हरीश सदानीsaharsh267@gmail.com 
घराबाहेर पडल्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होणारी स्त्रियांची छेडछाड इतकी सर्रास सुरू असते, की अनेकदा स्त्रियाही ‘हे असं घडणारच आहे,’ असं गृहीत धरतात. संवेदनशील मनाच्या दीपेश टँक यांना मात्र रेल्वे प्रवासात होणारी स्त्रियांची छेडछाड बघवली नाही आणि त्यांनी त्याविषयी ‘वॉर अगेन्स्ट रेल्वे राऊडीज’ ही आगळीवेगळी मोहीम सुरू के ली. ‘हे वागणं खपवून घेतलं जाणार नाही’ हा संदेश काही प्रमाणात तरी रुजवण्यात ही मोहीम यशस्वी ठरली.  

देशात सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना पाहताना एक गोष्ट प्रकर्षांनं दिसते, ती म्हणजे या घटनांमध्ये अवतीभोवती असणाऱ्या लोकांतील कमालीचा बघेपणा व कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप न करण्याची वृत्ती. एकतर्फी आकर्षणातून घडणाऱ्या क्रौर्याच्या घटना असोत किंवा बस-ट्रेननं प्रवास करणाऱ्या अनेक स्त्रियांवरील छेडछाडीचे प्रसंग. अशा घटनांमध्ये दिसणारी समुदायातील लोकांमधली संवेदनशून्यता ही प्रत्यक्ष घटनांइतकीच चिंताजनक बाब म्हणून पाहायला हवी. पण अशा समुदायांमध्येही दीपेश टँक यांच्यासारखे कृतिशील होऊन लढा पुकारणारे तरुण आहेत. दीपेश यांचा स्त्रीसुरक्षिततेसाठीचा लढा आगळावेगळा म्हणावा असाच.

मुंबईत मालाडमध्ये राहणाऱ्या दीपेश टँक यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका नामांकित कंपनीच्या कॉल सेंटरमधून केली. ११ जुलै २००६ रोजी संध्याकाळी आपल्या कामाची शिफ्ट पूर्ण करून घरी गेलेले दीपेश गाढ झोपले होते. काही तासांनी त्यांच्या आईनं दूरचित्रवाणीवर मुंबईत रेल्वेच्या डब्यांत के वळ ११ मिनिटांच्या कालावधीत झालेल्या बॉम्बस्फोटांची बातमी पाहिली. अस्वस्थ करणारी ती दृश्यं पाहून त्यांनी दीपेशला झोपेतून उठवलं. दीपेश ताडकन उठले आणि आपल्या लहान भावासह त्यांनी कूपर रुग्णालयात धाव घेतली. त्या दोघांनी बॉम्बस्फोटातील जखमी व्यक्तींना उचलण्यासाठी, तसंच मृतदेह उचलण्यासाठी मदत के ली. स्वत: रक्तदान केलं. त्याचवेळी रुग्णालयात भासणाऱ्या रक्ताच्या तुटवडय़ाबद्दल कळल्यावर संबंधित रक्तगटांच्या नागरिकांनी रक्तदान करावं यासाठी बाहेर येऊन जमावाला आवाहनही के लं. रात्रभर तिथे सर्वतोपरी सहाय्य केल्यावर पहाटे दोघे भाऊ घरी परतले. त्यानंतर दीपेश यांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं. ऑफिसमधील काही सहकारी व मित्रमैत्रिणींना घेऊन ‘युथ फॉर पीपल’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. २०१२ पर्यंत या संस्थेनं रक्तदान शिबिरांचं आयोजन, हजारो गरजू, ग्रामीण भागातील मुलांना वह्य़ा वाटप, संगणक प्रयोगशाळा, वाचनालय, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मुलगे व मुलींसाठी वसतिगृह, समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची मोहीम यांसारखे उपक्रम राबवले.

दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी बसमध्ये प्रवास करणाऱ्या २३ वर्षांच्या तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं अनेक जण हेलावले. यांपैकी एक दीपेश होते. त्यांना पुरुष म्हणून स्वत:ची लाज वाटली. अशा घटना थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा ते विचार करू लागले. एके दिवशी सकाळी ८ वाजता ते कामावर जाण्यासाठी मालाड रेल्वे स्टेशनवर पोहोचले. वांद्रे येथे जाणारी ट्रेन त्यांनी पकडली. तेव्हा चालत्या ट्रेनच्या दारात उभे राहून दोन पुरुष फलाटावर उभ्या असलेल्या मुलींवर गुलाबाची फुलं फेकत असताना त्यांनी बघितलं. ते पाहून दीपेश यांनी स्थानिक रेल्वे पोलिसांकडे जाऊन झाल्या प्रकाराविषयी तक्रार केली. पण पोलीस या प्रश्नाविषयी उदासीन असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर दीपेश आणि त्यांचे ९ मित्रमैत्रिणी रेल्वेत घडणाऱ्या स्त्रियांबाबतच्या प्रत्येक गैरप्रकाराबद्दल पोलिसांकडे तक्रार करू लागले. ‘हे प्रकरण आमच्या कक्षेत येत नाही’, ‘आम्ही तेव्हाच कारवाई करू शकू, जेव्हा स्त्रिया तक्रार दाखल करतील’, ‘आम्ही तक्रार दाखल केली तरी धावत्या ट्रेनमध्ये हे उपद्रवी पुरुष कसे सापडणार?’, अशा प्रतिक्रिया पोलिसांकडून येत होत्या. मग ऑगस्ट २०१३ मध्ये दीपेश आणि चमूनं ‘डब्ल्यूएआरआर’ (वॉर अगेन्स्ट रेल्वे राऊडीज) ही आगळी मोहीम सुरू केली. दीपेश आणि त्यांचे  स्वयंसेवक रेल्वे प्रवासात स्त्रियांना पाहून मुद्दाम शिट्टी वाजवणाऱ्या, अश्लील हावभाव करणाऱ्या, अचकटविचकटपणे बोलणाऱ्या, स्त्रियांना स्पर्श करणाऱ्या, छेडछाड करणाऱ्या पुरुषांच्या त्या कृत्याचं मोबाइलवर व्हिडीओ चित्रण करू लागले. ‘जीआरपी’ (गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस) आणि ‘आरपीएफ’ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) दीपेशच्या मोहिमेत फक्त ४ दिवस सहभागी झाले. (त्यानंतर ते मोहिमेत फिरकले नाहीत.) साध्या वेशातील सुमारे ४० पोलिसांनी वेगवेगळ्या डब्यांमध्ये शिरून स्त्रियांची छेड काढणाऱ्या २५ जणांना पकडलं. रेल्वे नेटवर्कला घेऊन असा संघटित प्रयत्न देशात पहिल्यांदाच झाला. दीपेश सांगतात, ‘‘आम्ही केलेल्या व्हिडीओ नोंदींमुळे पोलिसांना प्रश्नाचं गांभीर्य कळलं. काही मुलांचे मुलींकडे बघून

के लेले हावभाव अतिशय किळसवाणे होते. या सर्व उपद्रवी मुलांना आपल्यावर कुठलीही कारवाई होणार नाही याची इतकी खात्री होती, की जराही न घाबरता ती हे सर्व करायला धजावली. पण एकदा त्यांच्यापर्यंत ही बाब स्पष्टपणे गेली, की स्त्रियांवरील कुठल्याही प्रकारची छेडछाड सहन केली जाणार नाही. यापुढे ती मुलं असं कृत्य करायला धजावणार नाहीत.’’

‘डब्ल्यूएआरआर’नं नंतर वेगवेगळ्या उपनगरी रेल्वे स्थानकांवर सकाळी-संध्याकाळी जाऊन ५०० स्त्री प्रवाशांचं सर्वेक्षण केलं. त्यात ८५ टक्के  स्त्रियांनी रेल्वेनं प्रवास करणं असुरक्षित असल्याचं, तर ७० टक्के  स्त्रियांनी त्यांच्या बाबतीत कुठल्या ना कुठल्या प्रकारे छेडछाड झाल्याचं सांगितलं. त्या सर्वेक्षणाचा तपशील आणि निष्कर्ष रेल्वे मंत्री, रेल्वे आयुक्त, राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग यांच्याकडे पाठवण्यात आला. त्याला थंड प्रतिसाद मिळाला. फक्त राज्य महिला आयोगाकडून संसदेच्या रेल्वेकरिता असलेल्या स्थायी समितीला अवलोकनासाठी पत्र गेलं.

रेल्वे पोलिसांकडूनदेखील केवळ चार दिवस मोहिमेला सक्रिय सहभाग मिळाला होता. त्यानंतर दीपेश व त्यांचे साथीच ‘डब्ल्यूएआरआर’ची लढाई पुढे नेत होते. सकाळ-संध्याकाळी एक तास पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर ते नियमितपणे अशा प्रकारांचं व्हिडीओ चित्रण करू लागले. काही वर्षांनी दीपेश यांच्या लक्षात आलं, की धावत्या, गजबजलेल्या ट्रेनमध्ये स्वत:ला सांभाळून, स्वत:ची बॅग सांभाळून मोबाइल फोनवर चित्रीकरण करणं जोखमीचं होऊ शकतं. मग त्यांनी छुप्या कॅमेऱ्यांविषयी जाणून घ्यायला सुरुवात के ली. रेकॉर्डिग करणारा, उच्च दर्जाचा कॅमेरा असलेला चष्मा अमेरिकेत उपलब्ध असल्याचं त्यांना कळलं. स्वत:चे २५ हजार रुपये खर्चून त्यांनी  तो चष्मा एका मित्राकरवी कुरिअरनं मागवला. मग दीपेश एकटय़ानं, सहसा कुणाच्याही लक्षात न येऊ देता हा चष्मा घालून रेल्वेत स्त्री-प्रवाशांबाबत होणारी दुष्कृत्यं टिपू लागले व अशा अनेक पुरुषांवर कारवाई होऊ शकली. आतापर्यंत त्यांच्या मोहिमेद्वारे जवळपास १८० उपद्रवी पुरुषांविरुद्ध कारवाई झाली आहे. दीपेश यांच्या कामाचा प्रभाव हा, की त्यांनी सुरू केलेल्या मोहिमेनंतर मुंबई पोलिसांनी ट्रेनमध्ये छुप्या कॅमेऱ्यांद्वारे गस्त घालायला सुरुवात केली.

दीपेश यांनी स्त्री-सुरक्षिततेसाठी के लेल्या प्रभावी कार्याची दखल अनेक वृत्तपत्रं व प्रसारमाध्यमांनी घेतली. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलं. ते म्हणतात, ‘‘मी काही हे स्वत:च्या प्रतिमेसाठी करत नाही. मी कुणी जेम्स बॉण्ड किं वा सुपरहीरो नाही, माणूसच आहे.  हे सर्व करताना अनेकदा माझ्यावर प्रतिहल्ला झाला आहे. अनेकदा वाईट अनुभव येतात, थकू न जायला होतं, पण त्यामुळे मी माझी मोहीम थांबवलेली नाही. आपल्या समाजात खूप वाईट पुरुष आहेत, यापेक्षा अनेक पुरुष त्यांच्यासमोर एखाद्या स्त्रीवर होणारा अन्याय, अत्याचार पाहूनही गप्प बसतात, काहीच करत नाहीत, ही बाब मला जास्त त्रास देते.’’

काही काळ एका जाहिरात कंपनीत काम केल्यानंतर दीपेश यांनी ३ वर्ष लालबत्ती परिसरातील एका सामाजिक संस्थेत काम केलं. यात देहव्यापारात अडकलेल्या ५० हून अधिक अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. करोनाकाळात मुंबई व पालघर येथील १० हजारांहून अधिक स्थलांतरित मजूर व कुटुंबीयांना अन्नधान्य पुरवण्याचं काम दीपेश व त्यांच्या स्वयंसेवकांनी केलं.

आपल्या सर्व सामाजिक उपक्रमांमागे- विशेषत: स्त्री-सुरक्षिततेसाठीच्या प्रयत्नांमागे आईची प्रेरणा असल्याचं दीपेश नम्रपणे सांगतात. ‘‘ लहानपणापासून मी आईला केटरिंगच्या व्यवसायात काम करताना, ट्रेननं प्रवास करताना पाहात आलोय. तिच्या कष्टांविषयी, असुरक्षित वातावरणात प्रवास करताना झालेल्या त्रासाविषयी मी विचार करायला लागलो, तसा मी असंख्य स्त्री प्रवाशांच्या परिस्थितीबाबत संवेदनशीलपणे बोलू लागलो,’’ असं ते म्हणतात. स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी सध्या दीपेश कर्करोगानं पीडित लोकांकरिता कार्य करणाऱ्या एका सामाजिक संस्थेत काम करतात.

टाळेबंदीमध्ये मुंबई लोकलनं प्रवास कमी होत असला, तरी जेव्हा जेव्हा ते प्रवास करतात, तेव्हा त्यांनी घातलेला विशेष चष्मा स्त्रियांबाबत लैंगिक छळ करणाऱ्यांविरुद्ध सज्ज असतो. त्यांच्यासारखे संवेदनशील पुरुष समाजात वाढले तरच त्यांच्या डोळ्यांवरून तो विशेष चष्मा उतरेल.. ज्याची समाज वाट पाहात आहे.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन

Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?

firearms seized in thane marathi news, illegal firearms marathi news
निवडणुकांपूर्वी मध्य प्रदेशात तयार होणारे अवैध अग्निशस्त्र ठाण्यात ?