मुग्धा बखले-पेंडसे

शुभांगी जोशी-अणावकर

Marathi paper viral
यवतमाळ : पाटणबोरीत मराठीचा पेपर भ्रमणध्वनीवरून सार्वत्रिक
Ichalkaranji
कोल्हापूर : इचलकरंजी पाणी योजनेसाठी तज्ज्ञ समितीची स्थापना; मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, निर्णयावर टीका आणि स्वागत
Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल
Unseasonal rain Buldhana district
बुलढाणा जिल्ह्यावर निसर्ग कोपला! गारपीटसह अवकाळीचे थैमान; रब्बी पिकांची प्रचंड हानी

Jayjaykar20@gmail.com

‘‘ माझा अनुभव असा आहे, की एखादा विषय शिकणं आणि त्यावर प्रभुत्व मिळवणं यात फरक आहे. मातृभाषेतून शिकणाऱ्या मुलांना विषयावर प्रभुत्व मिळवणं जास्त सहज शक्य होतं. बहुतेक इंग्रजी माध्यमातल्या मुलांना इंग्रजी येत असलं तरी मातृभाषेच्या बाबतीत तडजोड करावी लागते. त्यांची ती पोकळी कधीच भरून येत नाही.

मी म्हणतो, की मातृभाषा शिका आणि इंग्रजीसुद्धा शिका. आपण बहुभाषिक व्हायला पाहिजे,’’ सांगताहेत खडतर परिस्थितीत शिकून जिल्हाधिकारी झालेले आणि सध्या ओडिशामधील गंजम जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी विजय कुलांगे.

विजय कुलांगे हे मूळचे नगर जिल्ह्य़ातल्या राळेगण म्हसोबा या गावचे. घरी वडील शिंपीकाम करत, तर आई मजुरीवर काम करत असे. विजय यांचं प्राथमिक शिक्षण गावातल्याच ‘जीवन शिक्षण विद्या मंदिरा’त झालं. पुढचं दहावीपर्यंतचं शिक्षणही गावातल्याच ‘श्रीराम विद्यालया’त झालं. अकरावी-बारावी त्यांनी नगरच्या निवासी हायस्कूलमधून केलं. त्यानंतर ‘डी. एड.’ आणि पुढे  शिक्षकाची नोकरी सांभाळून ‘बी. ए.’, ‘एम. ए.’, केलं.  पुढे विक्रीकर अधिकारी, तहसीलदार असा प्रवास करत ते  सध्या ओडिशामधील गंजम जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त आहेत. त्यांचं ‘आजचा दिवस माझा’ हे पुस्तकही प्रकाशित झालं आहे. शिवाय ते इंटरनेटवर ब्लॉग लिहितात. राळेगण ते गंजम हा त्यांचा प्रवास सुकर निश्चितच नव्हता. आपल्या अथक परिश्रमांनी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीनं त्यांनी यश खेचून आणलं. मराठी माध्यमात शिकल्यामुळे यात त्यांना कुठे अडचणी आल्या का, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न : विजय, तुमची इंग्रजी भाषेशी ओळख गावातल्याच शाळेत पाचवीच्या वर्गात झाली. पण मराठी माध्यमात असल्यानं दहावी होईपर्यंत इंग्रजीशी फक्त एक विषय म्हणूनच संबंध होता. मग नगरला महाविद्यालयात शिकताना कितपत  जड गेलं?

विजय : हो, माझ्यासाठी नगरला येईपर्यंत इंग्रजी हा फक्त एक विषय होता. महाविद्यालयात गेल्यावर वर्गात पहिल्याच  दिवशी गंमत झाली. तिथं ‘कॉन्व्हेंट’मधून आलेली २-३ मुलं होती. त्यांनी प्राध्यापकांना इंग्रजीतून प्रश्न विचारले, आणि त्यांना उत्तरंपण इंग्रजीतूनच मिळाली. माझी फारच पंचाईत झाली, कारण मला प्रश्न आणि उत्तरं दोन्ही समजली नाहीत. त्यामुळे सुरुवातीचे थोडे दिवस मी अगदी निराश झालो होतो.

डी. एड. करून शिक्षक व्हावं म्हटलं तर मी वयोमर्यादेपेक्षा लहान होतो. माझे वडील म्हणाले, की आता प्रवेश घेतला आहेस तर सहा महिने तरी पूर्ण कर. सहा महिने राहायलाच हवं म्हटल्यावर मी जरा अभ्यासात लक्ष घालायला लागलो. आम्ही गावाकडून आलेल्या मुलांनी एकत्र अभ्यास करायला सुरुवात केली. आम्ही एकमेकांना विषय समजावून देत असू आणि कधी अडचण आलीच तर प्राध्यापकांना विचारत असू. मुळात आम्हाला संकल्पना नीट समजलेल्या होत्या. त्यासाठी असलेले इंग्रजी शब्द समजून घेतले. थोडा शब्दसंग्रह वाढवला. खरं तर नेहमीच्या वापरात आपल्याला फक्त १०००-१५०० शब्दांची गरज असते. हळूहळू सगळं जमायला लागलं, आणि पहिल्या सहामाहीत मी वर्गात तिसरा आलो. मग शिक्षक मला नावानं ओळखायला लागले. तसा माझाही आत्मविश्वास वाढला. सुरुवातीला जरी जड गेलं तरी नीट लक्ष देऊन, मन लावून कष्ट घेतल्यामुळे सगळं सुरळीत झालं.

प्रश्न : बारावीला जाईपर्यंत तुमचं इतकं छान बस्तान बसलं की तुम्हाला वैद्यकीय शाखेतही प्रवेश मिळाला होता ना?

विजय : हो, भाषेचा प्रश्न कधीच मिटला होता. पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला वैद्यकीय शाखेला जाता आलं नाही. डी. एड.ला प्रवेश घ्यावा लागला.

प्रश्न : मग डी. एड. केल्यावर तुम्ही शिक्षकाची नोकरी स्वीकारलीत..

विजय : हो, माझी पहिली नोकरी होती नेवाश्याला. मी तिथे गेलो, पण काही फारशा उत्साहानं नाही. पण हळूहळू मी ठरवलं, की हाती घेतलंय ते काम मन लावून करायचं. मग आम्ही त्या शाळेत बऱ्याच सुधारणा केल्या. शाळेला बक्षीस मिळालं. त्यामुळे मलाही बरं वाटलं. त्याच काळात मी बाहेरून बी.ए. आणि एम.ए. केलं. मधल्या काळात माझी दत्तवाडीला बदली झाली. पुन्हा तिथल्या शाळेतही खूप सुधारणा केल्या.

प्रश्न : म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही आपला ठसा उमटवलात. मग हे लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायचं तुमच्या मनात कसं आलं?

विजय : दत्तवाडीला एका तहसीलदारांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबद्दल ऐकलं होतं. मग मी आणि इतर काही मित्रांनी मिळून या परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. शाळा सांभाळून सकाळ-संध्याकाळ

तीन-तीन तास अभ्यास, चर्चा करायला लागलो. या परीक्षेचे तीन टप्पे असतात. मला ते तिन्ही टप्पे पार करायला तीन वेळा परीक्षा द्यावी लागली. माझी विक्रीकर निरीक्षक म्हणून नगरला नियुक्ती झाली. तिथं मी वर्षभर होतो. मग राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून तहसीलदार म्हणून निवड झाली. त्याच सुमारास विक्रीकर अधिकाऱ्याची वरची परीक्षाही दिली आणि त्यात मी राज्यात दुसरा आलो. पण ते सोडून तहसीलदार म्हणून सिंधुदुर्गला हजर झालो. या सगळ्यात माझा आत्मविश्वास अधिकच  वाढला.

प्रश्न : हे इतकं सगळं छान चालू असताना पुन्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायचं कसं का मनात आलं? नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळत पुन्हा अभ्यास करायचा म्हणजे कठीणच, नाही का?

विजय : हो ना. दरम्यान, लग्न होऊन आम्हाला दोन मुलं झाली होती. पुढे माझी नेमणूक नगर जिल्ह्य़ात जामखेडला झाली. तिथं संजय कुमार हे जिल्हाधिकारी होते. त्यांना मी राज्यात दुसरा आलो होतो हे कळल्यावर त्यांनी मला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायला प्रोत्साहन दिलं.

प्रश्न : त्याची तयारी कशी केली?

विजय : आतापर्यंतच्या परीक्षांच्या अभ्यासासाठी मराठी पुस्तकं भरपूर उपलब्ध होती. या परीक्षेसाठी मात्र दर्जेदार साहित्य इंग्रजीतच उपलब्ध आहे. मला वाटलं की कदाचित आपल्याला इंग्रजीत उत्तमरीत्या व्यक्त होता येणार नाही, आणि तसं झालं तर गुण  मिळायचे नाहीत. म्हणून मी परीक्षेचं माध्यम मराठीच घेतलं, पण पुस्तकं मात्र इंग्रजीतली भाषांतरित वापरली. शिवाय इंग्रजी पुस्तकंही घेतली. जे विषय मी घेतले होते त्यांचे मराठी शब्दकोश विकत घेतले, कारण उत्तरपत्रिका मराठीतून लिहायच्या होत्या. अशा  पद्धतीनं मी तयारी केली आणि परीक्षेत मला कुठेही अडचण आली नाही.

प्रश्न : मग मुलाखतपण मराठीत दिली का?

विजय : तुम्ही कोणत्याही राज्यभाषेत परीक्षा दिलीत तर तुम्हाला मुलाखतीच्या वेळेला दुभाष्या वापरायची मुभा असते. पण मी त्यांना म्हटलं की मी इंग्रजीत बोलायचा प्रयत्न करतो, जमलं नाही तर हिंदीत जोडून घेतो. मग माझं जुजबी इंग्रजी, मध्येच हिंदी, असं करत ते जमून गेलं. दुभाष्याची गरज पडली नाही. आधी म्हटलं तसं नेहमीच्या वापरात १०००-१५०० शब्दांच्या पलीकडे आपण जात नाही. तेवढं इंग्रजी मला येत होतं. सगळे टप्पे पार करत मी देशात १७६ व्या क्रमांकानं पास झालो.

प्रश्न : पण तुमचं ‘आय.ए.एस.’ प्रशिक्षण इंग्रजीतून होतं ना? मग ते कितपत जड गेलं?

विजय : हो, मी परीक्षा मराठीतून दिली असली तरी अभ्यास आधी म्हटल्याप्रमाणे इंग्रजीतून केल्यानं इंग्रजी आपसूकच सुधारलं होतं. त्यामुळे आता शासकीय व्यवहारात काहीच प्रश्न येत नाही. इतर अधिकाऱ्यांशी व्यवहारापुरतं बोलायला लागतं. पण ते नेहमीचं, ठरावीक शब्द लागणारं इंग्रजी असतं.  त्यामुळे तिथेही काही अडचण येत नाही.

प्रश्न : आता मागे वळून बघताना तुम्हाला काय वाटतं- इंग्रजी माध्यमातून शिकला असतात तर अधिक फायदा झाला असता, किंवा मराठी माध्यमातून शिकल्यानं काही अंशी मागे पडलात असं वाटतं का?

विजय : नाही. उलट मराठी माध्यमातून शिकल्यानंच इथपर्यंत पोहोचलो असं मला वाटतं. इंग्रजी माध्यमात गेलं, की मुलांसाठी शाळेत एक वातावरण, घरी वेगळं वातावरण अशी परिस्थिती होते. या सगळ्यात त्यांचं विषयात शिरणं, संकल्पना समजावून घेणं,

हे राहून जातं. मग पाठांतर करून उत्तरं लिहिली जातात. माझंही तसं झालं असतं कदाचित. मातृभाषेतून शिकवल्यावर जसं सहज समजतं तसं इतर भाषांतून होत नाही. मी तर म्हणेन, की जसा आईचं दूध हा अर्भकाचा हक्क मानला जातो, तसं मातृभाषेतून शिक्षण हाही मुलांचा हक्कच समजला गेला पाहिजे. पालकांना त्यांचा हा हक्क हिरावून घ्यायचा काही अधिकार नाही. शिवाय पालक तरी एवढे तज्ज्ञ आहेत का, की ते ठामपणे म्हणू शकतात की इंग्रजी माध्यमामुळे आमच्या मुलाचं कल्याण होणार आहे? माझा अनुभव असा आहे, की एखादा विषय शिकणं आणि त्यावर प्रभुत्व मिळवणं यात फरक आहे. मातृभाषेतून शिकणाऱ्या मुलांना विषयावर प्रभुत्व मिळवणं जास्त सहज शक्य होतं. बहुतेक इंग्रजी माध्यमातल्या मुलांना इंग्रजी येत असलं तरी मातृभाषेच्या बाबतीत तडजोड करावी लागते. त्यांची ती पोकळी कधीच भरून येत नाही.

प्रश्न : तुम्हाला असं का वाटतं की त्यांच्या आयुष्यात ही पोकळी आहे म्हणून?

विजय : तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण आयुष्यभरात वेगवेगळे पदार्थ खात असतो. समजा, तुम्हाला कोणी गुलाबजाम खायलाच दिला नाही, तर तुम्हाला त्याची चव, गोडी कळणारच नाही. पण मी तो खाल्ला असेल तर मला त्याची गोडी माहीत असते. मग माझ्या दृष्टीनं तुमच्या आयुष्यात पोकळी राहिलीच ना! तुमचं ते राहून गेलं म्हणजे तुम्ही त्या आनंदाला एक प्रकारे कायमचे मुकलात. मातृभाषेतून बोलण्याचा, संवाद साधण्याचा, साहित्य वाचण्याचा जो आनंद असतो तो दुसऱ्या कोणत्याही भाषेत मिळत नाही. माझ्या असंही लक्षात आलंय, की इंग्रजी माध्यमातल्या मुलांचं समाजीकरण बऱ्याच वेळा अगदी दुर्बल असतं. म्हणजे इंग्रजी माध्यमातले आय.ए.एस. अधिकारी जेव्हा ग्रामीण भागात जातात, तेव्हा त्यांना तिथल्या लोकांशी संवाद साधणं जड जातं. आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना लोकांशी जुळवून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण त्याशिवाय कामं होत नाहीत.

प्रश्न : पण आता परिस्थिती अशी आहे, की बहुतेक लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातच घालतात. मग तुम्ही हा मुद्दा कसा सिद्ध करणार?

विजय : मुळात सगळ्यांना आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालावंसं का वाटतं, कारण सगळ्यांना सुरक्षितता हवी असते. जोखीम नको असते. समजा शंभर लोकांपैकी ८० लोकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातलं, की बाकीचे म्हणणार, की अरे हे ऐंशी जण काय वेडे आहेत का! मग सुरक्षिततेच्या भावनेतून बाकीचेही त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालतात. नाहीतरी कोणते पालक व्यवस्थित अभ्यास करून हा निर्णय घेतात? मित्रांनी, नातेवाईकांनी जे केलं असेल तसंच आपण करतो.  इंग्रजीची गरज नाकारता येणार नाही. पण आपली भाषा त्याच्यासाठी मारायची का?

प्रश्न : म्हणजे सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे तर!

विजय : एक शिक्षक म्हणून मी ते बघतोय. मातृभाषेतून शिकलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वास असतो. कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायला ती तयार असतात. नुसतं ‘हाय-फाय’ इंग्रजी आलं म्हणजे तुम्ही हुशार आहात असं नाही. शिवाय हे इंग्रजी नुसतं नेहमीच्या वापरापुरतं मर्यादित असतं. त्या त्या भाषेतल्या साहित्याचा आस्वाद इंग्रजी माध्यमातल्या सगळ्या मुलांना घेता येतो का, त्या भाषेचं सौंदर्य, रस त्यांना अनुभवता येतो का? अशी अवस्था असेल

तर इंग्रजीतला आणि मराठीतलाही रस अनुभवला जात नाही. दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिकलेला मुलगा मुद्दाम जाऊन मराठी पुस्तक वाचेल असं सहसा होत नाही. बहुतेकांना ते जमतच नाही. पण मराठी माध्यमातून शिकलेली मुलं मात्र इंग्रजी पुस्तकंही वाचू  शकतात. मी म्हणतो, की मातृभाषा शिका आणि इंग्रजीपण शिका. एकीसाठी दुसरीचा बळी द्यायला पाहिजे असं नाही. आपण बहुभाषिक व्हायला पाहिजे. मग त्यात इंग्रजीपण येते. तुम्हाला मुलांना इंग्रजी माध्यमात घालायचंच असेल तर मुलांना घरी मराठी शिकवा. मराठी वृत्तपत्र, पुस्तकं त्यांना वाचायला लावा. आपली भाषापण त्यांना येऊ द्या.