सरिता आवाड

दीनानाथ आणि मीरा, समाजकार्याला झोकू न दिलेले दोन  कार्यकर्ते.. दोघांच्याही कामांमध्ये तणाव निर्माण झाला.. विचित्र अस्वस्थ पोकळी दोघांनाही वेढून राहिली होती.. त्याच दरम्यान संवादी  विचारधारेतून ते एकत्र आले.. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं.. आणि गेली ३० वर्ष ते  एकमेकांच्या सानिध्यात वाढत राहिले.. एकमेकांना वाढवत राहिले.. खूप काही घडवत राहिले.. आज दीनानाथ ८० वर्षांंचे, तर मीरा ७५ च्या आहेत. पण जगण्याची आणि समाजकार्याला झोकू न देण्याची ऊर्मी तीच आहे.  एकमेकांना पूरक ठरलेल्या त्यांच्या  ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा हा पूर्वार्ध.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल

या सदराच्या निमित्तानं अनेक नाती समजून घेत असताना माझं मलाच वाटलं की खरंच किती घाबरत घाबरत जगतो आपण. कुणाशी मनमोकळं बोलावं तर भीती, कुणाचा हात हातात घ्यावा तर भीती, मैत्री करावी तर भीती, नकोश्या नात्यातून बाहेर पडायची भीती, हव्याशा नात्यात सूर मारण्याची भीती.. ‘लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाचा दैत्य एकसारखा समोर उभा ठाकतो. कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात तसं, ‘दैत्यांचे या भय.. भय देवांचेही; भय याचि देही याचि डोळा’, अशी भयरूप उदासवाणी परिस्थिती अवतीभवती दिसत असताना मी असं व्यक्तिमत्त्व जवळून बघितलं, ज्याच्या बाबतीत भीती ही भावनाच भिऊन कुठेतरी सांदीकोपऱ्यात दडून बसली असावी. किंबहुना त्याच्या उसळत्या आंतरिक ऊर्जेमुळे विस्मयचकित होऊन गप्पगार झाली असावी. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे दीनानाथ मनोहर.

लेखक आणि कार्यकर्ता या दोन्ही भूमिका समर्थपणे पेलणारं दीनानाथ हे वेगळंच रसायन आहे. अगदी नजर भिडवुनी नजरेमध्ये आयुष्याला उत्तर देणारं! त्यांचं अठराव्या वर्षी घर सोडणं, सैन्यात जाणं, बाबा आमटे यांच्या श्रमिक विद्यापीठात झोकून देणं, शहाद्याच्या श्रमिक संघटनेत जाऊन आदिवासींसाठी झुंजार लढा देणं, ‘रोबो’सारखी परात्मभावाचा साक्षात अनुभव देणारी मराठी साहित्यातली महत्त्वाची कादंबरी लिहिणं, या सगळ्यांवर भरभरून लिहायची मला मनस्वी इच्छा होतेय.. पण आता माझ्या ‘लेन्सेस’चा ‘फोकस’ आहे त्यांच्या सहजीवनावर.

हा तीन दशकांचा विस्तृत कालखंड आहे. या कालखंडातली त्याची सहनिवासिनी आहे

मेरी डॅकिन अर्थात मीरा सद्गोपाल. त्यांचीही पार्श्वभूमी आगळीवेगळी आहे. त्यांचा जन्म आणि बालपण कॅलिफोर्नियामध्ये गेलं. साठच्या दशकात अमेरिकेतली तरुणाई अतिशय अस्वस्थ होती. व्हिएतनामचा रणसंहार, अमेरिकेची युद्धखोरी तिथल्या तरुणांना संतप्त करत होती. अशा वातावरणात काही ध्येयवादी तरुणांनी आशिया खंडातल्या विकसनशील देशांशी स्वत:ला जोडून घेण्याचा निर्णय घेतला.

मेरी डॅकिन ही अशीच एक १७-१८ वर्षांची तरुणी. १९६८ मध्ये ती भारतात आली आणि भारतीयच झाली. १९७७ मध्ये तिनं रीतसर भारतीय नागरिकत्व स्वीकारलं. मध्य प्रदेशात शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनिल सद्गोपाल यांच्याशी तिनं विवाह केला आणि  ती मेरी डॅकिनची मीरा सद्गोपाल झाली. मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर खासगी व्यवसाय न करता आजतागायत ती आरोग्यविषयक समाजकार्य करत आली आहे. ‘अशोका फाऊंडेशन’, ‘मेडिको फ्रें ड सर्कल’अशा संघटनांमध्ये ती क्रियाशील आहे. सध्या भारतातील चार राज्यांत वेगवेगळ्या ग्रामीण क्षेत्रात परंपरागत आरोग्य व्यवस्थेत असलेली ‘सुईणीची भूमिका’ या विषयावर संशोधन करणाऱ्या प्रकल्पाची ती प्रमुख संशोधक आहे. निराळ्या क्षेत्रात, निराळ्या ठिकाणी काम करणाऱ्या दीनानाथ आणि मीराची पहिली भेट १९७७ मध्ये झाली.

आणीबाणी नुकतीच उठली होती. मीरा तेव्हा बनखेडी, जिल्हा होशंगाबाद, मध्य प्रदेश या ग्रामीण क्षेत्रात ‘किशोर भारती’ या संस्थेचं काम करत होत्या. आणीबाणीनंतरच्या आव्हानात्मक परिस्थितीला कसं सामोरं जायचं, याबद्दल विचारविनिमय करण्यासाठी काही मोजक्या कार्यकर्त्यांची बैठक बनखेडीला आयोजित केली होती. या बैठकीत शहाद्याच्या श्रमिक संघटनेतर्फे दीनानाथ सहभागी झाला होता. तेव्हा या दोघांची जुजबी भेट झाली होती. या बैठकीत काय चर्चा झाली होती हे मीरा आता विसरल्या असल्या तरी त्यावेळच्या दीनानाथ यांच्या पायांच्या अस्वस्थ हालचालींची त्यांच्या मनानं घेतलेली नोंद त्यांच्या लक्षात आहे. या भेटीनंतर पाच वर्षांनी होशंगाबाद सायन्स टीचिंग प्रोग्रॅमतर्फे उन्हाळ्यात आयोजित केलेल्या शिबिरात ते पुन्हा भेटले. मधल्या काळात दीनानाथ श्रमिक संघटनेपासून दूर झाले होते. त्यांच्या आयुष्यात अचानक पोकळी निर्माण झाली होती. या शिबिरात दीनानाथ आणि मीराच्या नात्याचं बी रुजलं. त्यानंतर सात-आठ वर्ष ते क्वचितच भेटत होते, आठ-पंधरा दिवसांच्या अंतरानं पत्रापत्री होत होती. पत्रव्यवहारामुळे दोघांची चांगली ओळख झाली. पण दरवर्षी काही काळ मीराला औदासीन्य ग्रासून टाकत असे, याबद्दलही दीनानाथना माहिती झाली होती. मीराच्या मनात दीनानाथबद्दल प्रेमभावना रुजली होती, पण दीनानाथच्या मनाचा त्यांना अंदाज येत नव्हता. तशातच त्या काम करत असलेल्या बनखेडीत तीव्र मतभेद झाले. कार्यकर्त्यांमधे फूट पडली. तेव्हा मीरा यांना येणाऱ्या मानसिक औदासीन्यानं गंभीर रूप घेतलं. त्यांनी आत्महत्येचा (तिसरा) प्रयत्न केला. सहकाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे त्या वाचल्या. अशा नाजूक क्षणी दीनानाथ त्यांना भेटले. त्यानंतर मीराची मोठी बहीण सुसाना त्यांना कॅलिफोर्नियाला घेऊन गेली. तिथे दीर्घकाळ उपचार घेऊन त्या या औदासीन्यातून बाहेर पडल्या. १९६८ पासून भारतात असलेल्या वास्तव्यामुळे, केलेल्या कामामुळे आणि दीनानाथमुळे पुन्हा भारताची ओढ वाटायला लागली. १९९० च्या अखेरीला त्या भारतात परतल्या. परस्पर संमतीनं त्यांनी अनिलपासून घटस्फोट घेतला. जवळच्या मित्रमैत्रिणींमुळे पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

१९९१ ला मीरा आणि दीनानाथच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला सुरुवात झाली. छाया आणि अशोक दातार या समविचारी दांपत्याच्या मदतीनं त्यांनी पुण्यात सदाशिव पेठेत घर थाटलं. एव्हाना दीनानाथ यांनी पन्नाशी गाठली होती. मीराही ४५ वर्षांच्या होत्या.  या सहजीवनाच्या मुळाशी परस्परात रुजलेला प्रेमभाव तर होताच, पण त्या जोडीला दोघांची विचारधाराही संवादी होती. पुढच्या कामाच्या दिशा दोघांच्याही मनात स्पष्ट होत्या. त्या काळाचा विचार करता दोघांच्याही बाबतीत आतापर्यंत करत असलेल्या कामांमध्ये तणाव निर्माण झाले होते. दोघेही अस्वस्थ पोकळी अनुभवत होते. या सहजीवनातून मिळालेल्या ऊर्जेतून त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. मीरांना वैद्यकीय क्षेत्रातलं सामाजिक काम आपलं वाटत होतं. तेव्हा ‘तथापि’ या आरोग्यविषयक काम करणाऱ्या संस्थेच्या स्थापनेत त्या मग्न झाल्या.

अमेरिकेहून येताना मीराच्या भावानं त्यांना संगणक  दिला होता. १९९१ च्या सुमाराला संगणक जरी भारतात आला असला तरी त्याचा वैयक्तिक वापर मर्यादित होता. लेखनासाठी लेखणी हेच मुख्य साधन होतं. तेव्हा लेखनासाठी संगणक वापरण्यास दीनानाथ यांनी सुरुवात केली. हा वापर करायला त्यांचे तेच अनेक प्रयोग करत करत शिकले. सैन्यात असताना वायरलेस ऑपरेटरचं काम त्यांनी केलं होतं. त्या अनुभवाचाही उपयोग झाला असावा. ‘भलरी’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’ यांच्या दिवाळी अंकांची निर्मिती त्यांनी केली. त्या वेळी  ‘भारत ज्ञान विज्ञान समिती’ या संघटनेनं ‘जनवाचन’ नावाचा अभिनव उपक्रम सुरू केला. नवसाक्षर, मुलंमुली, अल्पशिक्षित स्त्रिया, यांच्यामध्ये वाचनसंस्कृती रुजावी म्हणून १६ ते २४ पानांची, चित्रांसह सोप्या भाषेतली, मोठय़ा टाईपातली पुस्तकं फक्त अडीच रुपयांत देण्याची ही योजना होती. या योजनेप्रमाणे प्रत्यक्ष पुस्तक निर्मिती करण्याचं काम- पुस्तकं लिहिण्यापासून अक्षरजुळणी, मुखपृष्ठ, मांडणी अशी अनेक कामं दीनानाथ यांनी अतिशय निरलसपणे केली. आर्थिक लाभापेक्षा कामाचा आनंद आणि चळवळीला मदत हे त्यांच्या व्यवहाराचं मुख्य सूत्र होतं. पुण्यात मध्यवर्ती घर असल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा राबता असायचा. मीरा त्यांच्या कामामुळे बराच काळ घराबाहेर असायच्या. त्यामुळे घरात आल्यागेल्यांची ऊठबस, घरातली कामं दीनानाथ करत असत. थोडक्यात ते गृहकृत्यदक्ष कार्यकर्ता झाले.

तशातच १९९४ उजाडलं आणि मीरा-दीनानाथच्या आयुष्याला सुनीता नावाचं तिसरं परिमाण मिळालं. सुनीता लातूरजवळच्या खेडय़ातली शेतकरी कुटुंबातली १३ वर्षांची मुलगी. किल्लारीच्या भूकंपात उद्ध्वस्त झालेली.  ‘मानवी हक्क संघटने’च्या कार्यकर्त्यांनी तिला मीरा आणि दीनानाथकडे आणलं. काठपदराची साडी अन् डोक्यावरून पदर घेतलेल्या सुनीताला सगळंच नवीन होतं. टेबलावर बसून नाश्ता करणंही तिच्यासाठी अप्रूप होतं. तिथल्या आश्वस्त वातावरणात तिला खुर्चीत बसल्याबसल्या झोप लागली. दीनानाथनं तिच्या अंगावर हळूच चादर टाकली, त्यामुळे दचकून ती जागी झाली. त्यावर ‘‘घाबरू नकोस शेजारच्या खोलीत झोप,’’ या दीनानाथांच्या मुलायम शब्दांनी या नात्याची सुरुवात झाली. सुनीता निरक्षर होती. दीनानाथ यांनी संगणकाच्या मदतीनं तिला अक्षर ओळख करून दिली, जोडाक्षरं शिकवली. क-ख-ग लिहिण्यासाठी डायरी, रंगीत पेन दिले. सुरुवातीला ‘मिळून साऱ्याजणी’च्या शेल्टर होममध्ये ती राहात होती. दीनानाथची ओळख ती काका म्हणून द्यायची. थोडय़ाच काळात दीनानाथ तिचा बाबा झाला आणि मीरा तिची आई. सुनीताचा जणू पुनर्जन्म झाला. ती लिहायला-वाचायला शिकली. पुस्तकं आवडीनं वाचायला लागली. सुनीता हे प्रचंड ऊर्जा असलेलं, एखाद्या शिंगरासारखं बंडखोर आणि धुडगूस घालणारं व्यक्तिमत्त्व होतं. ‘अशोका फाऊंडेशन’, ‘तथापि’ अशा संस्थांच्या कामामुळे मीरा बराच काळ बाहेर असायच्या. शिवाय सुनीताचं ग्रामीण वळणाचं मराठी मीरांना समजायला वेळ लागायचा. कधी कधी औदासीन्य मीराला ग्रासून टाकायचं. त्यामुळे गोंधळलेल्या सुनीताला दीनानाथचा आधार वाटायचा. या आधारानं सुनीता बहरली. ट्रेकिंग, सायकल चालवणं, नाटकात काम करणं, असे अनेक उद्योग तिनं केले. शालेय शिक्षण पूर्ण करून पदवीधर झाली. आता ‘आय टी ’ क्षेत्रातल्या किरणशी तिचा विवाह झाला असून त्याच्याबरोबर ती सिंगापूरला असते.

पण ही सगळी पुढची प्रगती. सुनीताचं मोठं होणं आनंददायक असलं तरी आव्हानात्मकही होतं. बाहेरच्या जगाशी जुळवून घेणं, ही सुनीतासाठी मुळीच सोपी गोष्ट नव्हती. त्यातल्या अनेक चढउतारात आई-बाबा या नात्यानं दीनानाथची आणि मीराची भावनिक गुंतवणूक होती. या सगळ्याचा ताण दोघांवर आला. पुण्याच्या घरात अनेक कार्यकर्त्यांची असलेली वर्दळ, त्यांची ऊठबस, घरात येणाऱ्या पोस्टमनसकट अनेकांची काळजी घेणं, सुनीताच्या वाढीतल्या समस्या सोडवणं अशा अनेक गोष्टींमुळे दीनानाथ दडपून गेले. सुनीताला वाढवताना तिला समजून घेणं, तिच्याशी संवाद करणं मीरांना श्रेयस्कर वाटायचं, तर संवादाच्या जोडीला शिस्तही दीनानाथना आवश्यक वाटत होती. अशा अनेक प्रश्नांच्या गदारोळात त्यांच्यातल्या निर्मितीक्षम लेखकाचा कोंडमारा व्हायला लागला आणि एका क्षणी दीनानाथ यांनी पुण्याला रामराम ठोकला. जुनी कर्मभूमी म्हणजे नंदुरबारला परतले. मनस्वी दीनानाथ नंदुरबारला परतले आणि त्यांची लेखणी जिवंत झाली. मीरा आणि दीनानाथ यांच्या सहजीवनातलं हे महत्त्वाचं वळण होतं. त्यांच्या  या आव्हानात्मक काळातल्या प्रवासाविषयी पुढच्या, १३ मार्चच्या लेखात जाणून घेऊ.

sarita.awad1@gmail.com