अमेरिकेतील फेडरल रिझव्‍‌र्ह बोर्डाची पहिली या महिला अध्यक्ष ठरली जॅनेट लुईज येलिन. ‘फेड्’च्या अध्यक्षपदासाठी जेव्हा मोर्चेबांधणी सुरू केली तेव्हा ५०० अर्थशास्त्रज्ञांनी, एका नोबेल पुरस्कारित अर्थशास्त्रज्ञानं आणि पूर्वीच्या फेड्च्या उपाध्यक्षानं तिच्या नियुक्तीची तरफदारी करणाऱ्या पत्रावर स्वाक्षऱ्या करून ते पत्र अध्यक्ष ओबामांकडे पाठवून दिलं. उदारमतवादी डेमोक्रॅट्ससुद्धा याला दुजोरा देऊ लागले. त्यांचं म्हणणं होतं की येल्निच मोठाल्या बँकांचे व्यवहार रुळावर आणून अर्थव्यवस्थेची यंत्रणा सुरक्षित बनवू शकेल. तिच्या प्रतिस्पध्र्यानं या स्पर्धेतून आपलं नाव मागे घेतलं आणि येल्निची या पदी नियुक्ती झाली. नुकत्याच झालेल्या या नियुक्तीनिमित्ताने येलिनविषयी..
तिचा उल्लेख ‘अ ट्रिलियन डॉलर वुमन’ असा केला जातो. त्याला साजेसं जबाबदारीचं पद ती आता सांभाळूही लागलीय. जगभरात अमेरिकेतील डॉलरच चलन म्हणून वापरला जातो आणि त्यामुळे अमेरिकेतील फेडरल रिझव्‍‌र्ह बोर्डनं (आपल्याकडील रिझव्‍‌र्ह बँकेसारखी संस्था) घेतलेले निर्णय केवळ अमेरिकेतीलच नव्हे, तर जगभरातील अर्थव्यवस्थांवर दूरगामी परिणाम घडवत असतात. या अशा जबाबदारीच्या पदावर,
६ जानेवारी २०१४ रोजी सदुसष्ट वर्षांच्या जॅनेट येलिन यांची नियुक्ती झाली. फेडरल रिझव्‍‌र्ह यंत्रणा १९१३ साली स्थापन झाली. तेव्हापासूनच्या १०१ वर्षांच्या ‘फेड’च्या (संक्षिप्त रूप) कारकिर्दीत एकूण १५ जणांनी त्याचे अध्यक्षीय पद सांभाळलं. जॅनेट ते पद भूषवणारी पंधरावी अध्यक्षा आणि ते पद मिळवणारी पहिलीच स्त्री आहे. या अत्युच्च पदापर्यंतची तिची वाटचाल पाहाणं खूपच उद्बोधक आहे.
१९२९ सालची अमेरिकेत सुरू होऊन जगभर पसरलेली जागतिक मंदी- ग्रेट डिप्रेशन- ही घटना अजूनही अर्थशास्त्रज्ञांमध्ये चर्चा घडवत असते. त्या काळाची विदारक वर्णनं अनेक अमेरिकन कादंबऱ्यांमध्ये वाचायला मिळतात. हा काळ जॅनेटच्या आईवडिलांनी प्रत्यक्ष अनुभवला होता. १९५०च्या दशकात, न्यूयॉर्कमधील ब्रूकलिब्च्या बे-रिज् या कामगारवर्गाच्या वस्तीच्या भागात जॅनेट लहानाची मोठी झाली. त्या काळात अर्थशास्त्राचं मानवी अंग तिनं जवळून पाहिलं. तिचे वडील डॉक्टर होते. त्यांच्या घरातल्या त्यांच्या ऑफिसात करखान्यातले मजूर आणि गोदीकामगार केवळ दोन डॉलर्स देऊन तपासून घेत असत. कधीकधी तर त्यांना तेवढेही पैसे देता येत नसत. बेकारीचा मानवी जीवनावर कसा आघात होतो, हे त्या वेळेस तिनं जवळून पाहिलं.
ब्राऊन युनिव्हर्सिटीत पदवीपूर्व शिक्षण घेत असताना, मॅक्रोइकॉनॉमिक्स या विषयाचा पहिला कोर्स करताना तिला आपलं व्यावसायिक उद्दिष्ट गवसलं तिच्याच शब्दात, ‘मला गणित आवडत असे आणि मी तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करत असे. त्या वर्गात बसून मी जेव्हा शिकत होते की, ग्रेट डिप्रेशनच्या वेळेस सरकारनं काही प्रकारची धोरणं राबवली असती, तर प्रचंड मानवी यातना टळल्या असत्या, तो क्षण माझ्या दृष्टीनं साक्षात्कारी क्षण ठरला. मला जाणवलं की सरकारी धोरणं या समस्या दूर करू शकतात आणि तशा योजना राबवल्या जायलाच हव्यात.’
तिनं येल् विश्वविद्यालयातून जेम्स टोबिन या विख्यात अर्थशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी.चा प्रबंध पूर्ण केला. टोबिननं त्याच्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवलं होतं की अर्थशास्त्राचं उद्दिष्ट खऱ्याखुऱ्या माणसांची काळजी घेणं हेच असायला हवं. टोबिनप्रमाणेच, जोसेफ स्टिग्लिट्झ या उदार मतवादी अर्थशास्त्रज्ञाच्या हाताखालीसुद्धा येलिननं पाठ घेतले. ‘लोकांना वाटतं, तेवढी मुक्त बाजारपेठ कार्यक्षम नसते’ या विषयावर स्टिग्लिट्झबरोबरच जॉर्ज अँकरलॉफ यानं जे काम केलं, त्याबद्दल त्या दोघांना नोबेल पुरस्कार विभागून मिळाला. याच जॉर्ज अँकरलॉफबरोबर येलिन १९७७ साली विवाहबद्ध झाली. येलिन म्हणते की तिच्या विचारांवर टोबिन येवढाच तिचा पती, अँकरलॉफ याचासुद्धा पगडा आहे. या अर्थशास्त्रज्ञ पतीनं येलिनला वैचारिक साहचर्याइतकीच संसारातही साथ दिली. येलिननं ३६ र्वष फेड्साठी काम केलं. त्या काळात तिला इंग्लंड, कॅलिफोर्निआतील बर्कले आणि सॅन्फ्रॉन्सिस्को, वॉशिंग्टन अशा विविध जागी जावं लागलं. तिला जेथे जावं लागेल, तेथे तिचा पती प्रोफेसरचं पद मिळवून काम करत असे. त्यांचा मुलगा रॉबर्ट आता ३२ वर्षांचा असून, इंग्लंडमध्ये वॉरविक्  येथे अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे. परंतु त्याला वाढवताना तिच्या पतीनं तिच्या बरोबरीनंच नव्हे, तर तिच्याच शब्दात ‘५० टक्क्य़ांपेक्षा जास्त’ जबाबदारी स्वीकारली. येलिन आणि तिच्या पतीनं, अ‍ॅकरलॉफनं, जोडीनं वेगळ्याच विषयात आघाडीचं संशोधन केलं. बर्कलेत असताना त्यांचा एक संशोधन प्रबंध खूपच गाजला. त्याचा विषय होता ‘‘कमी मोबदला नेहमीच अधिक नोकऱ्या का निर्माण करू शकत नाही.’’ या संशोधनाच्या वेळेस त्यांच्या बाळासाठी नॅनी नेमण्याचा अनुभव त्यांना खूप उपयुक्त ठरला. येलिन तिच्या दैनंदिन आयुष्यातून मिळवलेल्या व्यवहारज्ञानाची सत्वान्वेषक संशोधनाशी सांगड घालून नवीन सत्याचा सतत शोध घेत असते. कंपन्या वेगवेगळ्या सुविधा अलग अलग न विकता एकत्रितपणे का विकतात, यावर तिनं इतरांबरोबर लिहिलेला ‘मोनॉपॉली प्रायसिंग’वरचा संशोधन-प्रबंध टेलिकम्युनिकेशन्स व्यवसायाचा पाया ठरला.
अशी लोकांबाबत सतत विचार करणारी जॅनेट येलिन २००८ साली सॅन फ्रॅन्सिस्को फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेची प्रमुख असताना, तिनंच सर्वाच्या आधी ‘सब प्राइम मॉर्गेज’मधील संभाव्य धोका जाणून घेऊन त्याबद्दल इतरांना सतर्क केलं होतं. फेड्ची धोरणं आखणाऱ्या एकोणीस प्रमुखांपैकी या मुद्दय़ांबाबत धोक्याचा कंदील दाखवणारी ती पहिलीच व्यक्ती होती. पुढे काय घडलं ते सर्वश्रुतच आहे. त्यानंतर आर्थिक आघाडीवर जो कल्लोळ माजला आणि जगभर ज्याचे पडसाद उमटले, त्यातून अर्थव्यवस्थेला तारून नेण्यासाठी धोरणं आखण्यात- आणि हजारो अब्जांच्या किमतीची मालमत्ता विकत घेण्याच्या सरकारी धोरणाला आकार देण्यात तिनं २०१० साली फेड्ची उपाध्यक्षा या नात्यानं मोलाचा सहभाग घेतला. अमेरिकेतील लक्षावधी नोकरदारांना त्या धोरणामुळेच त्यांच्या नोकऱ्या टिकवून धरता आल्या आणि इतरांचे नोकऱ्या शोधायचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अमेरिकी अर्थव्यवस्था कोलमडू नये, म्हणून ‘फेड्’नं हजारो अब्जांची मालमत्ता विकत घेण्याचा जो उपक्रम राबवला. (त्याला क्वान्टिटेटिव्ह ईझिंग असं म्हणतात), तो आता हळूहळू बंद करणं आवश्यक आहे. ते कोणत्या गतीनं करायला हवं, हाच येलिनपुढचा यक्षप्रश्न आहे. सध्या बेकारी कमी होऊन मंदी ओसरू लागलीय. हा उपक्रम त्वरेनं बंद केला, तर अर्थव्यवस्थेतली सुधारणा ठप्प होऊ लागेल. परंतु हा उपक्रम फारच संथपणे बंद केला तर चलनफुगवटा- महागाई वाढू लागेल. येलिन ही अत्यंत संतुलनानं विचार करणारी अर्थशास्त्रज्ञ आहे आणि ही अवघड आव्हानं ती कौशल्यानं हाताळतेच. तिचं प्रांजळ मत आहे की, २०१४ हे साल अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं प्रगतीचं असेल आणि या वर्षी विकासाचा वेग २ टक्क्य़ांवरून ३ टक्क्यांवर जाईल. घरांची विक्री वाढेल, लोक अधिक गोष्टी विकत घेऊ लागतील, उद्योजक धंद्यात अधिक गुंतवणूक करतील आणि जास्त लोकांना नोकऱ्या मिळतील, असा तिचा आडाखा आहे. यासाठी योग्य ते निर्णय घेण्याचं काम एका अत्यंत सक्षम आणि सहृदय आणि संतुलित मानसिकतेच्या स्त्रीच्या हाती आहे, ही सर्व जगाच्या दृष्टीनंच सुदैवाची गोष्ट म्हटली पाहिजे.
तिच्या संतुलीत मनस्थितीचं दर्शन ‘फेड्’च्या अध्यक्षपदासाठी तिच्या प्रतिस्पध्र्याच्या हितसंबंधितांनी चालवलेल्या व्यूहरचनेच्या वेळेस घडलं. हे पद बर्नाकीकडून येलिनकडे जाणार असं सर्वाना वाटत होतं, तेव्हाच लॉरेन्स समर्स या इच्छुकाच्या पाठीराख्यांनी त्याच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आणि येलिनच्या क्षमतेवर शिंतोडे उडवण्याचं काम सुरू केलं, परंतु येलिन अगदी शांत होती. सप्टेंबर महिन्यात लॉरेन्स मायर हा फेड् गव्हर्नर तिला भेटायला गेला असता ती किंचित हसली आणि फक्त म्हणाली, ‘‘मी बाद झाले असं अजून समजू नका!’’ आणि खरोखरच त्यानंतर आघाडीवरच्या ५०० अर्थशास्त्रज्ञांनी एका नोबेल पुरस्कारित अर्थशास्त्रज्ञानं आणि पूर्वीच्या फेड्च्या उपाध्यक्षानं तिच्या नियुक्तीची तरफदारी करणाऱ्या पत्रावर स्वाक्षऱ्या करून ते पत्र अध्यक्ष ओबामांकडे पाठवून दिलं. उदारमतवादी डेमोक्रॅट्ससुद्धा याला दुजोरा देऊ लागले. त्यांचं म्हणणं होतं की येलिनच मोठाल्या बँकांचे व्यवहार रुळावर आणून अर्थव्यवस्थेची यंत्रणा सुरक्षित बनवू शकेल. तिच्या प्रतिस्पध्र्यानं या स्पर्धेतून आपलं नाव मागे घेतलं आणि येलिनची या पदी नियुक्ती झाली.
तिच्या धोरणांचे सकारात्मक परिणाम येत्या काही वर्षांत आपल्याला प्रत्यक्ष दिसणारच आहेत. जगातील सर्वात बलाढय़ अर्थव्यवस्थेचं सुकाणू हाती घेतलेल्या येलिनकडे पाहून मला रमाबाई रानडय़ांवरील ‘उंच माझा झोका’ या मालिकेतील शीर्षकगीताच्या पुढील काव्यपंक्ती समर्पक वाटल्या :
‘‘आरतीत तेवे माझ्या मंद या व्रताची समई,
   तुळशीचे रोप माझे उंच आकाशात जाई,
   मीच ओलांडले, सोबतीस माझा सखा,
   त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका.’’
  दोघींच्या बाबतीत स्थळ, काळ, संदर्भ वेगळे असले तरी कर्तृत्व, बुद्धिमत्ता आणि आच मात्र तीच!