा असा त्रिस्तरीय उद्देश आहे.

मराठी माध्यमातून शिकलेल्या आणि  विविध क्षेत्रांत (शिक्षण, उद्योग, संशोधन, अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, वैद्यकीय, मनोविकास, अकाउंटिंग, नागरी सेवा आदी) सर्वार्थाने यशस्वी असलेल्या व्यक्तींच्या मुलाखती या सदरातून वाचायला मिळतील. त्यातून त्यांना या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या गोष्टींना तोंड द्यावे लागले, त्यावर त्यांनी कशी मात केली, ‘मराठी माध्यमातून शिक्षण’ हा त्यांच्यासाठी अडसर ठरला का, याबाबतचे अनुभव ते सांगतील. त्याबरोबरच परदेशात जाऊन अनेकविध क्षेत्रांत मान्यता मिळवलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्यांचाही दृष्टिकोन वाचकांपुढे ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. मातृभाषेतून शिक्षण त्यांच्या करिअरसाठी वरदान ठरले, की अडचणीचे झाले हे या सदरातून जाणून घेऊ, जेणेकरून पालकांना पाल्यांच्या भविष्याबाबतचा कळीचा निर्णय घेण्यास मदत व्हावी. आज ज्यांचे वय चाळीस ते पन्नास या दरम्यान आहे, त्यांच्या मुलाखतींचा यात समावेश असेल. कारण साधारणत: या काळात इंग्रजी शाळांचं पेव फुटायला सुरुवात झाली होती. पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणं मोठेपणाचं, प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाऊ लागलं होतं.

या सदरासाठी अभ्यास करत असताना आमच्या निदर्शनास आले, की आपण भारतीय आपली मातृभाषा सोडून इंग्रजीच्या मागे धावतो, मात्र जगात कित्येक देश असे आहेत, की त्या नागरिकांना आपापल्या मातृभाषेचा अत्यंत अभिमान आहे. पेरू, न्यूझीलंड या देशांमध्ये राज्यकर्त्यांनी स्थानिक भाषांना जाणीवपूर्वक दुय्यम दर्जा दिल्याने त्या ऱ्हासाच्या मार्गावर होत्या. पण गेल्या काही दशकांत तिथे मातृभाषेचा अभिमान वाढवण्याचे आणि हा ऱ्हास रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इस्रायलसारख्या नवनिर्मित देशाने तर मृत:प्राय झालेली आपली हिब्रू भाषा प्रयत्नपूर्वक पुनरुज्जीवित केली आहे. इतकी, की आता अमेरिकेतील ज्यू लोकसुद्धा आपल्या ‘रविवारच्या शाळे’त मुलांना हिब्रू शिकवतात. (‘रविवारची शाळा’ म्हणजे अमेरिकेत राहणाऱ्या अ-अमेरिकी लोकांनी आपापली भाषा, संस्कृती जपण्यासाठी चालवलेल्या शाळा.)

महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्रायली लोक इंग्रजीही सफाईने बोलतात. म्हणजे मातृभाषा जपण्यामुळे त्यांच्या इंग्रजी बोलण्यात काही आडकाठी आलेली नाही. हे जर त्यांनी साध्य केले आहे तर आपल्याकडे तसा प्रयत्न का करू नये. परदेशातील या प्रयत्नांचे अवलोकन, त्यामागची त्यांची भूमिका आणि त्यांच्या यशाचा सविस्तर आढावा घ्यायचा या सदराचा प्रयत्न राहील.

विविध क्षेत्रांत आपली मुद्रा उमटवलेले मान्यवर मातृभाषा आणि शिक्षणाबाबत जी अंतर्दृष्टी देतील, ती पाल्यांसह पालकांनाही घडवणारी असेल, हे नक्की!

मुग्धा बखले-पेंडसे, सध्या कॅलिफोर्नियात एका सॉफ्टवेअर कंपनीत ‘व्हाइस प्रेसिडेंट’ म्हणून कार्यरत आहेत. इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी घेऊन अमेरिकेत शिष्यवृत्ती मिळवत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर विशेष प्रावीण्यासह एम.बी.ए. केले. महाविद्यालयीन जीवनात ‘लोकसत्ता’ आणि ‘सामना’मधून प्रासंगिक लेखन तसेच ‘आकाशवाणी’ आणि ‘दूरदर्शनवर’ही विविध कार्यक्रम केले आहेत. मराठीविषयी प्रेम आणि अभिमान असल्याने स्थानिक मराठी शाळेत स्वयंसेवी शिक्षिका म्हणूनसुद्धा त्या काम करतात. ‘ग्लोबल सोशल बेनिफिट्स इन्स्टिटय़ूट’मध्ये सामाजिक उद्योजकांना त्या विनामूल्य मार्गदर्शन करतात.

शुभांगी जोशी -अणावकर, या ‘बृहन्मुंबई महानगरपालिके’मध्ये यांत्रिकी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. अभिनय व साहित्याची त्यांना आवड असून ‘राज्य नाटय़ स्पर्धे’त त्यांनी अभिनयाचे पारितोषिक मिळवले आहे. कवयित्री शांताबाई शेळके यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रमाचे लेखन व सादरीकरण त्यांनी केले आहे. अभिवाचन, मराठी शुभेच्छापत्रे लेखन, कार्यक्रमांचे निवेदन ही त्यांची आवडती क्षेत्रं आहेत. ‘समता विचार प्रसारक संस्थे’च्या त्या कार्यकर्त्यां आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांनी मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले असून दोघेही आपापल्या क्षेत्रांत यशस्वी आहेत.