मीनल जोगळेकर

महाराष्ट्रात, मुंबईत ६२ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या, ४३ हजार महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या, २४ देशांमध्ये, ८०० कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल असणाऱ्या ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’ समूहाच्या एक संस्थापक सदस्य जसवंतीबेन पोपट यांना या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. नव्वदी पार केलेल्या जसवंतीबेन आजही दररोज सकाळी ५ वाजता मूळ शाखेत उपस्थित राहून रोजच्या कामकाजात सहभागी होतात आणि  रात्री साडेनऊला घरी परततात. त्यांच्यासारख्यांमुळेच अनेकांच्या जेवणाची आणि जीवनाचीही ‘लिज्जत’ वाढवणारी ही संस्था इतकी मोठी होऊ शकली..

mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…
HDFC Bank home loans become expensive
एचडीएफसी बँकेचे गृहकर्ज महागले
maval marathi news, sexually assaulted and killed 6 year old girl
मावळात बालिकेवर अत्याचार करुन खून करणाऱ्या आरोपीला फाशी, आरोपीच्या आईला सात वर्ष सक्तमजुरी

सुमारे ६२ वर्षांपूर्वी मुंबईच्या गिरगाव भागात लोहाना चाळींमध्ये काही गृहिणींनी वामकुक्षीच्या वेळेचा सदुपयोग आणि कुटुंबाला मदत करण्याच्या हेतूनं कमी भांडवल लागणारे, उपलब्ध कौशल्यातून करता येणारे आणि घरोघरी आवडणारे पापड लाटून विकण्याची कल्पना काढली. चाळीच्या तत्कालीन विश्वस्तांनी चाळीची गच्ची त्यांना या कामासाठी उपलब्ध करून दिली. या स्त्रियांनी पहिल्या दिवशी एक किलो पापड लाटून परिसरातील ‘आनंदजी प्रेमजी आणि कंपनी’ या दुकानात विक्रीसाठी दिले. ते सगळे पापड हातोहात खपले आणि स्त्रियांना पन्नास पैशांचा नफा त्यातून मिळाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी दोन किलो पापड लाटून दिले, तेही लगेच विकले जाऊन एक रुपयाचा नफा झाला. पापड विक्रीतून मिळकत होऊ शकते, असा विश्वास या स्त्रियांच्या मनात निर्माण झाला. त्यातूनच या घरगुती उद्योगाला व्यापक स्वरूप देण्याचं ठरलं. त्याच्या संस्थापकांपैकी एक जसवंतीबेन पोपट या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

जसवंतीबेन पोपट, जयाबेन विठलानी, पार्वतीबेन थोडानी, उजमबेन कुंडलिया, बानूबेन तन्ना, चुताडबेन गावडे आणि लगूबेन गोकानी या सात अल्पशिक्षित गृहिणींनी आपलं लक्ष्य ठरवलं. त्यांना त्यांच्या परिसरातील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते छगनलाल करमसी पारेख यांनी प्रोत्साहन आणि ८० रुपये भांडवल उपलब्ध करून दिलं. त्यातून १५ मार्च १९५९ रोजी एका उद्योगाची पायाभरणी झाली. त्याचा एवढा मोठा उद्योग समूह होईल याची कल्पनाही या स्त्रियांना नव्हती. पुरुषोत्तम दामोदर दत्तानी ऊर्फ दत्तानीबाप्पा यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. पुढच्या तीन-चार महिन्यांत स्त्रियांची संख्या वाढत जाऊन दोनशेपर्यंत गेली आणि वडाळा येथे एक शाखा सुरू करावी लागली. १९६६ मध्ये संस्थेची मुंबई विश्वस्त कायद्यांतर्गत आणि सोसायटी नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आली. तसंच खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडूनही त्यांना मान्यता मिळाली. त्याच वर्षी महाराष्ट्राबाहेर पहिली शाखा गुजरातमधील वालोद येथे उघडण्यात आली. आज देशभरात त्यांच्या ८१ शाखा आहेत आणि अमेरिका, इंग्लंड, थायलंड, जपान,ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये संस्थेच्या उत्पादनांची निर्यात होते. सुरुवातीला जिथे एक किलो पापड विकले गेले होते, त्याच पहिल्या दुकानात आज दररोज जवळपास पंचवीस किलो पापड विकले जातात. पापडांबरोबरच आता गव्हाचं पीठ, चपात्या, अप्पलम (दक्षिणेत लोकप्रिय असलेले पापड), कपडे धुण्याची पावडर आणि साबण, मसाले, अशा अनेक पदार्थाचं उत्पादन ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’ या संस्थेकडून केलं जातं.

आज वयाची ९० वर्ष पार के लेल्या जसवंतीबेन या कर्जतजवळील एका खेडय़ातल्या सामान्य गुजराती कुटुंबातील अल्पशिक्षित स्त्री. लहान वयात लग्न होऊन १९५०च्या दशकात मुंबईतील गिरगाव येथे आल्या. एक मुलगा आणि दोन मुली अशा कौटुंबिक जबाबदारीत गुरफटलेल्या असतानाच काही समविचारी स्त्रियांसह त्यांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पापड लाटून विकायला सुरुवात केली. नंतर तेच त्यांचं जीविकेचं आणि उपजीविकेचं साधन झालं. लिज्जत उद्योगसमूहाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या संपूर्ण वाटचालीत जसवंतीबेन यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यात अनेक खाचखळगे, यशापयश, तसेच अभिमानाचे, मानसन्मानाचे क्षण यांच्या आठवणी आहेत. सर्वोदयवादी विचारसरणी मानणाऱ्या आणि आचरणात आणणाऱ्या जसवंतीबेन यांचा जगण्याचा श्वास लिज्जत उद्योगसमूह आहे. आजही त्या दररोज सकाळी ५ वाजता त्यांनी स्थापन केलेल्या पहिल्या आणि मूळ शाखेत उपस्थित असतात आणि रोजच्या कामकाजात सहभागी होतात. रात्री साडेनऊ वाजता कामकाज संपवून त्या घरी येतात. त्यानंतर मुला-नातवंडांमध्ये रमतात, त्यांच्याबरोबर अगदी क्रिकेट मॅचचाही आनंद घेतात.

पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना हा पुरस्कार आपल्याबरोबरच्या सर्व ‘बेन’चा असल्याचं आणि त्यांच्या वतीनं राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारण्यासाठी नवी दिल्लीला जाणार असल्याचं, त्या उत्साहानं सांगतात.  ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’ या संस्थेकडे एक आदर्श सहकारी संस्था म्हणून बघताना संस्थेची अनेक वैशिष्टय़ं लक्षात येतात. आचार्य विनोबा भावे यांच्या सर्वोदयवादी तत्त्वज्ञानाच्या आधारे ‘महिलांकडून महिलांसाठी’ चालवली जाणारी ही सहकारी संस्था आहे. या संस्थेत कुणीही एक मालक नसून सर्व सहभागी स्त्रिया, ज्यांना ‘बेन’ असं संबोधलं जातं, त्या याच्या समान मालक आहेत. संस्थेला होणारा नफा किंवा तोटा यांच्या त्या समान भागीदार आहेत.  संस्थेत सहभागी होणाऱ्या स्त्रीला तिची जात, धर्म, शिक्षण, कौटुंबिक माहिती विचारण्यात येत नाही, मात्र तिला एक शपथपत्र भरून द्यावं लागतं. तसंच दररोज सर्वधर्मप्रार्थनेत सहभागी व्हावं लागतं.  दर्जाचं सातत्य राखण्यासाठी त्यांनी पदार्थामधील घटकांचं प्रमाणीकरण केलं असून पदार्थ तयार करण्याची एक कार्यप्रणाली विकसित केली आहे. उदा. उडदाची डाळ म्यानमार तसंच काठियावाडमधून, हिंग, अफगाणिस्तानमधून, काळीमिरी आणि इतर मसाल्याचे पदार्थ केरळमधून आणण्यात येतात. त्यामुळे देशभरातील कोणत्याही शाखेत तयार होणाऱ्या पदार्थाची चव आणि दर्जा समान गुणवत्तेचा राखणं शक्य झालं आहे.  संस्थेच्या शाखेच्या परिसरात राहणाऱ्या स्त्रिया सकाळी स्वत:हून पीठ न्यायला चालत केंद्रावर येतात. पण लांब राहाणाऱ्या स्त्रियांची संस्थेच्या वाहनातून केंद्रात ने-आण केली जाते. संस्थेत पापड लाटून अनेक स्त्रियांच्या संसाराला आर्थिक हातभार लागला असून त्यांचं आयुष्य सुखकर झालं आहे. मुलांची शिक्षणं, लग्नकरय, घरबांधणी संस्थेतून होणाऱ्या मिळकतीतून भागवण्यात येत असल्यानं स्त्रियांना संस्थेचा मोठा आधार वाटतो, नव्हे ते त्यांना दुसरं माहेरच वाटतं. संस्थेच्या नफ्यातील वाटा स्त्रियांना दिला जातोच आणि त्यांनी संस्थेसाठी केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणून आर्थिक बक्षीस दिलं जातं. अगदी पाच ग्रॅम सोन्याचं नाणंसुद्धा. कोणाकडूनही दान किंवा देणगी स्वीकारायची नाही, हा शिरस्ता संस्थेनं स्थापनेपासून पाळला आहे. संस्थेतील स्त्रियांना  कर्ज देणं, त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देणं याबरोबरच पूर, भूकंप यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीतही आर्थिक मदत संस्था करते. अगदी ताजं उदाहरण म्हणजे ‘करोना’ टाळेबंदीत संस्थेच्या बंद ठेवाव्या लागलेल्या काही शाखांमधील स्त्रियांना एकरकमी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

संस्थेतील काही स्त्रियांना कामगार संघटनांकडून केला गेलेला भडकवण्याचा प्रयत्न, संस्थेत टिकून असलेल्या आदर्श कार्यसंस्कृतीमुळे यशस्वी होऊ शकला नाही. संस्थेची जबलपूर येथील एक शाखा बळकावण्याचा एका उद्योजकाचा प्रयत्न यशस्वी न्यायालयीन लढा देऊन संस्थेनं हाणून पडला.

‘वर्क फ्रॉम होम’, आत्मनिर्भर भारत, महिला सबलीकरण, ‘मेक इन इंडिया’, व्यवसायांचा सामजिक उत्तरदायित्व निधी, या संकल्पना आपण आज पाहातो, पण त्या या गृह उद्योगानं ६० वर्षांपूर्वीच कृतीत आणल्या. आज हा ८१ शाखांमध्ये २७ विभागांमध्ये कार्यरत आणि सुमारे ४३ हजार महिलांना आत्मनिर्भर करणारा, २४ देशांमध्ये, ८०० कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल करणारा सहकारी तत्त्वावर चालणारा उद्योग ठरला आहे.

युगांडा देशाच्या उपराष्ट्रपतींनी त्यांच्या देशात अशा प्रकारे उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग समूहाला भेट देऊन तेथील कार्यसंस्कृती समजून घेतली होती. उद्योगजगतातील अनेक मानाच्या पुरस्कारांनी उद्योगसमूहाला गौरवण्यात आलं आहे. दूरदर्शन, बीबीसी, नॅशनल जिओग्राफिक यांसारख्या प्रतिष्ठित वाहिन्यांनी उद्योगसमूहावर माहितीपट दाखवले आहेत. या उद्योगसमूहाची प्रेरक गाथा ‘कर्रमकुर्रम’ या चित्रपटातून मोठय़ा पडद्यावर अवतरणार असून प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

भारतीय महिला सक्षमीकरणात मोलाचं योगदान असलेल्या या उद्योगसमूहाचे कार्य जसवंतीबेन यांना जाहीर झालेल्या ‘पद्मश्री’ पुरस्काराच्या निमित्तानं अधोरेखित झालं आहे. स्वत:चा उद्योग सुरू करण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या अगणित स्त्रियांसाठी ते प्रेरणादायीच!

meenalsj0@gmail.com

हा जागतिक महिना दिन विशेषांक असल्याने आजची नियमित सदरे २० मार्च २०२१ च्या ‘चतुरंग’ पुरवणीत प्रसिद्ध होतील.