सरिता आवाड sarita.awad1@gmail.com
मिलिंद आणि अंजली यांच्या सहजीवनाची ही गोष्ट, पण काहीशी वेगळी. त्यांचं नातं नुकतंच सुरू झालं असलं, तरी या उभयतांच्या मुलींनी त्यांचा एकाकीपणा जाणून घेऊन त्यांना दिलेला भक्कम पाठिंबा हे या नात्याचं वैशिष्टय़. मात्र खरी परीक्षा आहे ती या पाठिंब्याला पात्र ठरण्याची.  त्यासाठी ‘मीपण’ सोडावं लागणार आहे, हे दोघांना मनोमन पटलं आहे. विंदांच्या भाषेत, ‘माणसाला शोभणारे युद्ध’ एकच- स्वत:ला जिंकणे. ही शहाणीवच त्यांचं नातं टिकवणार आहे..

पुण्याच्या ‘हॅपी सीनियर्स’चा मेळावा नुकताच १५ जुलैला  झाला. करोनाच्या संकटामुळे हा मेळावा पन्नासच लोकांचा होता. नियमांचा जाच न मानता ते पाळून लोक एकत्र जमले होते. निमित्त होतं, संस्थेच्या माध्यमातून परिचय झालेल्या मिलिंद बेंबळकर आणि अंजली कुलकर्णी या जोडप्याच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची- सहनिवासाची सुरुवात झाल्याचं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि अभिष्टचिंतन करायला संस्थेचे प्रमुख, कार्यकर्ते आणि सदस्य एकत्र आले होते. कोण आहेत हे दोघं, त्यांची कशी ओळख झाली, हा निर्णय त्यांनी कसा घेतला, या प्रश्नांची उत्तरं शोधायला सारेच जण उत्सुक होते.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!

‘हॅपी सीनिअर्स’ संस्थेचे संचालक माधव दामले यांनी संस्थेची थोडक्यात माहिती सांगितली.  एकाकी स्त्री-पुरुषांना एकत्र आणण्यासाठी जून २०१२ मध्ये ‘जेष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप’ मंडळाची स्थापना झाली आणि आजपर्यंत ४० जोडय़ा या मंडळातून जमल्या आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी नवीन जोडीचं- मिलिंद बेंबळकर आणि अंजली कुलकर्णी यांचं पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आलं. दोघांनी थोडक्यात आपलं मनोगतही व्यक्त के लं.  मुख्य कार्यक्रमानंतर भरपूर गप्पा मारता आल्या. काही दिवसांनी मी त्यांच्या घरीही जाऊन आले. ‘तुम्ही अंजलीताईंबरोबर सहजीवन सुरू करण्याचा निर्णय का आणि कसा घेतला’ या माझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून एक सविस्तर टिपण मिलिंद यांनी मला मेलवर पाठवलं. या सगळ्या सामुग्रीच्या आधारावर मी या उभयतांचा परिचय आपल्याला करून देत आहे.

नुकतीच साठी ओलांडलेले मिलिंद हे मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. लातूर या त्यांच्या जन्मगावी ते आणि त्यांचे बंधू मिळून एक कारखाना चालवत होते. साखर कारखान्यांच्या यंत्रणेची दुरुस्ती, तसंच जलसिंचन प्रकल्पांसाठी सरकारला तांत्रिक साहाय्य करणं असं त्यांचं काम होतं. मिलिंद यांचं लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव विद्या. विदुला आणि निशिजा या त्यांच्या दोन मुली. २०१७ मध्ये लातूरमध्ये पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष झालं. त्याला कंटाळून त्यांनी कारखाना बंद केला. शिवाय त्याच वेळी विद्याताईंना कर्क रोग झाला. त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी त्यांनी पुण्यात स्थलांतर केलं. मोठी लेक विदुलाही लग्नानंतर पुण्यात स्थायिक झाली होती. पुण्यात आल्यावर वैद्यकीय उपचारांनंतरही ऑक्टोबर २०१९ मध्ये विद्याताईंचं निधन झालं. एका वर्षांनं धाकटय़ा निशिजाचं लग्न झालं आणि तीन महिन्यांनी ती आपल्या पतीबरोबर बोस्टनला रवाना झाली.

मिलिंद यांच्या सर्व सांसारिक जबाबदाऱ्या पार पडल्या. आता मात्र त्यांना विलक्षण रितेपण जाणवायला लागलं. सकाळी नऊपर्यंत स्वयंपाक करणाऱ्या मावशी आणि घराची स्वच्छता करणाऱ्या बाई येऊन गेल्यावर दिवसभर कोणी बोलायलासुद्धा नाही. उगाच नातेवाईकांकडे जाणं रुचेना. विदुलाला तिचं काम, संसार होता. आता आयुष्यभर एकटं राहायचं, या कल्पनेनं त्यांचं मन बावरून गेलं. रात्री बाहेरून घरी यायची, एकटं राहायची भीती वाटायला लागली. झोप उडाली. प्रकृतीवर परिणाम व्हायला लागला. याच काळात उत्तरायणातील सहजीवनाबद्दलचे लेख त्यांच्या वाचनात आले आणि आपणही जोडीदाराचा शोध घ्यावा असा विचार मनात आला. ‘गूगल’वर त्यांना माधव दामले यांच्या ‘हॅपी सीनियर्स’ची माहिती मिळाली. तिथे जाऊन नाव नोंदवणं अजिबात सोपं नव्हतं. मुली काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, त्यांच्या प्रतिक्रियांना कसं तोंड द्यायचं, अशा विचारांनी मन अवघडलं होतं. तरीही हिय्या करून त्यांनी नाव नोंदवलं. तिथेच त्यांची भेट अंजली कुलकर्णीशी झाली.

अंजली यांची कथाही याहून फारशी वेगळी नव्हती. अंजली मूळच्या नांदेडच्या. औरंगाबादहून त्यांनी ‘एम.एस्सी.’ केलं. तिथे शिकत असतानाच त्यांचं विश्वास कुलकर्णी या अभियंत्याशी लग्न झालं. लग्नानंतर विश्वास कानपूर ‘आय.आय.टी.’मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विश्वास आणि अंजली यांचा संसार कानपूर आय.आय.टी.च्या कॅम्पसमध्ये सुरू झाला. विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अंजली यांना आय.आय. टी.तच संशोधन अधिकाऱ्याचं काम मिळालं. या कामात त्यांना रुची निर्माण झाली. सई आणि अपूर्वा या त्यांच्या दोन मुली. असा सुरळीत संसार सुरू असताना विश्वासना कर्क रोग झाला आणि २०१० मध्ये त्यांचं निधन झालं. मात्र जगाचा निरोप घेण्यापूर्वी आपल्या पत्नीनं पुनर्विवाह करावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. काळ पुढे जात होता. अंजली यांची मोठी मुलगी सई लग्नानंतर कुवेतला स्थायिक झाली. तिला एक मुलगी झाली. धाकटी मुलगी अपूर्वा हिचंदेखील लग्न  झालं आणि ती पतीबरोबर अ‍ॅमस्टरडॅमला गेली.  दोघी मुली आपापल्या संसाराला लागल्यावर अंजली यांना रितेपण जाणवायला लागलं. बरेचसे नातेवाईक पुण्यात असल्यानं त्या पुण्यात आल्या होत्या. तेव्हाच करोनाची दुसरी लाट आल्यानं त्या पुण्यातच अडकल्या. नेमकी मोठी मुलगी सईसुद्धा तेव्हा पुण्यात होती आणि तिलाही करोनाच्या कारणांमुळे कुवेतला जाता येत नव्हतं. अपूर्वाच्या परदेशी जाण्यानं आई खूप अस्वस्थ झाली आहे, तिला पोकळी जाणवायला लागली आहे, हे सईनं ओळखलं. तिनंच पुढाकार घेऊन नेटवर ‘ हॅपी सीनियर्स’ संस्था शोधली आणि आईचं नाव तिथे नोंदवलं. या संस्थेमुळे मिलिंद आणि अंजली यांची भेट घडून आली.

फोनवर मिलिंद यांनी अंजलींशी संपर्क साधला. फोनवर काही वेळा बोलणं झाल्यावर प्रत्यक्ष भेटायचं ठरलं. त्याप्रमाणे मिलिंद अंजली यांच्या घरी जाऊन त्यांना भेटले. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तिथेच असलेली सईसुद्धा घरी भेटली. सविस्तर बोलणं झाल्यावर दोघींना मिलिंद यांनी आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. त्याप्रमाणे दोघी त्यांच्याकडे जाऊन आल्या. मिलिंद यांनी आपली मुलगी विदुला आणि पुतणी मनीषा यांनाही घरी बोलावलं होतं. सई आणि विदुला या दोघींनी- म्हणजे अंजली आणि मिलिंद यांच्या लेकींनी या उभयतांची प्रदीर्घ मुलाखत घेतली आणि शेवटी जाहीर केलं की ‘आमचं सर्वाचं छान जमेल.’ शेवटी त्यांनी एक बहुमोल सल्लाही दिला. तो म्हणजे ‘आता तुम्ही नवरा-बायकोसारखे न वागता मित्र-मैत्रिणीसारखे राहा. तर तुमचं सहजीवन आनंददायी होईल.’ हा सल्ला मिलिंद आणि अंजली यांना पटला. ‘बालादपि सुभाषितं ग्राम्’ म्हणतात ते काही खोटं नाही!

आपल्या समाजात नातेसंबंध फक्त दोघांपुरते नसतात. त्यांना कुटुंबांतर्गत मान्यता लागते, याची मिलिंद आणि अंजली यांना जाणीव होती. त्यांनी दोघांनी आपले नातेवाईक, जवळचे स्नेही, यांचा परिचय एकमेकांना करून दिला. त्यात मिलिंद यांचे बंधू होते. तसंच त्यांचे लातूरचे सख्खे शेजारीसुद्धा होते. त्या सर्वानी या नव्या नात्याला सहर्ष मान्यता दिली. विशेष म्हणजे अंजली यांच्या आईनंसुद्धा या नात्याला दुजोरा  दिला. काळाबरोबर विचार बदलण्याची आईंची तयारी नि:संशय कौतुकास्पद होती.

अशा रीतीनं सर्व बाजूंनी विचार करून मिलिंद आणि अंजली आता मिलिंद यांच्या घरी राहात आहेत. या निर्णयाला येण्याअगोदर मिलिंद यांनी इथले वृद्धाश्रम पाहिले होते. पण तिथलं वातावरण खूपच उदास वाटलं होतं. ज्याप्रमाणे हॉटेल्स, रुग्णालयं, यांना मानांकन असतं, त्याचप्रमाणे वृद्धाश्रमांनाही मानांकन मिळावं, असं त्यांना वाटतं. तिथल्या सोयींची सरकारतर्फे  तपासणी व्हायला हवी असंही त्यांना वाटतं. एकाकी राहाण्याचे निरनिराळे मार्ग चाचपडून पाहिल्यावर विचारपूर्वक ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा पर्याय त्यांनी स्वीकारला आहे. अंजली यांची नोकरी अजून तीन वर्ष शिल्लक आहे. लवकरच त्यांना कानपूरला रुजू व्हावं लागेल. तेव्हा मिलिंदजी आनंदानं त्यांच्यासोबत कानपूरला जाणार आहेत. (‘लिव्ह इन..’ नात्यात कोणी कुणाकडे राहावं हा म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर अवघड मुद्दा ठरू शकतो.) आर्थिक अवलंबित्व नात्यात मुळीच नसावं, याबद्दल त्यांचं पूर्ण एकमत आहे. मुलांना संपत्ती वाटपासंबंधी विश्वासात घेणं, त्यासंबंधी वकिलांच्या सल्ल्यानं व्यवस्थापत्रक करणं, उपनिबंधक कार्यालयात त्याची नोंदणी करणं त्यांना आवश्यक वाटतं. त्याचप्रमाणे वैद्यकीय उपचार आणि अवयवदानासंबंधीचं इच्छापत्र करण्याची त्यांची इच्छा आहे. लिव्ह-इन रिलेशनशिप सुरू करण्यापूर्वी दोघांनी आपापली वैद्यकीय तपासणीही करून घेतली होती.

या दोघांशी बोलताना मिलिंद यांची संतुलित विचार करण्याची पद्धत मला भावली. त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं, की त्यांच्या आणि अंजली यांच्या स्वभावात, विचारांत अंतर आहे. मिलिंदजी कामाच्या बाबतीत काटेकोर व वेळ पाळण्याच्या बाबतीत अगदी पक्के . ‘लवकर निजे लवकर उठे’ या पठडीतले. तर अंजलीजी रात्री उशिरापर्यंत लेखन-वाचन करणाऱ्या. हे सगळे भेद एका पारडय़ात, तर दुसऱ्या पारडय़ात दोघांच्या समजूतदारपणाचं सज्जड वजन आहे. दोघांनी एकलेपणा अनुभवला आहे. म्हणून बौद्धिक साहचर्य देणारं सहजीवन त्यांना अनमोल वाटतं. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील नात्याबद्दलचा त्यांचा निर्णय ठाम आहे. हा निर्णय यशस्वी करण्याचा जुनून दोघांवर स्वार झाला आहे! सहजीवन सुरू करण्यापेक्षा ते सघन आणि समृद्ध करणं त्यांना आव्हानात्मक वाटतं. यासाठी परस्पर स्वीकाराची पातळी सतत उंचावत न्यायची गरज असते. हे साध्य करण्यासाठी ‘मीपण’ सोडावं लागतं हे दोघांना मनोमन पटलं आहे.

या सदरात आतापर्यंत आलेल्या लेखांमधली नाती बरीच वर्ष टिकली होती. पण या उदाहरणातलं नातं मात्र नवं आहे. तरीही नात्याच्या जडणघडणीची सुरुवातीची प्रक्रिया यात नेमकेपणानं लक्षात येते. म्हणून हे उदाहरण मला महत्त्वाचं वाटतं.  मिलिंदजींनी मला लिहून दिलेल्या टिपणाचा शेवट त्यांच्या स्वभावातली शहाणीव दर्शवतो. तो जसाच्या तसा उधृत करावासा वाटतो. ते म्हणतात, ‘पहिल्याच भेटीत अंजली यांनी मला प्रश्न विचारला होता, की तुमचं आणि माझं जमेल असं तुम्हाला का वाटतं? मी उत्तर दिलं, विद्याबरोबरच्या तेहतीस वर्षांच्या वैवाहिक जीवनातून मी जे शिकलो, त्यापेक्षा अधिक तिच्या मृत्यूनंतरच्या दीड वर्षांत शिकलो. आता माझ्यातील मीपण पूर्णपणे विसर्जित झालं आहे.’

पत्रातल्या ताज्या कलमासारखी विंदा करंदीकरांच्या कवितेतील दोन ओळींची आठवण करून देते- ‘माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वत:ला जिंकणे एवढे लक्षात ठेवा.’