‘जपलेले क्षण हे पुस्तक म्हणजे माझ्या ८० वर्षांच्या आयुष्यात ज्या विविध क्षेत्रांत वावरले तेथलेच शब्दबद्ध केलेले क्षण आहेत. तसं पाहिलं तर हे आत्मकथनच. परंतु,ललित लेखाच्या अंगानं लिहिलेलं आहे.
 माझा मूळचा स्वभाव सारखे काही ना काही उद्योग करत राहायचे. (माझा मुलगा त्यांना गंमतीनं उपद्व्याप म्हणतो) स्वस्थ मुळी बसायचेच नाही. त्यामुळेच ८० वर्षे झटकन निघून गेली. सुरुवातीला खेळकर विनोदी ढंगानं लिहिलेल्या कथा. शिवाय आकाशवाणीवरील ‘पुन्हा प्रपंच’, ‘आंबटगोड’, ‘वनिता मंडळ’ या कार्यक्रमासाठी सतत लेखन, गळ्यात गंधर्वपठडीचं गायन जपल्यामुळे मुंबई आकाशवाणीवरून आणि बडोद्यासारख्या इतर केंद्रांवरून पाहुणी कलाकार म्हणून गायन सादर, स्वतंत्र मैफिली, रंगमंचाची भीती अजिबात नसल्यामुळे विविध विषयांवर भाषणं, परिसंवादातून भाग, मुंबईला दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यावर सुहासिनी मूळगावकरच्या ‘सुंदर माझं घर’ मध्ये २० वर्षे संचालिका म्हणून सहभाग, मध्येच वाटलं म्हणून १९७४-७५ या दोन वर्षांत पुणे विद्यापीठातून ‘मराठी’ विषय घेऊन एम.ए. ही पदवी संपादन, दूरदर्शनमधून बाहेर पडल्यावर स्वभावाला साजेसा ‘हास्यदिंडी’ नामक एकपात्री विनोदी कार्यक्रम बसवला. देश-विदेशातल्या मंडळींच्या मनावरचे ताणतणाव त्यांना हसवून दूर करण्याचा प्रयत्न केला. पाठोपाठ तीन कवयित्री आणि मी असा गद्य-पद्य माध्यमातला ‘स्त्रियांच्या बोलघेवडेपणावर’ आधारित ‘आम्ही गप्पिष्ट’ हा कायर्यक्रम लिहिला. त्याचेही प्रयोग झाले. असं सगळं करता करता ८० वर्षे केव्हा संपली हे कळलंच नाही. त्याचाहा हा लेखाजोखा.|त्यानंतर एक दिवस मनात आलं, इतक्या विविध क्षेत्रातले वाटय़ाला आलेले प्रसंग ‘शब्दबद्ध’का नाही करायचे’ आणि ही आंतरीची ओढ जेव्हा स्वस्थ बसू देईना, तेव्हा लेखणी हातात घेतली. एकामागून एक लेख लिहून पूर्ण केले. गिरगावातले श्री. केशव भिकाजी ढबळे यांच्यासारखे नामवंत प्रकाशक लाभले. डॉ. शुभा चिटणीसांनी प्रस्तावक लिहून दिली. बहिणीच्या नातीनं- सुप्रिया चक्रदेव- हिने मुखपृष्ठासाठी चित्र काढून दिलं आणि ‘जपलेले क्षण’ या पुस्तकाचा जन्म झाला.
माझ्या जीवनात मला नशिबामुळे फार मोठमोठय़ा व्यक्तींशी परिचय झाला. वानगीदाखल दोन-चार नावं सांगते. १९४२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस, नंतर जवाहरलाल नेहरू, गणेशपुरीच्या मुक्तानंद स्वामींसमोर गायन, स्वर्गीय बालगंधर्व आणि  कृष्णा मास्तर हे वडिलांचे स्नेही म्हणून घरी येणे-जाणे, नंतरच्या काळात माणिक वर्माशी स्नेह, शंकर वैद्य- सरोजिनी वैद्य किती नावं सांगू?  अशा मंडळींशी ओळख म्हणजे माझ्या आयुष्याला भरजरी किनार देणारा खजिनाच आहे.
  आणखी एक भाग्याची गोष्ट अशी आहे की, लग्नाच्या अगदी पहिल्या दिवसापासून माझ्या आयुष्याच्या जोडीदारानं प्रोत्साहनाचा हात माझ्या पाठीवर ठेवला ओह तो आजतागायत! आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अजून ‘स्मृतीनं’ दगा दिलेला नाही. एकच गोष्ट आयुष्यात करता आली नाही ती म्हणजे ‘नोकरी!’ माझ्या आजारी आणि वृद्ध सासू-सासऱ्यांची देखभाल करण्याची माझ्यावर जबाबदारी होती आणि ती देवमाणसं असल्यामुळे मला ती आनंदाने पार पाडता आली.
आणखी एक गोष्ट सांगायला हवी. आजच्या तुलनेनं मी थोडी जुन्या मतांची आहे. कुटुंबसंस्था- विवाहसंस्था यांना मी जीवनाचे आधारस्तंभ मानते. तसच घराचं घरपण स्त्रीमुळेच टिकतं यावर माझा ठाम विश्वास आहे आणि ‘संस्कार’ हे नेहमी एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पाझरत जात असल्यामुळे घरातल्या वडील मंडळींनी स्वत:च्या वागण्यावर र्निबध घालायला हवेत. या सगळ्याच्याच आठवणी, विचार शब्दरूपाने या पुस्तकात आल्या आहेत.
‘जपलेले क्षण’ हे पुस्तक प्रसिद्ध होऊन महिनाच झाला आहे. त्यामानानं पत्ररूपानं आणि दूरध्वनीवरून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकंदरीत सध्या तरी या लिखाणाने मनाला खूप खूप समाधान मिळत आहे.