१९८०च्या दशकातही स्त्रियांसाठी अभेद्य ठरलेलं ‘ग्लास सीलिंग’ आजच्या स्त्रियांनी भेदले आहे का? या प्रश्नांचे उत्तर जसे ‘हो’ आहे, तसे ‘नाही’सुद्धा आहे. स्त्रिया मोठय़ा पदांपर्यंत पोचल्या. गलेलठ्ठ पगार घ्यायला लागल्या, म्हणजे स्त्रियांसाठी सगळे आलबेल आहे का? उच्च पदावर पोचण्यासाठी अजूनही स्त्रियांना खूप संघर्ष करावा लागत आहे, पण हा संघर्ष यशात बदलायला लागला आहे. बॅंकिंगच्या क्षेत्रातील सर्वोच्च पदांबरोबर मोठमोठय़ा कंपन्यांच्या सीईओ, सीओओ पदं भूषवणाऱ्या स्त्रियांची संख्याही वाढू लागली आहे.. हळूहळू का होईना पण समाजाचा स्त्रियांच्या क्षमतांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो आहे.. ग्लास सीलिंगला तडे जात आहेत.
भारत आणि अमेरिका- जागतिक अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन अर्थसत्ता! आणि अशा दोन देशांतल्या महत्त्वाच्या बँकांमध्ये प्रमुख पदावर स्त्रिया असणे हा योगायोग नक्कीच नाही. स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी अरुंधती भट्टाचार्य यांची नेमणूक झाल्याची बातमी येते न येते तोवर अमेरिकेतल्या फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रमुखपदी जेनेट येलेन यांची नेमणूक झाल्याची बातमी आली. दोन अर्थासत्तांनी स्त्रियांच्या क्षमतेवर दाखवलेला हा विश्वास आहे. जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरचे अर्थकारण कठीण टप्प्यावर असताना महत्त्वाचे आíथक निर्णय घेणाऱ्या पदावर स्त्रियांची नेमणूक व्हावी, हा गेली अनेक वष्रे स्त्रियांनी केलेल्या संघर्षांचा विजय आहे. समाजाचा स्त्रियांच्या क्षमतेवरचा विश्वास वाढतो आहे, याचे हे निदर्शक आहे.
साधारण १९८०च्या दशकात अमेरिकेमध्ये ‘ग्लास सीलिंग’ हा शब्द प्रचलित झाला. आता हे ग्लास सीिलग म्हणजे काय, तर कॉर्पोरेट जगातील स्त्रियांना त्या स्त्रिया असल्यामुळे यशाच्या मार्गात, पदोन्नतीत जे अडथळे येत होते, अडचणी येत होत्या त्यासाठी ग्लास सीिलग हा शब्द वापरला जाऊ लागला. ग्लास सीिलग का? तर म्हणायला सगळंच पारदर्शक काचेसारखे, पण तरीही अदृश्य स्वरूपातले अभेद्य अडथळे. १९८०च्या दशकात हा शब्दप्रयोग किंवा अनुभव स्त्रियांना जाणवू लागला, कारण त्याच काळात स्त्रियांचे शिक्षणाचे, नोकरी करण्याचे प्रमाण सगळीकडेच वाढायला लागले होते. पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण किंवा कामाचा अनुभव असला तरीही महत्त्वाचे पद न मिळणे, पुरुषांच्या प्रमाणे पगारवाढ न मिळणे, पदोन्नतीमध्ये स्त्री असल्यामुळे डावलले जाणे, असे अनुभव अनेक स्त्रियांना येत होते. स्त्री आहे म्हणजे हिला जास्त काम देऊन चालणार नाही. अविवाहित स्त्री असेल तर हिचे लग्न होईल, मग तिचा संसार, यातून तिला करिअरसाठी वेळ मिळणार का, असा विचार स्त्रियांचे जॉब प्रोफाइल ठरवताना होत असे. विवाहित स्त्रियांना जबाबदारी देतानाही असाच विचार केला जायचा. ही जास्त प्रवास करू शकणार नाही, ही उशिरापर्यंत कामासाठी थांबू शकणार नाही म्हणून हिला ‘लाइट चार्ज’ दिलेला बरा! कार्यालयामध्ये एखाद्या स्त्रीने थोडी चमक दाखवली तर तिला मागे खेचण्याचे पद्धतशीर प्रयत्नही अनेकदा तिच्याच पुरुष सहकाऱ्यांकडून होत असत. किंवा मुळातच अशक्य असणारी कामे या स्त्रियांवर सोपवली जात असत. जेणे करून त्यांचे अपयश आधीच ठरवले जाईल. हाताळण्यास कठीण किंवा जवळजवळ अशक्य अशा जबाबदाऱ्या स्त्रियांवर लादण्याच्या वृत्तीसाठी ‘ग्लास क्लीफ’ अशी संकल्पना वापरात यायला लागली.
मुलाचा जन्म, त्यांचे संगोपन या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी महिलांना रजा घ्याव्या लागतात, यामुळेही त्यांच्या करिअरमधल्या प्रगतीवर परिणाम होतो. यासाठी ‘मम्मी ट्रॅक’ असा शब्द रूढ झाला होता. ग्लास सीिलग म्हणा, ग्लास क्लिफ म्हणा किंवा अन्य काही. त्या सगळ्याचा परिणाम एकच, स्त्री म्हणून आलेल्या मर्यादा!
पण आता गेल्या काही वर्षांतल्या सामाजिक, राजकीय, आíथक आणि सांस्कृतिक घडामोडींकडे लक्ष टाकले तर आपल्याला प्रकर्षांने हे जाणवते की, ही परिस्थिती बदलली आहे. एकविसावे शतक उजाडूनही १३ वर्षे झाली. आज देशात आणि परदेशातही अनेक क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर महिला कार्यरत आहेत. भारतात बँकिंग क्षेत्रातच अरुंधती भट्टाचार्य, चंदा कोचर, शुभलक्ष्मी पानसे, शिखा शर्मा, विजयालक्ष्मी अय्यर अशा अनेक स्त्रिया आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात किरण शॉ, नना किडवाई, स्वाती पिरामल, कल्पना मोरपारिया, मीरा सन्याल आदी अनेक स्त्रिया मोठय़ा प्रमाणावर आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर्मनीच्या चान्सेलर अन्जेला मर्केल आहेत,  आयएमएफ (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी)च्या शक्तिशाली पदावर ख्रिश्चियन लागार्दे आहेत, थायलंडच्या प्रेसिडेंट यिन्ग्लूक शिनवात्रा आहेत, ब्राझीलची प्रेसिडेंट दिल्मा रुसेफ आहे, फेसबुकची शेरिल सॅन्डबर्ग, ‘याहू’ची मरिसा मेयर आहे, पेप्सिकोच्या इंद्रा नुयी आहेत, ‘एचपी’ची मेग व्हाइटमन आहे, यादी काही लहान नाही. यादी मोठी आहे, तशी महत्त्वाचीही आहे. कारण पारंपरिक दृष्टिकोनातून जी क्षेत्रे स्त्रियांसाठी वज्र्य मानली जात होती अशा क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. स्त्रियांना अर्थकारणातले, तंत्रज्ञानातले काय कळते हा सूर काही फार जुना नाही. त्या सुराशी झगडत उच्च पदी पोचणे ही काही वर्षांपूर्वी कठीण किंवा अगदी अशक्य वाटणारी गोष्ट आता प्रत्यक्षात आली आहे. कामाच्या जबाबदाऱ्या सारख्या, कामाबद्दलच्या अपेक्षा सारख्या पण तरीही स्त्रियांना मिळणारा पगार आणि त्यांच्याच पुरुष सहकाऱ्यांना मिळणारा पगार याच्यात फरक असण्याचे दिवसही आता झपाटय़ाने मागे पडायला लागले आहेत. उच्च पदावरच्या स्त्रियांचीही ‘पे पॅकेजेस्’ आता कुठचाही भेद न करता कोटी कोटी उड्डाणे घेत आहेत. किंबहुना उच्च पदावरच्या स्त्रियांना मिळणारा पगार हासुद्धा आता चच्रेचा आणि कौतुकाचा विषय व्हायला लागला आहे. भारतात आय.आय.टी. किंवा आय.आय.एम. येथून शिक्षण घेऊन नोकरीत येणाऱ्याच्या पगाराची नेहेमीच चर्चा होते. तशाच चर्चा तितक्याच महत्त्वाने स्त्रियांच्या पगाराबद्दल होतात, हा बदल नक्कीच सुखावह आणि उत्साहवर्धक आहे.
‘ग्लास सीिलग’ हा शब्द खाजगी क्षेत्रातल्या स्त्रियांसाठी वापरला गेला असला, तरी अशा अडथळ्यांचा सामना सर्वच क्षेत्रांमधल्या स्त्रियांना करावा लागला आहे. राजकारणात, समाजकारणात, सरकारी आणि खासगी नोकरीमध्ये सगळीकडे यशाचे शिखर गाठण्याचा प्रवास सोपा नव्हता, पण हा प्रवास अनेक स्त्रियांनी गेल्या काही वर्षांमध्ये यशस्वी करून दाखवला. आणि हा यशस्वी प्रवास करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण दिवसानुदिवस वाढतच आहे ही विशेष गोष्ट आहे. कारण या स्त्रियांचे यश हे त्यांच्या पुरते मर्यादित नाही. स्वत:ला सिद्ध करून दाखवू पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी त्या दीपस्तंभासारख्या आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा मिळते तसेच या वाटेवर कुठे आणि कसे धोके आहेत तेही त्यांच्याकडून कळते. यातही आणखी उत्साहवर्धक बाब अशी की या स्त्रियांनी पुस्तकाच्या माध्यमातून, ब्लॉगच्या माध्यमातून आपले अनुभव इतरांशी शेअर केले आहेत. अगदी अलीकडेच बरेच चच्रेत असणारं ‘फेसबुक’च्या सीओओ शेरिल सॅंडबर्गचे ‘लिन इन- वुमन, वर्क, अ‍ॅण्ड द विल टू लीड’ या पुस्तकात तिने हे म्हटले आहे, ‘महिला स्टिरिओटाइपच्या बळी ठरतात. म्हणजे काय तर स्त्रिया अशाच असतात, त्यांना हे जमते, ते जमत नाही असे जे ठाम समज समाजात असतात ते त्यांना पटायला लागतात आणि स्त्रिया त्यानुसारच वागायला लागतात. उदाहरणार्थ, फायनान्स हे महिलांचे क्षेत्र नाही असा सार्वत्रिक समज आहे. स्त्रियांनाही असेच वाटते की आपल्याला हे जमणार नाही. या मानसिकतेतून बाहेर येण्याचे मोठेच आव्हान स्त्रियांसमोर आहे. किंवा लीडरशिप ही स्त्रियांची वृत्तीच नाही, असे कायम जर मनावर िबबवले गेले तर लीडरशिपच्या फंदात न पडलेलेच बरे असेच अनेक स्त्रियांना वाटायला लागते. निर्णय घेण्याच्या महत्त्वाच्या क्षणी स्त्रिया पाऊल मागे घेतात.’  
स्त्रियांच्या बाबतीत नेहमी अनुभवाला येणारी सार्वत्रिक बाब शेरिलने आपल्या या पुस्तकात मांडली आहे. आणि अशा वृत्तीवर मात करत ती पुढे कशी गेली हे वाचणे जितके मनोरंजक आहे तितकेच प्रेरणादायी आहे. एक स्त्री म्हणून महत्त्वाच्या पदावर काम करताना तिला जे अनुभव आले त्यापासून ती शिकत गेली आणि स्त्रियांच्या उपयोगाच्या, हिताच्या अनेक गोष्टी तिने प्रत्यक्षात आणल्या. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अरुंधती भट्टाचार्य यांनी बँकेच्या दोन लाख सहकाऱ्यांना उद्देशून जे भाषण केले त्यात त्या कशा हार्ड टास्क मास्टर आहेत याची झलक दिसली. २ आणि २ मिळून चार नाही तर २२ झाले पाहिजेत या त्यांच्या विधानातून सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याची वृत्ती आणि तयारी दिसते. आय.सी.आय.सी.आय. या बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना एकदा विचारले होते की, तुमची बँक अतिशय कठीण परिस्थितीतून मार्ग काढून पुढे गेली ते केवळ तुमच्या शांत आणि संयत भूमिकेमुळे हे तुम्हाला पटते का? यावर त्यांनी दिलेले उत्तर बरेच काही सांगून जाते. त्यांनी म्हटले होते की, ‘‘माझ्यामुळे माझी बँक यशस्वी झाली असेल तर त्याचा मला आनंद नक्कीच आहे, पण त्या आनंदात रमून चालणार नाही. पुढचे मोठे पाऊल काय असणार आहे, याचाही विचार आणि योजना तितकीच महत्त्वाची आहे.’’ याचाच अर्थ यश मिळाले की त्यातच अडकून पडणाऱ्या या स्त्रिया नाहीत. सतत काहीतरी नवीन आणि वेगळे करण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी करावे लागणारे संघर्ष करण्याची त्यांची तयारी आहे.
महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या स्त्रियांच्या वैयक्तिक आयुष्याकडे आपण जवळून पहिले तर आपल्याला जाणवेल की, त्यांचाही हा प्रवास काही साधा, सोपा, सरळ नव्हता. पण तो प्रवास यशस्वी करण्याची जबरदस्त इच्छा त्यांच्याकडे होती. मार्गात येणाऱ्या संकटांवर मात करण्याची धमक त्यांच्याकडे होती. चुका झाल्या तरी त्यातून नवीन धडा घेऊन त्या पुढे जात रहिल्या. त्यांच्या लढय़ात त्यांना विरोध करणारी माणसे होती, तशीच त्यांच्या पाठीशी उभी राहणारी माणसेसुद्धा होती. या प्रवासात त्या कधी थकल्या असतील पण खचून गेल्या नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपला प्रवास कधी थांबू दिला नाही. म्हणूनच या सगळ्या स्त्रिया त्यांच्या आजूबाजूच्या स्त्रियांसाठी त्यांच्या मागच्या पुढच्या पिढीसाठी कायम आदर्श म्हणून रहिल्या. आपल्याच सारखी एखादी स्त्री यशाचे नवे नवे शिखर गाठत आहे हे पाहून प्रत्येक स्त्रीला तिचा म्हणून जो स्वत:चा लढा आहे त्याच्यासाठी बळ मिळतेच. चंदा कोचर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते,
‘आपल्याला दोन डोळे कशासाठी असतात, तर एक डोळा संधी शोधण्यासाठी आणि दुसरा आव्हाने शोधण्यासाठी. आणि या दोन दृष्टींचा मेळ बसतो तेव्हाच तुम्हाला योग्य मार्ग सापडतो.’ हे विधान अनेक बाबतीत लागू पडत असले, तरी स्त्रियांच्या बाबतीत फारच लागू पडणारे आहे. स्त्रियांना संधी मिळत आहेत पण या संधीचा उपयोग करताना आव्हानेसुद्धा खूप आहेत आणि या संधी आणि आव्हानांचा मेळ बसला की, यशाच्या पायऱ्या सोप्या वाटायला लागतात.
आता तुम्ही काही जण म्हणाल की, काही स्त्रिया मोठय़ा पदांपर्यंत पोचल्या. गलेलठ्ठ पगार घ्यायला लागल्या म्हणजे स्त्रियांसाठी सगळे आलबेल आहे का? या प्रश्नाचे उत्तर नक्कीच नाही असे आहे. उच्च पदावर पोचण्यासाठी अजूनही स्त्रियांना खूप संघर्ष करावा लागत आहे, पण हा संघर्ष यशात बदलायला लागला आहे. हळूहळू का होईना पण समाजाचा स्त्रियांच्या क्षमतांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो आहे. यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या स्त्रियांनीही आपल्या क्षमता सिद्ध करून मागून येणाऱ्या स्त्रियांचा मार्ग मोकळा करायला हातभार लावला आहे. दबकत दबकत का होईना पण आपल्याला समान संधी मिळाव्यात, कामाचा योग्य मोबदला मिळावा, पदोन्नतीच्या समान संधी मिळाव्यात अशा रास्त मागण्या स्त्रियासुद्धा करायला लागल्या आहेत. आपण बाईमाणूस, आपल्याला हे जमणार नाही, ते जमणार नाही, अशा मानसिक बंधनातून स्त्रिया स्वत:च मुक्त व्हायला लागल्या आहेत. एकमेकींकडे पाहून पुढे जात आहेत आपल्याच मत्रिणींकडून बळ मिळवत आहेत.
‘ग्लास सीिलग’ स्त्रियांनी भेदले आहे का? या प्रश्नाचे उत्तर जसे हो आहे, तसे नाहीसुद्धा आहे. काही महिला खरोखरच या अदृश्य िभती पार करू शकल्या आहेत, पण काहींसाठी मात्र अजूनही हा अडथळा आहेच. पण त्या अडथळ्यांवर मात करण्याची इच्छा जोवर टिकून आहे, तोवर ग्लास सीिलग नाहीसे होण्याची आशासुद्धा टिकून आहे. २५ वर्षांपूर्वी एखाद्या मोठय़ा बँकेच्या अध्यक्षपदावर महिला असेल असा विचारही कोणी क्वचितच केला असेल, पण आज तीच गोष्ट प्रत्यक्षात आली आहे. भारतातल्या छोटय़ाशा खेडय़ातल्या छोटय़ाशा मुलींसाठी शाळासुद्धा दुरापास्त असण्याचे दिवस आता भरभर मागे पडायला लागले आहेत. तिच्या समोर असणाऱ्या रोल मॉडेलची संख्या वाढती आहे, तोवर तिच्या डोळ्यातली स्वप्नं प्रत्यक्षात येण्याची शक्यताही वाढती राहणार आहे. म्हणूनच एक स्त्री मोठी झाली याचाच आनंद नाही, तर तिच्यापासून अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळणार आहे,बळ मिळणार आहे याचा आनंद अधिक आहे. म्हणूनच तडे गेलेले ग्लास सीिलग कधी तरी पूर्ण नाहीसे होईल, ही अशासुद्धा टिकून आहे.      
upsdk@gmail.com