मुग्धा बखले-पेंडसे

शुभांगी जोशी-अणावकर

Jayjaykar20@gmail.com

‘‘इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायच्या माझ्या निश्चयामुळे मी एम.टेक.ला जाईपर्यंत इंग्रजी संभाषणात चांगला पारंगत झालो होतो. प्रयत्नपूर्वक मी माझे उच्चारही सुधारले होते. त्यासाठी मी इंग्रजी वृत्तपत्र मोठय़ाने वाचत असे. शेवटी तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे, माघार घ्यायची की मात करायची ते. मात करायची असेल तर तसे प्रयत्नही करायला पाहिजेत. जर्मन कंपनीत काम करायला लागल्यावर मी जर्मनही शिकलो. कुठलीही भाषा आत्मसात करताना सुरुवातीला चुका होणारच आणि त्याची लाज न बाळगता बोलत राहण्याचा सराव करणे याला पर्याय नाही.’’ जर्मनीच्या ‘बॉश’ कंपनीचे सीईओ विजय रत्नपारखे सांगताहेत त्यांनी इंग्रजीवर मात कशी केली..

विजय रत्नपारखे स्टुटगार्ट, जर्मनी येथील ‘रॉबर्ट बॉश इंजिनीअिरग अँड बिझिनेस सोल्यूशन्स लिमिटेड’ (आरबीईआय) या आंतरराष्ट्रीय कंपनीचे सप्टेंबर २०१९ पासून चीफ इन्फॉम्रेशन अधिकारी आहेत. हे पद भूषविणारे ते पहिलेच भारतीय आहेत. वार्षिक

६ लाख कोटींहून अधिक उलाढाल असणाऱ्या या कंपनीचे ते २०१० पासून अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहात होते. या पदावर असताना कंपनीचे भारत, मेक्सिको आणि व्हिएतनाममधील व्यवहार तसेच एकवीस हजारांहून अधिक कर्मचारी असलेल्या ‘बॉश’च्या जागतिक संशोधन संस्थेचे व्यवस्थापनही त्यांच्या अधिकाराखाली होते.

रत्नपारखे यांनी त्यापूर्वी ‘लार्सन अँड टुब्रो’, ‘इन्फोसिस’ आणि ‘टी.सी.एस.’ या कंपन्यांमधूनही वरिष्ठ पदांवर काम केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण पठणमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर अकरावी-बारावी औरंगाबादमध्ये करून त्यांनी केमिकल इंजिनीअिरगची पदवी घेण्यासाठी मुंबईच्या यू.डी.सी.टी.मध्ये (आजची आय.सी.टी.) प्रवेश घेतला. त्यांनी आय.सी.टी.मधून बी.केम्. आणि नंतर आय.आय.टी. मुंबईमधून एम.टेक. पदवी घेतली आहे. पठण ते स्टुटगार्ट अशा यशाच्या चढत्या कमानी काबीज करत असताना मराठी माध्यमामुळे त्यांच्यावर मर्यादा आल्या का, आणि त्या त्यांनी कशा पार केल्या ते त्यांच्याच शब्दांत..

प्रश्न:  विजयजी, पठणची शाळा सोडून तुम्ही अकरावीसाठी औरंगाबादला आल्यावर शिक्षणाचं माध्यम इंग्रजी झालं. हा बदल तुम्हाला कितपत जड गेला?

विजय: अकरावी-बारावीमधील आमच्या शिक्षकांना बहुतेक मुले मराठी माध्यमातून आल्याची जाणीव होती. त्यामुळे ते मदतीला तयार असत. भौतिकशास्त्राचे एक प्राध्यापक तर नेहमी सांगायचे, ‘‘समजलं नाही तर कितीही वेळा विचारा, मी तितक्या वेळा समजावून देईन; पण इंग्लिशमधूनच.’’ आणि मधूनमधून ‘‘काय, समजतंय का?’’ असं मराठीत विचारीत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी जवळीक वाटे. काही अडलं तर विचारायला लाज वाटत नसे. आमचे अकरावीतले इंग्रजीचे प्राध्यापकही चांगले होते. त्यामुळे मला इंग्रजी साहित्य, काव्य यातही गोडी निर्माण झाली. गणित/शास्त्र हे विषय इंग्रजीतून शिकताना मात्र मला फारशी अडचण आली नाही. शिवाय माझे वडील प्राध्यापक असल्याने मी शाळेत असताना मला बऱ्याच वेळा कॉलेजच्या ग्रंथालयातून पुस्तके आणायला पाठवत असत. तेव्हा तेथील ग्रंथपालही काही पुस्तके घेण्यास प्रोत्साहन देत असत. मग मीही काही पुस्तकं आणायचो स्वत:साठी. त्यामुळे माझं इंग्रजी वाचन माझ्या मित्रांपेक्षा नक्की जास्त होतं. त्याचाही फायदा झाला.

प्रश्न: त्यानंतरचं तुमचं शिक्षण मुंबईत आय.सी.टी.त झालं. तिथे काय अनुभव आले?

विजय: मुंबईला इंजिनीअिरग कॉलेजला गेल्यावर वातावरण बदललं. कारण आतापर्यंत शिक्षण जरी इंग्रजीमधून असलं तरी बहुतेक सगळं बोलणं मराठीतच होतं; पण मुंबईत मात्र संभाषणही इंग्रजीतून होतं. इतकंच काय, अर्ध्याहून अधिक मुलांना मराठी समजतही नसे. मग मी एक शब्दकोश  विकत घेतला. मनाशी ठरवलं, की माझ्या कितीही चुका झाल्या तरी मला इंग्रजीतून बोलायलाच पाहिजे. मी खूप चुका करत असे तरी त्यावर लक्ष ठेवून मी त्या सुधारतही असे. शिवाय इतरांच्या बोलण्याकडेही माझं बारीक लक्ष असे. त्यांचा शब्दांचा वापर, उच्चार यांचं मी निरीक्षण करत असे. एक लक्षात घ्यायला हवं की, इंग्रजीवर प्रभुत्वाचे दोन भाग आहेत. विषय समजणे आणि स्वत:ला व्यक्त करता येणे, संभाषण करता येणे. विषय आवडत असेल, संकल्पना नीट समजल्या असतील तर त्यांची इंग्रजी नावे वगैरे पटकन आत्मसात करता येतात. कारण ग्रॅव्हिटी म्हटलं काय किंवा गुरुत्वाकर्षण म्हटलं काय, शेवटी त्याचा अर्थ काय, परिणाम काय हे समजलं तर ते  सहज लक्षात राहतं; पण संवाद साधण्यासाठी इंग्रजी बोलण्याच्या सरावाची गरज असते. नाही तर साधा वर्गात प्रश्न विचारण्याइतका आत्मविश्वाससुद्धा राहात नाही आणि तसं झालं तर तुमचं कायमचं नुकसान होतं. त्यातून बाहेर येणं खूप कठीण. त्या वेळेला जर तुम्ही असे दोन भाग केले आणि म्हटलं, की मला विषय समजलेत, संकल्पना समजल्यात; पण मला त्या व्यक्त करता येत नाहीत, संभाषण जमत नाही, त्यासाठी मला प्रयत्न करायला पाहिजेत. मग त्यासाठी प्रयत्न म्हणजे काय? तर न लाजता, न घाबरता मित्रांशी, प्राध्यापकांशी सारखं इंग्लिशमधूनच बोलत राहायचं, कितीही चुका झाल्या तरी. त्याला काही दुसरा पर्याय नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषा अस्खलित बोलता यायला हवी असेल तर बोलताना त्याच भाषेत विचार करायची सवय लावून घ्यायला पाहिजे. आता मी जर्मन कंपनीत ‘रॉबर्ट बॉश’मध्ये काम करतो. माझ्या बऱ्याच मीटिंग्स जर्मन भाषेत असतात. म्हणून मी जर्मन शिकलो. त्या वेळीही मला हाच अनुभव आला.

प्रश्न: विजयजी, या काळात वर्गाबाहेर, म्हणजे मित्रमंडळींबरोबर वावरताना काही कमीपणा वाटला का?

विजय: आय.सी.टी. राष्ट्रीय स्तरावर प्रवेश देत असल्याने तिथं प्रांतिक भाषांतून शिकलेली मुलं खूप होती. त्यातल्या बहुतेकांचं इंग्रजी माझ्या इतपतच होतं. त्यामुळे इतरांनी कमीपणाची वागणूक दिली नाही तरी आपला आत्मविश्वास कमी असेल तर आपल्यासारख्याच मुलांबरोबर राहण्याचा आपला कल होतो. माझेही तसेच झाले. पहिल्या वर्षी मी इतर मराठी भाषिकांबरोबरच राहत असे; पण मग हळूहळू जशा ओळखी झाल्या, संभाषणाची सवय झाली तसा आत्मविश्वास परत आला. पण त्यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. संभाषणात्मक इंग्रजी म्हणजे बोली भाषा ही लेखी भाषेपेक्षा वेगळी असते. भाषेचा बाजही तुम्हाला शिकावा लागतो. नुसती पुस्तकं वाचून तो येत नाही. त्यासाठी इतरांचं निरीक्षण करण्याची सवय कामी आली.

प्रश्न: कॉलेजमध्ये तोंडी परीक्षा, सेमिनार वगैरे देताना काही अडचणी आल्या का?

विजय: हो तर, मला इंजिनीअिरगच्या दुसऱ्या वर्षांतली एक तोंडी परीक्षा अजूनही आठवतेय.. मला प्राध्यापकांनी प्रश्न विचारला आणि मला उत्तर येत होतं, पण बोलायला शब्दच सुचेना. शेवटी तेच म्हणाले, ‘‘तुला उत्तर येतंय हे मला माहीत आहे.’’ मग त्यांनीच जरा सुरुवात करून दिल्यावर मी सगळं उत्तर भराभर देऊन टाकलं. तसं पुन्हा होऊ नये म्हणून मी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी अधिक जोरात प्रयत्न सुरू केले; पण पुन्हा लक्षात घ्या, मला उत्तर माहीत होतं, विषय समजला होता, फक्त संभाषणावर गाडी अडली होती.

प्रश्न: पुढे नोकरी सुरू झाल्यावर काही अडचणी आल्या का?

विजय: नाही. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायच्या माझ्या निश्चयामुळे मी एम.टेक.ला जाईपर्यंत इंग्रजी संभाषणात चांगला पारंगत झालो होतो. प्रयत्नपूर्वक मी माझे उच्चारही सुधारले होते. त्यासाठी मी इंग्रजी वृत्तपत्र मोठय़ाने वाचत असे. शेवटी तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे, माघार घ्यायची की मात करायची ते. मात करायची असेल तर तसे प्रयत्नही करायला पाहिजेत. आता मला जर्मन भाषेतही बोलता येतं ते त्याचमुळे. कुठलीही भाषा आत्मसात करताना सुरुवातीला चुका होणारच आणि त्याची लाज न बाळगता बोलत राहण्याचा सराव करणे याला पर्याय नाही.

प्रश्न: सध्याच्या मराठी माध्यमाच्या शाळांबद्दल आपलं काय मत आहे?

विजय: मी स्वत: जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलो आहे. सरकारी शाळांना पुरेसा निधीच मिळत नाही. खासगी शाळांमध्ये ज्ञान-प्रबोधिनीसारख्या शाळा अजूनही उत्तम शिक्षण देत आहेत, त्यांना मागणीही आहे; पण सरसकट सगळ्यांनी इंग्रजी माध्यमाकडे धाव घेणंही बरोबर नाही. मुलांना इंग्रजीतून शिक्षण देण्यापेक्षा ती मराठीतून शिकत असली तरी पालकांना त्यांना शिकण्यात मदत करता येणं जास्त महत्त्वाचे आहे. जेव्हा कामकरी पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात, तेव्हा बऱ्याच वेळा त्यांची अपेक्षा असते की, मुलांना मॉलमध्ये किंवा फार तर फोन सेन्टरमध्ये नोकरी मिळावी आणि केवळ अशी नोकरी मिळावी म्हणून ते आवाक्याबाहेरची फी भरत राहतात. कदाचित आपल्या भाषेतून शिकून, प्राथमिक संकल्पना छान आत्मसात करून यातलीच काही मुलं एखाद्या क्षेत्रात जास्त चांगली नोकरी, जास्त यश मिळवू शकतील.

प्रश्न: मराठी भाषा जपण्यासाठी काय करावं?

विजय: मला असं वाटतं की, प्रत्येक भाषा ही त्या-त्या संस्कृतीची, जीवनपद्धतीचा आरसा असते. उदा. इंग्रजी भाषेत लाडक्या व्यक्तीला ‘सनशाइन’ म्हणतात, कारण तिथल्या ढगाळ हवेत सूर्यप्रकाश क्वचित मिळणारा आणि म्हणूनच अधिक कौतुकाचा. आपल्याकडे सूर्यप्रकाश भरपूर आणि जीव नकोसा करणारा. त्यामुळे आपल्या भाषांतून लाडक्या व्यक्तींना सौम्य चंद्राची, चंद्रप्रकाशाची उपमा दिली जाते.  स्थानिक भाषेत असे तपशील सहज सामावलेले असल्याने त्या भाषा जपणे अत्यंत जरुरीचे आहे आणि त्याला प्रत्येकाने जमेल तशी मदत केली पाहिजे. मला वाटतं की, आपण शास्त्र, वैद्यकीय, तंत्रज्ञान हे इंग्रजीतच ठेवावं, ते मराठीतून शिकवण्याचा आग्रह धरू नये; पण साहित्य, काव्य या गोष्टी आपल्या भाषेतून शिकाव्यात. त्या जपणं आता नव्या तंत्रज्ञानामुळे सहज शक्य आहे. आता अलीकडे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ग्रुप्समुळे किती तरी मराठी लेख वाचायला मिळतात.  नवीन तंत्रज्ञानाचा यासाठी अजून पद्धतशीरपणे कसा फायदा करून घेता येईल याचा विचार करायला पाहिजे.

प्रश्न: मराठी माध्यमातून शिकल्याने काय कमावले आणि काय गमावले असे  वाटते?

विजय: एकापेक्षा अधिक भाषा शिकणे हे मेंदूच्या वाढीसाठी पोषक आहे हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. मराठी भाषा येत असल्याने महाराष्ट्रात कोठेही प्रवास करत असताना कोणाशीही बोलता येते. लोकांशी त्यांच्या भाषेतून बोललं की त्यांना जवळीक वाटते. कोंकण, विदर्भ, मराठवाडा अशा वेगवेगळ्या भागांतल्या मराठी लेखकांचं साहित्य वाचलेलं असल्यानं आपल्याच राज्यातल्या वेगवेगळ्या भागांत जीवन पद्धतींमधील बारकावे लक्षात आले; पण तोटा काही झाला असं नाही वाटत मला. माध्यम बदलताना जर माझा आत्मविश्वास गेला असता तर तो एक तोटा झाला असता; पण माझ्या निर्धारामुळे आणि प्रयत्नांमुळे तसं नाही झालं माझ्या बाबतीत.