26 January 2021

News Flash

जगणं बदलताना : ही पहाटवेगळी आहे

सगळ्या बदलांशी पटकन जुळवून घेणं प्रत्येकाला जमणार नसलं, तरी ती प्रक्रिया आपण आपल्यापुरती सहज नक्की करू शकतो

(संग्रहित छायाचित्र)

अपर्णा देशपांडे

दैनंदिन जगण्याचे अनेक आयाम वर्षांनुवर्ष कणाकणानं आणि आपल्याही नकळत बदलत होते. घर, कुटुंबातल्या सदस्यांच्या कामाचं, व्यवसायाचं स्वरूप, कुटुंब म्हणून एकत्र वेळ घालवण्याची पद्धत, हे सगळं बदलत गेलं. आताच्या नवीन तंत्रज्ञानाच्याच सान्निध्यात जन्माला आलेल्या पिढीकडे पाहताना मागच्या पिढय़ांना तो बदल प्रकर्षांनं जाणवतो. हे जाणवण्यासाठी ती व्यक्ती वृद्धच असली पाहिजे, असं मुळीच नाही. नव्वदच्या दशकात जन्मलेल्या पिढीसाठीही आजचा बालचमू वेगळा आहे. सगळ्या बदलांशी पटकन जुळवून घेणं प्रत्येकाला जमणार नसलं, तरी ती प्रक्रिया आपण आपल्यापुरती सहज नक्की करू शकतो. ‘जगणं बदलताना’ त्यातली गंमत हरवू न देण्याचा मंत्र शोधणारं हे सदर दर पंधरवडय़ानं.

‘‘उठ नं रे मन्या, उशीर होईल नं निघायला!’’ पाघळलेल्या लाडवासारख्या सोफ्यात लोळणाऱ्या मनीषला देविकाने गदागदा हलवलं.

‘‘हे देवी! आम्ही या रम्य पहाटे बाल्कनीत विराजमान होऊ.. आपण मस्त आलं घातलेला चहा घेऊन यावे आपल्या सुकोमल हस्ताने आम्हास..’’

‘‘ओ महाराज, त्या स्वप्नातून आजच्या सत्यात या जरा! बाहेर बाल्कनीत फक्त दहा मिनिटं बसलात नं, तर शुभ्र धवल सिमेंटचा अभिषेक होऊन धुपानी बाबा व्हाल आपण! समोरच्या इमारतीच्या बांधकामानं वीट आणलाय नुसता. दिवसभर खडखडाट, राडा आणि माती. डोंबलाची रम्य पहाट!’’ देविका-मनीषचा हा प्रेमळ संवाद होईपर्यंत बाहेर दरवाज्यापर्यंत रांगोळ्या मांडल्यागत सामान गोळा झालेलं होतं. पोहण्याचे कपडे, खाद्यपदार्थ, बॅट-बॉल अन् कायकाय.

‘‘बाबा, आज आपल्याला डॅम बघायला आणि वॉटरमध्ये खेळायला जायचंय ना?’’ एरवी तोंडावर पाणी मारूनही न उठणारी ही इंग्रजाळलेली प्रजा आज इतक्या सकाळी उठून तयार होती. या प्रजेपुढे मात्र मन्यानं शस्त्रं टाकली आणि पाघळलेला लाडू अखेर वळला (म्हणजे उठला!).

मंडळी उत्साहानं गेली तर खरी, पण..

आख्खा महाराष्ट्र फक्त तिथेच कडमडलाय की काय वाटलं मन्याला. गाडी उलटी वळवायलादेखील वाहनचालनाचं सगळं कौशल्य पणाला लावावं लागलं. ‘‘बाबा, अभिमन्यूनं चक्रव्यूह  भेदलं होतं. आपल्याला फक्त या गाडय़ा भेदून जायचं आहे.’’ इति ज्येष्ठ चिरंजीव. टाळेबंदीमध्ये महाभारत बघून झालं होतं ना त्यांचं. आता धरण न बघता जायचं म्हणून मंडळी धरणं धरून बसतील की काय अशी भीती वाटत होती मनीषला.

‘‘बाबा, आता हे नाही तर फूड मॉलला जाऊ ना..’’ छोटं रत्न कुरकुरलं. घरचे डबे खाण्यास ही प्रजा तयार नव्हती. मग फूड मॉलच्या पिझ्झा बर्गरनं खिशाला मोठं भगदाड पाडलं आणि ‘‘एखाद्या दिवशी चालतं.. कुणासाठी कमावतो आपण!’’ म्हणत देवीजींनी मन्याची समजूत काढली. परत येताना रस्त्यात तिनं गाणंही म्हटलं- ‘‘शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट..’’

‘‘यात काय रम्य आहे डोंबल?’’ मन्या वैतागला होता.

‘‘अरे काही वर्षांपूर्वी होतं तसं आयुष्य आता कसं मिळणार? महिना सहा आकडी कमवायचं तर त्याची किंमत पण द्यावी लागेल ना? प्रत्येक जणच आपलं सुख शोधत धडपडतोय. जगणं बदलतंय नं मन्या? हातात असलेल्या तुटपुंज्या वेळेतच सगळं बसवण्याची सर्कस करतोय आपण.’’

‘‘हो बाबा.. वेळ कमी पडतोय, वेळ कमी पडतोय, हेच म्हणत आई रोज सकाळी टॉयलेटमध्ये पण टेबल्स ऐकवते आम्हाला. मोबाईल ठेवते खिडकीत. तिथे पण निवांत बसू देत नाही.’’ आपलं म्हणणं मांडून फिदीफिदी हसली पोरं.

खरंच बदलाचं हे वारं जरा जास्तच वेगात वाहातंय. हा काळ वेगळा आणि ही पहाट वेगळीच आहे. सगळं मनात ठरवल्यासारखं होतंच असं नाही, पण कधी कधी त्याच्या अगदी विपरीत घडावं अशी परिस्थिती आहे आज. तरी रोजच्या जगण्यातला आनंद गमावून कसं चालेल?

दोन वर्षांपूर्वी असंच मुलांच्या इच्छेखातर  ‘वॉटर पार्क’ला गेले होते सगळे. सकाळी गर्दी कमी असेल म्हणून लवकर तिथे पोहोचले होते. तिकिटांची किंमत बघून मळमळलं होतं, पण आपल्या आनंदासाठीच आलो ना आपण? म्हणत त्यांनी मनाला समजावलं.

‘‘आत पार्कमध्ये पाणी कमी आणि जनसागर मोठा आहे गं. काय जमतात लोक इथे!’’ मनीष म्हणाला होता.

‘‘असूदेत  बाई, पण आपल्याला ‘एन्जॉय’ करायचंय! आता तक्रार नाही करायची. मुलं उतरली बघ पाण्यात. तशी उभं राहाण्याइतकी जागा मिळालीये ना? बस झालं. आता पूर्वीसारखं मनसोक्त खेळायला कसं मिळेल? बदललंय ना सगळं.’’

मनीष आणि देविकाच नाही, तर त्यांच्यासारख्या सगळ्यांचंच आयुष्य बदललेलं आहे. आपापल्या वर्तुळात आनंद शोधत बदलाला सामोरं जावं लागेल याची त्यांना कल्पना आहेच. आहे त्याचा आनंदी स्वीकार असला की जगण्यातला खुमार टिकवता येतो यावर त्यांचा विश्वासही आहे. ही खुमारीच तर आपल्यातला खळखळता झरा जिवंत ठेवणारी असते.

‘‘चिंटूला त्या मोठय़ा शाळेत प्रवेश मिळवायचा आहे ना गं? अर्ज भरण्याची तारीख जाहीर झाली आहे बघ.’’ मंदारनं ऑफिसमधून आठवणीनं जाईला फोन केला.

‘‘पण पहिल्या शंभर लोकांनाच अर्ज मिळणार आहेत. आपल्याला लवकर जावं लागेल तिथे..’’ म्हणत जाईनं पहाटे लवकर जाण्याची सगळी तयारी केली. अर्ज मिळालेल्या पालकांची एक सभा पण होती, म्हणून तिनं सोबत डबा घेतला आणि थंडीची पर्वा न करता पहाटे सहा वाजताच दोघं शाळेच्या फाटकाजवळ पोहोचले. शाळेला जत्रेचं स्वरूप आलं होतं. कार्यालयासमोर ही मोठी रांग होती. पालक सतरंज्या, चादरी घेऊन रात्रीच तिथे मुक्कामी आले होते. चहावाला, वडापाववाला, बरोबर आलेल्या मुलांसाठी दुप्पट भावानं चॉकलेटं विकणारे.. सगळंच अजब.

‘‘तुझा ‘आ’ बंद कर मंदार. बावळट दिसतोयस तू!’’ जाई त्याला चिडवत म्हणाली.

‘‘अगं, हे काय आहे सगळं? शिशु वर्गाची अ‍ॅडमिशन आहे ना ही? आपला प्रवेश आठवतोय का तुला? मी तर सरळ सरळ बालवाडीत जाऊन बसलो होतो. नंतर तीन दिवसांनी नाव नोंदवलं होतं. हे किती वेगळं आहे!’’

‘‘सगळंच बदललंय ना मंदार.  पण आपण इथेच प्रवेश घेतला पाहिजे ही सक्ती तर नाहीये ना? आपण दुसरीकडे जाऊ. तिथेही नक्कीच चांगलं शिक्षण मिळेल त्याला.’’

दोघंही तिथून माघारी फिरले. चिंटूला चांगली शाळा मिळाली असणार.. नक्कीच!

आजचा बदलता काळ आपल्याला हे असे चकित करणारे अनुभव देत असतो. काळ बदलला आहे नक्कीच, पण त्या वेगळेपणाशी कसं जुळवून घ्यायचं हे ज्याचं त्याचं कौशल्य आहे.

‘‘पहाट होत आली बायजाबाई, झोपा की आता!’’ नानींना जागं बघून नाना म्हणाले.

‘‘अहो, आपल्या नातसूनबाई कानांना हेडफोन लावून वेगवेगळ्या देशातील ‘क्लायंट्स’बरोबर मीटिंग करत आहेत. आताच तिला पेलाभर दूध नेऊन दिलं.’’

‘‘..आणि सौरव काय करतोय?’’ नातवाचा फ्लॅट बघायला म्हणून आलेले नाना नातवाच्या काळजीनं बोलत होते.

‘‘तो झोपलाय हो. त्याला सकाळी लवकर जायचंय ऑफिसला.’’

‘‘आणि नव्या सूनबाई? ती आता कधी झोपायची? अजबच आहे यांचा संसार. ती झोपेल आणि हा उठून कामावर जाईल.’’

‘‘त्यांचं जगच वेगळं आहे हो. जेव्हा झोपायला मिळेल तेव्हा रात्र, उठलं की पहाट. त्यांच्या सहजीवनाच्या कल्पना आपल्यासारख्याच असाव्यात हे जरुरी तर नाही नं? त्यांच्या आयुष्याकडून अपेक्षाही वेगळ्या आहेत. बोलू उद्या त्याच्याशी. झोपा बरं आता, नाहीतर पित्त होईल उद्या.’’  नाना-नानीदेखील नातवाच्या नव्या जीवन शैलीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते.

असंच राधिका आणि अमरचंही आहे. दोघंही उच्चशिक्षित आहेत, दोघांनाही कामाचा मोठा ताण आहे, म्हणून त्यांनी स्वयंपाकासाठी मावशीबाईंना बोलावलं. अंगावर नीटनेटकी साडी, चेहऱ्यावर आत्मविश्वास, अशा मावशीबाई आवडल्या त्यांना.

‘‘मी पहाटे पाचला येईन. नंतर माझी खूप कामं आहेत. मला वेळ नाही.’’ मावशीबाई म्हणजे तुफान मेल होती!

‘‘पहाटे पाचला? तुम्ही सकाळी आठपर्यंत या ना..’’

‘‘नाही जमणार. आमची बायकांची युनियन आहे, तुम्ही कुणालाही बोलावून बघा, नाही येणार त्या.’’

‘‘जाऊ दे गं, जमवू आपण.’’ मावशींकडे किल्ली ठेवत जाऊ.

मान डोलवत मावशींनी हो म्हटलं आणि एक छापील नियमावलीच त्याच्या हातात ठेवली.

अमरला ते वाचून हसू येत होतं. त्याच्याकडे डोळे वटारून राधिकानं म्हटलं, ‘‘चालेल मावशी. पण पगार किती घ्याल?’’

‘‘मी जास्त घेतंच नाही, दहा हजार घेईन फक्त.’’

अमर चेष्टेत म्हणाला, ‘‘एक काम करू राधिका. मी नोकरी सोडतो आणि स्वयंपाकाची पाच-सहा घरं पकडतो.’’

राधिका त्याला ओरडण्याआधीच मावशीबाई म्हणाल्या, ‘‘माझ्या युनियनमध्ये ऑनलाइन नोंदणी करा. तुम्हाला आत्ता पाच-सहा घरं मिळवून देते. सभासद फीस.. फक्त पाच हजार!’’

राधिकाला हसू आवरेना. ‘‘अमर, जमाना बदल गया है! तुमची निकड ही त्यांची संधी आहे. करू आम्ही अ‍ॅडजस्ट. मावशी, या तुम्ही उद्यापासून पहाटे पाचला!’’

त्यांचं या नव्या पहाटेशी जुळवून घेणं सुरू झालं होतं.

अपर्णा देशपांडे या ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिके शन’ विषयातील अभियंत्या असून त्यांनी समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त के ली आहे. अभियांत्रिकी विषयाच्या त्या प्राध्यापिका आहेत. तरुण पिढीच्या मानसिकतेशी अवगत असण्याबरोबरच समुपदेशन हादेखील त्यांच्या कामाचा एक भाग आहे. विविध वृत्तपत्रांसह मासिके आणि दिवाळी अंकांमध्ये त्यांचे लेख, कथा, कविता, व्यंगचित्रे आदी साहित्य प्रसिद्ध झाले आहे. ‘चतुरंग’साठीही त्यांनी यापूर्वी काही लेख लिहिले आहेत. सहलेखिकांबरोबर त्यांनी लिहिलेला ‘पर्ण रेशमी प्राजक्त’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. लेखनाबरोबरच त्या चित्रकला आणि ‘की-बोर्ड’ वादनाची आवड  जोपासतात.

adaparnadeshpande@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 12:03 am

Web Title: jag badaltana article by aparna deshpande abn 97
Next Stories
1 पुरुष हृदय बाई : माझ्यातल्या पुरुषपणाचे अंश..
2 जोतिबांचे लेक : चाकोरी मोडणारे पुरुष 
3 गद्धेपंचविशी : या मंडळी सादर करू या!
Just Now!
X