अपर्णा देशपांडे adaparnadeshpande@gmail.com

डेटिंग, प्रेम, लग्न या गोष्टींविषयी तरुणाईची मतं त्यांच्या आई-बाबांच्या पिढीच्या मतांपेक्षा अगदीच निराळी आहेत. घरातल्या मुलाचं किंवा मुलीचं कुणाबरोबर तरी प्रेम जुळलंय, हे आई-वडिलांना कळून त्यांचं लग्न ठरेलसं वाटेपर्यंत त्यांच्या ‘ब्रेकअप’चीही बातमी आलेली असते. तरुणांची वस्तुनिष्ठ विचार करण्याची पद्धत, जुन्या नात्यातून लवकर मोकळं होऊन नवीन नातं जोडण्यातला सहजपणा मागच्या पिढीला कोडय़ात पाडतात. काही वेळा असा सुटसुटीतपणाही गरजेचा आहे का?, असं वाटून जातं, तर अनेकदा तरुण पिढी गोंधळलेली आहे असं वाटतं. दोन पिढय़ांच्या मानसिकतेतील फरकाचा विचार करत त्याचा मध्य शोधण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा भाग पहिला..

‘आज जुन्या वहीतलं

जाळीचं पान थरथरलं

मन आतून हललं.. गहिवरलं.. म्हणालं..

मी तुला विसरत तर नाहीये ना?..’

माझ्याच  एका कवितेच्या या ओळी आता पुन्हा वाचताना वाटतं, आजची तरुणाई या भावनेशी नाळ जोडू शकेल का? आणि मग लगेच वाटलं. असं जोडलं जाण्याची खरंच गरज असते का? आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं, त्या व्यक्तीबरोबर आयुष्य जगायला मिळतंच असं नाही ना? आणि नाही मिळालं, तर दुसरी प्रेम करणारी व्यक्ती आयुष्यात येतच नाही असंही नाही ना? मग पूर्वाश्रमीचं प्रेम विसरलं, न विसरलं, तरी भरभरून जगण्याची आस विरायला नको. कवी सौमित्र यांनी फार सुरेख लिहिलंय-

‘हिच्या मिठीत तुझी ऊब

शोधणं नाही बरं

मी तुला विसरत चाललोय

एवढं मात्र खरं.’

किती साधी सरळ समजूत घातलीय मनाची.. प्रेमाच्या बाबतीत मात्र आजची तरुणाई मला पूर्वीपेक्षा जास्त सजग वाटते. प्रथमदर्शनी प्रेम वगैरे फारसं मानत नाहीत ते. (तसं खरंच असतं की नाही हा चर्चेचा विषय ठरावा.) आजची मुलं पूर्णत: प्रेमात पडण्याआधी एकमेकांना आपल्या अपेक्षांच्या चाळणीत घोळून घेतात. त्यानंतर एक पाऊल पुढे गेल्यावर त्या चाळणीचं छिद्र अजून मोठं होतं आणि अपरिहार्यतेनं नातं त्यातून गळायची वेळ येते. तेव्हा जे होतं ते म्हणजे ‘ब्रेकअप’. प्रेमभंग हा एकतर्फी असतो, तर  आजच्या मुलांचं ब्रेकअप हा बहुतांश दोघांनी मिळून मान्य केलेला निर्णय असतो.

ज्या घरांमध्ये मुलं आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींबद्दल मोकळेपणानं बोलतात, तिथे मनात रुजत आलेल्या कोमल भावनांबद्दलही बोलतात. असंच काहीसं अजयचंही कुटुंब होतं. ‘‘अहो, मोठय़ानं गाणं लावू नका. आवाज कमी करा जरा.’’ कल्पनाताई- म्हणजे अजयची आई म्हणाली.

‘‘का? काय झालं?’’ अजयचे बाबा.

‘‘अस्मिता आणि आपल्या अजूचं ब्रेकअप झालंय. ब्रेकअप पचवणं जड जात असेल ना त्याला.’’

‘‘ब्रेकअप? अगं पण गेली तीन वर्ष सोबत आहेत ना दोघं? इतकं ओळखतात एकमेकांना.. तरीही?’’

‘‘पाहा ना. खरं तर किती गोड पोरगी आहे अस्मिता. अहो.. आला अजू. शांत बसा एकदम.’’

अभयराव आणि कल्पनाताई चेहरा पाडून बसले होते. हातातली चावी फिरवत, मोठय़ानं गाणं म्हणतच अजय आतून बाहेर आला आणि थबकला.

‘‘ही अशी तोंडं पाडून कुणी गेल्यासारखं काय बसलाय तुम्ही दोघं?  एक सेकंद! तुम्हाला माझ्या आणि अस्मिताबद्दल सांगितलं म्हणून का हे असं? अहो, ‘म्युच्युअल ब्रेकअप’ आहे ते. असं होणार याची गेल्या दोन महिन्यांपासून कल्पना आली होती. पण मैत्री नाही तुटलेली. उद्या सम्याच्या एंगेजमेंटला भेटणारच आहोत. एक गंमत सांगू? सम्याला त्याच्या ‘एक्स’नंच (अर्थात पूर्वीच्या प्रेमिकेनं) ही मुलगी शोधायला मदत केली आहे. असं असतं ते. त्यामुळे चिंता नको!’’

मुलगा बिथरण्याचं एकदम मोठ्ठं टेन्शन गेल्यामुळे अभयराव निवांत होत म्हणाले, ‘‘तुमचं बिनसलं कशावरून ते नाही माहीत, पण तुझं हे ‘कूल’ असणं आवडलं आपल्याला.’’

‘‘हो.. नाहीतर त्या अन्यासारखा देवदास होऊन बसला असतास तर मला बघवलं नसतं बाई. पण नेमका कशामुळे तुमचा निर्णय बदलला रे अजू?’’ आईनं विचारलं.

‘‘आधी अस्मिताला वाटलं होतं की चेन्नईहून ती इथे मुंबईत येईल आणि लगेच आम्ही लग्नाचा विचार करू. पण झालं उलटंच. तिला कंपनी दोन वर्षांच्या प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवतेय. कदाचित आणखीन वेळ लागू शकतो. आणि तिला ती संधी अजिबात सोडायची नाहीये. मी आत्ता अठ्ठावीसचा आहे, आणखी थांबलोही असतो, पण तिच्या परत येण्याची खात्री नाही. थोडक्यात आता आमचं जमणं अवघड आहे.’’

‘‘अरे, पण लग्न करून मग ती अमेरिकेत गेली तर?’’ आईची काळजी बोलली.

‘‘आम्ही दोघंही त्यासाठी तयार नाही आहोत. तिच्या जागी मी असतो तरी हेच केलं असतं. इट्स ओके आई-बाबा. मला वाईट वाटलं, खूप त्रासही होतोय, पण असं काही होऊ शकतं याची कल्पना होतीच आम्हाला. तुम्ही काही वाटून घेऊ नका. आमच्या पिढीत लग्न हा चाळीस टक्के हृदयानं आणि साठ टक्के मेंदूनं घेण्याचा निर्णय असतो. चला, येऊ मी? रात्री एकत्र जेवू, येतोच.’’ पाठमोऱ्या अजूकडे बघत कल्पनाताई म्हणाल्या, ‘‘लग्नानंतर जर तिला हे असं प्रोजेक्ट मिळालं असतं, तर काय तेवढय़ावरून सोडलं असतं त्यांनी एकमेकांना? कशी ही पोरं! यांना प्रेमाचं नातं हवं असतं, पण ते टिकवण्यासाठी लागणारं समर्पण नकोय. मी दोघांना समजावून बघते.’’ अभयरावांनी उत्तरादाखल फक्त एक सुस्कारा सोडला. त्यांना प्रेमभंगात पार बर्बाद झालेले आपल्या काळातले मित्र आठवले आणि आपल्या मुलाच्या समंजस भूमिकेबद्दल कौतुक वाटलं. आजच्या पालकांनी मुलांची ब्रेकअप्स हा आधुनिक जीवनशैलीचा एक भाग म्हणून बऱ्यापैकी मान्य केलेलं असावं बहुदा. त्यांना कल्पना आहे, की आजची मुलं बऱ्याचदा आहे त्या क्षणात जगतात. भूतकाळाचं ओझं फार काळ वागवत नाहीत. नात्यांच्या बाबतीत ताणतणावांचं नियोजन करायला ही मानसिकता फार कामी येते. अन्यथा प्रेमाचे अनुबंध जुळवताना त्याकडे डोळसपणे बघायला जमणं तसं कठीणच.

विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीचे जनक अल्बर्ट एलिस यांच्या मते माणसाला जर स्पष्ट, तर्कशुद्ध, वास्तववादी आणि शास्त्रीय पद्धतीनं विचार करायला शिकवलं, तर त्यांच्या जवळपास सगळ्या मानसिक समस्याच दूर होतील. वाचताना वाटतंय तितकं सरधोपट नाहीये ते. अन्यथा मनुष्य हा नात्यात वागताना कुठेही चुकला नसता. निदान सत्य परिस्थितीचं नीट आकलन जरी असेल, तरी निर्णयात अजयसारखी भूमिका घेता येते. पण काही लोकांच्या बाबतीत ते तितकंसं सोपं नसतं बरं का.  सगळ्यांनाच जर कायम तर्कशुद्ध वागणं जमलं असतं, तर तरुणाईला हवी असते ती ‘रिलेशनशिप’ची ‘नशा’ कशी अनुभवायला मिळाली असती? इथे नशा हा शब्द मुद्दाम वापरलाय. कधी कधी असं वाटतं, की नवतरुण मुलं/ मुली ही व्यक्तीच्या नाही, तर प्रेमाच्या ‘सुखद भावनेच्या प्रेमात’ पडतात. कारण सगळं जग विसरायला लावणारी भावना त्या वेळी जास्त प्रबळ असते आणि त्या धुंदीत सोबतच्या व्यक्तीतील दोष दिसतातच असं नाही. थोडीशी धुंदी उतरली आणि मूळ स्वभाव उघड झाले की लगेच डोक्यात ब्रेकअपची घंटा वाजू लागते. कुणीही व्यक्ती सर्वगुणसंपन्न नसते. त्यामुळे स्वप्नातील रणबीर किंवा दीपिकाची वास्तवाशी तुलना करून उपयोग नसतो. पण ही समज येईपर्यंत ब्रेकअपचा भरपूर अनुभव येऊन गेलेला असतो.

शलाकाच्या लग्नाचा विषय सुरू झाला होता. बिनधास्त आणि बेधडक शलाकाला भरपूर मित्रमैत्रिणी होत्या. घरात खूपच मोकळं वातावरण होतं. आई-बाबा मागील दोन वर्षांपासून लक्ष ठेवून होते आणि एखाद्या विशेष मित्राकडे तिचा जास्त कल दिसतोय का, हे हस्तक्षेप न करता चाचपत होते.

‘‘शलाका, आम्हाला वाटतंय की तू आता गंभीरपणे लग्नाचा विचार करावास. तुला ओजस आवडतो हे आम्हाला माहितीय. तुमचा काय विचार आहे?’’ बाबांनी विषय काढला.

‘‘बाबा, काहीही काय? ओजस आणि माझा ब्रेकअप झालाय. आमच्या आवडीनिवडी बिलकुल मॅच नाही होत. ओजस माझ्यासाठी आता ‘हिस्ट्री’ आहे. आणि तसंही तो सध्या यामिनीसोबत ‘डेट’ करतोय.’’

आता मात्र आई चिडली. ‘‘काय हिस्ट्री.. काय भूगोल.. ब्रेकअप म्हणजे काय खेळ वाटतो तुम्हा मुलांना? मुलामुलींना जास्त मोकळीक देण्याचे तोटे आहेत हे. त्यापेक्षा आम्ही स्थळं बघतो, तू पसंत कर. आमच्या वेळी बरं होतं. आईवडील माहिती काढून स्थळं आणायचे आणि आम्ही पसंत करायचो.’’

बाबा आईला समजावत म्हणाले, ‘‘ए तू चिडू नकोस गं.. शलाका बेटा, तुझं मत सांग. तुला काय वाटतं?’’

‘‘मला करण आवडतो. म्हणजे आमची वेव्हलेंथ मॅच होते. पण अजून त्यानं मनालीला ‘डंप’ नाही केलेलं. म्हणून तो मला ‘फिक्स’ नाही सांगू शकत.’’

आईला भोवळ यायचीच बाकी होती. ‘‘अगं, काय बोलतेयस तुला कळतंय का? अहो, तुम्हाला तरी कळतंय का ती काय बोलतेय ते? आणि ‘डंप’ नको म्हणूस गं! डोळ्यासमोर काहीतरी विचित्रच येतं.’’

शलाकाच्या भावनेला आणि विचारांना खोलीच नाहीये हे आई-बाबांना कळत होतं आणि त्यांना तिला योग्य मार्गदर्शन करायचं होतं. आकर्षण आणि प्रेम यातला फरक समजावणं, या अशा प्रकारच्या नात्यातून तिला सुखरूप बाहेर काढणं किंवा त्यातून योग्य जोडीदार निवडणं या दोन्हीसाठी तिच्या पाठीशी उभं राहायचं होतं.

बाबा म्हणाले, ‘‘तू बोल शलाका. चुकतंय असं वाटलं तर आम्ही  सांगू तुला. मला खात्री आहे, आपण यावर नक्की योग्य तो मार्ग काढू. आणि तुझ्या भल्याचा विचार करूनच निर्णय घेऊ.’’ किती पालक आपल्या मुलांशी या विषयावर इतक्या समंजस पातळीवर खुली चर्चा करू शकतात?

आज तरुण मुलांच्या आकर्षणाचा आणखी एक मुद्दा म्हणजे टी.व्ही. आणि ‘ओ.टी.टी.’ वरील काही मालिका. यातील पात्रं आणि कथानक म्हणजे खरोखरच नात्यांच्या सवंगतेची आणि अध:पतनाची हद्द आहे. ‘अ’ची दुसरी प्रेमिका ‘ब’च्या तिसऱ्या प्रियकराच्या प्रेमात पडते, जो ‘क’चा पहिला पती असतो. नाही समजलं ना? जाऊ द्या. या पोरांना बरोबर समजतं आणि काही कच्ची डोकी नकळत त्याचं अनुकरण करायला बघतात. अशा उथळ ‘युज अँड थ्रो’ मानसिकतेच्या मुलांनी त्यांचे हेच नियम प्रेम आणि नात्यांना  लावले तर?..

मिहिका मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. तिच्याच ऑफिसमधील एका सहकाऱ्याबरोबर तिचे प्रेमबंध जुळले. तो वारंवार तिच्याशी शारीरिक जवळीक साधायचा प्रयत्न करायचा, ज्यासाठी तिची तयारी नव्हती. तिनं आपल्या पालकांना त्याची भेट करून देण्याचा विषय काढला, तेव्हा त्या मुलानं आधी शारीरिक संबंधांची अट घातली आणि मगच पुढे जाण्याची तयारी दर्शवली. प्रचंड मानसिक क्लेशानंतर तिला ते संबंध तोडता आले. पण मिहिकाचं उदाहरण अपवादात्मक असू शकतं,  कारण प्रेमाचं नातं, शारीरिक संबंध आणि लग्न या बाबतीत आपल्याकडे आणि इतर जगात मान्य असलेली समीकरणं निश्चित वेगळी आहेत. आपल्याकडे एकीकडे या विषयांबद्दल बोलण्यात पराकोटीचा संकोच, तर दुसरीकडे के वळ मोकळ्या वागण्यालाच ‘आधुनिकपणा’चं नाव देणं, अशी दोन्ही टोकं   दिसतात. आधीच्या पिढीनं आताच्या पिढीचा हा गोंधळ जाणून, त्यांच्या दृष्टिकोनातून शांतपणे विचार करून, घरात तरुण मुलांशी संवादाचा प्रयत्न के ला तर? नात्यातील प्रगल्भतेचं भान त्यांना देण्यासाठी घराघरात असा खुला संवाद सुरू करता येईल.

आजच्या पिढीतील मुलं ‘डेटिंग’ करताना नेमकं काय बघतात? ब्रेकअप्स का होतात? प्रेमात शारीरिक आकर्षणाचा किती प्रभाव असतो? ‘लैंगिक अनुकूलता’ तपासली जाते का? आणि कशी? या सगळ्या प्रश्नांवर मुलांची मतं काय आहेत?, या सगळ्याचा विचार होणं गरजेचं आहे.

एकूण काय, तर  डेटिंग, प्रेम, लैंगिक आकर्षण आणि ब्रेकअप या विषयासाठी आपण पुढील भागात पुन्हा एकदा भेटण्याची गरज आहे मंडळी!

(या लेखाचा पुढील भाग २६ जून रोजी.)