मंगला गोडबोले

mangalagodbole@gmail.com

चित्रपट स्त्रियांच्या समस्यांवर होता. पण त्यावरचा कार्यक्रम तुफानी विनोदी असल्याचा एकूण माहौल होता. हा मुलाखत्या कोणताही कार्यक्रम विनोदी करण्यात वाकबगार होता. आताही ‘आत्या.. आत या’ ‘पुढे मी म्हणेन.. पुढे नको, मागे म्हणा’ वगैरे सुरू होतंच. नायिका मध्येच बिचारी गंभीरपणे म्हणाली, ‘अलीकडे मला असं वाटायला लागलंय’ यावर लगेच ‘सारखं वाटायला नको, आता मिक्सर आलेत घराघरात’ असा अत्यंत ओरिजिनल आणि ‘इंटेलिजेंट’ विनोद त्याने केला.मावशींना काही हसू येईना. विनोद कळल्याशिवाय हसायचं कसं हे कळत नसल्याने त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

घराबाहेर पडायला थोडा अवकाश होता म्हणून सगळी तयारी करून मावशींनी कोचावर बसत समोरचा दूरचित्रवाणी संच सुरू केला. तर छोटय़ा पडद्यावर एका नव्या मराठी चित्रपटाच्या ‘प्रमोशन’चा कार्यक्रम सुरू होता. त्यातला नायक, नायिका, दिग्दर्शक, कॅमेरामन वगैरे पाचसात माणसं चित्रपटाची भलावण करायला बसवली होती आणि एक प्रसिद्ध मुलाखत्या त्यांना बोलतं करीत होता.

चित्रपट स्त्रियांच्या समस्यांवर होता. पण कार्यक्रम तुफान विनोदी असल्याचा एकूण माहौल होता. हा मुलाखत्या कोणताही कार्यक्रम विनोदी करण्यात वाकबगार होता. समोर बसलेल्या मान्यवरांशी एकेरीत बोलणे, टाळ्या देणे, टपल्या मारणे, मध्येच खुर्चीतून उठून स्वत:भोवती किंवा त्यांच्याभोवती गोल फिरणे, नकला करणे, खुर्चीवर उभे राहणे, सेटवर मांडी घालून बसणे असले सर्व विभ्रम करून कोणताही कार्यक्रम पठ्ठय़ा हसताखेळता, नाचतागाता इत्यादी करू शके. आताही ‘आत्या.. आत या’ ‘पुढे मी म्हणेन.. पुढे नको, मागे म्हणा’ वगैरे सुरू होतंच. नायिका मध्येच बिचारी गंभीरपणे म्हणाली, ‘अलीकडे मला असं वाटायला लागलंय’ यावर लगेच ‘सारखं वाटायला नको, आता मिक्सर आलेत घराघरात’ असा अत्यंत ओरिजिनल आणि ‘इंटेलिजेंट’ विनोद त्याने केला आणि त्यावर हसताहसता तोच खुर्चीतून ‘पलीकडे’ पडला. यामुळे तिथे चौफेर हसण्याचा गदारोळ माजला. मावशींना काही तेवढं हसू येईना. मग त्यांनी आपल्या नजरेतून विनोद सुटू नये म्हणून जास्त बारकाईने बघायला सुरुवात केली. शूटिंग दरम्यान त्या सेटवर म्हणे आग लागली होती आणि तिच्यात म्हणे शेवटी शेवटी काही उपस्थितांनी कांदे भाजून खाल्ले होते. हा धम्माल विनोदी किस्सा सांगताना तर बोलणाऱ्यांपैकी एकाचंही एकही वाक्य पुरं होईना. ‘‘त्या दिवशी या चच्याने म्हणजे..’ असं एकानं म्हणताच उरलेले हातवारे करत खिदळायचे. की लगेच ‘‘आमचे अप्पा तरी काय कमी..’ असं दुसरा म्हणून सगळ्यांना खिंकाळायला लावे. त्यात लगेच ‘‘तू काही सांगू नकोस.. विन्या.. तू साxx ..’ एवढंच तिसऱ्यानं बोलायचा अवकाश, सगळे पुन्हा हसूनहसून भुईसपाट. एकूण ‘धम्माल’मधले ‘म’ फक्त वाढलेले मावशींना कळले. प्रत्यक्षात त्या चच्या.. अप्पा.. विन्या यांच्यामध्ये काय झालं हे जाम कळलं नाही. विनोद कळल्याशिवाय हसायचं कसं हे कळत नसल्याने त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

संध्याकाळी त्यांच्या मैत्रिणीला, प्रा. शुभांगिनी साखरदांडेला, रसायनशास्त्रामधल्या तिच्या व्यासंगाबद्दल विद्यापीठातर्फे सन्मान मिळणार होता. त्या समारंभाला जाताना तिच्यासाठी छानशी साडी भेट घेऊन जायचा बेत होता. म्हणून त्यांनी हौसेनं साडय़ांचं दुकान गाठलं. त्यांची मागणी ऐकून दुकानदाराने फर्मान सोडलं, ‘‘अरे, गण्या..‘हास्यसम्राट’चा लॉट दाखव रे ताईंना.’

‘‘कशाचा?’’

‘‘हास्यसम्राटचा हो.. त्यातले सगळे बाप्ये साडय़ा नेसून रोज लोकांना हाशीव हाशीव हाशिवतात ना.. फार हिट आहेत त्या साडय़ा.’’

‘‘हो का.. असेल बाई.. पण मला जरा वेगळ्या हव्या होत्या.’’

‘‘बरं.. अरे गण्या तो स्मितॉथॉनवाला लॉट काढ रे.’’

‘‘स्मितॉथॉन..’’

‘‘मग? हसण्याचा मॅरेथॉन घाणा नसतो का त्यात? त्यातले बाप्ये तर साडय़ा नेसून शड्डू ठोकतात. ‘बाईमाणूस’ वगैरे ज्योक करतात. आठवडय़ात पाच पाच दिवस दीड दोन तास हसवणं ही काही ज्योक आहे का मॅडम?’’

 

‘‘नक्कीच नाही. पण मला सांगा.. तुमच्याकडे बायकी साडय़ा अशा काही मिळतच नाही का आता?’’

‘‘आता बायका जास्त साडय़ा नेसतात तरी कुठे? कॉमेडीवाले बाप्ये नेसतात म्हणून आमची पोटं भरताहेत अजून तरी. गेल्या आठवडय़ात एका कॉमेडीवाल्यानं नऊवार नेसून लावणी केलेली. लगोलग तशा पंधरा नऊवार विकल्या आपण पुढच्या वारी.’’

‘‘हो का? अरे वा.. बाकी त्या रात्री मला तरी खूप मळमळत होतं एवढं आठवतंय..’’ मावशी अनवधानाने म्हणाल्या. पुरुषाने पुरुषासारखे कपडे घालून पुरुषी हावभाव केले तर विनोद होऊच शकत नाही, या विश्वासावर तर चाललं होतं बाहेरचं हसरं जग! भरीला कोणीतरी काळाकुट्ट, लठ्ठय़ामुठ्ठय़ा किंवा बुटका कुबडय़ा वगैरे माणूसही घेतला जाई. की मग त्याच्या व्यंगावर विनोद करायला सगळे मोकळे. कोणाच्याही शारीरिक व्यंगाला हसू नये अशा अत्यंत मागासलेल्या कल्पनेत वाढलेल्या मावशींना हे कुठलं पचायला. कोणी उगाच वरचेवर आणि अनावर हसत सुटलं तर त्याच्याकडे अंमळ संशयानेच बघावंसं वाटायचं त्यांना. आणि एवढं प्रचंड ओक्साबोक्शी, हमसून हमसून वगैरे हसू येणं तर घडायचं आठपंधरा दिवसांमध्ये कधीतरी एखाद्या वेळेस.. मावशी स्वत:लाच बोल लावत साडी खरेदी न करता दुकानाबाहेर पडल्या. दुसरी एक भेटवस्तू खरेदी करून समारंभाला गेल्या. सखीचं कौतुक करावंसं वाटत होतंच आतून.

प्रा. शुभांगिनी साखरदांडे यांच्या ज्ञाननिष्ठेचा गौरव होत होता. एखादी विद्वतसभा म्हणावी असं वातावरण अपेक्षित होतं. पण तिथेही निवेदिकेला विनोदाची उबळ आली. ‘मॅडमची केमिस्ट्रीशी केमिस्ट्री जुळली’ इथपासून तिने निवेदनाला सुरुवात केली. मग शुभांगिनी या खऱ्यातर ‘ज्ञानाच्या संगिनी’ आहेत. अशा माफक चलाख विधानावर लोक थोडे हसले. पण तेवढय़ाने समाधान होईल तर ती निवेदिका कसली? मग तिने साखरदांडे या आडनावाच्या चिंध्या करायला घेतल्या. शिकवताना मॅडममध्ये साखरेचा गोडवाही येतो आणि जरूर तेव्हा शिस्तीचा दांडाही त्या उगारतात वगैरे साखरपेरणी झाली. लोक आणखी थोडे खसखसले. मग निवेदिका मॅडमच्या ‘शुभ अंगी’ असण्यात घुसल्या. मॅडमने मोठा व्यासंगही केला आहे. केमिस्ट्रीसारख्या पाठांतराचा विषय पोराटोरांच्या गळी उतरविला आहे. हे किरकोळ मुद्दे या हसवून सोडण्याच्या अट्टहासात कधी मागे पडले हे कळलंही नाही. करता करता शेवटी कधीतरी, विद्यार्थ्यांना फॉम्र्युले शिकवण्याचे फॉम्र्युले मॅडमनी अचूक शोधले आहेत, हे वाक्य बापडीने शोधलं तेव्हा ती स्वत:च इतकी हसली, की पहिल्या रांगेतल्या दोनतीन लोकांना बळेबळे हसून कंटाळा लपवावा लागला. अशा प्रकारे कार्यक्रमाला ओढूनताणून विनोदाचे चार चाँद लावल्यावरच निवेदिका जरा शांत झाली. चार माणसं पुढय़ात जमलीयेत, जाहीर कार्यक्रम आहे आणि विनोद नाही हे काही आजच्या घडीला चालणारं नव्हतंच नाहीतरी. अर्धापाऊण वेळ हसू आणि शेवटी थेंबभर आसू याखेरीज माणसांना एकत्र बसू द्यायचं नाही या तत्त्वावर तर सगळं चाललं होतं. आपण रिक्षात बसल्यावर रिक्षाचा मीटर पडतो. शुल्काचे आकडे वाढतात. तसं एखाद्या कार्यक्रमाला बसल्यावर हशांचा मीटर पडला पाहिजे. सोबत टाळ्याबिळ्या पडल्या पाहिजेत. उगाच ‘थोडी गंमत’ वाटण्यात गंमत नाही. समोरच्यांना हसू फुटलं नाही तर कार्यक्रम करणाऱ्यांचं नशीब फुटलंच म्हणून समजा.

असं सगळं मनात दाटल्याने मावशींचा चेहरा बराचसा कोराच राहिला. आजूबाजूचे खिदळणारे लोक चमत्कारिक नजरेने आपल्याकडे बघत असतील असं जाणवल्यावर तो रडकाही झाला नसेलच असं नाही. पण त्यांना खरोखरीचा प्रश्न पडला. हे काय होतंय आपलं? आपण खडूस आहोत का? तर नाही. एखाद्या, सहज, उत्स्फूर्त, मार्मिक विनोदाला हसू शकतो आपण. अगदी तो समोरच्यानं किंवा थेट शत्रूने केला असला तरीही. तेवढी दानत टिकली आहे अजून. पण हे असं कर्तव्यभावनेने हसून नंतर ‘हुश्श’ करणं रोजच्या रोज ठरलेल्या वेळी.. ठरलेला वेळ हसण्याचा रतीब घालणं कठीण आहे. जे घालताहेत त्यांना सलाम. पोटासाठी माणसाला करावं लागतं काहीकाही किंवा काहीच्या काही किंवा काहीही. पण यातलं काहीच जमत नाही म्हणून आपली न हसणारी राजक न्या होऊ घातलीये का? ती गोष्टीतली होती म्हणून तिची गोष्ट वेगळी. तिला हसवायला आलाही कोणी राजकुमार. आपल्यासाठी कोण येणार?

‘व्वा’ हेल्पलाइन? मावशींना एकदम आठवलं. हे ‘व्वा’वाले आजकाल फार लोकप्रिय होऊ लागले होते. वत्सलावहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाइस! अनवट समस्यांवर तोडगे सुचविण्याचा प्रयत्न! मावशींनी तातडीने ‘व्वा हेल्पलाइन’शी संपर्क केला.

‘‘हॅलो, वत्सलावहिनी.. माझी फार विचित्र समस्या आहे हो.. मला मुळी हसूच येत नाही आताशा..’’

‘‘काय सांगता? हसू येत नाही? खो खो हसावं, केविलवाणे, उदास हसावं अशा खूप गोष्टी घडत असतात की आसपास आपल्याकडे, रोजच्या रोज.’’

‘‘हो ना.. सगळं कळतं पण हसू येत नाही.. लोकांबरोबर..’’

‘‘अरेरे.. कधीपासून?’’

‘‘असेल, गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून.. आसपास सगळे, ख्या ख्या.. करत असतात.. आणि मी तेवढी मख्ख..’’

‘‘सीरियस..व्हेरी सीरियस!’’

‘‘असं कसं झालं माझं?’ पूर्वी वेळच्या वेळी मनसोक्त हसलेय मी..चिं. वि., अत्रे, पु. ल., वुडहाउस वगैरेंमुळे.. ते कोणीही बेटे कधीच अंगचटीला येत नसत, तरीही..’’

‘‘अजून रडूबिडू येतं की नाही?’’

‘‘येतं की.. एकेकाचा हसवण्याचा खटाटोप पाहिला की.. किती करुण असतात हो ते प्रयत्न.’’

‘‘ठिके. तुम्हाला अजून रडू येतंय म्हणजे हसू येण्याच्या होप्स असून संपलेल्या नाहीत. बाकी शेवटचा प्रयत्न म्हणून रेकॉर्डेड लाफ्टर असतोच.’’

‘‘हसण्याच्या ध्वनिमुद्रिका?’’

‘‘मग? त्या लावून ठेवाव्याच लागतात मागे. आपल्या कार्यक्रमाने कोणालाही जराही हसू येणारच नाही अशी खात्री असणारे लोक त्या सोबत घेऊन फिरणार. शास्त्र असतं ते!’’

‘‘हो का’ आम्हाला पूर्वी शिकवायचे चांगला विनोद हे शस्त्र असतं. हत्यार. आता जास्त वेळा विनोदाची हत्याच करतात एकेक जण. तीही हसण्याची सक्ती सोबत ठेवूनच. नाकातोंडात कोंबून हसायला लावायचं. हसत कसे नाही ते बघतोच. असा दम द्यायचा.’

‘‘एवढं असतं?’. मला नाही वाटत.’’

‘‘माणसं राबराब राबतात हो त्यासाठी.. अँकर लोक तर खुर्चीवरून पडतात.. उठतात, नाचतात, स्वत:भोवती गिरक्या घेतात.. गॅलरीला हसवायला कॅलरी जाळण्यापर्यंत कष्ट करतात बिचारे..’’

‘‘त्यांच्या कष्टाला दाद म्हणून तरी हसावं की मग!’’

‘‘हो.. करते तसा प्रयत्न.. पण.. मला आपलं वाटायचं, प्रत्येक विषय कसा, त्याच्या त्याच्या वजनाने घ्यायला हवा. विनोदाच्या वेळी विनोद, एरवी सारखं सगळं हसत खेळत कसलं करायचं?’’

‘‘सोच बदलिये. रवैया बदलेगा, आपला आपण बदलता येत नसेल तर एक उपाय सुचवते. एखाद्या हास्यदंगल कार्यक्रमाला परीक्षक व्हा.’’

‘‘इश्श.. मला कोण परीक्षक करणार? मी थोडीच तज्ज्ञ आहे?’’

‘‘बघा.. दाखवलीत ना विनोदबुद्धी. अहो.. अहो कोणत्याही स्पर्धेचा परीक्षक त्यातला तज्ज्ञ असावा लागतो. असं कोणी सांगितलं? नटूनथटून त्या खुर्चीत बसणं आणि ‘टॅजण्ट’ स्मार्ट विधान करणं जमलं की झालं. करू शकतो आपण मॅनेज. होता हास्यबुद्रुकच्या परीक्षक?’ वत्सलावहिनी हसत हसत म्हणाल्या.

इथं मात्र मावशीचं सगळं अवसान क्षणात गळालं. एकदम रडकुंडीला येऊन म्हणाल्या. ‘‘नका हो.. एवढं माकड करू नका आमचं. वाटल्यास जेव्हाच्या तेव्हा हसून टाकेन. समोर टकल्या येवो, कुबडवाला येवो, साडीतला बाप्या येवो, दात विचकेन, चालेल की पळेल? छाप विनोद होवोत, खिदळेन. दर तीन मिनिटांमध्ये तीनदा खुसूखुसू ते खदाखदा अशापैकी काहीतरी हसून दाखवेन.. मोबाइलला तसं टायमिंगच लावून ठेवते ना..’’