हरीश सदानी

विवेक-एकता यांच्या चौकोनी कुटुंबातल्या दोन्ही मुली दत्तक आहेत. पहिल्या मुलीनंतर दुसरीही मुलगीच मिळावी या मागणीसाठी मात्र त्यांना न्यायालयाची पायरी चढावी लागली. त्यांनी इतर दोन जोडप्यांसह चार वर्ष मुंबई न्यायालयात लढून कायद्यात बदल करण्यात यश मिळवलं. देशातील ती ऐतिहासिक घटना ठरली. आज या दोन्ही मुली मानसशास्त्र, पर्यावरण, लैंगिकता आदी विषयांवर चर्चा करतात, लोकांपर्यंत पोहोचतात. विवेक स्टार्टअप्सच्या माध्यमातून उद्यमशील स्त्रिया घडवत आहेत, तर एकता ‘इनव्हिजिबल स्कार्स’ मंचाच्या माध्यमातून स्त्रियांवरील अत्याचाराला वाचा फोडत आहेत. या सगळ्यामागे असणाऱ्या विवेक आणि त्यांच्या कुटुंबाच्या आगळ्या ‘रिश्त्या’विषयी..  

कुटुंब म्हटलं की सर्वसाधारणपणे आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहातं ते म्हणजे एक विवाहित स्त्री-पुरुष- जोडपं आणि त्यांची मुलं. कधी कधी आजी-आजोबांचाही यात समावेश असतो. जैविक, रक्ताच्या नातेसंबंधाला भारतीय समाजात जास्त महत्त्व आहे. पण या जैविक नात्यापलीकडे मानवनिर्मित नातेसंबंध घेऊन एक सुसंपन्न, समृद्ध आणि आनंदी चौकोनी कुटुंबही असू शकतं. हैद्राबाद येथील विवेक वर्मा यांचं असंच आगळं चौकोनी कुटुंब, सहजीवन आहे.

पुण्यात एकासधन, उच्चशिक्षित परिवारात वाढलेल्या विवेक यांचे वडील लष्करात अधिकारी होते. पुणे विद्यापीठातून ‘बी.एस्सी.’ व नंतर कायदा या विषयात विवेकनं पदवी घेतली. ‘डीएचएल’ या प्रसिद्ध कुरिअर कंपनीत फेब्रुवारी १९९० मध्ये त्यांना व्यवस्थापक पदावरील नोकरी मिळाली. तिथेच सहकारी म्हणून ओळख झालेल्या संगीता नगरकर हिच्याशी भावबंध जुळले. दोघांनी मिळून कंपनीचा व्यवसाय प्रचंड नफ्यानं वाढवला. महत्त्वाकांक्षी, स्वत:च्या अटींवर आयुष्य जगू पाहाणाऱ्या संगीताशी विवाह करण्याचा मनोदय विवेक यांनी व्यक्त केल्यावर नातेवाईकांकडून प्रचंड विरोध झाला. पुण्यात एका छोटय़ा चाळीतील खोलीत आई आणि तीन बहिणींसह राहाणाऱ्या संगीताच्या परिवाराची सामाजिक-शैक्षणिक पार्श्वभूमी पूर्णत: भिन्न होती. पण राष्ट्रीय पातळीवरची यशस्वी बास्केटबॉल खेळाडू असलेल्या संगीतानं कष्ट घेऊन ‘बी.कॉम.’, ‘एम.कॉम.’ आणि पुढे ‘एमबीए’पर्यंत शिक्षण घेतलं होतं. तिच्या सामथ्र्यशील व्यक्तिमत्त्वानं भारावून, घरातल्यांचा विरोध पत्करत विवेकनी फेब्रुवारी १९९३ मध्ये संगीताशी (नंतरची ‘प्रेरणा’) लग्न केलं.

१९९२ मध्ये विवेक यांची डीएचएल-अहमदाबाद येथे बदली झाल्यानंतर ते आणि प्रेरणा अहमदाबाद येथे राहायला आले. इथल्या ऑफिसमध्ये कार्यरत राधिका या पहिल्या स्त्री बॉस विवेकच्या ‘रोल मॉडेल’ बनल्या. काम करवून घेण्याच्या बाबतीत काटेकोर, व्यावसायिक दृष्टिकोन असला तरी आपण दिवसभरात केलेलं काम अधिक चांगल्या प्रकारे कसं करता येईल, हे संध्याकाळी गप्पाटप्पांच्या स्वरूपात समजावून सांगण्याची त्यांची वृत्ती विवेक यांना समृद्ध करत गेली.  पाच वर्ष विवेक-प्रेरणा यांचा संसार चांगला चालला असताना ऐन उमेदीच्या काळात प्रेरणाला त्यांच्या ३२ व्या वर्षी कर्क रोगाचं निदान झालं.  इच्छाशक्तीच्या बळावर आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन किमोथेरपी, किरणोपचार करताना विवेक सतत सोबतीला असायचे. पत्नीला कर्करोग झाल्यानंतर विवेकनी प्रेरणापाशी बाळ दत्तक घेण्याविषयी चर्चा केली. ‘सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ ससून हॉस्पिटल, पुणे’च्या (अर्थात सोफोश) ‘अ‍ॅडॉप्शन सेंटर’मधून दोघांनी २००० मध्ये रिद्धीला दत्तक घेतलं. पुढे सहा वर्षांनी आणखी एक मूल दत्तक घेण्याचा निर्णय दोघांनी घेतला. ‘सोफोश’ येथे याबाबत भेट द्यावयास गेले असताना कें द्रातील पदाधिकाऱ्यांनी विवेक यांना एक मुलगा दाखवला. मूल नसलेल्या जोडप्याचं पहिलं दत्तक घेतलेलं बाळ जर मुलगी असेल तर दुसऱ्यांदा त्यांना बाळ दत्तक घेताना मुलगाच दाखवण्याचा अनाथाश्रमात प्रघात असतो. त्यामुळे एकल स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या अनाथाश्रमातील असंख्य मुलींना तिष्ठत राहावं लागतं, हे जाणून विवेकनी दुसरीदेखील मुलगीच दत्तक घेण्याचा निर्धार केला. परंतु तत्कालीन ‘हिंदू अ‍ॅडॉप्शन अ‍ॅक्ट’नुसार विवेक यांना तसं करणं अशक्य होतं. मग त्यांनी आणि दोन इतर जोडप्यांनी चार वर्ष मुंबई न्यायालयात लढून कायद्यात बदल करण्यात यश मिळवलं. देशातील ती ऐतिहासिक घटना ठरली. मिष्का या दुसऱ्या मुलीला विवेक-प्रेरणा यांनी दत्तक घेतलं.

दोन्ही मुलींना आपले आई-वडील हे जैविक पालक नाहीत, याची समज आणि स्वीकृती कालांतरानं व्हावी, या उद्देशाने विवेकनी त्यांचे पहिले तीन वाढदिवसही ‘सोफोश’ येथे मुलांबरोबर साजरे केले. थोरली मुलगी रिद्धीच्या समंजसपणाचा एक दाखला विवेक सांगतात, ती सात वर्षांची असताना तिच्या मैत्रिणीनं तिचे आई-बाबा हे खरे, जन्माचे आई-बाबा नसल्याचं सुनावलं. यावर रिद्धीनं पटकन मैत्रिणीला सांगितलं, ‘‘तुझ्यामाझ्यात फरक काय हे ठाऊक आहे? तुझ्या जन्माबाबत तुझ्या आईवडिलांना ‘चॉइस’ नव्हता. पण माझ्या आईवडिलांकडे चॉइस होता. ते अ‍ॅडॉप्शन केंद्रात गेले आणि त्यांनी माझी निवड केली. त्यामुळे मी ‘स्पेशल बाळ’ आहे याचा मला अभिमानच आहे!’’

कर्क रोगाचा आजार शरीरातील इतर अवयवांवर पसरल्यानंतर २०११ मध्ये प्रेरणाचं निधन झालं. नोकरीनिमित्त अनेक शहरांत प्रवास करावयास लागत असलेल्या विवेक यांना आपल्या दोन्ही मुलींना आईचं प्रेम मिळावं असं वाटत होतं आणि त्यांनी पुनर्विवाह करण्यासाठी ‘शादी डॉट कॉम’वर नाव नोंदवलं. सामथ्र्यशील, स्वतंत्र बाण्याची, व्यावसायिक असलेल्या एकताला भेटल्यावर दोघांचे सूर जुळले आणि ११ फेब्रुवारी २०१२ रोजी ते विवाहबद्ध झाले. कडव्या, सनातनी विचारसरणीच्या नातलगांचा विरोध लग्नानंतर विवेक आणि एकता दोघांना झाला. पण गेली आठ वर्ष त्यांचं चौकोनी प्रगल्भ कुटुंब आनंदी, संपन्न सहचर्य अनुभवत आहे. गेली ३० वर्ष विवेकनी व्यवस्थापकीय पदांवर ८-१० नामांकित कंपन्यांमध्ये कामं केली. ‘बीपीएल मोबाइल’, ‘अबॅकस’, ‘श्रीनिवास फाम्र्स’ यांसारख्या कंपन्यांमध्ये काम करता करता ‘काव्‍‌र्ही’सारखी नवी कंपनी सुरू करून त्याचा पसारा वाढवला. मागील एका वर्षांपासून विवेक ‘तेलंगणा राज्य इनोव्हेशन सेल’ येथे ज्येष्ठ सल्लागार म्हणून काम करत आहेत. ‘टेक स्टार्टअप्स’, ‘सोशल स्टार्टअप्स’मध्ये अधिक स्त्रिया येऊन यशस्वी उद्योजिका कशा तयार होऊ शकतात, यासाठी विवेक विशेष प्रयत्न करत आहेत. ‘टेडेक्स हैद्राबाद’चे गेली सहा वर्ष मुख्य आयोजक म्हणून विविध क्षेत्रांतील यशस्वी स्त्रियांना ते प्राधान्यानं जाहीरपणे व्यक्त होण्यासाठी निमंत्रित करत आहेत.

२०१६ मध्ये एकता यांनी कुटुंबांतर्गत होणारे कलह आणि भावनिक हिंसेची झळ बसलेल्या स्त्रियांना आधार देण्यासाठी ‘इनव्हिजिबल स्कार्स’ (अदृश्य व्रण) या नावानं गट सुरू केला. देशभरातील २००० हून अधिक गरजू, समदु:खी स्त्रियांना व्यक्त होण्यास एक मंच या गटानं दिलेला असून त्याला शक्य ते सर्व सहाय्य विवेक करतात. त्यांची २१ वर्षांची थोरली मुलगी रिद्धी मानसशास्त्र विषय घेऊन ‘बी.ए.’च्या अखेरच्या वर्षांत शिकत आहे. तिनं स्वतंत्र, स्वावलंबी जगणं अनुभवावं यासाठी विवेक- एकतांनी तिचं बारावी शिक्षण झाल्यानंतर हैद्राबाद येथील घर सोडून एखाद्या वसतिगृहात वा पेइंग गेस्ट म्हणून राहूनच वाटचाल करावी याचा आग्रह धरला. नववीत शिकणारी

१४ वर्षांची धाकटी मुलगी मिष्का ही अतिउत्साही, सर्जनशील आहे. पर्यावरण रक्षण, टाळेबंदी, सकारात्मक दृष्टिकोन यांसारख्या आणि सामाजिक विषयांवरचं भान समवयस्क छोटय़ा मुलांना द्यावं या हेतूनं मिष्का एक यूटय़ूब चॅनल चालवते. ‘बिल्ली ऑफ हॉलीवूड’ या मजेशीर नावाच्या एक वर्षांपासून सुरू असलेल्या  चॅनलवर ती पाच-सहा मिनिटांच्या गप्पांचे व्हिडीओ स्वत: संपादित करून प्रस्तुत करते. आतापर्यंत ५१ भाग सादर झालेल्या या चॅनलनं ‘मायक्रोसॉफ्ट हैद्राबाद’चंही लक्ष वेधून घेतलं आणि त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांशी ‘समलिंगी आणि इतर लैंगिक अल्पसंख्याक’ या विषयावर ‘चॅट’ करण्यासाठी मिष्काला निमंत्रित केलं.

समतेच्या तत्त्वावर, व्यक्तिवाद जपत, ताठ मानेनं दोन्ही मुलींनी जगावं यासाठी विवेक आपली मतं परखडपणे मांडतात. समानतेसाठी आग्रही असल्यानं घरात सर्व बाबतींत खुलेपणानं चर्चा करत असताना ‘कन्यादान’सारख्या प्रथेविरुद्ध ते तीव्र शब्दांत आपली मतं व्यक्त करतात. ‘‘माझ्या मुली दान करण्यासारख्या वस्तू नाहीत. घरातील संतुलन बिघडवणाऱ्या अशा गोष्टींबद्दल आम्ही चौघंही जागरूक आहोत. माझ्या मुली मला एका सशक्त, पुरोगामी वातावरणात असलेल्या मला बघायचं आहे. त्यांना लज्जित केलं जाईल, कमी लेखलं जाईल किंवा गुलामासारखं वागवलं जाईल अशा वातावरणात असलेल्या नाही बघायचं.’’

विवेक यांचं  प्रगल्भ, आगळं सहजीवन पाहाता आठवण येते ती ‘खामोशी’ या चित्रपटात गुलजार यांच्या गाण्याची-

‘‘हमने देखी हैं उन आँखो की महकती खुशबू

हाथ से छूके इसे रिश्तों का इल्जाम न दो

सिर्फ एहसास हैं ये रुह से महसूस करो

प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो..’’

saharsh267@gmail.com