जानकीबाई परशुराम आपटे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. समाजकार्यात पडण्यापूर्वी घरात भरपूर सोवळेओवळे असे. अशा जानकीबाई आपल्या मुलांच्या पंक्तीला हरिजन मुलांना जेवू घालू लागल्या. त्यांचे उष्टे, खरकटे व भांडी घासणे हेही रोजच्या कामाबरोबर करू लागल्या. त्यांनी ‘हिंद सेविका संघाची’ स्थापना केली. त्यात हरिजन स्त्रियांना सहभागी करून घेऊ लागल्या. हळदी-कुंकवाच्या वेळी त्यांनी यावं म्हणून स्वत: घरोघरी जाऊन हरिजन स्त्रियांना आमंत्रण देऊ लागल्या. १९३८ सालापासून त्या हरिजन वस्तीत जाऊन मुलींच्या डोक्यातील उवा काढणे, मुलांना आंघोळ घालणे, बायकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगणे, साक्षरता प्रसार करणे इत्यादी कामे करीत. दलितोद्धाराचे काम पाहून लोकच त्यांना ‘महाराष्ट्राच्या ठक्करबाप्पा’ म्हणू लागले. त्यांच्याविषयी..
अंबू वासुदेव दाते. चार वर्षांची असतानाच वडील गेले. मामांनी तिचे लग्न लावून दिले वयाच्या अकराव्या वर्षी. वर होता सत्तावीस वर्षांचा एक शिक्षक. लग्न झाल्यावर जानकी आपटे या नव्या नावाने, नव्या कुटुंबात व नव्या गावात अंबू दातेने प्रवेश केला. अंबू ऊर्फ जानकी या गावाचे नाव स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात कोरेल, असे कोणी भविष्य सांगितले असते, तर त्याला वेडय़ातच काढले असते; पण जानकीने, एका अशिक्षित, गरीब बाईने ते घडविले.
जानकीबाईंचे मामा गोविंदराव टिळक हे टिळकभक्त होते. लोकमान्य सोलापूर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर असले तर गोविंदराव टिळकांच्या घरीच उतरत. वडील गेल्यावर जानकीबाई मामाकडेच आईबरोबर राहू लागल्या. मामाचे घर देशभक्तीने भारलेले. त्यांच्या बालमनावर खोल कुठे तरी देशभक्तीचे संस्कार होत गेले. अकराव्या वर्षी लग्न झालेली अंबू ऊर्फ जानकी परशुरामपंत आपटय़ांची गृिहणी म्हणून अहमदनगरच्या बिऱ्हाडी आली. अहमदनगरचे हरिभाऊ पटवर्धन वकील हे परशुरामांचे मावसभाऊ. त्यांनी आपल्या वाडय़ाच्या मागच्या बाजूला असलेले दोन खोल्यांचे, पण स्वतंत्र घर आपटय़ांच्या बिऱ्हाडासाठी दिले होते.
जानकीबाई बिऱ्हाडात आल्या, तेव्हा त्यांना अक्षरओळखही नव्हती. घरात दुसरे कोणीच नव्हते. जानकीबाई बघून बघून व इतर बायकांना विचारून सर्व शिकल्या. त्यांनी जुजबी शिवणकला शिकून घेतली. लहान मुलांचे कपडे शिवून देत. घरातच एक शिवणवर्ग सुरू केला. हातमागाच्या नगरी साडय़ा मागावरून आणून घरातच लुगडी, खण व चिटे (प्रिंटेड क्लॉथ) विकू लागल्या. शिक्षकाच्या तुटपुंज्या पगारात सात मुलांचे पालनपोषण करण्यास या अशिक्षित महिलेने असा हातभार लावला. अशा या जानकीबाईंच्या आयुष्याला कलाटणी मिळण्यास कारण झाले ते एका महिला नेत्याचे भाषण!
१९३० साली मिठाच्या सत्याग्रहाच्या प्रचारार्थ अहमदनगरला गेलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे भाषण ऐकून जानकीबाई अस्वस्थ झाल्या होत्या. सभेनंतर बेकायदेशीर मिठाची विक्री झाली. कमलादेवींच्या चळवळीला हातभार लावण्याच्या दृष्टीने स्त्रियांची संघटना बांधणे आवश्यक आहे असे त्यांच्या मनाने घेतले. नगरचे काँग्रेस कार्यकर्ते काकासाहेब गरुड यांच्या सहकार्याने त्यांनी ‘हिंद सेविका संघाची’ स्थापना केली. महिलांमध्ये देशप्रेम व पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी त्या राष्ट्रीय कार्यक्रमांचे नियोजन करू लागल्या. त्याचा परिणाम मध्यमवर्गीय स्त्रिया धीटपणे प्रभातफे ऱ्या, निदर्शने, सभांना हजर राहणे या कामांत पुढे येऊ लागल्या. १९३६ साली फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनास स्वत:चे स्वयंसेविका पथक तयार करून घेऊन जानकीबाई गेल्या होत्या. हे पथक बनविण्यासाठी रावसाहेब पटवर्धन यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते. फैजपूरमध्ये दहा दिवस कार्यकर्त्यांची व्यवस्था पाहणे, नेत्यांच्या तंबूबाहेर पहारा देणे अशी महत्त्वाची कामे या स्वयंसेविकांनी पार पाडली. त्यांची शिस्त व नेटकेपणा याबद्दल पंडित नेहरूंसह सर्व नेत्यांनी जानकीबाईंच्या नेतृत्वाची व पथकाच्या शिस्तीची प्रशंसा केली. जानकीबाईंच्या संघटनामुळे नगर व आसपासच्या स्त्रिया आपोआप काँग्रेसमध्ये येऊ लागल्या. परिणामी १९३७ च्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ खूप स्त्रिया पुढे आल्या.
१९३८-३९ मध्ये जानकीबाईंची काँग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्षपदी निवड झाली. जानकीबाईंनी अध्यक्ष म्हणून एका पत्रकाद्वारे गुढीपाडव्याला गुढीबरोबरच तिरंगी झेंडा लावण्याचे आवाहन केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत ही प्रथा चालू राहिली. १९४० मध्ये वैयक्तिक सत्याग्रहात रावसाहेब पटवर्धन यांना अटक झाली. या अटकेच्या निषेधार्थ झालेल्या सभेत जानकीबाईंचे फारच प्रभावी भाषण झाले. ब्रिटिश सरकारच्या अरेरावी धोरणास शह देण्यासाठी त्यांनी महिलांना स्वयंपाकाचा मसाला लवंग न वापरता करावा असे पत्रक काढले. अशा गोष्टी दिसायला अगदी नगण्य वाटल्या, तरी हे करून आपणही काही करू शकतो, असा आत्मविश्वास स्त्रियांच्या ठायी उत्पन्न होण्यास निश्चित मदत झाली.
१९४० पासून जानकीबाईंचे राजकीय क्षेत्र खूप विस्तृत झाले. त्या सर्व नगर जिल्ह्य़ात फिरून भाषणे देत. रूढार्थाने त्यांचे शिक्षण झाले नव्हते, पण त्या भाषण करताना समर्थक म्हणी व उदाहरणे देऊन सोप्या भाषेत बोलत. सामान्य माणसाच्या थेट हृदयास हात घालण्याचे सामथ्र्य त्यांच्या भाषणात होते. १९४० च्या वैयक्तिक सत्याग्रहात कोणी भाग घ्यायचा याची यादी ठरली होती. अच्युतराव पटवर्धन हे सत्याग्रह समितीचे अध्यक्ष होते. त्यांना अटक होऊन १५ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाल्यामुळे त्या जागेवर जानकीबाई आपटे यांची नेमणूक झाली. हा जानकीबाईंचा फार मोठा बहुमान होता. डिसेंबर १९४० नंतर जानकीबाईंची निवड सत्याग्रहासाठी झाली. त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकारी फातिमा शेख व ख्रिस्ती ताराबाई राठोड होत्या. ६ जानेवारी १९४१ रोजी या तिघींनी सत्याग्रह करून मोर्चा काढला. त्यात हजारो लोक सामील झाले. युद्धविरोधी घोषणांनी नगर शहर दुमदुमले. या सत्याग्रहात दंड भरण्याचे कबूल न केल्यामुळे त्यांना तीन महिन्यांची साधी कैद झाली. तुरुंगात असताना गांधीजींनी आदेश दिलेला राष्ट्रीय सप्ताह जानकीबाईंनी वेगळ्या पद्धतीने साजरा केला. गुन्हेगार बायकांच्या बराकीत त्यांची लहान मुलेही होती. त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. आपल्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यां स्त्रियांच्या खादी साडय़ा कापून त्यांनी या मुलांना कपडे शिवले. त्यांना स्वच्छ का व कसे ठेवले पाहिजे हेही त्या स्त्रियांना समजावून सांगितले. त्यांना घेऊन रोज प्रार्थना म्हटली. या सर्वाचा परिणाम गुन्हेगार स्त्रियांवर झाला नसता तरच नवल. तुरुंगातून सुटल्यावर अनेक स्त्रियांना त्यांनी सत्याग्रहासाठी तयार केले. यानंतर त्यांच्या छोटय़ा दोन खोल्यांच्या घराला पक्ष कचेरीचेच स्वरूप आले. थेट रावसाहेब अगर अच्युतराव पटवर्धनांकडे जाण्याऐवजी आता लोक जानकीबाईंना प्रथम भेटत.
१६ ऑगस्ट १९४२ ला त्यांना येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आले. येरवडय़ातून त्यांना कर्नाटकातील हिंडला जेलमध्ये हलविले. तिथे त्यांना रक्तदाबाचा तीव्रतेने त्रास होऊ लागला. आजार बळावत गेला. त्यांनी पॅरोलवर सशर्त सुटका करून घ्यावी, असा आग्रह अधिकारी धरू लागले. जानकीबाईंसारखी कणखर सत्याग्रही सशर्त सुटकेला होकार देणे कालत्रयी शक्य नव्हते. शेवटी सरकारच नमले व त्यांची बिनशर्त मुक्तता झाली. त्यावेळी जानकीबाईंच्या दोन्ही मुली व सूनबाईही जेलमध्ये होत्या.
जानकीबाईंनी आपल्या कामाला सामाजिक कार्याच्या माध्यमातून सुरुवात केली होती. उच्च रक्तदाबासारखा गंभीर आजार जेलमध्ये झाल्यामुळे राजकीय कामात जी पळापळ व श्रम होतात ते होईनासे झाले. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी पुन्हा विधायक कार्यालाच वाहून घ्यायचे ठरविले. १९३५ साली महात्मा गांधींनी हरिजन कार्याला चालना देण्यासाठी देशभर दौरा केला. त्यात नगरलाही त्यांनी भेट दिली. गांधीजींच्या भाषणाने प्रभावित होऊन त्यांनी हे काम आपल्या घरापासूनच करावयाचे ठरविले. जानकीबाई चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. समाजकार्यात पडण्यापूर्वी घरात भरपूर सोवळेओवळे असे. अशा जानकीबाई आपल्या मुलांच्या पंक्तीला हरिजन मुलांना जेवू घालू लागल्या. त्यांचे उष्टे, खरकटे व भांडी घासणे हेही रोजच्या कामाबरोबर करू लागल्या. त्यांच्या हिंद सेविका संघात हरिजन स्त्रियांना सहभागी करून घेऊ लागल्या. हळदी-कुंकवाच्या वेळी त्यांनी यावं म्हणून स्वत: घरोघरी जाऊन हरिजन बायकांना आमंत्रण देऊ लागल्या.
जानकीबाई व त्यांच्या सहकारी मथुराबाई चांदकर या दोघीही ब्राह्मण कुटुंबातील बायका. १९३८ सालापासून त्या हरिजन वस्तीत जाऊन मुलींच्या डोक्यातील उवा काढणे, मुलांना आंघोळ घालणे, बायकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगणे, साक्षरता प्रसार करणे इत्यादी कामे करीत. वस्तीतील चावडी रहिवाशांच्याच साहाय्याने दुरुस्त करून जानकीबाईंनी तिथे तिसरीपर्यंतची प्राथमिक शाळा सुरू केली. अखिल भारतीय हरिजन सेवा संघाचे सचिव पूज्य ठक्करबाप्पा नगरच्या मुक्कामात मुद्दाम जाऊन त्यांचे काम पाहून आले. जानकीबाईंची जिद्द पाहून ते थक्क झाले. ग्रामीण भागातील हरिजन मुलींसाठी वसतिगृह असेल, तरच त्या शिकू शकतील, असे ठक्करबाबा म्हणाले. जानकीबाईंनी त्यांचा हा विचार आव्हान म्हणून स्वीकारला व त्यातूनच जून १९४३ मध्ये बालिकाश्रमाची स्थापना झाली. ठक्करबाबांनी स्वत: या वसतिगृहाचे उद्घाटन केले होते. बालिकाश्रमाला न्या. छागला, साने गुरुजी, इंदिरा गांधी व बालगंधर्व अशा मान्यवरांनी आवर्जून भेट दिली होती. जानकीबाईंबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले होते.
अस्पृश्योद्धारातील जानकीबाईंचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे त्यांनी सफाई कामगारांना योग्य वेतन मिळावे व त्यांच्याकडील अन्याय दूर व्हावे म्हणून केलेला संघर्ष. हरिजन वस्तीत जात असल्यामुळे भंगी, झाडूवाले यांच्याशी त्यांचा संबंध आला. त्यांची संघटना बांधली व त्यांच्या संघटनेचे अध्यक्षपदही भूषविले.
जानकीबाई नेहमी दलित व स्त्रिया यांच्या विचाराने झपाटलेल्या असत. एकदा शेवगावला त्या सभेला गेल्या असता ११ वर्षांची सासरच्या जाचाला कंटाळलेली व माहेरला मुकलेली शांता नावाची एक दलित मुलगी त्यांना भेटली. मागचापुढचा काहीही विचार न करता जानकीबाई शांताला आपल्या घरी घेऊन आल्या. त्या मुलीला एक चित्पावन बाई आपल्या मुलीसारखे वाढवते आहे हे पाहून समाजाने आपटे कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घातला. जानकीबाई मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. शांताचे स्वत:च्या मुलीप्रमाणे पालनपोषण, शिक्षण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर शांतानेही आयुष्यभर आश्रमाची पर्यवेक्षक म्हणून काम केले. शांताने आपले सर्व आयुष्य बालिकाश्रमासाठी वेचले. या तिच्या कामाबद्दल महाराष्ट्र शासनाचा ‘दलितमित्र’ हा पुरस्कारही मिळाला.
अहमदनगरमध्ये उच्चभ्रू स्त्रियांचा लेडीज क्लब होता, पण त्यात कनिष्ठ व मध्यमवर्गातील स्त्रिया जाऊ शकत नसत. त्यांनाही एकत्र येण्याची गरज होती. अशा स्त्रियांना एकत्र येण्यासाठी त्यांनी माता-बालक मंदिराची स्थापना केली. रावसाहेब पटवर्धनांनी आपल्या घरच्या तबेल्यात मंदिराला जागा
दिली. तबेल्याच्या शेजारी एक पटांगण नगरपालिकेच्या मालकीचे होते. हे पटांगण नगरपालिकेकडून जानकीबाईंनी मिळविले. या पटांगणाला कंपाऊंड घालून बंदिस्त करणे हे स्त्रिया व मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक होते. यासाठी येणाऱ्या खर्चाची उभारणी बायकांनी स्वत:च करावी असे जानकीबाईंना वाटले. त्यांनी बायकांना एक कल्पना सुचवली. संक्रांत जवळ येत आहे. तुम्ही हळदी-कुंकू करून वाणे वाटता. हा खर्च जो  तुम्हाला शक्य आहे तो तुम्हा सर्व जणींचा एकत्र केला, तर आपल्याला कंपाऊंडसाठी कोणाकडे हातच पसरावा लागणार नाही. जानकीबाईंनी घरोघरी जाऊन ही कल्पना पटवली व त्या जमलेल्या पैशातून स्त्रिया व मुलांसाठी बंदिस्त जागा तयार झाली.
१९३६ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेची वर्गणी फक्त ४ आणे महिना होती. या संस्थेतर्फे तिकीट लावून नाटके केली. पुरुषांच्या भूमिका स्त्रियाच करीत. नगर शहरालाच नव्हे, तर महाराष्ट्रातही ही कल्पना नवीन होती. श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला ‘मातृदिन’ म्हणतात. दलित महिलांना व मुलांना मातृदिनादिवशी शाळेच्या मैदानावर बोलावून त्यांना गहू, गूळ व खाऊ वाटण्याची प्रथा सुरू केली. गोरगरिबांना गणपतीत गोडधोड खायला जमत नाही. या प्रथेमुळे दलित महिलांना आपल्याही घरात गणपतीचे गोडधोड करता येऊ लागले. दुसरे म्हणजे मध्यमवर्गीय स्त्रिया आपल्यापेक्षा कनिष्ठ दलित भगिनींशी संपर्क ठेवण्याची इच्छा धरू लागल्या. ही प्रथा आजही चालू आहे असे समजते.
दलितांशी जवळीक साधून समाजाला जानकीबाईंनी जसा धक्का दिला तसाच एका सोवळ्या झालेल्या बालविधवेची जबाबदारी घेऊन तिचा पुनर्विवाह करूनही धक्का दिला. माया नावाची सोवळी बालविधवा जानकीबाईंच्या शिवणवर्गाला येत असे. तिला त्यांनी केस वाढवायला प्रोत्साहन दिले. तिच्या घरच्या माणसांची व तिचीही मानसिकता बदलण्यासाठी त्या सतत पाठपुरावा करीत होत्या. एका सुस्वरूप तरुणाबरोबरीचा विवाह लावून देण्यात जानकीबाईंनी पुढाकार घेतला. हे प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देण्यासारखेच होते.
समाजातील सर्वच थरांतील स्त्रियांनी एकाच व्यासपीठावर यावे, विचारांची देवाणघेवाण करावी, या उद्देशाने जानकीबाईंनी नगरमध्ये दोन दिवसांची महिला परिषद आयोजली. या परिषदेसाठी त्यांनी विडी महिला कामगार, सफाई महिला कामगार, सार्वजनिक नळावर पाणी भरणाऱ्या महिला व यांच्याबरोबरच मध्यम वर्गातील व उच्चभ्रू महिला यांना आमंत्रण दिले होते. तीन हजार स्त्रियांच्या या भव्य परिषदेचे उद्घाटन गांधीवादी कार्यकर्त्यां प्रेमा कंटक यांनी केले होते. या परिषदेला स्वत: नगरचे कलेक्टरही जातीने हजर राहिले. २० व २१ ऑक्टोबर १९४५ ला भरलेल्या या परिषदेला प्रवेश फी फक्त १ आणा होती. त्यामुळेही तळागाळातील स्त्रिया या परिषदेला हजर राहू शकल्या व त्यांनी आयुष्यात प्रथमच व्यासपीठावर चढून आपले मनोगत व्यक्त केले असावे.
कमलादेवी चट्टोपाध्याय, ठक्करबाप्पा व महात्मा गांधी अशा थोर लोकांच्या भाषणांमुळे जानकीबाई प्रभावित झाल्या. दलितोद्धाराचे काम पाहून लोकच त्यांना ‘महाराष्ट्राच्या ठक्करबाप्पा’ म्हणू लागले. दलित व स्त्रिया यांच्यासाठी त्या अहोरात्र झटल्या. ११ वर्षांत ७ बाळंतपणे, त्यातील दोघांचा मृत्यू, याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होताच; पण पुढे समाजकार्य व राजकीय चळवळीत होणाऱ्या दगदगीमुळे व अतिश्रमामुळे त्यांची प्रकृती ढासळत होती. तशाच हिंडलग्याच्या तुरुंगात असताना जडलेल्या उच्च रक्तदाबामुळे पक्षघाताचा झटका आला. तशाही अवस्थेत त्या जिद्दीने आपण स्वीकारलेले कार्य करीतच राहिल्या. आपल्या मागे कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली हे त्यांचे आजच्या काळात दिसून न येणारे वैशिष्टय़ होते. नगर गावाचे भूषण असलेल्या या महाराष्ट्रकन्येने त्याच गावी २८ ऑगस्ट १९६२ रोजी अखेरचा श्वास घेतला.     
    gawankar.rohini@gmail.com

Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
jejuri marathi news, two lakh pilgrims jejuri marathi news
जेजुरीच्या सोमवती यात्रेस दोन लाख भाविक, शालेय परीक्षा व पाडवा सणाचा यात्रेवर परिणाम
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
BJP's sitting MP Unmesh Patil from Jalgaon joined Shiv Sena UBT on Wednesday .. Express Photo by Amit Chakravarty
“मला त्या पापात वाटेकरी व्हायचं नाही”, ठाकरे गटात प्रवेश करताच खासदार उन्मेश पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप