News Flash

कलाच जेव्हा शस्त्र बनते!

बारा वर्षांनी ती इराणला परतली तेव्हा तिच्या मनातला, आठवणीतला इराण आणि प्रत्यक्षातला इराण यात जमीन-आस्मानाचा फरक होता. तिच्या आठवणीतला म्हणजेच पूर्वीचा इराण धर्मनिरपेक्ष होता. आता

| June 28, 2014 01:01 am

कलाच जेव्हा शस्त्र  बनते!

बारा वर्षांनी ती इराणला परतली तेव्हा तिच्या मनातला, आठवणीतला इराण आणि प्रत्यक्षातला इराण यात जमीन-आस्मानाचा फरक होता. तिच्या आठवणीतला म्हणजेच पूर्वीचा इराण धर्मनिरपेक्ष होता. आता हुकूमशाहीच सुरू होती तिथं. लोकांचं वागणं, जगणं, वावरणं सगळच बदललं होतं. स्त्रियांची परिस्थिती तर खूपच हलाखीची आणि दयनीय झाली होती. अस्वस्थ झालेल्या शिरीनने परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने आशयघन, संदेश देणाऱ्या, जागृती करणाऱ्या छायाचित्रं, लघुपट आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या कलेचा शस्त्रासारखा वापर केला. त्या शिरीन नेशतची ही गोष्ट.

बारा वर्षांनी ती इराणला, आपल्या मायभूमीत परतली तेव्हा तिच्या मनातला, आठवणीतला इराण आणि प्रत्यक्षातला इराण यात जमीन-आस्मानाचा फरक होता. तिच्या आठवणीतला म्हणजेच पूर्वीचा इराण धर्मनिरपेक्ष होता. आता हुकूमशाहीच सुरू होती तिथं. लोकांचं वागणं, जगणं, वावरणं सगळच बदललं होतं. स्त्रियांची परिस्थिती तर खूपच हलाखीची आणि दयनीय झाली होती. अस्वस्थ झालेल्या तिने परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने आशयघन, संदेश देणाऱ्या, जागृती करणाऱ्या छायाचित्रं, लघुपट आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या कलेचा शस्त्रासारखा वापर केला. ती कलाकार होती,शिरीन नेशत.
इराणमध्ये २६ मार्च १९५७ या दिवशी जन्मलेली शिरीन संपन्न घरात वाढली. वडील डॉक्टर. पाश्चात्त्य विचारसरणी आणि जीवनशैलीचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांच्या पाच मुलांपैकी शिरीन चौथी. तिच्या वडिलांनी सर्व मुलांना समानतेनं वाढवलं. खूप शिका, जग बघा, स्वत:च स्वत:ला घडवा आणि कोणतीही जोखीम पत्करायला नेहमीच सिद्ध राहा, अशी त्यांची शिकवण होती. अशा वातावणात घडत असतानाही शिरीननं आपल्या आजी-आजोबांकडून मुस्लीम समाजातील धार्मिक परंपरा, रीतिरिवाज जाणून घेतले. वयाच्या १७ व्या वर्षी १९७४ मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’मध्ये आर्टस्चं शिक्षण घेण्यासाठी तिनं इराण सोडलं. १२ वर्षे ती इराणबाहेर होती.
दरम्यानच्या काळात इराणमध्ये उलथापालथ झाली होती. १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. फारसी संस्कृतीकडून इस्लामी संस्कृतीकडे इराणची वाटचाल सुरू झाली होती. इस्लामच्या नावानं सत्तेवर आलेल्यांच्या दडपणांना इराणी समाज, विशेषत: इराणी स्त्रिया बळी पडत होत्या. दडपण, अन्याय, अत्याचार वाढतच होते. अशा परिस्थितीमध्ये १९९० मध्ये शिरीन इराणला परत आली. मायभूमीच्या ओढीनं. तिला आपल्या देशात आपल्या समाजात, आपल्या माणसांत राहायचं होतं. शिरीन परत आली, पण तिच्या मनातला, आठवणीतला इराण आणि प्रत्यक्षातला इराण यात जमीन-आस्मानाचा फरक होता. तिला हा इराण आपला वाटला नाही. कारण, तिच्या आठवणीतला म्हणजेच पूर्वीचा इराण धर्मनिरपेक्ष होता. लोकतांत्रिक होता. आता तो ‘इस्लामी राष्ट्र’ झाला होता. जवळजवळ हुकूमशाहीच सुरू होती तिथं. लोकांचं वागणं, जगणं, वावरणं सगळंच बदललं होतं. स्त्रियांची परिस्थिती तर खूपच हलाखीची आणि दयनीय झाली होती. त्या भयानक वास्तवामुळे शिरीन खूप अस्वस्थ झाली. धर्माध आणि संकुचित विचारसरणीच्या जुलमी राज्यकर्त्यांमुळे इराणी जनतेचे होणारे हाल ती जवळून पाहत होती. जगभरात इराणची प्रतिमा मलीन झाली होती. त्यामुळे तर ती आणखीनच अस्वस्थ होत होती. पण नुसतं अस्वस्थ होऊन भागणार नव्हतं. ती आपल्या परीनं कामाला लागली.
शिरीन हाडाची कलाकार आहे. कलात्मक छायाचित्रण करणं, लघुपट आणि चित्रपट बनवणं हा तिचा ध्यास आहे, व्यवसाय आहे. आपल्या या कलेचाच उपयोग या कामी करून घ्यायचं तिनं ठरवलं. त्यासाठी आधी तिनं इराणचा सर्वच दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. इराणमधल्या मुस्लीम स्त्रियांचा तिनं अभ्यास केला. धर्माध सत्ता, धार्मिक रूढी आणि बंधनं यामुळे स्त्रियांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचा तिनं वेध घेतला. हा अभ्यास करताना इराणी समाजातला विरोधाभास तिच्या लक्षात आला. एकीकडे धर्माविषयी नितांत श्रद्धा आणि विश्वास समाजात असतानाच दुसरीकडे हिंसा, अत्याचार, अपराध, क्रौर्य आणि गैरवर्तनही ठायी ठायी दिसून येत होतं. ही विसंगती दूर व्हायला हवी, समाजाला खऱ्या अर्थानं जागं करायला हवं, हे शिरीनला उमगलं. सरकारवर किंवा इस्लामी क्रांतीवर थेट टीका करणं तिला शक्य नव्हतं. कारण, बऱ्याच वर्षांनंतर ती इराणमध्ये परत आली होती. त्यामुळे स्थानिकांच्या दृष्टीनं ती ‘परकी’ होती. पण तरीही कलात्मक छायाचित्रं, लघुपट, चित्रपट यांच्या माध्यमातून तिनं समाजजागृती, तसंच काही प्रमाणावर सरकारवर टीका करायला सुरुवात केली. त्या वेळची शिरीनची ‘वुमन ऑफ अल्लाह’ ही छायाचित्रांची मालिका खूप गाजली. मुस्लीम स्त्रियांच्या हाता-पायांवर, चेहऱ्यांवर फारसी लिपीच्या सुलेखनाचा शिरीननं खूप कलात्मक आणि परिणामकारक वापर केला. महिलांच्या सामाजिक, मानसिक आणि राजकीय पैलूंवर प्रकाश पाडणारी ती छायाचित्रं होती. प्रतिमा आणि सुलेखन यांचा सुरेख समन्वय साधून तिनं आशयघन सादरीकरण केलं होतं. दडपलेल्या स्त्रियांच्या अव्यक्त भावना शिरीननं अतिशय प्रभावीपणे व्यक्त केल्या होत्या.
तिनं काढलेली अशीच इतर छायाचित्रंही खूप गाजली. त्यांच्या माध्यमातून तिनं शब्दांशिवाय खूप काही सांगितलं. तिला प्रतिसाद मिळू लागला. साहजिकच तिचा हुरूप आणखी वाढला. तिच्या कलेतील टीकेची धार अधिकच वाढली. इराणच्या इतिहास काळातील परिस्थितीचं वर्णन करणारी ‘वुमेन विदाऊट मेन’ हा चित्रपट शिरीननं बनवला. १९५३ मधल्या इराणमधल्या परिस्थितीवर बेतलेल्या एका इराणी कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. स्वातंत्र्य, बदल, लोकशाही, नवे विचार यांच्या शोधात असलेल्या तीन स्त्रियांची ही कथा आहे. पुरुषांच्या आधाराशिवाय, मदतीशिवाय स्वत्वाचा शोध घेऊ पाहणाऱ्या आणि त्यात यशस्वी होणाऱ्या या स्त्रियांनी जगभरच्या चित्रपट रसिकांना, तसेच सामाजिक भान असणाऱ्या विचारवंतांना हलवून सोडलं. लोकशाही आणि सामाजिक न्यायाची मागणी या चित्रपटात करण्यात आली आहे.
आशयघन, संदेश देणाऱ्या, जागृती करणाऱ्या छायाचित्रं, लघुपट आणि चित्रपटांच्या माध्यमातून शिरीननं आपल्या कलेचा शस्त्रासारखा वापर केला. लोकांना प्रोत्साहित करणं, पुकारणं, आशा दाखवणं हे कलाकार या नात्यानं ती आपलं कर्तव्य मानत आली आहे. सांस्कृतिक, राजनैतिक आणि सामाजिक पातळीवर एक कलाकार म्हणून आपल्याला मान मिळतो, याची तिला जाणीव आहे. आणि आपली समाजाप्रति असलेली जबाबदारी जाणीवपूर्वक पार पाडण्यासाठी ती धडपडत आहे. अनेक कलाकृती शिरीननं निर्माण केल्या. ‘झरीन रॅप्चर,’ ‘पॅसेज,’ ‘टब्र्युलंट’ ही त्यातली काही उदाहरणं. शिरीनच्या कलेचं प्रदर्शन अनेक ठिकाणी, जगभरात सगळीकडे झालं. शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये, तसेच इतरही अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये तिचे चित्रपट दाखवले गेले, वाखाणलेही गेले. तिच्या चित्रपटांना क्रिस्टल अवॉर्ड, सिल्व्हर लायन अवॉर्ड, रॉकफेलर फाऊंडेशन अर्वार्ड असे अनेक पुरस्कार मिळाले. जगभरच्या वेगवेगळ्या लिलावांमध्ये तिच्या छायाचित्रांना भरघोस किमती मिळाल्या.
जगभर तिचं नाव झालं, मानमरातब मिळाले. पण इराणमधल्या, तिच्या मायभूतीतल्या तथाकथित धर्माध सत्ताधाऱ्यांच्या रोषाला मात्र मिला बळी पडावं लागलं. हाती घेतलेला वसाच असा होता, की त्यासाठी तिला मातृभूमीला पारखं व्हावं लागलं. शिरीन मोरक्को, तुर्कस्तान आणि मेक्सिकोमध्ये राहिली. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये राहत आहे. आपलं काम तिनं चालूच ठेवलं आहे.
२००९मध्ये इराणमध्ये अध्यक्षीय निवडणुका झाल्या. ही निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचं जगभरच्या सर्वच जाणकारांचं मत होतं. अनेकांनी या निवडणुकींना आक्षेप घेतला. इराणमधल्याही अनेकांनी आवाज उठवला. शिरीन अर्थातच तेव्हा इराणबाहेर होती. तिनंही या निवडणूक प्रक्रियेला विरोध केला. विरोध करण्यासाठी तिनं उपोषणाचा अिहसक मार्ग स्वीकारला.  ‘संयुक्त राष्ट्रसंघा’च्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयासमोर जुल २००९मध्ये तिनं तीन दिवसांचं उपोषण केलं.  
५-६ वर्षांपूर्वी बनवलेल्या ‘वुमेन विदाऊट मेन’ या चित्रपटातील स्त्रियांच्या माध्यमातून तिनं इराणी महिलांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्या अपेक्षा सध्या इराणी महिलांकडून पूर्ण केल्या जात असल्याचं तिचं म्हणणं आहे. ‘तिथल्या दबलेल्या, दडपलेल्या, अन्याय-अत्याचारांना बळी पडलेल्या स्त्रिया आता बदलत आहेत. त्यांची विचारसरणी बदलत आहे. त्या अन्याय्य परंपरा झुगारत आहेत. आत्मसन्मान राखण्यासाठी धडपडत आहेत. आपल्या मागण्यांसाठी त्यांचा सरकारविरोधात लढा सुरू आहे. त्यासाठी त्या निधडेपणानं रस्त्यावर उतरत आहेत. त्यांना इराणमधल्या तरुणांची साथ आणि जगभरातून पाठिंबा मिळत आहे. हे चित्र खूपच आशादायक, उत्साह वाढवणारं आहे. अशा स्त्रियांकडून मला प्रेरणा मिळते,’ असं शिरीन म्हणते. दुसऱ्या देशांना तिला आपली कर्मभूमी बनवावी लागली तरीसुद्धा इराणचा, आपण इराणी असल्याचा तिला सार्थ अभिमान वाटतो. ‘इराणी जनता आणि उर्वरित जग यांच्यातला मी दुवा आहे आणि कायम राहणार आहे,’ असं ती ठामपणे सांगते.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2014 1:01 am

Web Title: iranian artist shirin neshat on art politics and changing the world
टॅग : Chaturang
Next Stories
1 कहाणी बेगमीच्या लोणच्याची
2 अपेंडिसायटिस
3 महिला अत्याचार ‘झीरो टॉलरन्स’ हवाच
Just Now!
X