12-nivruttiनोकरीत असताना माझा यंत्रमानव झाला होता. अखेर कंटाळून आर्थिक गणिते जुळल्यावर मनमुराद आयुष्य जगण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मग अनेक प्रकारच्या यंत्रांशी आणि अवजारांशी दोस्ती करत माझ्या दुसऱ्या इनिंगमधील माझ्या उद्योगपर्वाला सुरुवात केली. 

माझा मोठा, ऐसपस म्हणता येईल असा टेरेस फ्लॅट असल्याने गच्चीत झाडे होतीच. आता तेथे उत्साहाने बागकाम सुरू केले. तिथे जीव ओतला आणि लवकरच डािळब, पेरू, लिंबू, सीताफळ यासारख्या फळांनी बाग बहरली. तसेच घरच्या फ्लॉवर, मिरच्या, कारलं, टोमॅटोंनी जेवणाची रंगत वाढवली. शिवाय प्राजक्त, झेंडू, गुलाब, रातराणी, सोनटक्कासारख्या फुलांनी गच्ची सुशोभित आणि सुगंधी केली. बागेत काम करताना भोवताली पक्ष्यांची किलबिल मन प्रसन्न करी. तिथेच माझ्या पक्षीनिरीक्षणाच्या छंदाला सुरुवात झाली. सनबर्ड पक्षी फक्त मधासाठीच फुलझाडांकडे वळतात हा शोध मला नव्यानेच लागला. एकदा वाढलेल्या ख्रिसमस ट्रीवर Red Whisker  (बुलबुल) ने घरटे बांधून अंडी ठेवल्याचे आढळले. तेव्हा एक प्रयोग करायचे ठरवले. घरटय़ावर अलगदपणे वेबकॅम लावून अंडी उबवण्यापासून पिल्ले उडून जाईपर्यंतचे चित्रण मी टिपले. नंतर मूव्ही मेकर सॉफ्टवेअरच्या साहाय्याने संगतवार त्या दृश्यांपासून छोटी फिल्म बनवायला शिकलो आणि ती ‘यू-टय़ूूब’वर टाकली. त्याच सुमारास फिशटँकमधल्या फायटर जातीच्या माशांकडे लक्ष गेले. त्यांच्या जरा हटके प्रकारातील ब्रीिडग पद्धतीचेही शूटिंग करून त्याचीही फिल्म बनवली.
गच्चीची सफाई करताना मोठय़ा कुंडय़ा हलवण्यास त्रास होई. एकदा त्यावर तोडगा काढायचे ठरवून माळ्यावरील लाकडे काढली. बाजारातून सुतारकामाचे जुजबी साहित्य आणून वॉशिंग मशीन-फ्रीजखाली असतात तशा चाकाच्या ट्रॉलीज या अवजड कुंडय़ांखाली ठेवायला बनवल्या. त्यामुळे दोन फायदे झाले. हलवाहलव सोपी झाली आणि सुतारकाम शिकण्याचा उत्साह वाढला. त्याच उत्साहाने गच्चीतील इतस्तत: पडलेल्या माझ्या प्रयोगासाठीच्या अवजारांसाठी घरातील जुन्या लाकडांतूनच सोयीप्रमाणे छोटय़ा-मोठय़ा ड्रॉवरचे टुमदार असे भिंतीवरचे कपाट बनवले. व्यावसायिक सुतारांइतके ते सफाईदार नसले तरी माझ्या उपयोगाचे आणि अतीव समाधान देणारे आहे.
असेच एकदा अडगळीत पडलेल्या पोर्टेबल कूलरकडे लक्ष गेले आणि पुन्हा एक कल्पना सुचली. समोरच्या दोन बाजू वरतून तुटल्या होत्या. उरलेल्या उभ्या काटकोनी भागावर व्हाइट सीमेंटचे ओबडधोबड थर लावून त्यावर मधेमधे गोटय़ा चिकटवल्या. पंप लावून पाणी वाहतं केले. तेव्हा धबधब्याचा आभास निर्माण झाला. त्यात फिशटँकमधले मासे सोडले. घरच्या गणपतीची आरास म्हणून ठेवले तेव्हा बघणाऱ्याचा क्षणभर विश्वासच बसला नाही. लहानपणीची हातातील चित्रकला जगण्याच्या धडपडीत विस्मृतीत गेली होती. तिला पुन्हा आजमावण्यासाठी चित्रकार पुतणीकडून कॅन्व्हॉस, रंग-कुंचले मागवले काही दिवस रंगांशी मुक्तपणे खेळलो. आणि दोन लँडस्केप बनवून गच्चीच्या भिंतीवर लावली. नेमके तेव्हाच भावाने त्याच्या घरातील लाकडी आभासाचे कार्पेट माझ्या उद्योगासाठी आणून दिले. त्याच्यावरही मी याच रंगांच्या साहाय्याने झकासपैकी सूर्यास्ताचा कोकणकिनारा रंगवून दुसऱ्या भिंतीवर लावला तेव्हा कॅन्व्हॉसवरचे पेंटिंग त्याच्यापुढे फिके पडले. बागेचा भाग सोडून उर्वरित गच्चीवर म्हणजेच माझ्या प्रयोगशाळेत उरलेले कार्पेट स्वत:च चिकटवले. स्वत:च्या मेहनतीने लावल्यामुळे पायघडय़ांचाच भास होतो. आजकाल लाकडी कोरीव काम शिकतोय. सुतारकामानंतर लाकडाचे जे छोटे छोटे तुकडे निघतात त्यातून नातवंडांसाठी प्राणी-पक्ष्यांच्या आकाराची खेळणी बनवण्याच्या उद्योगात आहे. त्यामुळे नातवंडांचा लाडका बनलोय.
बदलीच्या नोकरीमुळे जुजबी स्वयंपाक करताना इतरही नवनवे पदार्थ करायला शिकलो. पण आता मात्र आमच्या गृहमंत्र्यांनी किचनमध्ये शिरण्यास मज्जाव केल्याने कधी बहिणीकडे किंवा वहिनीकडे गेलो तर स्वत:हून ‘आज तुम्ही आराम करा. मी स्वयंपाक करतो’ असे सुचवून बघतो. पण तिथेही सहसा माझी डाळ शिजत नाही. मात्र आम्ही मित्रमंडळी जेव्हा त्यांच्या फार्महाऊसवर जातो तेव्हा माझे स्वयंपाकातील प्रयोग सुरू होतात.
वर सांगितलेल्या उद्योगात आजवर एक पथ्य मी आवर्जून पाळले. पर्यावरणाचे रक्षण करतानाच जे काही बनवले ते शक्यतो टाकाऊतून-टिकाऊ आणि दिखाऊ. असे करण्याचाच प्रयत्न केला. वयाला विसरून सतत नवीन काही करण्याच्या, शिकण्याच्या जिज्ञासेपोटी उद्योगपर्वातील माझा प्रत्येक दिवस नवीन कल्पना सुचवीत सुरू होतो आणि आकाशातील ताऱ्यांच्या मांडवाखाली माझ्या प्रयोगशाळेतील आरामखुर्चीत उशिरापर्यंत माझ्या लाडक्या पुस्तकांच्या संगतीत संपतो.