हैदराबादमध्ये जेठीबेन यांनी ‘सायमन गो बॅक’ म्हणत स्वातंत्र्यसंग्रामात पहिली उडी घेतली. तिथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहातही जेठीबेननी कराचीत सत्याग्रह केला. १९४२ ला ‘चले जाव’च्या आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांना अटक होऊन कराचीच्या तुरुंगात रवानगी झाली. मात्र स्वातंत्र्य मिळायच्या आधीच त्या भारतात स्थायिक झाल्या. फाळणीनंतर विस्थापितांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केले. मोरारजीभाई देसाई यांनी ज्यांचा ‘आदरणीय महिला सेनानी’ असा सार्थ गौरव केला त्या जेठीबेन सिपाहीमलानी यांच्याविषयी….‘मुं बई’चे ‘मणिभवन’ हे स्वातंत्र्यसैनिकांचे तीर्थक्षेत्र आहे. महात्मा गांधी मुंबईत आले की त्यांचे वास्तव्य या वास्तूत असे. पद्मभूषण कै. उषा मेहता हयात असता दिवसभर स्वातंत्र्यसैनिकांचा राबता त्यांची भेट घेण्यासाठी असायचा. अशा भेट घेणाऱ्यांपैकी नेहमी येणाऱ्या व उषाबेनशी प्रेमाचे नाते जपणाऱ्या एक स्वातंत्र्यसैनिक म्हणजे ‘जेठीबेन’ सिपाहीमलानी.
माझी व जेठीबेन यांची ओळख उषाबेननी ‘मणिभवन’मध्येच करून दिली. बऱ्यापैकी उंच, शिडशिडीत व तरुणपणातील सौंदर्याची साक्ष देणारा चेहरा, गोरा रंग, खादीची सफेद साडी, मनगटापर्यंत लांब हात असलेला व लहानशी कॉलर असलेला, साडीत पूर्णपणे खोचलेला पोलका घातलेल्या या बाईची समोरच्या व्यक्तीवर झटकन छाप पडे. जेठीबेन गांधीजींचे दर्शन घेण्याकरिता वारंवार ‘मणिभवन’ला भेट देत व उषाबेनशी गप्पा मारून जात. प्रसंगाप्रसंगाने जेठीबेनची माहिती उषाबेनकडूनच कळत गेली.
हिंदुस्थानची फाळणी झाली व सिंध पंजाबमधून मुंबईत लोंढे आले माणसांचे. त्यातलेच एक सिपाहीमलानी कुटुंब. पण जरा आधी आलेले. सिंध प्रांतातल्या हैदराबादचे. जेठीबेनचा जन्म विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात झाला. शालेय व कॉलेजचे शिक्षण हैदराबादेतच झाले. १९२५ साली त्या मॅट्रिक झाल्या व हैदराबादच्याच कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या मुली त्या वेळी कॉलेजमध्ये जात. खाली मानेने त्या जात-येत. जेठीबेनसारखा आपला वेगळा ठसा उमटविणारी मुलगी त्या काळच्या समाजाच्या दृष्टीने अगदीच अनोखी होती. कॉलेजमध्ये शिकत असताना त्या गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, जयरामदास दौलतराव, आचार्य कृपलानी, जमशेटजी मेहता, सिंध प्रांताचे आमदार गिडवानी इत्यादी काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आल्या व या श्रीमंत घरातील मुलीच्या जीवनाला एक नवीच दिशा मिळाली.
१९२२ मध्ये ब्रिटिश शासनाने ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’ कायद्यात सुधारणा का व कोणत्या कराव्यात हे पाहण्याकरिता सर जॉन सायमन व सहा ब्रिटिश सांसदांचे एक कमिशन नेमले. हिंदुस्थानच्या इतिहासात ते ‘सायमन कमिशन’ नावाने प्रसिद्ध आहे. हा कायदा हिंदुस्थानच्या राज्य कारभारासाठी होणार असल्यामुळे त्यात एकही हिंदी माणूस नसणे हा देशाचा अपमान होता. या सायमन कमिशनवर बहिष्काराची निदर्शने भारतभर झाली. त्याला काळे झेंडे दाखवून ‘सायमन गो बॅक’ अशा घोषणा देशभर दिल्या गेल्या. विद्यार्थ्यांनी सायमन कमिशनवर सर्वत्र जोरदार निदर्शने केली. हैदराबादमध्ये जेठीबेननी अशा विद्यार्थ्यांना नेतृत्व देऊन स्वातंत्र्यसंग्रामात पहिली उडी घेतली. तिथून पुढे त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
१९३० मध्ये गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी हाक दिली. या सत्याग्रहातही जेठीबेननी कराचीत सत्याग्रह केला. त्यांना अटक होऊन शिक्षाही झाली. गांधी-आयर्विन करारानंतर सत्याग्रहींची सुटका करण्यात आली. त्यात जेठीबेनचीही सुटका झाली. उच्च शिक्षण घेतलेल्या या मुलीला चांगल्या पगाराची नोकरी त्या वेळी मिळणे अगदी शक्य होते. पण जेठीबेननी मार्ग धरला तो देशसेवेचा. मिठाच्या सत्याग्रहात पोलिसांनी केलेल्या निर्घृण अत्याचाराने घायाळ झालेल्या या जखमी सत्याग्रहींची शुश्रूषा करण्याला त्यांनी प्राधान्य दिले. या त्यांच्या कामामुळे सिंधी जनता त्यांना जेठीदीदी म्हणू लागली. जेठीबेन ही त्यांना उषा मेहता यांनी दिलेली गुजराथी पद्धतीची उपाधी.
१९३५ मध्ये ब्रिटिश सरकारने ‘प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा’ पास केला. १९३७ मध्ये हिंदुस्थानमध्ये अकरा प्रांतिक राज्ये निवडणुकीच्या तत्त्वावर निर्माण झाली. जेठीबेन या निवडणुकीत विजयी होऊन कराची लेजिस्लेटिव्ह अ‍ॅसेम्ब्लीच्या माननीय सदस्य बनल्या. कराची म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्येही त्या निवडून आल्या तेव्हा त्या चोवीस वर्षांच्या होत्या. आपल्या मतदारसंघाची कामे करीत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आपल्या या सुंदर, सुशिक्षित व स्वत: निवडलेल्या कामात प्रस्थापित झालेल्या मुलीचा विवाह व्हावा असे माता-पित्यांना वाटणे साहजिकच होते. सिंधी समाजात त्या वेळी ‘दहेज’ द्यावा लागत असेच. पण शिवाय सुखवस्तू घरातल्या मुलींची लग्ने नवाबी डामडौलात होत. त्यासाठी आई-वडील कर्जबाजारी होत. अशा लग्नाला जेठीबेनचा विरोध होता व समाजात फक्त अशी आणि अशीच लग्ने होत. त्या पद्धतीला विरोध म्हणून त्यांनी स्वत: लग्न केले नाही. इतर अशा प्रकारे होणाऱ्या नातेवाइकांच्याही लग्नावर त्या बहिष्कार घालीत. अखेपर्यंत त्यांनी सिंधी समाजात अशा लग्नाच्या विरोधात प्रचार केला. लोकप्रतिनिधी म्हणून सिंध प्रांतात काम करताना प्रत्येक वेळी त्यांच्या स्वत:च्या कार्यक्रमपत्रिकेवर महिला व बालकल्याण या विषयाला प्राधान्य असे.
१९४२ ला ‘चले जाव’चे आंदोलन सुरू झाले. त्या वेळी प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. जेठीबेनही त्यातून सुटल्या नाहीत. त्यांची कराचीच्या तुरुंगात रवानगी झाली. खटलाच चालला नाही. त्यामुळे सुटकाही झाली नाही.
१९४६ ला हिंदी स्वातंत्र्याचा कायदा झाला व हिंदुस्थानची फाळणी होण्याचे नक्की झाले. सिंध प्रांत ब्रिटिशांच्या लबाडीमुळे पूर्णपणे पाकिस्तानात जायचा होता. बंगाल व पंजाब या प्रांतांचेही तुकडे होऊन ते धर्मसंख्येप्रमाणे पाकिस्तान व हिंदुस्थानात वाटले जाणार होते. सिपाहीमलानी कुटुंबाला कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात राहायचे नव्हते. त्यामुळे स्वातंत्र्य मिळण्याची तारीख ठरण्यापूर्वीच त्या परिवाराने आपले बस्तान हैदराबादहून मुंबईकडे हलविले. तो परिवार मुंबईत स्थायिक झाला. १४ ऑगस्ट १९४७ पासून पाकिस्तानात रक्ताचे पाट वाहिले. अनेक निरपराध माणसांच्या कत्तली झाल्या. लोकांचा समज होता की सत्तांतर शांतपणे होईल. क्रौर्याचा डोंब उसळेल असा विचारही कुणाच्या मनात न आल्यामुळे तिथेच पाळेमुळे असलेले लोक पाकिस्तान सोडायला कबूल नव्हते. त्यांची वित्तहानी झाली. यापेक्षा मोठे दु:ख जिवलगांना बळी पडताना पाहावे लागल्याचे. मुले-बाळे, आजारी, म्हातारे यांचे काबिले घेऊन भारतीय हद्द गाठण्याच्या कसरतीतही अनेक जण प्राणाला मुकले. बहुसंख्य लोक दिल्ली व मुंबई शहराकडे वळले.
जेठीबेननी मुंबई व दिल्ली येथे निर्वासितांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केले. राहायला घर नाही, हातात पैसा किंवा अंगावर दागिना तर सोडाच, पण अंगभर वस्त्र व अंथरूण-पांघरूणही नाही. अशा अवस्थेत निर्वासित छावण्यांमध्ये लोक मरण येत नाही म्हणून जगत होते. जेठीबेन मुंबईत त्या मानाने बऱ्याच सुस्थापित झाल्या. आपल्या समाजबांधवांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी कंबर कसली. ‘नवजीवन सहकारी गृहसंस्था’ स्थापन केली. आपल्या स्वत:च्या मालकीचा सर्व जमीनजुमला त्यांनी नवजीवन सोसायटीला दान केला. आजही मुंबई सेंट्रलच्या एका नाक्यावर ही प्रचंड सोसायटी उभी आहे. मुंबईत पूर्वी आलेल्या सिंधी व इतर समाजांतील लोकांना बरोबर घेऊन जागोजागी मुंबईत जेठीबेननी नवजीवनच्या वसाहती उभारल्या. या वसाहतीतच जीवनावश्यक सर्व सुविधा देण्याचा जेठीबेन यांनी आटोकाट प्रयत्न केला. या वसाहतीत सिंधी माध्यमाची शाळा, सार्वजनिक आरोग्य केंद्र, बँक, पोस्ट ऑफिस, समाजकल्याण सभागृह, बगीचा अशा सुविधा देऊन या वसाहती परिपूर्ण करण्यावर जेठीबेननी भर दिला. जेठीबेनच्या या असामान्य कामगिरीमुळे सर्वस्व गमावून देशोधडीला लागलेल्या जवळजवळ पंधरा हजार परिवारांना रास्त दरात घरे मिळाली.
     जेठीबेननी फक्त मुंबईतच नवजीवन सोसायटीच्या माध्यमातून निर्वासितांकरिता काम केले असे नाही. सिंधच्या लगत कच्छमध्ये नवजीवन सोसायटीच्या माध्यमातून विकलांग मुलांसाठी ‘हॅपी होम’ नावाची संस्था सुरू केली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. तांत्रिक शिक्षणाची गरज त्यांनी ओळखली होती. अशा शाळा सुरू करण्यास त्यांची सक्रिय मदत असे. मुलींचे शिक्षण, महिला कल्याण व स्त्रियांचे अधिकार याबाबत त्या सदैव जागरूक असत. मुलींनी शिकून स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठी त्या प्रयत्नशील असत. स्वत:च्या लग्नाचा निर्णय स्वत: विचारपूर्वक घ्यावा व साधेपणाने विवाह संपन्न करावा असे त्या मुलींना, विशेषत: सिंधी मुलींना सांगत. नोकरी करणाऱ्या मुलींना व स्त्रियांना राहण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी ‘गांधीग्राम’ येथे एका ‘महिला वसतिगृहांची’ स्थापना केली. इंजिनीअरिंग, वैद्यकीय आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थी आणि खासकरून विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्तीची सोय त्या करीत. निरनिराळ्या हॉस्पिटलमधील गरीब, गरजू रुग्णांचे औषध-पाणी व आहार यासाठी आर्थिक मदत देण्याचे काम त्या नवजीवन सोसायटीच्या माध्यमातून करीत. साधनहीन वर्गाच्या सर्वागीण विकासाकरिता काम करणाऱ्या नवजीवन सोसायटीने आपले ‘नवजीवन’ हे नाव जेठीबेनचे मार्गदर्शन व सक्रिय साहाय्यामुळे सार्थ केले.
  स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्याच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलवर त्या निवडून गेल्या. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर कायदेमंडळाची नावे विधानसभा व विधान परिषद अशी झाली. विधान परिषदेत त्यांनी उपाध्यक्षा म्हणून काम केले. सर्व सिंधी समाजच मुंबईच्या समाजाशी एकरूप फार लवकर झाला. जेठीबेन तर त्यांची नेताच. ती त्यांना अपवाद कशी असेल? त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याबद्दल श्रद्धांजली वाहताना त्यांचा गौरव मोरारजीभाई देसाई यांनी ‘आदरणीय महिला सेनानी’ या शब्दात केला. सामान्य जनतेच्या संपर्कात राहून अविरत त्यांच्यासाठी काम करण्याचे व्रत त्यांनी घेतले व पाळले. हुंडा देऊन नवरा विकत घेऊन स्वत: गुलाम म्हणून जगू नका. लग्न ही खासगी बाब आहे.  लग्न सोहळे करून संपत्तीचे प्रदर्शन (व खरे म्हणजे हौसेच्या नावाखाली कष्टाच्या पैशाचा नाश) टाळा, हा त्यांचा त्या काळात मुलींना केलेला उपदेश आजच्या मुलींपर्यंत पोहोचेल तेव्हाच जेठीबेनना खरी श्रद्धांजली होईल.