अपर्णा देशपांडे

आजच्या तरुण पिढीबरोबर नांदणाऱ्या त्यांच्या मात्यापित्यांना, आजी- आजोबांना त्यांच्या अनेक बाबतींतल्या विचारांचं नवल वाटतं. ही मुलं भावनिक गुंतवणूक तर करतात, पण आळवाच्या पानांप्रमाणे भावनेच्या पाशांमध्ये न गुरफटणंही त्यांना सहज जमतं. ‘त्यात काय एवढं?’ हा त्यांचा परवलीचा शब्द झाला आहे. भावनांच्या अशा सुटसुटीतपणामुळेच कदाचित आयुष्यातले अनेक निर्णय घेणं त्यांना सोपं जातं. पण त्यामुळे ‘आमच्या वेळी तसं नव्हतं’ असं वाटणाऱ्यांना प्रश्न पडतो, की आताच्या पिढीचं हे वागणं योग्य म्हणावं की अयोग्य?..

दुपारपासून संपदाची नुसती घालमेल सुरू होती. कॉलनीतल्या खरे आजोबांची प्रकृती बरी नव्हती. ‘‘काळजी करू नका काकी, माझा मोठा लेक स्वप्निल तुम्हाला दवाखान्यात नेईल,’’ असं सांगून ती स्वप्निलची वाट बघत होती.

‘‘हल्लीच्या मुलांना ना, कशाचं गांभीर्य म्हणून नाहीच. इथे आपला जीव कुरतडून अर्धा झालाय! आज त्याला जास्त काम नसल्यानं काकींना शब्द दिलाय मी तो येईल सोबत म्हणून! ’’ ती स्वप्निलच्या नावानं जपमाळ ओढत असतानाच त्यानं तीरासारखी घरात एन्ट्री घेतली.

‘‘कुठे होतास रे? मी केव्हाची वाट बघतेय!’’

‘‘तूच सांगितलंस ना, खरे आजोबांना न्यायचंय म्हणून!’’ त्यानं म्हटलं.

‘‘असा खांद्यावर हात ठेऊन ‘न्यायचं’ काय म्हणतोस रे? जा आता त्यांच्याकडे लवकर.’’

‘‘स्टे कूल मॉम!  त्यांच्या नेहमीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सुरूही झालेत. तुम्ही लोक लगेच टेन्शन का घेता? त्यात काय एवढं? मी अ‍ॅम्ब्युलन्स मागवली, त्यांच्याबरोबर ‘सहृदय’ संस्थेचा काळजीवाहकही  दिला, आता ऑल इज वेल! मला माझं प्रोजेक्ट आजच पूर्ण करायचं आहे, मी जाऊ?’’ म्हणत चार ढांगांत त्यानं वरची खोली गाठलीही.

संपदाला स्वत:चंच आश्चर्य वाटलं. आपण अनेक गोष्टींसाठी उगाच रक्त जाळतो की काय असं वाटलं तिला. आज बाजारात अनेक सेवा उपलब्ध आहेत, हाल का करून घ्यायचे?, आर्थिक स्थिती उत्तम असेल तर उपलब्ध सेवांचा लाभ घेतलाच पाहिजे, हे मुलाकडून शिकत होती ती. आपल्यापेक्षा या मुलांची कार्यपद्धती वेगळी आहे. त्यांचं जगणं आपल्यापेक्षा खरंच खूप वेगळं आहे.

गेल्या आठवडय़ात रोहिणीच्या मैत्रिणीचा चार वर्ष पाळलेला डॉगी (कुत्रा नाही बरं, डॉग्गी!) अपघातात  गेला आणि ते ऐकून रोहिणीच्या आईलाच प्रचंड हुरहुर लागली. ‘‘काय आई.. आता त्यावरून सुतकी तोंड घेऊन बसणार का तू?’’

‘‘अगं, मुकं जनावर ते.. किती जीव लावतं माणसाला.’’ आईचं म्हणणं.

‘‘तिची आईसुद्धा जेवणखाण सोडून घरातलं कुणी गेल्यासारखी बसलीये! लॉल! (दर दोनचार वाक्यांआड हे ‘लॉल’ येतंच.) थोडंसं वाईट वाटणार, पण लगेच नवीन डॉगी आणायचा घरी. त्यात काय एवढं?’’ रोहिणीनं  हुकमी उपाय सुचवला. आई अवाक्.

प्रत्येक गोष्ट सोप्यानं सोडून देणं कसं जमतं या मुलांना? आपण छोटय़ा-छोटय़ा गोष्टींत मन अडकवून बसतो. मग ती हातातून सुटली की वाईट वाटून घेतो. हे वाटणं चुकीचं आहे, की त्यात आपलं  रेंगाळणं चुकीचं? अळवाच्या पाण्यासारखं वेगळं होत विषयात जास्त न गुंतण्याची त्यांची ही मानसिकता काही ठिकाणी फारच उपयोगी पडते. कसलाच ताण अजिबात घेत नाहीत ही मंडळी.

एकदा योगिता आणि तिचं कुटुंब एका पर्यटन कंपनीबरोबर दहा दिवसांच्या टूरवर गेलं होतं. काही दिवस सगळे प्रवासी एकमेकांत मस्त मिसळले, जिव्हाळा निर्माण झाला. एकमेकांची काळजी घेत, मजा करत दहा दिवस अतिशय जल्लोषात गेले. घरी आल्यावर योगिताला खूपच पोकळी निर्माण झाल्यासारखं रितेपण आलं. तिचं कशातच मन लागेना. तिची तरुण मुलं मात्र दुसऱ्याच दिवसापासून सहज आपापल्या कामाला लागली.

‘‘मला तो छोटासा गोलू, त्या सोनी आजी, शहा वहिनी, सगळ्यांचीच खूप आठवण येतेय रे..’’ मलूल झालेल्या योगितानं म्हटलं.

‘‘कम ऑन आई! आम्ही विसरलोही. इतकं इमोशनल होण्यासारखं त्यात काय एवढं? अशा किती तरी ट्रिप्स करणार आपण. प्रत्येक वेळी वेगळी टीम असेल. संपर्क ठेवणं ठीक आहे, पण असं गुंतून पडलो तर कसं जमेल?’’ मुलगा म्हणाला होता.

‘‘हेच तर जमलं पाहिजे ना रे!’’ योगिता.

‘‘मला सांग आई, आमच्या मित्रांमध्येसुद्धा भावनिक गुंतवणूक असतेच ना? पण करिअरनिमित्त कुठे कुठे पांगतात सगळे. मग ‘मूव्ह ऑन’ करणं नाही जमलं तर वेडे होऊ आम्ही. किती गोष्टी घडत असतात आमच्या आजूबाजूला.’’

योगिताला वाटलं, हे असं पुढे वाटचाल करणं, प्रवाही असणं आपल्याला सहजपणे का जमत नाही?  माणसं जोडतो आपण, पण भावनिकदृष्टय़ा गुंतून पडून त्रास करून घेणं बरोबर नाही.

एका सुस्थितीतल्या कु टुंबातल्या वडिलांनी दिल्लीची लठ्ठ पगाराची ‘जॉब ऑफर’ सोडून दिली, कारण इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांबरोबर त्यांची कार्यपद्धती आणि घडी मस्त जुळली होती. तेव्हा मुलं म्हणाली, ‘‘इतकी मोठी ऑफर का सोडून देताय? तिथेही मिळतीलच ना तुम्हाला हवी तशी माणसं? इथेच अडकून पडाल तर  ‘सॅलरी हाइक’ कशी मिळेल? जायचं मस्त! त्यात काय एवढं?’’ आयुष्यात सगळी गणितं अशी सोप्या पद्धतीनं सुटली असती तर किती छान झालं असतं. हल्लीची मुलं किती चटकन भारतातून परदेशात नोकरीनिमित्त जातात, तिथेही लगेच नोकऱ्या बदलतात. गरजेनुसार मागील दोर कापणं जमतं त्यांना.

आधीच्या पिढीलाही बरंचसं पटत असतं, पण त्या पिढीची घडणच तशी झाली आहे, त्यामुळे जुळवून घ्यायला थोडा वेळ तर लागणारच; पण कधी-कधी या वेगळं होण्याचा अतिरेक होतो. मग वागण्या-बोलण्यातली आणि एकंदरच छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी फुलण्यातली मजा कमी होते. घरी नवा फ्रिज, टी.व्ही. किंवा नवीन मोबाइल घेणं हा किती छान आनंद सोहळा असतो खरं; पण मुबलकता जास्त झाली की अप्रूप वाटणं बंद होतं. तसं झालंय या मुलांचं. त्यांना वाटतं, गरज वाटली की बाजारात जाऊन आणायचं! त्यात काय एवढं?

आम्हाला तर लहानपणी नवीन पेन आणलं तरी ते घेऊन अख्ख्या कॉलनीत मिरवावंसं वाटायचं.. गुलाबाला फूल आलं तरी तेच, शंभर वेळा प्रवास करूनही प्रत्येक वेळी रेल्वेत बसायचं म्हटल्यावरही तेच, रेडिओवर आवडीचं गाणं लागलं तरी कोण आनंद वाटायचा. (आजही वाटतो!) ‘त्यात काय एवढं’ असं वाटलं नाही कधी.

आज मात्र  हे सगळंच कालबाह्य़ झालंय. हेच काय, अनेक गोष्टी कालबाह्य़ झाल्या आहेत. पैसा जपून वापरावा, ही संकल्पना तर आपल्या पिढीतच संपते की काय असं वाटतं आता..

एका कार्यक्रमाला जाण्यासाठी नैना छानशी साडी नेसली. लगेच कपाळावर आठी पाडून लेक म्हणाली, ‘‘या ओल्ड फॅशन्ड साडय़ा आणखी किती वर्ष नेसणार आहेस तू? मस्त ‘डिझायनर स्टफ’ घे ना काही तरी.’’

‘‘कमाल आहे गं तुझी! नवीन साडी? कपाट भरलंय साडय़ांनी. पैशांचा चुराडा नुसता.’’

‘‘आई, तू आता टिपिकल आयांसारखी नको वागूस बरं! पैसा कमावतो कशासाठी? कपडे कमी करण्यापेक्षा कपाट मोठं करा ना.. त्यात काय एवढं?’’

नैनाच्या मनात आलं, या मुलांना कशी समजणार सणाला खास एक ड्रेस घेऊन पुढील सणापर्यंत वापरणाऱ्या आमची मानसिकता? दसऱ्याला भावंडांना एकाच ताग्यातून एकसारखे कपडे शिवले जायचे; पण त्यामुळे सणांचं अप्रूप वाटायचं. आता तर दिवाळीमध्येसुद्धा मुलांना आनंदाचं उधाण येत नाही. त्यांच्यासाठी सगळे दिवस सारखेच. सगळ्याच बाबतीत त्यांचं एकच सूत्र.. ‘त्यात काय एव्हढं!’

मुलांचं सगळं नीट व्हावं, त्यांचा अभ्यास आपण स्वत: घ्यावा, त्यांना घरात एकटं वाटू नये, म्हणून कांचननं आपली  कंपनीतली नोकरी सोडली होती. तिच्या संपूर्ण समर्पणामुळे दोन्ही मुलांचं करिअर अतिशय उत्तुंग झालं होतं. आता त्यांच्या भविष्याची अजिबात चिंता नव्हती. आपण काही त्याग केलाय हे तिनं कधीच बोलून दाखवलं नव्हतं, कारण तो तिचा वैयक्तिक निर्णय होता. एकदा आजीनं मुलांना याची जाणीव दिली, तर मुलगा म्हणाला, ‘‘लुक मॉम, देवेशची आईही जॉब करते. तो बघ किती स्मार्ट, हुशार आणि स्वावलंबी आहे. कुठे अडलं का त्याचं? उलट महागडी गाडी घेऊन फिरतो, फॉरेनला जाऊन येतो.. कारण डबल इंजिन आहे त्यांचं! तू उगाच जॉब सोडलास. केलं असतं आम्ही मॅनेज. त्यात काय एवढं?’’

आईनं शांतपणे त्याचं ऐकून घेतलं. खरं तर फाडकन उत्तर देऊ शकली असती ती, की शहाण्या, तू पाचवीत गणितात नापास होता होता वाचलास. तुझी छोटी बहीण जन्मत: इतकी अशक्त होती, की तिला सारखं दवाखान्यात भरती करावं लागायचं. तुझं म्हणणं बरोबरच आहे म्हणा. मी सोडून द्यायला हवं होतं तुमची काळजी करणं. आणि तसंही  जन्माला आलेल्या मुलाला आपण घडवलं, असं म्हणणं चूकच! जो तो आपलं संचित घेऊन येतो म्हणतात. वाढली असती मुलं आपोआप.. त्यात काय एवढं, असं म्हणायला हवं होतं का?

या ‘त्यात काय एवढं’मध्ये कधी ताणविरहित ‘समस्या निराकरण’ आहे ; तर कधी फाजील बेफिकिरी. मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजाव्यात म्हणून आपण धडपडतो. त्यांच्या बदलत्या जगाशी जुळवून घेताना त्याचा अनावश्यक ताण न घेता सरळ, सहज काम करणं जमलं पाहिजे आपल्याला.. जमेल, जमेल.. त्यात काय एवढं!

adaparnadeshpande@gmail.com