01-badaltanaजोपर्यंत माणूस ध्येयाकडे जाणं चालूच ठेवतो तोपर्यंत तो आनंदयात्री असतो. जीवनात सुख किंवा दु:ख येतात आणि जातात. समाधानाचे क्षण येतात तसेच निराशेचेपण येतात. मात्र प्रवास चालूच असायला हवा. हाती घेतलेलं कर्म धर्म मानायचं ही खरी परीक्षा.

कालचीच गोष्ट. गौरी (माझी पत्नी) मला सांगत होती, ‘‘महेंद्र, तुला नेमकं काय हवंय ते तू आत्तापर्यंत कधीच ठरवू शकला नाहीस. तू जशी वेळ येईल तसे तुझे उद्योग-व्यवसाय बदलत राहिलास. कोणत्याही एका व्यवसायाशी तू स्वत:ला बांधून ठेवले नाहीस. त्यामुळे यापुढील आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं आहे ते ठरवण्याची वेळ आता आली आहे. आणि अजून वेळ गेलेली नाही. तू आत्तासुद्धा हे ठरवू शकतोस.’’ ती सांगत होती ते संपूर्णपणे खरं होतं. त्यात काही चुकीचं नव्हतं. तिने एक आठवण यावेळी सांगितली. त्यावेळी आमच्या विवाह संस्थेच्या माझ्या कामात सातत्य नसे. काही दिवस झाले की मला कामाचा कंटाळा येई. त्यामुळे तिची चिडचीड होणं स्वाभाविक होतं. तेव्हा आम्ही दोघं डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा ते गौरीला म्हणाले होते, ‘‘हे बघ, ही विवाहसंस्था हे तुझं कर्म आहे आणि कर्म करीत राहणं हाच तू धर्म समजलीस तर तुला त्यात आनंद वाटेल. या संस्थेचा विकास हा तुझं ध्यास बनेल आणि महेंद्र असला तर उत्तमच, पण नसला तरी फारशी अडचण तुला येणार नाही. मला पूर्ण कल्पना आहे की या संस्थेचं काम पूर्णवेळ करावं अशी तुझी इच्छा नव्हती. बँक सोडल्यानंतर तुला तुझ्यातल्या कलागुणांना समृद्ध करायचं होतं. पण या गोष्टीची तू जर खंत बाळगलीस तर ना धड याला न्याय मिळेल ना तुझ्या छंद जपण्याला! तुला तुझ्या कर्माची निवड करावीच लागेल.’’

आणि खरोखरीच गौरीने ही संस्था हेच तिचं कर्म मानलं आणि आज ठिकठिकाणी यशस्वी मराठी उद्योजिका म्हणून गौरवली जात आहे. तिच्या व्यवसायवृद्धीत माझ्या कल्पकतेचा आणि विक्रयकलेचा मोठा वाटा आहे हे ती सर्वाना आवर्जून सांगतेही, परंतु तो तिचा मोठेपणा. कोणतीही योजना तयार करणं आणि ती प्रत्यक्षात सातत्याने राबवणं यात जो प्रचंड फरक असतो तोच फरक तिच्या आणि माझ्या यशात आहे, हे मला मान्य करायलाच हवं. हे घरचं उदाहरण मुद्दाम एवढय़ासाठी दिलं की माणसाने स्वत:मध्ये जाणीवपूर्वक बदल घडवून आणण्यासाठी स्वत:चं कर्म निश्चित करणं हे आवश्यक आहे.
महाराष्ट्रभूषण अभय बंग यांनी त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी एक महत्त्वाची घटना लिहिली आहे. त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं. तरीही व्यवसायात मन रमेना. आपल्या आवडीनिवडी- छंद यासाठी काहीतरी करावं असं वाटत राहिलं. मनात संभ्रम होता. आपण जे करतो आहोत त्यात खरोखरीच आनंद मिळणार आहे का? हेच माझं कर्म का? तेव्हा ते आचार्य विनोबा भावे यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेले. आचार्य इतकंच म्हणाले, ‘‘तुला असं वाटतं का की तुझं कर्म दिवा घेऊन तुला शोधता येईल? तुझं कर्म हे तूच निश्चित करायला हवंस. आपण आपलं विहित कर्म घेऊनच जन्माला येतो आणि त्या विहित कर्माचं मनोभावे आचरण म्हणजे तुझा धर्म निभावून नेणं. आध्यात्मात केवळ संसारत्याग अपेक्षित नाही. तुझं कर्म करीत राहणं हाच कर्मयोग.’’
विनोबांनी जो अर्थ सांगितला तसाच किंवा त्या अर्थाचं स्पष्टीकरण न्यूयॉर्कमध्ये बसून अल्बर्ट एलीस या ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञाने केलं होतं, ‘‘मी जे काम करतो ते मनापासून आणि माझ्या आनंदासाठी करतो आणि त्या काम करण्यातून मला विलक्षण आनंद मिळतो.’’
माझे एक स्नेही आहेत. विदुर महाजन. आयुष्यभर सतारीला वाहून घ्यावं, सतत नवं शिकावं, ज्येष्ठ आणि तज्ज्ञ संगीतकारांच्या सहवासात राहावं ही त्यांची मनोकामना. परंतु व्यवसाय-संसार या गोष्टी बंधन ठरू पाहात होत्या. एक दिवस व्यवसायाच्या दगदगीतून बाहेर पडण्याची संधी मिळाली आणि संसारापुरते पैसेही मिळाले. तेव्हापासून त्यांना मुलगी नेहा आणि पत्नी अपर्णा साऱ्यांनीच मनापासून साथ केली. आणि ते जिथे सतार सारखं वाद्य अजिबात पोहोचलेलं नाही त्या बुल्गेरिया देशात रसिकांसाठी एक आगळी मैफल रंगवून आले. आणि यापुढे साधं ‘सतारमय’ जगणं, थोडय़ा मुलांना शिकवणं हेच त्यांनी त्यांचं विहित कर्म मानलं आहे आणि हा कर्मयोग चालू आहे. त्यात त्यांना त्यांचं आनंदाचं गणित जमून गेलं आहे, त्यांच्या वीस वर्षांच्या गुरूंनीही त्यांना कधी मनसोक्त दाद दिली नाही. त्याचं त्यांना वाईट जरूर वाटतं, परंतु कार्याचा गौरव त्यांच्या गुरुजनांनी केलाच पाहिजे, असा त्यांचा आग्रह नाही की हट्टही नाही. त्यामुळे ते त्यांच्या दाद न देण्याने निराश किंवा खिन्न होताना दिसत नाहीत. दाद मिळाली असती तर नक्की बरं वाटलं असतं, पण नाही मिळाली. बस इतकंच स्वगत.
स्टीवन कोव्हे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखकाच्या ‘प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तींच्या सात सवयी’ या पुस्तकात त्यांनी दिलेला ‘प्रत्येक माणसाचं स्वत:चं असं जीवनध्येय असलं पाहिजे’ हा आग्रह असो वा ‘माझ्या मृत्यूनंतर इतरांनी काय श्रद्धांजली वहावी असं तुम्हाला वाटतं ?’ हा गृहपाठ असो सर्व आपल्या कर्माच्या निश्चितीशी आणि धर्मपालनाशी निगडित आहेत. अल्बर्ट एलीस तर सांगतो, ‘‘माणसं जेव्हा त्यांचं जीवनध्येय निश्चित करतात आणि ते साध्य करण्यासाठी जिवाचं रान करतात तो त्यांचा प्रवास म्हणजे आनंद.’’ मग त्यात अडथळे येतील, कधी पाऊल मागे घ्यावं लागेल, पण जोपर्यंत माणूस ध्येयाकडे जाणं चालूच ठेवतो तोपर्यंत तो आनंदयात्रीच असतो. जीवनात सुख किंवा दु:ख येतं आणि जातं. समाधानाचे क्षण येतात तसेच निराशेचे पण. मात्र प्रवास चालूच असायला हवा. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ हे जीवन आहे. पण असं असलं तरी हाती घेतलेलं कर्म हे धर्म मानायचं ही खरी परीक्षा. चातुर्मासाच्या व्रतात अनेक कथा आहेत. त्यात जसा उल्लेख असतो ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही’, त्या धर्तीवर जर आपण स्वत:मध्ये बदल घडवताना ‘उतणार नाही, मातणार नाही, हाती घेतलेलं कर्म पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही’ अशी स्वयं सूचना दिली तर कर्म-धर्म संयोग साधेल.
मला नेहमी प्रश्न पडतो की जर हे सारं मी अभ्यासलं आहे. त्याबद्दलची अनेक पुस्तकं वाचली आहेत. या विषयावर बोलून अनेक प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. तरी प्रत्यक्ष जगताना मी जे बोलतो तसं वागत का नाही? हाच प्रश्न मला अनेक प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तींनी विचारला. हे प्रत्यक्ष जीवनात उतरवणं जमत का नाही?
मी माझा स्वत:चा शोध घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी फक्त माझ्या गुणांचाच विचार करतो. माझं ज्ञान (माहिती?) गोळा करण्याचा सतत प्रयत्न करतो. माझ्याकडे असलेली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोप्या भाषेत (मला शक्य तितक्या) पोचवायचा प्रयत्न करतो.
माझी प्रेझेन्टेशन्स अधिक चांगली व्हावीत याचा प्रयत्न करतो. माझी वक्तृत्व कला वाढवण्याचा, अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्या स्वभावातील खोलवर मुरलेल्या दोषांचं काय? ते निदान कमी व्हावेत यासाठी कधी वेळ काढणार?
माझं जसं होतं तसंच इतर अनेकांचं होत असावं असा माझा अंदाज आहे. युग स्पर्धेचं असल्याने मी इतरांपेक्षा किती चांगला हे सिद्ध करण्यात माझी तरी सर्वाधिक ऊर्जा खर्च होते आणि माझे काही मित्र-मैत्रिणी मी इतका चांगला/ली असून सुद्धा इतरांच्या तुलनेत मागे का? या प्रश्नाचा शोध घेण्यात व्यग्र असतात.
या दोन्ही गोष्टी माझ्यातील बदलांसाठी मारक आहेत. जेव्हा ‘मीच चांगला’ हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा त्याचबरोबर मी अमक्या-तमक्यापेक्षा चांगला असं काहीतरी करीत असतो. दुसऱ्या गटातले मित्र-मैत्रिणी मी कसा चांगला/ली आहे अमक्या-तमक्यापेक्षा ही तुलना करण्यात वेळ घालवत असतात किंवा प्राक्तन/नियती/नशीब वगैरे गोष्टींवर खापर फोडतात.
त्याऐवजी मी माझ्यात नेमकं काय कमी आहे याचा शोध घेतला तर माझ्यात नेमकं कोणकोणते बदल करावे लागणार आहेत याचा अंदाज येऊ शकेल. मी याबद्दल माझंच उदाहरण देतो.
मी सर्वप्रथम माझ्यात नेमकं काय कमी आहे त्याची यादी केली. माझ्यातल्या कमतरता शोधल्या.
१. चूक झाली तर स्वत:लाच माफ करणं.
२. झालेल्या चुकांमधून न शिकणं.
३. सातत्याचा अभाव.
४. सतत तुलना.
५. उतावळेपणा.
६. धरसोड वृत्ती .
७. माझ्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणजे फाजील आत्मविश्वास.
ही यादी करून फक्त थांबलो नाही तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रामाणिक प्रयत्न अहं-इतरांना दाखवण्यासाठी नाही तर स्वत:साठी. जो बदल सर्वात सोपा तो आधी करायचा असं ठरवलं. आणि गेले सात महिने तो अमलात आणण्यात यशस्वी झालो आहे. केवळ स्मरणशक्तीवर मी अवलंबून राहात नाही, जगातील अनेक विषयांत मला कळत नाही आणि अशी परिस्थिती असेल तेव्हा इतरांकडून माहिती घ्यायला मी लाजत नाही. भाषण असेल तर टिपणं काढतो, लेख असेल तर पुन्हा एकदा वाचल्याशिवाय संपादकांकडे पाठवीत नाही. प्रत्येकाने मला चांगलंच म्हणलं पाहिजे, हा आग्रह मी सोडून दिला आहे.
असं करता करता एक दिवस असा येईल की माझ्या दोषांना सीमित करण्यात मी यशस्वी ठरेन. माझा प्रवास थांबणार नाही. आता फक्त बदलाची दिशा बदलेल. दुर्गुण कमी करण्याऐवजी पुन्हा गुण आत्मसात करायला सुरुवात करावी लागेल. नित्य नवा दिस जागृतीचा बनेल.