जयंत सावरकर

‘‘त्र्याऐंशी वर्षांचा मी, अलीकडे अभिनयाची कामं कमी केली असली तरीही खूप व्यग्र असतो. आत्ता या घडीला माझ्या हातात पाच चित्रपट आहेत, काही दूरचित्रवाणीवरील मालिका आहेत. मी मध्यंतरी काही हिंदी चित्रपटांतही कामं केली. अनेक वर्ष मराठी नाटक, चित्रपट, मालिका करूनही लोक मला ‘सिंघम’मधील आजोबा म्हणून ओळखतात, याची गंमत वाटते. हिंदीचा प्रेक्षकवर्ग केवढा तरी असतो. हिंदीत मी अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या तरुण कलाकारांबरोबर कामं केली, तीही पंचाहत्तरीनंतर! नवव्या वर्षी सुरू झालेला हा माझा अभिनय प्रवास असाच अखंड चालूच राहणार..’’

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
marathi actress Sharmishtha Raut journey as a poducer
शर्मिष्ठा राऊत: अभिनेत्रीची निर्माती होताना…
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

मी एक छोटा माणूस. छोटय़ा घरात जन्माला आलो, छोटय़ा घरात वाढलो, छोटंसं जग पाहिलं आणि छोटय़ा छोटय़ा भूमिका करत इथवर आलो. ‘लोकसत्ता’नं जेव्हा सांगितलं की ‘अवघे पाऊणशे वयोमान सदरासाठी लिहा.’ क्षणभर हसू आलं. एक छोटा माणूस काय सांगणार आणि त्यातून लोक काय बोध घेणार? पण ज्ञानेश्वर माऊलींचा दाखला आठवला, ‘राजहंसाचं चालणं डौलदार असतं, म्हणून इतरांनी काय चालूच नये की काय?’ आपण आपल्या चालीनं गेली त्र्याऐंशी वर्ष जगत आलो आहोत. ते जगणं आपण एका आत्मकथनात मांडलं आहे, त्यापलीकडेही काही सांगण्यासारखं आहे का? मग ध्यानात आलं, अरेच्या, आहे की आपल्याकडे सांगण्यासारखं खूप काही. कोणत्याही प्रकारचे लाड न होता, कोणत्याही प्रकारचं व्यसन न करता, कोणत्याही प्रकारचे ‘सो कॉल्ड’ नखरे न करता, कोणत्याही प्रकारची मस्ती न करता आपण १९५४ पासून आजवर गेली पासष्ट वर्षे जवळपास दोन-तीन दिवसांआड तोंडाला रंग लावून रंगमंचावर उभं राहात आलो आहोत की. बस, तोच हा प्रवास..

माझा जन्म रत्नागिरी जिल्ह्य़ातील गुहागर गावातला. माझ्या वडिलांच्या एकवीस मुलांतलं मी शेंडेफळ! माझ्या मोठय़ा भावात व माझ्यात बावीस वर्षांचं अंतर होतं. अठरा विसे दारिद्रय़ होतं. भाडय़ाच्या घरात आम्ही राहात होतो. माझे वडील वेगवेळ्या प्रकारचे छोटेछोटे व्यवसाय करून पोट भरत होते. आम्हाला ‘ऊसवाले सावरकर’ म्हणून ओळखत असत. कारण, दररोज सकाळी चार वाजता बाबा उठून सर्व आवरून गुऱ्हाळ लावायचे. गुऱ्हाळ फिरवायला आमच्याकडे रेडा नव्हता, ते स्वत: गुऱ्हाळ फिरवायचे आणि आई चरकात ऊस घालायची. हंडाभर ऊस काढला की बाबा तो हंडा डोक्यावर घेऊन गुहागरपासून आरे गावापर्यंत चालत रस विकायचे.  सकाळी नऊ वाजेतो ते परत येत. मग त्यांची बाकीची कामे चालत. कुणाचं शेत बेणायला किंवा लावायला घे, कुणाच्या झाडावरचे नारळ, आंबे, फणस काढायचं काम घे, असं सारखं चालायचं. मोठा भाऊ  नोकरीनिमित्ताने मुंबईत गेला होता. त्याच्याकडे शिक्षणासाठी म्हणून बाबांनी पाठवलं. मोठय़ा भावाचं गिरगावातल्या मंगलवाडीतील श्रीकृष्ण निवास चाळीत घर होतं. दोन खोल्यांच्या जागेत आम्ही चौदा जण राहायचो. त्या वेळच्या मुंबईची ती पद्धतच होती. कोकणातला एखादा कर्ता पुरुष मुंबईत यायचा व त्याच्या माध्यमातून घर उभं राहायचं. शाळेला सुट्टी पडली की मी कोकणात घरी जायचो. सकाळी चारला घरातला राबता सुरू व्हायचा. बाबा आम्हा मुलांना मदतीला घ्यायचे. आमच्याकडे दुपारी झोपेची सवय नव्हती. गरिबी तुम्हाला झोप घेऊ  देत नाही, म्हणून कष्ट करायची सवय लागते व शरीर आपोआप तगडं बनत जातं. तुम्हाला सांगतो, मला आठवतं तेव्हापासून दररोज सकाळी चार वाजता मी उठतो म्हणजे उठतोच. आज बाबा हयात नाहीत, पण त्यांनी शरीर व मनाला लावलेली शिस्त आजही अंगात कायम आहे. आजही माझ्या मनाला वाटतं, बाबा उठले असतील. आज त्यांच्याऐवजी आपण गुऱ्हाळ चालवू या, त्यांना जरा आराम देऊ या. आताशा सकाळी फारसं काम नसतं, पण मी मनातल्या मनात माझ्या बाबांना थोडासा झोपायला सांगतो, त्यांचे पाय चेपून देतो. पहाटेचं स्वप्न ते, पण समाधान देऊन जातं.

आजही माझा दिवस पहाटे चार वाजता एक आयुर्वेदिक औषध घेऊन सुरू होतो. तासाभराने सर्व काही आवरून देवपूजा करतो. मला देवपूजा करायला आवडते.  गणपतीच्या पूजेने प्रारंभ होतो आणि मग सव्वादोनशे श्लोक म्हणत ती पूजा सुरू राहते. ठाण्याला येण्यापूर्वी गिरगावात असताना मी पहाटे फिरायला जात असे. त्या काळात पूजा करायचं काम माझी पत्नी, उषाचं असायचं. फिरता फिरता मी हे सारे श्लोक म्हणायचो, त्यानंतर अगदी २०१४ पर्यंत ‘मफतलाल’मध्ये मी दररोज सकाळी अर्धा ते पाऊण तास पोहायचो, त्यानंतर अर्धा तास मी टेबलटेनिस खेळायचो. साडेआठ-नऊच्या सुमारास घरी परतल्यावर चहा आणि शिळी पोळी खात असे. आज ठाण्यात आल्यावरही माझा हा दिनक्रम सुरू असतो. त्यातलं पोहणं तेव्हढं डॉक्टरांच्या सांगण्यामुळे बंद झालं. सकाळी पाच वाजता माझा रेडिओ सुरू होतो. एफएम बँडवरच्या कार्यक्रमाच्या तालावर माझा सारा दिनक्रम चालतो. सकाळी पाच वाजता सुरू झालेला रेडिओ दुपारी तीनवाजेतो चालतो. प्रत्येक कार्यक्रमाच्या ठोक्यावर माझी दैनंदिन दिनचर्या सुरू असते.

हे सारं मी घरी असतो तेव्हा. गिरगावात असताना मी सकाळी साडेसात वाजता जेवून बाहेर पडायचो. ही सवय लागल्यामुळे मला नटांना होतात तसे अ‍ॅसिडिटीचे आजार झाले नाहीत. खरं म्हणजे कोकणातील व जीवनातील सातत्यपूर्ण कष्टांमुळे माझ्या शरीराला तगडेपणा लाभून मी आजारी पडलो नाही. आता जेव्हा शूटिंग असतं किंवा नसतं तेव्हाही मी रात्री साडेआठनंतर काहीही खात नाही. मी पूर्णपणे शाकाहारी आहे. जेवणात मला मोजके पदार्थ आवडतात. पालेभाज्या, बेसनाचं किंवा कुळथाचं पिठलं, तुरीच्या डाळीची चिंच गुळाची आमटी (अशी आमटी हे आम्हा नाटकवाल्यांचं लाडकं अन्न आहे) हे अन्नपदार्थ माझी भूक भागवतात. मला कोणतंही व्यसन नव्हतं. चवीनं खावं आणि रसपूर्ण जीवन जगावं एवढंच मी पाळत आलोय. हीच सवय माझ्या मुलांना – सुषमा, सुपर्णा आणि कौस्तुभला आहे.

माझ्या मुलांशी माझं व्यवस्थित जमतं, याचं कारण बहुधा मी त्यांच्या वयाचा होऊन त्यांच्यात रमतो. त्यामुळे त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मला पटकन कळू शकतात. त्यांना आम्ही, म्हणजे मी व उषानं कायमच निर्णयस्वातंत्र्य दिलं आहे. त्यांनी त्यांचे व्यवसाय निवडावेत. जेव्हा कौस्तुभनं माझ्याच व्यवसायात यायचं ठरवलं, तेव्हा मला आनंद झाला. पण एक पथ्य आम्ही दोघंही पाळतो, ते म्हणजे घरात नाटक, चित्रपट आणि मालिका या विषयांवर बोलायचं नाही. आमच्यात काही मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत. आमच्यात जे खटके उडतात, ते साधारण आवराआवरीवरून उडतात. सध्या मी कामं कमी केली आहेत, त्यामुळे मग घरात असलो की आवराआवर सुरू असते. स्वस्थ बसत नाही. त्यावरून चिरंजीवांत आणि माझ्यात मतभेद निर्माण होतात. त्याचं तणतणणं मी एन्जॉय करतो. उषाबरोबर एवढी वर्ष संसार केला, पण आमच्यातही भांडणं होत असतात. ते विषयही मजेदार असतात. मला वांगं किंवा भोपळी मिर्ची अजिबात आवडत नाही. तिला आवडते. एखाद्या दिवशी, ती यापैकी एखादी भाजी करते. मग मी तिच्याशी वाद घालतो, तुला माहितीय ना ही भाजी मला आवडत नाही, मग तू का करतेस? तर ती लगेच उत्तर देते, तुम्हाला नको म्हणून आम्ही खायची नाही का ती भाजी? खायचं तर खा, नाही तर राहू दे! हे खरं म्हणजे भांडण नसतं, या वयातलं प्रेम असतं, बस!

हल्ली मी कामं कमी केली असली तरीही खूप व्यग्र असतो कामात. आत्ता या घडीला माझ्या हातात पाच चित्रपट आहेत, काही दूरचित्रवाणीवरील मालिका आहेत. मी मध्यंतरी काही हिंदी चित्रपटांतही कामं केली. अनेक वर्ष मराठी नाटक, चित्रपट, मालिका करूनही लोक मला ‘सिंघम’मधील आजोबा म्हणून ओळखतात, याची गंमत वाटते, हिंदीचा प्रेक्षकवर्ग केवढा तरी असतो. हिंदीत मी अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या तरुण कलाकारांबरोबर कामं केली, तीही पंचाहत्तरीनंतर!

एका गोष्टीचा आनंद वाटतो, तो म्हणजे माझ्याबरोबर काम करणाऱ्या पूर्वीच्या काही तरुणांवर जुनीच नाटकं करणारे असा शिक्का बसला, पण तो माझ्यावर बसला नाही, याचं कारण बहुधा माझी स्वीकारशील भूमिका. मी आठवणींत रमण्याऐवजी, त्या आठवणींच्या खांद्यावर उभा राहून भविष्याकडे पाहात असतो. सतीश पुळेकरबरोबर मी ‘खोली नंबर ५’ या नाटकात काम केलं. तो मला म्हणाला, ‘‘अण्णा, नवीन पिढीबरोबर काम करत जुळवून घेणारे दोनच कलावंत मी पाहिले. एक म्हणजे चंद्रकांत गोखले आणि दुसरे तुम्ही.’’ मला खूप बरं वाटलं. दामू  कें करे, कमलाकर सारंग, भालचंद्र पेंढारकर या जुन्या दिग्दर्शकांबरोबर कामं केल्यानंतर मंगेश कदम, अद्वैत दादरकर, चंद्रकांत कुलकर्णी, समीर विद्वांस अशा  नव्या पिढीतल्या दिग्दर्शकांबरोबर मी कामं करू शकलो. याचं कारण, ही नवी पिढीच आहे. कालानुरूप बदल झालेला असला तरी, नाटय़शास्त्राचा अभ्यास केलेली ही पिढी माझ्यासारख्या जुन्या नटांकडून योग्य अभिनय काढून घेण्यात कुशल आहे, त्यामुळेच मी आज रंगभूमीवर टिकून आहे. ते श्रेय त्यांचं आहे.

जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन करण्याची एक पद्धत अलीकडे सुरू झाली आहे. त्या प्रयोगांत काम करतानाही मला मजा वाटत आली आहे. सुनील बर्वेनं ‘लहानपण देगा देवा’, ‘सूर्याची पिल्लं’ केलं. त्यात काम करताना विलक्षण आनंद वाटला. अनेक वर्ष काम केल्यानंतर त्या भूमिकांचा नवा विचार आपल्याला अभिनयाच्या माध्यमांतून साकारायची संधी मिळणं हे महत्त्वाचं असतं. ती संधी मला मिळाली. ‘जावई माझा भला’ या अद्वैत दादरकरबरोबर केलेल्या नाटकात माझा व अद्वैतचा एक छोटासा प्रवेश होता- अगदी दोन वाक्ये होती आणि पुढचा अख्खा प्रवेश अ‍ॅक्शन आणि रिअ‍ॅक्शन यांच्यावर होता. त्या तेवढय़ाशा प्रवेशाला प्रेक्षक अलोट प्रतिसाद देत. आमच्या या जुळलेल्या टय़ुनिंगबद्दल अद्वैतने विचारल्यावर मी त्याला म्हणालो, ‘‘अरे मी मधमाशीसारखा आहे. ती माझा आदर्श आहे. त्यामुळे समोरच्या माणसाच्या वयाचा विचार न करता त्याला येणारी प्रत्येक चांगली गोष्ट मलाही करता यावी असं मला वाटतं, त्यामुळेच कदाचित आपला हा खेळ रंगत असेल.’’

दोन-तीन वर्षांपूर्वी मला मंगेश कदमनं ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकात काम करायला बोलावलं. मला ते झेपणार नाही, असं वाटलं. पण, मंगेश म्हणाला, जेव्हा आम्ही या नाटकाचं वाचन केलं तेव्हाच लेखक शेखर ढवळीकरने सांगितलं की हे काम जयंत सावरकरच करतील, इतर कुणीही नाही. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगानंतर पुढचा प्रयोग अधिक चांगला कसा करता येईल याची आम्ही चर्चा करायचो. आजही मी नाटकात उत्साहानं काम करत असतो. ‘ओ वुमनिया’ हे नाटक मी एक्याऐंशी वर्षांचा झालो, तेव्हा माझ्याकडे आलं. मी काम करतोच आहे आणि त्यात आनंद घेतो आहे. कारण या कामावर माझं प्रेम आहे.

केवळ वयाचा आधार घेऊन मला आजकालच्या माझ्या तरुण मित्रांना एक गोष्ट सांगायची आहे, ‘यश ही अशी गोष्ट आहे की त्याच्या मागे धावलात की ते दूर पळतं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून निष्ठेनं आपलं काम केलं तर ते न सांगता आपल्या मागे येतं. तुम्ही शांतपणे प्रयत्न करत राहा. कधी ना कधी ते तुमच्यामागे उभं ठाकेल. नाही तर ‘साहित्य संघ’च्या दरवाजावर उभं राहून तिकिटं गोळा करणारा जयंत सावरकरसारखा छोटा माणूस आज त्याच ‘साहित्य संघ’चा उपाध्यक्ष कसा झाला असता? त्याला जीवनगौरव पुरस्कार कसा मिळाला असता? त्याला अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचा अध्यक्ष कसं होता आलं असतं?’ वयाचा असलेला अधिकार वापरून एवढंच सांगतो, ‘रंगभूमीची निरलस सेवा करा, ती तुमची काळजी घेईल.’

शुभं भवतु!

शब्दांकन – नितीन आरेकर

nitinarekar@gmail.com

chaturang@expressindia.com