03 March 2021

News Flash

वसुंधरेच्या लेकी : द अँग्री ब्लॅक गर्ल!

पर्यावरण रक्षणाचा, पुढच्या पिढीच्या भवितव्याचा, वंचितांच्या आजच्या जगण्याचा विचार न करता  हाती असलेल्या सत्ता- संपत्तीच्या जिवावर अमर्याद विकास करू पाहाणाऱ्यांवर ‘रागावलेल्या’ मुलामुलींमधल्या इसराविषयी.

इसरा हिरसी

सिद्धी महाजन – wsnmhjn33@gmail.com

जागतिक हवामानबदलाच्या परिणामांमध्ये जगभरातला तळागाळातला समाजच आधी भरडला जात असल्याचं वारंवार समोर आलं आहे. पर्यावरणाच्या महाकाय प्रश्नाची आणि कृष्णवर्णीय समाजाच्या प्रश्नांची सांगड घालत, आजूबाजूला घडणाऱ्या घटना समजून घेत, त्यावर आपलं मत मांडणारी अमेरिके तली १७ वर्षीय इसरा हिरसी तिच्या वयाच्या इतर मुलांमध्ये वेगळी उठून दिसते. इसरा तिची मतं समाजमाध्यमांवर ठामपणे मांडते आणि त्यावर होणाऱ्या वादांना, प्रतिहल्ल्यांना आत्मविश्वासानं उत्तरं देते. पर्यावरण रक्षणाचा, पुढच्या पिढीच्या भवितव्याचा, वंचितांच्या आजच्या जगण्याचा विचार न करता  हाती असलेल्या सत्ता- संपत्तीच्या जिवावर अमर्याद विकास करू पाहाणाऱ्यांवर ‘रागावलेल्या’ मुलामुलींमधल्या इसराविषयी.

दिनांक २० सप्टेंबर २०१९ या दिवशी जगभरातील हजारो शाळकरी मुलामुलींनी शाळेला चक्क दांडी मारली. या बंडखोरीमागे काही ठोस कारणं होती. विकासाच्या प्रचंड वेगात तगण्याच्या, जगण्याच्या खटपटीत दृष्टिआड झालेली कारणं. दर शुक्रवारी ही मुलं एकत्र जमायची. ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ किंवा ‘भविष्यासाठी शुक्रवार’ या मोहिमेअंतर्गत आंदोलनं आयोजित करायची, सभा घ्यायची, मोर्चे काढायची.

या चळवळीनं जगभरातल्या किशोरवयीन मुलामुलींना पर्यावरणीय प्रश्नांवर विचार करायला भाग पाडलं. आपल्या समाजाशी, भवतालाशी अन् निसर्गाशी मिळतीजुळती नवी ओळख अन् आत्मभान दिलं. जागतिक तापमानवाढीमुळे ठिकठिकाणी उद्भवणाऱ्या समस्यांमुळे भरडल्या गेलेल्या विविध समूहांचा चेहरा बनून  लढायचा आत्मविश्वास दिला. या पाश्र्वभूमीवर ‘टेड एक्स टॉक’च्या व्यासपीठावर ‘द अँग्री ब्लॅक गर्ल’ याच नावाने पुढे येत आत्मविश्वासानं बोलणाऱ्या एका चुणचुणीत मुलीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं!

ती इसरा हिरसी. ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ या चळवळीची मशाल अमेरिकेतून समर्थपणे पेलणारी ही मुलगी. बडय़ा राजकारणी लोकांच्या खांद्याला खांदा लावून, वाढत्या कार्बन उत्सर्जनासंदर्भात व्यवस्थेनं दाखवलेल्या नाकर्तेपणावर खडसावून जाब विचारणारी ही सतरा वर्षांची कृष्णवर्णीय मुलगी. समाजमाध्यमांवर ‘येस आय अ‍ॅम सेव्हंटीन अँड आय हेट कॅपिटॅलिझम’ असं जाहीर करणारी   ‘यू. एस. युथ क्लायमेट स्ट्राइक’ची कार्यकारी संचालिका.  इसराची ओळख शाळेपासूनच ‘पॉलिटिकल पोलीस’ अशीच. मिनिसोटा राज्यातल्या मिनियापोलीस शहरात आणि हक्क मिळवण्यासाठी लढण्याचा, चळवळीचा ‘डीएनए’ लाभलेल्या कुटुंबात इसराचं बालपण गेलं. लहानपणापासूनच तिनं आपल्या समुदायाच्या प्रश्नांकडे सजगपणे पाहाण्यास सुरुवात केली होती. अनेक सामाजिक चळवळींमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. डोळे उघडे ठेवून आजूबाजूच्या घडामोडींवर नजर ठेवताना अनेक प्रश्नांनी तिचं लक्ष वेधून घेतलं. एकीकडे अमेरिके तल्या, तेही ती जन्माला आलेल्या सोमालियन कृष्णवर्णीय अल्पसंख्य समाजाच्या हक्कांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. अति बर्फवृष्टीमुळे तापमानात झालेली कमालीची घट, मिशिगन राज्यातल्या फ्लिंट शहरात पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्यानं उद्भवलेला पाणीप्रश्न अन् संपूर्ण राज्यात पसरलेल्या  नैसर्गिक वायू वाहिन्यांच्या जाळ्यात अडकलेला धरणीचा श्वास या सर्व समस्या तिच्या आजूबाजूला उग्र रूप घेत होत्या. हे सारं पाहून ही लहानगी अस्वस्थ होत होती. या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी एका सामूहिक विचाराच्या शोधात असताना ती ‘आय मॅटर मिनियापोलिस’ या ‘ग्रीन क्लब’ची सभासद बनली. हवामानबदलाशी निगडित आंदोलनांत सक्रिय असणाऱ्या अनेक संस्था, व्यक्तींशी जोडली गेली. पर्यावरणविषयक समस्यांवर गंभीरपणे विचार करू लागली. यातच एका समांतर जाणाऱ्या मितीकडे तिचं लक्ष वेधलं गेलं, ती म्हणजे तिची वांशिक ओळख.

इसरा सोमालियन अमेरिकन कृष्णवर्णीय वंशाची मुस्लीमधर्मीय आहे. तिची आई आहे इल्हान ओमर. अमेरिकन काँग्रेसमध्ये निवडून आलेली सोमालियन अमेरिकन कृष्णवर्णीय वंशाची पहिली मुस्लीम स्त्री. लहानपणापासून सोमाली अमेरिकन वंशाच्या कृष्णवर्णीय समुदायात मिळून मिसळून वाढल्यामुळे ती ओळख तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनली. शाळेत असताना ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ या कृष्णवर्णीय हक्कविषयक चळवळीमध्ये तिनं सहभाग नोंदवला होता. जन्मापासून नाळ जोडलेली ही तिची ओळख होती. तिला ती अजिबात पुसून टाकायची नव्हती, तर ती जपतच पुढे जायचं होतं. स्वत:ची स्वतंत्र सामाजिक ओळख जागी होताना तिच्या लक्षात आलं, की बहुसंख्याक समुदायात ज्या प्रश्नांचा विचार केला जातोय, त्यांचा अन् अल्पसंख्य समुदायाच्या समस्यांचा पोत फार वेगळा आहे. पोटापुरतं कमावणाऱ्या हातांची दु:खं दाहक आहेत. त्यामागे वर्षांनुर्वष हिंसा, उपेक्षा यात पोळला गेलेला अल्पसंख्य, अशिक्षित समाज आहे. त्यात पर्यावरणीय समस्या आणि त्यांनी वाढवलेला गुंता हेही घटक येतात. त्या समस्या सुखवस्तू समाजाला टोचणाऱ्या सुखाएवढय़ा गोमटय़ा मुळीच नसतात.

इसराच्या म्हणण्याप्रमाणे अविकसित आणि विकसनशील देशांतील वंचित आणि दुर्लक्षित समाजाला वातावरणबदलांचा सर्वात मोठा फटका बसला आहे. जागतिक तापमानवाढ आणि समुद्राची वाढत जाणारी पातळी यामुळे अधिकांश भूभाग पाण्याखाली जाऊन निर्वासितांची संख्या वाढते. ऋतूंमध्ये होणारे मोठे बदल, सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती यांनी आशिया आणि आफ्रिका खंडातील जनता पुरती गांजून गेली. ‘हरिकेन मारिया’ हे वादळ पोएर्तो रिकोमध्ये दाखल झालं तेव्हा आधीच आर्थिक आणि सामाजिक विषमता अनुभवणारा समाज देशोधडीला लागला. अर्थव्यवस्थेचा कणा आणखीनच खिळखिळा झाला. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांना आधीच वंचित असलेले ते लोक त्यास अधिकच महाग झाले. या उलथापालथीमध्ये मोठा फटका बसला तो गरीब आफ्रिकी देशांना. दरडोई कमी उत्पन्न असलेल्या या देशांमधील समाजाला नैसर्गिक आपत्तींची फार मोठी झळ बसली. हातावर पोट असलेले, काम शोधत स्थलांतर करणारे कामगार मोठय़ा प्रमाणात विस्थापित झाले. मागास देशांतून सधन देशांत होणारे स्थलांतर वाढले, तशीच नवीन नोकरीधंदे निर्माण होण्याची शक्यताही.

कृष्णवर्णीय समाजाला सर्व प्रकारची समानता अन् बळ हवं आहे. चुकीच्या धोरणांतून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भरडले गेल्यावर, पुन्हा नवी धोरणं ठरवताना त्यांचं म्हणणं विचारात घेणं महत्त्वाचं आहे. याबद्दल निर्णय घेणाऱ्या संस्था, समित्या, परिषदा यांच्यात त्यांना प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे. म्हणूनच या वांशिक ओळखीचा पुरस्कार करणारी सर्वसमावेशक पर्यावरणवादी चळवळ असं इसराच्या चळवळीचं स्वरूप बनलं आहे, कारण तिच्या मते हे मुद्दे वरवर वेगवेगळ्या दिशांना जात असल्यासारखे वाटत असले, तरी ते एकमेकांना स्पर्श करतातच. प्रत्येक व्यक्ती हे एक झाड आहे, मातीत खोलवर रुजलेलं. त्याची ओळख निसर्गाशी नातं सांगते. संस्कृती जपून ठेवण्याची प्रेरणा निर्माण करते. माणसामाणसांतील वैविध्य टिकून राहाणं समाजाच्या दृष्टीनं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच ते वसुंधरेच्या आरोग्याच्या दृष्टीनंही आश्वासक आहे. म्हणूनच या नव्या पिढीनं हे आंदोलन उभारलं आहे. तिच्या मते मोठय़ा प्रमाणावर कार्बन उत्सर्जन करणाऱ्या भांडवलशाही राष्ट्रांवर कार्बन कर लावून त्यातून गरिबांना मदत करायला हवीय. सतत अनिश्चित भविष्याच्या छायेत असणाऱ्या आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस उपाय करण्यात आले पाहिजेत.

जानेवारी २०१८ मध्ये इसरानं ‘यू. एस. युथ क्लायमेट स्ट्राइक’ या देशव्यापी चळवळीचा पाया रोवला. तेव्हापासून या आंदोलनाचं संघटनात्मक धोरण ती ठरवते आहे, कायदेशीर समर्थन करीत कार्यवाहीची बाजूही उत्तम सांभाळते आहे. तिच्या देशातील सधन आणि राजकीय वर्तुळात आढळणारी, वातावरणबदलावर काही ठोस उपाय करण्यात आडकाठी करणारी मनोवृत्ती तिच्यासमोर असलेलं सर्वात मोठं आव्हान आहे. पेट्रोलियम आणि कोळसा उद्योगावर मोठा भर असणाऱ्या या देशात शाश्वत विकासाकडे केव्हाचीच डोळेझाक केली गेली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा हवा तसा वापर करून राक्षसी प्रगती केली गेली. या मुद्दय़ांवर आवाज उठवू पाहाणाऱ्या वर्गाची मुस्कटदाबी केली गेली. आता याविरुद्ध आवाज उठवणं, ही एका निष्काळजी भूतकाळाच्या स्वार्थी निर्णयांमुळे अतिशय धोक्यात आलेल्या भविष्यकाळाचीच जबाबदारी आहे. वेगवान विकासासमोर सदान्कदा दुर्लक्षित राहिलेला वातावरणबदल ही बदलत्या भविष्यातली मोठी धोक्याची घंटा आहे, हळूहळू भिनत जाणाऱ्या विषासारखी भयंकर राष्ट्रीय आपत्ती आहे.

या पाश्र्वभूमीवर अपारंपरिक ऊर्जा तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि कार्बन उत्सर्जनात घट करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न जागतिक तापमानवाढीला आणि प्रदूषणाला आळा घालायला मदत करतील. म्हणूनच या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवणारं नवीन हरित धोरण या मुलांच्या दृष्टीनं आणि एकूणच पृथ्वीच्या भविष्याच्या दृष्टीनं आशेचा नवा किरण बनणार आहे. जगभरातून या नव्या विचाराला मोठा पाठिंबा मिळतोय. इसराच्या खांद्यावर कौतुकाची थाप पडते आहे. २०१९ चं ‘ब्रोवर युथ अ‍ॅवॉर्ड’ तिला मिळालं. ‘फॉच्र्युन’ मासिकाने चाळीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या राजकारणातील चाळीस सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत २०२० मध्ये तिचं नाव समाविष्ट केलं आहे. फेब्रुवारी २०२० रोजी ‘टेड टॉक’मध्ये जनतेला संबोधित करण्यासाठी तिला आमंत्रण मिळालं. तिचे लोक अन् तिचा समाज तिच्यासाठी अक्षय्य ऊर्जेचा स्रोत आहेत.

आईच्या पावलावर पाऊल ठेवून तिला राजकारणात प्रवेश करायचा आहे, पण तिच्या सावलीत वाढणं इसरा नाकारते. सार्वजनिक ठिकाणी स्वत:ची स्वतंत्र ओळख सांगते. २०२० मधल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या धोरणात ‘हवामानबदल आणि शाश्वत विकास’ हा परवलीचा शब्द बनवण्यात तिचा फार मोठा वाटा आहे. हवामानबदलाच्या मुद्दय़ाबाबत संवेदनशील असणाऱ्या लोकप्रतिनिधीला तिचा पाठिंबा राहिला होता. खुद्द माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी ट्वीट करून या ‘अँग्री ब्लॅक गर्ल’च्या प्रयत्नांची दखल घेतली. ‘टीन व्होग’ मासिकानं इसरा आणि तिच्या आईचं छायाचित्र आपल्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध केलं आहे. ‘‘मी ५ वर्षांची असल्यापासून अमेरिके ची राष्ट्राध्यक्ष होण्याचं स्वप्न पाहात आहे.२०४० च्या अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक मी लढवेन,’’ असं ती या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आत्मविश्वासानं सांगते. २५ मे २०२० रोजी जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या झालेल्या मृत्यूनंतर जे आंदोलन झालं त्यात तिनं सक्रिय सहभाग घेतला होता. ‘‘ते आमचं संरक्षण करण्यासाठी नसून विश्वासघात करण्यासाठी आहेत,’’ असं म्हणत आपल्या तिखट ट्वीटनं ट्विटरवर रान उठवलं होतं.

‘आयडेंटिटी क्रायसिस’ अनुभवायला लावणाऱ्या वयात आपल्या व्यक्तिमत्त्वाची नाळ कशाशी तरी जोडू पाहणं आणि त्याहीपुढे जाऊन निसर्गाशी जोडणं किती सुंदर आहे! इसरा म्हणते, ‘‘मी निसर्गाच्या सान्निध्यात वाढले नाही, की छंद म्हणून इतर मुलांसारखी कधी तळ्याच्या काठावर कॅम्पिंगसाठी गेले नाही; पण समाजाच्या समस्या जाणून घेता घेता, फॉर ए ग्रेटर गुड, माझी नजर पर्यावरणविषयक प्रश्नाचा वेध घ्यायला शिकली आहे. माझा आतला आवाज माझ्या सातासमुद्रापलीकडे वसलेल्या समाजाचे प्रश्न जाणून घ्यायला मदत करतो.’’  या मुलीचा शांत आवाज कानात घुमत राहतो, कारण तळागाळातील उत्तम काम करणाऱ्या, मिसळून, निसर्गाशी एकरूप होऊन सतत पृथ्वीच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या कित्येक व्यक्ती अन् समाजघटकांचा समाजाभिमुख असा हा एकसंध आवाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 1:09 am

Web Title: isra hirsi the angry black girl vasundharechya leki dd70
Next Stories
1 गद्धेपंचविशी : अनुभवसमृद्धीची ‘पंचविशी’!
2 शांतता, टोमणे सुरू आहेत..
3 लुजैन अल् हाथलूल यांच्या शिक्षेचा अन्वयार्थ
Just Now!
X