हरीश सदानी saharsh267@gmail.com

मुलांना अगदी लहान असल्यापासूनच घरात आणि शाळेत स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्याची ओळख झाली, तर ही शिकवण त्यांच्या मनात सहज रुजवता येईल. निरोगी समाज घडवणारी अशी काही मूल्यं रुजवण्यासाठी स्वप्निल गायकवाड आणि त्यांचा चमू गेली काही वर्ष प्रामाणिकपणे काम करतो आहे. मुलांची लिंगभावाकडे पाहाण्याची मानसिकता, सामाजिक धारणा कशा तयार होत जातात, हे समजून घेण्याचा प्रयत्न तर ते करतातच, पण शालेय अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून मुलं कशी शिकतील, यासाठीही ते प्रयत्नशील आहेत.  

मूल जन्मल्यानंतर सुरुवातीची सहा वर्ष त्याच्या भावी आयुष्यातील अनेक गोष्टींचा पाया रचला जात असतो. बाळाच्या आकलनविषयक, भावनिक, सामाजिक क्षमतांचा विकास आकार घेत असतो. या पायाभरणीसाठी करावयास लागणारा अभ्यास, चिंतन व नवनवे प्रयोग करण्यासाठीची जिद्द व प्रयत्नांची पराकाष्ठा महत्त्वाची असते. भारतात या विषयावर काही उल्लेखनीय काम होत असलं तरी यात वेळ व कौशल्याची गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या पुरेशी नाही. ३४ वर्षीय स्वप्निल गायकवाड गेलं दशकभर या विषयावर सातत्यानं, एकनिष्ठेनं काम करत आहे.

पुण्यातल्या एका चाळीमध्ये स्वप्निल वाढला. चाळीतला गोंगाट आणि गजबज यात एक वेगळीच ऊब त्याला जाणवायची. लोक जितके एकमेकांशी भांडायचे तितकेच एकमेकांच्या अडचणीत मदतीलाही धावायचे. माणुसकीचे आणि नात्यांचे अनेक धडे या जागेनं त्याला शिकवले. बेताची परिस्थिती असल्यानं प्रत्येक घर आपल्या उदरनिर्वाहासाठी झटताना त्यानं जवळून पाहिलंय. स्वप्निलच्या व त्याच्या तीन मोठय़ा बहिणींच्या शिक्षणासाठी घरातल्या मोठय़ांनी केलेली मेहनत, काटकसर आणि धडपड आजही त्याला आणखी मोठी स्वप्नं पाहण्याची प्रेरणा देते. ‘‘सातवीपुढचं शिक्षण घेणारी आमची घरातली ही पहिली पिढी आणि ‘एम.ए.’ पूर्ण केलेला मी पहिला मुलगा! अहमदाबादच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन’मध्ये (एन.आय.डी.) पदवी घेत असताना माझ्या मित्रांच्या परिवारांच्या तुलनेत आपण अजूनही एक-दोन पिढय़ा मागे का आहोत, हा प्रश्न मला नेहमी पडायचा. पुढील काही र्वषानी पदव्युत्तर शिक्षण घेत असताना या प्रश्नाचा उलगडा मला होत गेला. दलित कुटुंबात जन्माला आल्यामुळे माझ्या आजी-आजोबांना आणि आई-वडिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. जातीविषयक भेदभावाच्या झळा त्यांनी सोसल्या. पण त्याचं सावट त्यांनी आमच्यावर कधीही पडू दिलं नाही. शिक्षण एके शिक्षण हे धोरण त्यांनी डोळ्यांपुढे ठेवून आम्हाला वाढवलं.’’ आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा वंचित समाजाचा संघर्ष आणि शिक्षण हे दोन मुद्दे स्वप्निलच्या सामाजिक कार्याबद्दलच्या ओढीचा पाया बनले.

घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे स्वप्निलनं अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक डिझायनर म्हणून काही वर्ष काम केलं. २०१२ मध्ये एका ट्रेकिंगच्या ठिकाणी सूर्या डेका या द्रष्टय़ा शिक्षणप्रेमी तरुणाशी त्याची भेट झाली. सूर्या व इतर सहकाऱ्यांसोबत पुणे जिल्ह्य़ातील भोर गावात ‘प्रोजेक्ट री-इमॅजिन’ हे पूर्वप्राथमिक बाल शिक्षण केंद्र त्यानं सुरू केलं. ५ वर्ष ‘मराठा चित्र मंदिर’ इथल्या जुन्या इमारतीत सुरू झालेलं हे केंद्र पुढे संजय नगर वसाहतीत कार्यान्वित झालं. बांधकाम व इतर कामं रोजंदारीवर करणारे, मासेमारी करणारे, कातकरी समुदायातील लोक इथे राहाताहेत. मुलांचं व्यक्तिगत तसंच वस्ती-समुदायातील लोकांचं स्वास्थ्य केंद्रस्थानी ठेवून ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण पुरवताना शिक्षण-संशोधन, शिक्षक-प्रशिक्षण, पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम हे सारं समांतर सुरूआहे. मुलांचं संगोपन आणि शिक्षण, कुटुंबातील सदस्यांचं- विशेषत: स्त्रियांचं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, सामाजिक आणि आर्थिक स्तरावर होणारी ओढाताण, लिंगभेद, घरगुती हिंसा, असे अनेक विषय केंद्राच्या उपक्रमांमागील संकल्पनेचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. केंद्रात काम करणारे शिक्षक हे स्थानिक रहिवासी असल्यामुळे त्यांना गावातील परिस्थितीचा अनुभव आहे. शैक्षणिक जगाचा आणि मुलांसोबतच्या कामाचा अनुभव असल्यामुळे ‘थिअरी आणि प्रॅक्टिस’ याचा संगम खूप छान जुळून आलेला इथे दिसतो. आतापर्यंत  सुमारे ५०० मुलं व वस्तीतील १२०० कुटुंब-सदस्य यांच्याशी  संपर्क  ठेवत संस्थेनं काम के लं असल्याचं स्वप्निल सांगतो.

मुलांबरोबर वेगवेगळे उपक्रम घेताना येणारे अनुभव हे पुस्तकी बालमानसशास्त्र आणि ‘बुद्धिमत्ते’चे पारंपरिक ठोकताळे यांना आव्हान देणारे असतात. त्यामुळे स्वप्निल आणि त्याच्या चमूला ते शिक्षण-संशोधनातील, अध्यापनातील नवी गृहीतकं मांडायला प्रोत्साहित करतात. याविषयी बोलताना स्वप्निल सांगतो, ‘‘मुलांच्या ‘फ्री-प्ले’च्या (खेळाच्या) तासाला मुलांना हवं ते खेळण्याची/ करण्याची किंवा न करण्याची संधी दिली जाते. मुलांच्या खेळात व्यत्यय न आणता दुरून मुलांचं निरीक्षण करणं, त्यांना साहित्य उपलब्ध करून देणं आणि मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणं अशा काही भूमिका शिक्षक या वेळी बजावतात. मूल तीन वर्षांचं होईपर्यंत लिंगभावविषयक भूमिकांची ओळख ही मुलांमध्ये तयार झालेली असते. याची प्रचीती मुलं साहित्याबरोबर कसं जाणीवपूर्वक खेळत असतात याबद्दल महिनोंमहिने निरीक्षण केल्यानंतर व मुलांशी बोलल्यानंतर आमच्या टीमला आली. उदा. ‘बिल्डिंग ब्लॉक्स’चा (ठोकळ्यांचा) वापर मुलं आणि मुली खेळण्यासाठी करतात. जरी यातून मुलं समस्या निवारण  किंवा बांधणी कौशल्य शिकत असली तरी शेवटी त्याचा उपयोग मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळा होताना दिसला. मुलं ठोकळ्यांचा वापर इमारत, गाडी, घर बनवण्यासाठी करताना, बनवलेल्या गाडय़ा खेळातल्या रस्त्यावरून चालवताना दिसली. तर मुली ठोकळ्यांपासून बाहुल्यांसाठी झोपायला पलंग किंवा स्वयंपाकघराचा ओटा बनवताना दिसल्या.’’

एका कथाकथनामध्ये प्रकल्पातील महालिंग निंबाळकर या शिक्षकानं पुरुष (दादा) व स्त्री (दीदी) पात्रांबाबत लिंगविशिष्ट कामाच्या विभागणीबद्दल मुलांना विचारलं, की ‘दीदीनंच आजीसाठी चहा का

के ला?, दादानं का नाही के ला?’ तेव्हा त्यांच्यापैकी काहींचं समर्थन असं होतं- प्रकाश (वय- ५ वर्ष)- ‘तो काय मुलगी आहे का चहा करायला?’, काजल

(५ वर्ष)- ‘ते दादाचं काम नाहीये.’ आयेशा (४ वर्ष

८ महिने)- ‘दादाला चहा करताच येणार नाही.’ शिक्षकांच्या बोलण्यातील आणि कृतीतील गर्भित व स्पष्ट संदेश निरपेक्ष साधनसामुग्रीच्या मुलांच्या वापरावर कसा प्रभाव टाकतात याचासुद्धा अभ्यास स्वप्निलच्या टीमला उपयोगी ठरला. स्वप्निल काही उदाहरणं देतो. – उदा. मुलांची मातीशी ओळख करून देताना जेव्हा मातीपासून बनवलेल्या कोणत्या तरी विशिष्ट उत्पादनाचा संदर्भ दिला गेला, तेव्हा मुलींनी स्वयंपाकघरातील भांडय़ांचा आणि मातीचा संबंध जोडला. त्यानुसार त्या मातीशी खेळू लागल्या. तर सर्व मुलगे या कृतीसत्रापासून दूर राहिले. जेव्हा मातीचा कुठल्याही विशिष्ट उत्पादनाशी संबंध न जोडता, मातीचा हवा तसा वापर करायला सांगितलं, तेव्हा मुलं-मुली दोघंही पुढच्या खेळासाठी तयार झाले. समुदायाची सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्टय़ं शाळेच्या वातावरणाशी  सुसंगत आहेत की विसंगत, याचा प्रभाव मुलांवर पडत असतो. दिलेली खेळाची साधनसामुग्री मुलं कशी वापरतात यावर त्याचा परिणाम झालेला लगेच दिसून येतो.  उदा. ज्या मुलींनी घरात भांडी घासणं हे दैनंदिन वास्तव म्हणून पाहिलं आहे, त्यांना भातुकलीतला ‘किचन-सेट’ देऊन त्यांनी त्याचा एखाद्या वेगळ्या काल्पनिक खेळात वेगळा वापर करण्याची अपेक्षा करणं चुकीचं नाही का ठरणार?  असा सवाल स्वप्निल उपस्थित  करतो.

मुलांच्या शिक्षण प्रक्रियेत पालकांची भूमिका महत्त्वाची मानून त्यांच्याकडे प्रोजेक्ट री-इमॅजिन सहशिक्षक म्हणून पाहात आलीय. शाळेत वर्ग चालू असताना किंवा कथाकथन, साक्षरता, गणित यांसारखे विषय समजावत असताना निरीक्षण करून त्याचा पाठपुरावा घरी कसा करायचा याबद्दल पालकांना नियमित मार्गदर्शन केलं जातं.  निरक्षर पालकांच्या अंगी असलेल्या कौशल्यांचाही वापर या ठिकाणी उत्तम रीतीनं करून घेतला जातो. कधी मासेमारी, विणकाम, शेतीकाम, मातीकाम याविषयी माहिती देण्यासाठी, कधी कथाकथनासाठी, शैक्षणिक साधनांची निर्मिती करण्यासाठी, सण-उत्सव सामूहिकपणे साजरे करण्यासाठीही त्यांना आवर्जून सहभागी करून घेतलं जातं. नदीच्या किनारी व खुल्या मैदानात मुलांना नेणं, पोस्टमन दैनंदिन कामं कशी करतो यासाठी प्रत्यक्ष पोस्टमनशी संवाद साधून मुलांना अनुभवयुक्त शिक्षण देणं, अशा संस्थेनं सुरू केलेल्या उपक्रमांना खूप छान प्रतिसाद मिळत असल्याचं स्वप्निल सांगतो.

वस्तीतल्या स्त्रियांसाठी संस्थेनं ‘एक तास स्वत:साठी’ हा साप्ताहिक उपक्रम सुरू केला आहे. स्त्रियांचं मानसिक आरोग्य, रोजच्या जीवनातील संघर्षांबद्दलच्या चर्चा, गोष्टी, खेळ, कला, मुलांचं शिक्षण, ध्यानधारणा, व्यायाम, आहार व अशा अनेक विषयांवर त्यात मुक्त चर्चा होत असते. रोजची दगदग, मानसिक आणि शारीरिक ओढाताण या सगळ्यांमधून विसाव्याचा  हा एक तास केंद्रातल्या मुलांच्या मातांसाठी ‘रीचार्ज’ आणि ‘रीफ्रेश’ करणारा ठरतो. अनिता सूर्यवंशी या शिक्षिकेद्वारा संचालित या उपक्रमात पुरुष मंडळींचा सहभाग वाढावा यासाठी सतत प्रयत्न केला जात असल्याचं स्वप्निल सांगतो.

‘आर्ट-बेस्ड थेरपी’चा (कलांवर आधारित उपचार पद्धती) वापर मुलांच्या, पालकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी कसा करता येईल यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. वेगवेगळे कलाप्रकार- संगीत, नृत्य, नाटय़, इमेज-थिएटर (प्रतिमानाटय़) यांचा वापर स्व-जाणीव, अभिव्यक्ती क्षमता, समुदायाची कल्पना व भावनिक बुद्धय़ांक वाढवण्यासाठी केला जात आहे.

व्यावसायिक विकासाचा भाग म्हणून संस्थेचं काम करता करता २०१६-२०१८ मध्ये ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’तून ‘एलिमेंटरी एज्युकेशन’ विषयात ‘एम.ए.’ केल्यानंतर स्वप्निल सध्या फग्र्युसन महाविद्यालयाद्वारे समुपदेशन मानसशास्त्र शिकत आहे. त्याचा सहकारी सूर्या केंब्रिज विद्यापीठातून मानसशास्त्रविषयक संशोधन करत आहे.

दानशूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या ऐच्छिक देणग्या, तसंच पुणे महानगरपालिका, युनिसेफ, पुणे विद्यापीठ व इतर संस्थांकडून देशभरातील कार्यशाळा-कोर्सेस घेऊन मिळणारं मानधन, याद्वारे स्वप्निलची संस्था आर्थिक स्थैर्यासाठी झटत आहे. २०१९ मध्ये ‘फ्लरिशिंग माईंड्स फाउंडेशन’ म्हणून त्याच्या संस्थेची नोंदणी झाली असून ‘प्रोजेक्ट री-इमॅजिन’ हा मुख्य उपक्रम चालूच आहे. ३ ते ६ वयोगटातील मुलांबरोबर मूलत: काम असलं तरी ६ ते १४ वयाच्या मुलांना शाळाबाह्य़ शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आधार देण्याचं कामही संस्था जोमानं करत आहे. या संस्थेच्या (नव्या) नावाच्या अर्थाप्रमाणेच आनंदी, अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठीच्या शिक्षणाद्वारे कोवळ्या मनांना व समुदायाला उभारी देण्यासाठी, त्यांच्यात स्त्री-पुरुष समतेसारख्या मूल्यांची रुजवात करण्यासाठी धडपडणाऱ्या स्वप्निल आणि त्याच्या सहकाऱ्यांना खूप शुभेच्छा.