News Flash

सुखात सुखावले, दु:खात सावरले

तीस वर्षांपूर्वी अधुरे शिक्षण घेऊन आईबाबांच्या इच्छेखातर सासरी पाऊल टाकले. एम.एस्सी. करण्याची प्रचंड इच्छा होती. कायम वेगळय़ा वाटेने जाणाऱ्या माझ्या प्राध्यापक पतीने मोठय़ा मनाने ती

| March 14, 2015 01:01 am

तीस वर्षांपूर्वी अधुरे शिक्षण घेऊन आईबाबांच्या इच्छेखातर सासरी पाऊल टाकले. एम.एस्सी. करण्याची प्रचंड इच्छा होती. कायम वेगळय़ा वाटेने जाणाऱ्या माझ्या प्राध्यापक पतीने मोठय़ा मनाने ती पूर्ण केली. त्यासाठी मला दूर राहावे लागणार होते; पण भक्कम पाठिंब्यामुळे एम.एस्सी., पुढे बी.एड. पूर्ण झाले. बी.एड.चा निकाल येण्याअगोदरच नोकरीची संधी चालू आली अन् खरी कसरत सुरू झाली.

मराठी संस्कारात वाढलेली मी, नोकरी होती ख्रिस्ती संस्थेत. त्यामुळे प्रचंड शिस्त. सुट्टी घ्यायची म्हणजे दडपण यायचं, त्यामुळे सांसारिक जबाबदाऱ्या, आपले अनेक सणवार, पै-पाहुणे, समारंभ आदी घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना मनाची प्रचंड कुतरओढ व्हायची.
नोकरीसोबतच मातृत्वही लाभलेलं. त्यामुळे जबाबदारी अधिकच वाढलेली. आजही आठवतंय, आजीच्या कुशीत असलेली माझी चार महिन्यांची लेक. मी घरी परतल्यावर चक्क अनोळखी चेहरा समोर आल्यागत तोंड फिरवायची तेव्हा डोळय़ांत पाणी आणण्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हते.
केवळ आर्थिक स्वातंत्र्यासाठी नाही, तर स्व-अस्तित्वासाठीही नोकरी आवश्यक असते, ही भावना ग्रामीण भागात त्या वेळी खिजगणतीतही नव्हती. त्यामुळे नवऱ्याचा पगार कमी पडतो म्हणून नोकरी करावी लागते. घरी फार शेती नसेल, घरच्यांकडे- मुलीकडे दुर्लक्ष करून नोकरी करणे म्हणजे मूर्खपणा, सुट्टी मिळत नाही म्हटलं, तर बाकी लोक नोकरी करतच नाही का? वगैरे दूषणं ऐकतच नोकरी सुरू होती. पुढे दुर्दैवानं दुसरं मूल राहण्यात अडचणी निर्माण होत राहिल्या अन् त्याचंही खापर माझ्या नोकरीवर फोडण्यात येत गेलं; पण आता त्याची सवय झाली होती.
नाही म्हणायला, वाढता बँक बॅलन्स, घरात आधुनिक सुखसुविधा, एकुलत्या एक मुलीची उंचावत चाललेली शैक्षणिक कारकीर्द यामुळे सुख, समाधान मिळत होतं.
एकच अपत्य असल्यामुळे आम्हा दोघांच्याही सर्व भावभावना तिच्याभोवती केंद्रित झाल्या होत्या. त्यातूनच तिच्या भल्यासाठी अकरावीपासून तिला आम्ही बाहेर ठेवलं. आठवतंय, शनिवार आला की, तिला भेटायला ओढ असायची. एका शनिवारी असेच भेटायला गेली असता, रात्री तिचा कान दुखावला लागला. तिचं रडणं सुरू. रात्रभर तिने झोपू दिले नाही. दुसऱ्या दिवशी परत येणं आवश्यक होतं. निघताना तिचा रडका, केविलवाणा, ‘तू जाऊ नको’ हे सांगणारा चेहरा अजूनही विसरू शकलेले नाही. पुढे बारावीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मीही माझ्या नोकरीला दोषी मानू लागले, पण तरीही परिस्थितीतून मार्ग निघतोच. वैद्यकीय क्षेत्र नाही, पण त्याच्याशी जुळणारे जैवतंत्रज्ञानात तिने एम.टेक. पदवी प्राप्त करून माझी ही खंत दूर केली.
नोकरीसोबत आयुष्य पुढे सरकत असताना अनेक सुख-दु:खाच्या प्रसंगांना सामोरी गेले. खूपदा नोकरीमुळे अडचणी उद्भवल्या, ताशेरे ऐकावे लागले; पण उत्तम सहकाऱ्यांमुळे सुखात सुखावले, दु:खात सावरले.

आयुष्यात खूप भरीव कार्य जरी केले नसले तरी असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे निभावल्या. विज्ञान शिक्षिका असल्यामुळे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाविषयी जागरूकता वाढविली. मुळात स्वत: शिस्तप्रिय असल्यामुळे नोकरी करण्याचा ताण नव्हता. सोबत चांगली शाळा व हुशार विद्यार्थी होतेच; पण सणवार, व्रतवैकल्ये, हळदीकुंकू व शाळा यांचा ताळमेळ बसवताना अनेकदा काही गोष्टींना फाटा, प्रसंगी रोषही पत्करावा लागला.
आज या घडीला मात्र मी समाधानी आहे. ‘नोव्हार्टिस’सारख्या प्रख्यात कंपनीत मुलगी उच्चपदस्थ आहे. डॉक्टर पतीसोबत तिचा सुखात संसार सुरू आहे व आम्हाला गोड नातवाची भेट मिळाली आहे. मुलीच्या नोकरीमुळे दोन वर्षांच्या नातवासह आजही आमच्या दोघांचा संसार व नोकरी सुरू आहे.
कांचन हिवंज, अकोला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2015 1:01 am

Web Title: joy and sorrow
Next Stories
1 उन्हाळ्यावर उपाय
2 ऊर्जेचं देणं!
3 वधूच्या शोधात चीन
Just Now!
X