News Flash

बिकट वाट वहिवाट

एक अरब स्त्री असणं, एवढाच अफनानपुढला अडथळा नव्हता; तिला जुनाट यंत्रणांमध्ये सुधारणा करुन बदल घडविण्यासाठी झुंजावं लागलं.

| March 15, 2014 01:28 am

बिकट वाट वहिवाट

एक अरब स्त्री असणं, एवढाच अफनानपुढला अडथळा नव्हता; तिला जुनाट यंत्रणांमध्ये सुधारणा करुन बदल घडविण्यासाठी झुंजावं लागलं. वाटेत आलेल्या आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक अडचणींमधून युक्तीनं मार्ग काढावा लागला आणि कोणती तरी सर्वस्वी वेगळी गोष्ट करण्याचं धाडस करावं लागलं. मोबाइल हीटरची निर्मिती करणाऱ्या इंजिनीयर मुलीची ही कथा.
‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपटमार्गा सोडू नको’ हीच शिकवण आपल्या मनावर वर्षांनुर्वष बिंबवण्यात आली आहे. नीटपणे मन लावून शिकायचं, चांगली नोकरी मिळवायची, ती इमानेइतबारे निवृत्तीपर्यंत करायची आणि त्यानंतर सुखेनैव कालक्रमणा करायची, या सुरक्षित आयुष्यापलीकडे इतर कोणत्याही आव्हानात्मक पर्यायाचा विचार करणं, म्हणजे ‘बिकट वाटे’कडे जाण्याचा मूर्खपणा करणं, हे समीकरण आपल्या मनावर कोरलं गेलं होतं. परंतु आपल्या आयुष्याची प्रत उंचावणाऱ्या नव्या शोधांचा आढावा घेता आपल्या लक्षात येतं की, चाकोरीबाहेरचा विचार करणारेच- त्यासाठी बिकट वाटेने जाणारेच- असे शोध लावू शकतात.
पाश्चिमात्य देशात ‘इन्व्हेन्शन (नवे शोध)’, ‘इनोव्हेशन (नवे उपक्रम व सुधारणा)’ आणि ‘थिंकिंग आऊट ऑफ द बॉक्स (चाकोरीबाहेरचा नवा विचार)’ हे शब्द नवीन शोधांच्या संदर्भात सतत कानावर पडत असतात. हायस्कूल- विद्यार्थ्यांसाठी ‘इन्वेस्टिंग हाऊस स्कॉलरशिप’ ठेवल्यामुळे, अमेरिकेतील असंख्य विद्यार्थ्यांनी समाजाला उपयुक्त असे अनेक शोध लावलेले आपण वर्तमानपत्रात सतत वाचत असतो. या विचारांचं बाळकडू पाजण्यात आल्यामुळे तेथील मुलं लहानपणापासून स्वतंत्र विचार करू लागतात; परंतु अशी परंपरा नसलेल्या अरब देशातील – जॉर्डनमधील – एका मुलीनं अशी अपारंपरिक झेप घेण्याचं धाडस केलंय, ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट म्हटली पाहिजे.
या मुलीचं नाव आहे, अफनान अली. तिनं हॅशेमाइट युनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगची पदवी मिळवली आणि ती अम्मान(जॉर्डन)मधील एका खासगी कंपनीत नोकरी करू लागली.
परंतु सहा महिन्यांतच तिनं ळएढछड या मोबाइल हीटरची (अंगात ऊब आणण्यासाठीच्या पोर्टेबल हीटरची) निर्मिती करण्याच्या हेतूनं नोकरी सोडून दिली आणि त्यासाठीच्या संशोधन आणि विकासाला स्वत:ला वाहून घेतलं. जॉर्डनमधील कडक थंडीचा तिच्या देशवासीयांना किती प्रचंड त्रास होतो, हे पाहिल्यावर तिच्या मनानं घेतलं की कमी खर्चात बनण्याजोगा, इंधनबचत करणारा आणि खनिज तेलावर अवलंबून नसणारा पोर्टेबल हीटर बनवला, तर लोकांना तो खूप उपयुक्त ठरेल; तो अंगावर वागवून अंगात ऊब आणता येईल आणि हालचाल करून इतर कामंसुद्धा करता येतील. रिचार्ज करता येण्याजोग्या बॅटरीवर चालणारा, कमी-मध्यम-जास्त असं तपमान करता येण्याजोगा आणि थेट अंगावर ठेवता येण्याजोगा पातळ  चकत्यांनी बनलेला तिच्या कल्पनेतला हा पोर्टेबल हीटर वास्तवात उतरविण्यासाठी तिला अनेक अडचणींमधून मार्ग काढावा लागला.
 सर्वात पहिला अडथळा म्हणजे असा हीटर बनवण्याचं तंत्रज्ञान जॉर्डन देशात उपलब्धच नव्हतं. ते तंत्रज्ञान मिळवण्यासाठी अफनान प्रथम जर्मनीत गेली आणि अखेरीस चीनमधून तिनं त्याचं उत्पादन करून घ्यायला प्रारंभ केला. परंतु हे तंत्रज्ञान विकसित करून उत्पादन सुरू करण्यासाठी आवश्यक ते भांडवल उभं करणं सोपं नव्हतं. त्यासाठी तिनं वेगवेगळ्या स्पर्धामधून भाग घेऊन पारितोषिकं आणि अनुदानं मिळवली. तिनं या पोर्टेबल-हीटरचं ‘ळएढछड’ नावाखाली एक मॉडेल बनवलं. त्या मॉडेलला-प्रतिकृतीला- २००८ सालचं ‘क्विन रानिना नॅशनल आंत्रप्रेन्युअरशिप काँपिटिशन’चं प्रथम पारितोषिक मिळालं आणि २००९ सालचं युरोपिअन युनियनचं, तंत्रज्ञान आणि विकास प्रयत्नांसाठीच्या प्रकल्पांसाठी ठेवलेलं अनुदानसुद्धा मिळालं. ‘अरब टेक्नॉलॉजी बिझनेस प्लॅन काँपिटिशन’मध्ये पहिल्या दहा क्रमांकांत येण्याचा मानसुद्धा ‘ळएढछड’नं मिळवला. २०१० साली मध्यपूर्वेत आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय-संशोधन-प्रदर्शनात अफनानच्या ‘ळएढछड’ला कास्यपदक मिळालं.
या सर्व प्रयत्नांती अफनानचा ‘ळएढछड’ नावाचा पोर्टेबल हीटर जॉर्डनच्या बाजारपेठेत उपलब्ध झाला. एका कंपनीनं या हीटर्सचं वितरण आणि विक्री करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि तशा करारावर सही केली आहे. मोठय़ा प्रमाणावर याचं उत्पादन करता आलं, की हे हीटर्स ग्राहकांना कमी किमतीत उपलब्ध करून देता येतील. त्यासाठी आवश्यक तो वित्तनिवेश करणारे- भागीदार शोधण्याचा सध्या अफनानचा जोरदार प्रयत्न चालू आहे. कमी किमतीत हा हीटर देशबांधवांना उपलब्ध करून देता आला, तर सारे इच्छुक तो विकत घेऊ शकतील आणि जॉर्डनच्या कडक थंडीचा सामना करू शकतील, असं तिला तीव्रतेनं वाटतं. याचे किती आणि कसे उपयोग होऊ शकतात, हे अफनाननं प्रत्यक्ष पाहिलं आहे. ती म्हणते, ‘‘एक नव्वद वर्षांचे आजोबा माझे ग्राहक आहेत. त्यांना सतत थंडी वाजत असे आणि थकवा येत असे. बराचसा वेळ ते अंथरुणातच झोपून राहात असत. परंतु ‘ळएढछड’ वापरू लागल्यापासून ते खूप हालचाल करू लागले आहेत. ते बागेत काम करू लागलेत आणि कुटुंबियांसमवेत घराबाहेर हिंडू-फिरू लागलेत.’’ हा हीटर वापरल्यामुळे एका लहान मुलीची पोटदुखी-पाठदुखी कमी होऊन, तिला आता रात्री शांत झोप लागते आहे. अफनान म्हणते, ‘‘सुरुवातीला आम्हाला याचा उपयोग हिंडत-फिरत असताना, सुटसुटीतपणे ऊब आणण्याएवढाच आहे, असं वाटत होतं. परंतु ग्राहकांना होणारे फायदे मोजल्यावर, आमच्या लक्षात आलं की, याच्या वापरामुळे अनेक वैद्यकीय समस्या दूर होऊ लागल्या आहेत; रुधिराभिसरण सुधारतं आहे आणि काही व्याधींमुळे उद्भवणाऱ्या वेदना कमी होत आहेत. पोटात आणि पाठीत होणाऱ्या वेदना खूपच कमी होत आहेत.’’
हा पहिला संशोधन- उत्पादन- प्रकल्प अनेक अडचणींमधून मार्ग काढून तडीला नेऊन, अफनान थांबलेली नाही. आत्मगौरवात ती बुडून गेलेली नाही. या मार्गात तिच्या वाटय़ाला आलेल्या अडचणींचा तिनं डोळसपणे आढावा घेतला आणि आपल्या अनुभवाचा इतरांना फायदा करून देण्याच्या हेतूने तिने ‘ब्राइट किड्स अकॅडमी’ (हुशार मुलांसाठी विद्यानिकेतन) सुरू केली आहे. तेथे लहान वयापासूनच मुलांना अगदी सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने, रोबॉटिक्स (यंत्रमानवशास्त्र), इंजिनीअरिंग (अभियांत्रिकी) आणि टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) शिकविलं जातं. ती म्हणते, ‘स्मार्ट फोन्स आणि गेम्सद्वारे मुलं तंत्रज्ञानाचा केवळ वापर करीत असतात, उपभोग घेत असतात. केवळ त्यात गुंतून पडण्याऐवजी त्यांनी असं तंत्रज्ञान स्वत: विकसित करण्याचा प्रयत्न करावा, हा आमचा या अभियांत्रिकी- प्रशिक्षण- प्रकल्पामागचा हेतू आहे. त्यांनी नवीन शोध लावावेत, सध्याच्या तंत्रज्ञानात सुधारणा घडवाव्यात मनाची कवाडं उघडून समाजहितासाठी तंत्रज्ञान वापरावं आणि जगाला उपयुक्त असे शोध लावावेत, अशी आमची इच्छा आहे.’
या मुलांनी नव्या प्रकाराचे शोध लावून त्याद्वारे उपयुक्त गोष्टी बनवाव्यात, यासाठी अफनान त्यांना मदत करू इच्छिते. मनातील आगळ्यावेगळ्या विचारांच्या आधारे मुलांनी प्रथम एक मॉडेल बनवावं आणि त्यानंतर त्यात सुधारणा घडवीत अंतिम वस्तू बनवावी, अशी अफनानची इच्छा आहे. ती म्हणते, ‘‘ळएढछड बनविताना मी अनेक चुका केल्या आणि पैशांचा आणि वेळेचा अपव्यय केला, कारण माझी रीतच चुकली होती. आमच्या या तंत्रज्ञान शिक्षण प्रकल्पाद्वारे त्यांना त्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत करता येईल, अशी मी आशा करते.’’
अफनानला स्वत:च्या ळएढछड प्रकल्पासाठी वित्तनिवेशक शोधताना खूप यातायात करावी लागली, कारण निवेशकांना औद्योगिक उत्पादनापेक्षा सॉफ्टवेअर क्षेत्रात निवेश करणं कमी धोक्याचं वाटतं. त्यांचा हा दृष्टिकोन बदलावा आणि तंत्रज्ञानाद्वारे नवे प्रकल्प उभारणाऱ्यांचा मार्ग सुकर व्हावा यासाठी तिनं ‘ब्राइट किड्स अकॅडमी’ सुरू केली आहे. त्याद्वारे अरब मुलं आपली सृजनशीलता विकसित करू शकतील आणि लावलेले शोध उत्पादनात परिवर्तित करू शकतील, अशी तिला खात्री वाटतेय.
अनेक अडचणींमधून आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणारी अफनान म्हणते, ‘‘अखेरीस तुम्हाला इतरांकडून उत्तेजनाची किंवा शाबासकीच्या थापेची वाट न पाहता, मनाचा कौल घेऊन पुढे जावं लागतं. तुमची उत्कटता आणि आत्मविश्वासच तुमच्या रचनांना आणि उद्दिष्टांना इंधन पुरवीत असतात.’’
केवळ एक अरब स्त्री असणं, एवढाच अफनानपुढला अडथळा नव्हता; तिला जुनाट यंत्रणांमध्ये सुधारणा घडवून बदल घडविण्यासाठी झुंजावं लागलं. वाटेत आलेल्या आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक अडचणींमधून तिला युक्तीनं मार्ग काढावा लागला आणि कोणती तरी सर्वस्वी वेगळी गोष्ट करण्याचं धाडस करावं लागलं, अशी ही अफनान तिच्या देशातील स्त्री-उद्योजिकांपुढला एक आदर्श ठरली आहे. बिकट वाटेचीच तिनं वहिवाट बनविली आहे!    ठ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2014 1:28 am

Web Title: jordanian female entrepreneur creates a heartwarming legacy
Next Stories
1 नावडत्या राणीची मुलं
2 नोकरी करण्याचा निर्णय
3 ‘मला सांगा मनातलं’
Just Now!
X