News Flash

जंगलकन्या!

१ मे २०२१. अवघा महाराष्ट्र सुट्टीचा आस्वाद घेत होता आणि ताडोबाच्या जंगलात १० जणांचं एक पथक पानगळ तुडवत झपाझप चाललं होतं.

जंगलकन्या!

|| अनंत सोनवणे
वाघ या रुबाबदार प्राण्याचं दर्शन जितकं  रोमांचित करणारं, तितकं च भीतीने धडकी भरवणारंही. ताडोबा जंगलात येथील वाघांच्या संरक्षणासाठी अनेक जणी काम करत आहेत. वाघांना नुसतं पाहाणं नाही तर प्रत्यक्ष वाघांबरोबर काम करणं हे एकाच वेळी आव्हानात्मक आणि समाधान देणारं आहे. आरएफओ मनीषा जाधव, जीवशास्त्रज्ञ प्राजक्ता हुशंगाबादकर, वनरक्षक शीतल कुडमेथे आणि त्यांच्यासारख्या इतर काही जणींच्या प्रत्यक्ष कामाशिवाय ताडोबा परिसरात ‘गाईड’चं काम करणाऱ्या १३ स्थानिक स्त्रियाही जंगल आणि पर्यटकांमधला दुवा ठरत आहेत. निबिड जंगलात वेळीअवेळी कर्तव्य बजावताना या स्त्रियांचं जीवन समृद्ध करणाऱ्या थरारक अनुभवांवरचा हा लेख २९ जुलैच्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्ताने...

१ मे २०२१. अवघा महाराष्ट्र सुट्टीचा आस्वाद घेत होता आणि ताडोबाच्या जंगलात १० जणांचं एक पथक पानगळ तुडवत झपाझप चाललं होतं. सकाळचे ११ वाजलेले. पण वैदर्भीय ऊन अंग जाळून काढत होतं. भोवताली किर्र शांतता आणि तिला भेदणारा वाळल्या पानांच्या गालिच्यावर उमटणारा करकरीत पायरव… पथकात ८ पुरुष, २ स्त्रिया. काही जणांच्या हातात काठ्या. सर्वांच्या नजरा सावध. कान टवकारलेले. त्यांच्या मागून मी. पायांवर, चेहऱ्यावर उमटणारे बांबूचे ओरखडे टाळण्याचा केविलवाणा प्रयत्न करत. मुख्य वाटेपासून आम्ही जेमतेम १५० मीटर आत घुसलेलो. पण तेवढ्यातच माझं दिशांचं भान पुरतं हरपलेलं. कुठून त्या रानात घुसलो आणि कुठे चाललोय, काही सुधरेना.

‘‘सर, युनिटच्या सोबत चाला. मागे राहू नका.’’ रेंज फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) मनीषा जाधव यांच्या आवाजानं भानावर आलो.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या ‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स’बरोबर (एसटीपीएफ) मी गस्तीवर निघालो होतो. एसटीपीएफच्या या युनिटचं नेतृत्व करत होत्या आरएफओ मनीषा. मूळच्या नाशिकच्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन वनसेवेत आलेल्या. आधी राष्ट्रीय फुटबॉल संघात खेळलेल्या. हवाईदलात जायचं स्वप्न बाळगणाऱ्या. वनविभागाच्या खडतर ट्रेनिंगनंतर पहिलीच पोस्टिंग ताडोबात!

अर्ध्या तासापूर्वी खातोडा गेटजवळ मी आणि आरएफओ मनीषा बोलत बसलो होतो. त्यांच्या युनिटचे सदस्य खबर घेऊन आले, ‘लारानं शिकार केलीय!’ लारा म्हणजे ताडोबातली एक तरुण, देखणी लेकुरवाळी वाघीण. शिकार केल्यावर लारा निघाली होती ती थेट आम्ही बसलो होतो त्याच दिशेनं. गेटजवळ असलेल्या पाणवठ्याकडे. युनिटनं खबर दिली आणि आरएफओ मनीषा गाडीतून कॅमेरा काढून गेटकडे वळल्या. मी त्यांच्यासोबत. मागे अवघं युनिट श्वास रोखून बसलेलं. अवघी काही सेकंदांची अस्वस्थ प्रतीक्षा आणि गेटच्या उजव्या बाजूच्या झाडीतून ती बाहेर आली!  उन्हात तिचा पट्टेदार देह झळाळला. आमच्यापासून फक्त १०० फूट अंतरावर. रस्त्यालगतच्या गवतातून शांतपणे चालत ती डांबरी रस्त्यावर आली. आमच्या दिशेनं एक दृष्टिक्षेप टाकला आणि रस्ता ओलांडून पाणवठ्याकडे गेली. इतक्यात पुन्हा उजव्या बाजूला हालचाल झाली. झाडीतून एक पिल्लू रस्त्यावर आलं. अवघं पाचेक महिन्यांचं. मग एकामागोमाग एक आणखी तीन पिल्लं! चौघंही दुडूदुडू धावत आईच्या मागून पाणवठ्यावर गेली.

कॅमेरा बंद करून मनीषा वेगानं गाडीच्या दिशेनं निघाल्या. टीमला त्यांनी पटकन निघण्याची सूचना केली. मी गाडीत बसताच त्या म्हणाल्या, ‘‘हीच योग्य वेळ आहे त्या वाघिणीने के लेल्या शिकारीकडे जाण्याची.’’ वाघांच्या संरक्षणाची जबाबदारी एसटीपीएफ चमूच्या खांद्यांवर असते. त्यासाठी ऊन, वारा, पाऊस, वन्यप्राण्यांपासूनचा धोका, यांची पर्वा न करता दैनंदिन गस्त तर घालायची असतेच, शिवाय वाघानं शिकार केली की त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहाणीसुद्धा करायची असते. विशेषत: गावाजवळ झालेल्या शिकारीची अधिक काळजीपूर्वक पाहाणी करावी लागते. कारण भक्ष्यावर विष टाकून वाघाचीच शिकार केली जाण्याची शक्यता असते. वाघानं एखाद्या पाळीव गुराची शिकार केली असेल, तर त्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून देखरेख ठेवली जाते. आताही लारा आणि पिल्लं पाणवठ्यावर गेल्याची संधी साधून आम्ही भक्ष्याची तपासणी करायला निघालो होतो.

एसटीपीएफचे जवान वाघाचा मागोवा घेण्यात पटाईत. वाटेतल्या खाणाखुणांची उकल करत त्यांनी आम्हाला बांबूच्या एका बेटाजवळ आणलं. बेटाच्या बुडाशी लारानं तिचं भक्ष्य दडवलं होतं. तो एक छोटा गवा होता, अजून पुरता वयात न आलेला. डोळे सताड उघडे. पाय ताणलेले. मागचा काही भाग खाल्लेला. विशेष म्हणजे मृतदेहावर पालापाचोळा पसरून तो लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मनीषा म्हणाल्या, ‘‘वाघ हा अत्यंत हुशार प्राणी आहे. मांसाचा वास बाहेर जाऊ नये आणि परिसरातले स्पर्धक वाघ, बिबटे, इतर मांसभक्षी प्राण्यांना सुगावा लागू नये, म्हणून लारानं ही काळजी घेतलीय.’’ या काळजीचाच एक भाग म्हणून शिकार केल्यानंतर वाघ शिकारीपासून फार काळ दूर जात नाही. त्यामुळे एसटीपीएफला काम झटपट पूर्ण करावं लागतं. आताही युनिटनं पटापट निरीक्षणं नोंदवली आणि आम्ही तिथून निघालो. संध्याकाळी मी गेटवरच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. तेव्हा समजलं, सकाळी आमच्या समोर पाणवठ्यावर आलेली लारा अवघ्या १० मिनिटांत पिलांना घेऊन शिकारीच्या ठिकाणी परतली होती!

गस्तीदरम्यान आम्ही काही पाणवठ्यांनाही भेट दिली. मनीषा म्हणाल्या, ‘‘वाघाची शिकार करण्यासाठी कोणी पाण्यात विष तर मिसळलेलं नाही ना, हे आम्ही लिटमस पेपरच्या सहाय्यानं तपासतो. तसंच पाणवठ्याच्या वाटेवर शिकाऱ्यांनी सापळा लावलेला नाही ना, हेसुद्धा पाहातो.’’ याशिवाय पाणवठ्यात पुरेसं पाणी आहे का?, सोलर पंप सुरूआहे का?, तिथले कॅमेरा ट्रॅप जागेवर व व्यवस्थित सुरूआहेत का?, हेदेखील पाहिलं जातं. कधी एखाद्या विशिष्ट वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवायचं असतं. कधी वन्यजीव-मानव संघर्षाच्या प्रसंगी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जायचं असतं, तर कधी जंगलात घुसखोरी करणाऱ्यांना रोखायचं असतं. अशा प्रत्येक वेळी एसटीपीएफ आघाडीवर असते. अशा तणावग्रस्त प्रसंगात युनिटच्या सदस्यांना मारहाण होणं, गाडीवर हल्ला होणं, असंही घडतं कधी. या परिस्थितीलाही मनीषा धीरानं सामोऱ्या गेल्यात.

त्या सांगतात, ‘‘प्रशिक्षणादरम्यान मी देशातल्या १३ व्याघ्र प्रकल्पांना भेट दिली होती, पण एकही वाघ दिसला नव्हता! ताडोबात पोस्टिंग मिळाल्यावर देवाचे आभार मानले. इथं वाघ रोज फक्त दिसणारच नव्हता, तर त्याच्याबरोबर काम करायची संधी होती.’’ अर्थात हे काम सोपं नव्हतं. एका बाहेरून आलेल्या, अननुभवी तरुण स्त्रीसाठी तर आणखीनच कठीण. सर्वांत पहिलं आव्हान होतं युनिटचा विश्वास संपादन करण्याचं. मनीषा स्वत: फील्डवर उतरल्या. प्रत्येक ऑपरेशनमध्ये आघाडीवर राहून नेतृत्व केलं. युनिटबरोबर पॅट्रोलिंग केलं, छातीइतक्या पाण्यातून फिरायला लागलं, घनदाट जंगलात संरक्षण कुटींवर स्टाफसोबत राहिल्या. हळूहळू युनिटबरोबर सूर जुळले. त्याचवेळी वाघाबरोबरही नातं जोडलं गेलं. मनीषा म्हणतात, ‘‘वाघाला मी रोज पाहाते. पण मन भरत नाही. किती देखणा, रुबाबदार प्राणी. खराखुरा जंटलमन! तरी किती बिचारा! कोणीच त्याला पूर्णपणे समजावून घेऊ शकत नाही.’’ वाघाचा विषय निघाला की मनीषा कधी आक्रमक होऊन बोलतात तर  क्वचित हळव्या होऊनसुद्धा. ‘‘एकदा छोटी तारा नावाची वाघीण माझ्यापासून शे-दीडशे फूट अंतरावर बसली होती. तिच्या छातीजवळ जखम झाली होती. तिला ती जखम चाटून साफ करता येत नव्हती. आम्ही दोघी एकमेकींकडे बघत बसलो होतो. नि:शब्द संवाद! तिची नजर आद्र. माझ्या नजरेत अगतिकता. मी तिला काहीच मदत करू शकत नव्हते. दोघीही चक्क तीन तास तशाच बसून. शेवटी निघताना मनात म्हटलं, ‘काळजी करू नकोस. होशील तू बरी.’ कालांतरानं पुन्हा दिसली, तेव्हा तिची जखम बरी झाली होती.’’

हळूहळू इथल्या वाघांशी माझं नातं इतकं घट्ट झालं, की कामाच्या आणि वेळेच्या चौकटी गळून पडल्या. मनीषा सांगतात, ‘‘एकदा एका बछड्याला ‘कॉलर’ लावायची होती. मी त्या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. त्याला ‘डार्ट’नं बेशुद्ध करण्यात आलं. रक्तदाब, तापमान, लांबी, उंची, सुळ्यांची लांबी मोजणं, असं सारं सुरू होतं. अचानक त्या बछड्याचा भाऊ आक्रमक होत धावून यायला लागला. म्हणून या बछड्याला थोडं दूर न्यावं असं ठरलं. त्याला स्ट्रेचरवर घेऊन आम्ही उचलायला लागलो. त्याचा एक पाय स्ट्रेचरवरून बाहेर आला. मी तो उचलून स्ट्रेचरवर ठेवायला गेले, तर तो एक पायच मला किती जड लागला! जेमतेम दीड वर्षांचा तो बछडा. पण वजन १७६ किलो. त्याची जीभ बाहेर आली होती. म्हणून ती जबड्यात सारण्यासाठी मी जीभेला हात लावला. ओह! तो खरखरीत स्पर्श. कधीही न विसरता येणारा अनुभव!’’ अशा अनेकानेक अनुभवांनी जीवनसमृद्ध होत असतानाच कामाच्या तणावानं कधी खचायला नाही का होत? यावर मनीषा हसून उत्तर देतात, ‘‘मला वाघ आवडतो. त्याच्यासोबत काम करणं आवडतं. इथं मला माझ्या आवडीचं काम करायला मिळतं आणि वर पगारही मिळतो. आणखी काय हवं!’’

मनीषासारखीच कामात झोकून देणारी आणखी एक तरुणी मला ताडोबात भेटली. प्राजक्ता हुशंगाबादकर. मनीषांचं काम वाघांच्या संरक्षणाचं, तर प्राजक्ता यांचं ‘टायगर मॉनिटरिंग’चं. प्राजक्ता ताडोबाच्या जीवशास्त्रज्ञ. मूळच्या अमरावतीच्या. गेली दहा वर्षं वाघांबरोबर काम करत आहेत. उत्तरांचलपासून महाराष्ट्रापर्यंत विविध भोगौलिक प्रदेशांत त्यांनी काम केलंय. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातसुद्धा. प्रत्येक ठिकाणचं जंगल वेगळं, माणसं वेगळी, अडचणीही वेगळ्या. उत्तरांचलला दोन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर त्यांनी काम केलंय. पहाडी परिसर. तापमान दोन-तीन अंशापर्यंत उतरणारं. हाडं गोठवणारं, तर मध्य भारतात ४५-४७ अंशांपर्यंत जाणारं तापमान. कातडी भाजून काढणारं. पण ही पठ्ठी कुठेही डगमगली नाही!  मुलगी म्हणून कुणी वेगळं वागवावं, कामात सवलत द्यावी, अशी अपेक्षा बाळगली नाही.

जीवशास्त्रज्ञ म्हणून प्राजक्तांचं मुख्य काम असतं कॅमेरा ट्रॅपिंगचं. व्याघ्रगणनेसाठी पंजांचे ठसे, पाणवठ्यावरची गणना या पद्धतींची जागा आता कॅमेरा ट्रॅपिंगनं घेतलीय. हे काम बरंचसं तांत्रिक आणि खूप मेहनतीचं. टायगर मॉनिटरिंगसाठी विशिष्ट प्रकारचे कॅमेरे वापरले जातात. हे कॅमेरे छोट्यातली छोटी हालचाल अचूक टिपतात. रात्रीसुद्धा. जंगलात ज्या रस्त्यावर वाघाचा वावर असतो त्याच्या दोन्ही बाजूंना एक-एक कॅमेरा लावला जातो. रस्त्याच्या मध्यापासून तीन ते पाच मीटर अंतरावर. जमिनीपासून दीड ते दोन फूट उंचीवर. दोन्ही कॅमेरे अगदी समोरासमोर लावत नाहीत. तसं केलं तर एकमेकांच्या फ्लॅशनं ते एकमेकांचे फोटो खराब करतात. म्हणून किंचित तिरपा कोन साधतात. पण एकाच वाटेवर दोन कॅमेरे का? प्राजक्ता याचं उत्तर देतात, ‘‘आम्हाला वाघाचे दोन्ही बाजूंनी फोटो हवे असतात. प्रत्येक माणसाच्या तळहातावरच्या रेषा वेगळ्या असतात. तसाच प्रत्येक वाघाच्या शरीरावरच्या पट्ट्यांचा ‘पॅटर्न’ वेगळा असतो. तो विशिष्ट पॅटर्नच त्या वाघाची ओळख ठरवतो.’’ संपूर्ण जंगलात असे शेकडो कॅमेरे लावले जातात. त्यातल्या मेमरी कार्डवर महिनाभर दिवसरात्र प्राण्यांच्या हालचाली टिपल्या जातात. असे अक्षरश: लाखो फोटो गोळा होतात. संगणकावर त्यांचं वर्गीकरण होतं. मग विशिष्ट सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं फोटोंमधल्या वाघांची ओळख पटवली जाते. जमा झालेल्या डेटाचं सांख्यिकी विश्लेषण केलं जातं. या विश्लेषणाच्या आधारावर जंगलात किती वाघ आहेत, याचा आकडा निश्चित होतो.

विश्लेषण आणि अहवालाचं काम तासन्तास ऑफिसमध्ये बसून करावं लागतं, तर कॅमेरे लावणं, त्यांची देखरेख, यासाठी प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं. कॅमेरा ट्रॅपिंगसाठी प्राजक्ता यांच्याबरोबर मी अनेकदा जंगलात गेलोय. प्रत्येक वेळी त्यांचा कामाचा (पान ४ वर) (पान १ वरून)   झपाटा पाहून अवाक् झालोय. सकाळी सहा-सात वाजता जंगलात गेलो, की संध्याकाळी अंधार पडल्यावरच आम्ही घरी परतायचो. त्या दिवसाचं ठरवलेलं काम पूर्ण होईपर्यंत जंगलातून बाहेर पडायचं नाही, असा प्राजक्तांचा नियम. दिवसभर त्या जेवणारसुद्धा नाहीत! हातात ‘जीपीएस’ यंत्र घेऊन प्रत्येक कॅमेरा योग्य ठिकाणी लागलाय ना,  कॅ मेऱ्याचा अँगल बरोबर आहे ना, बॅटरी पुरेशी चाज्र्ड आहे ना, मेमरी कार्ड चालतंय ना… प्रत्येक गोष्ट स्वत: बारकाईनं तपासणार. एखादी त्रुटी आढळली तर संबंधिताची हजेरी घेणार. त्या म्हणतात, ‘‘मला माझं काम आवडतं आणि ते मी मनापासून करते. इतरांनीही तसं करावं, एवढीच माझी अपेक्षा असते. कारण हे ‘टीमवर्क’ आहे.’’ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचं कामही त्या मनापासून करतात.

एके ठिकाणी आम्ही कॅमेरे तपासण्यासाठी गेलो होतो. वनरक्षक म्हणाले, ‘‘या जंगलात गाडीवाट नाही. तुम्ही कसे जाणार?’’ त्यावर प्राजक्ता म्हणाल्या, ‘‘बाइक जाते ना? मग बाइकवर जाऊ.’’ तीन मोटारसायकल मागवण्यात आल्या. त्यावर आम्ही सहा जण गेलो आणि काम पूर्ण करून आलो. छान ‘खडखडीत’ प्रवास झाला! काही ठिकाणी दुचाकी जाण्यासारखीही परिस्थिती नसायची. तिथे चालत जायचं. कधी चार-चार किलोमीटर चालायचं. वाट अर्थातच खडबडीत, काट्याकुट्याची. वर रणरणतं ऊन. पण प्राजक्तांचा उत्साह कायम. सगळ्यात पुढे. चौफेर सावध नजर. कुठे धोका वाटला, तर ‘‘अनंतदा, तू गाडीतच थांब,’’ असं फर्मान सोडणार. वाटेत आजूबाजूची झाडंझुडपं, पक्षी, कीटक यांची माहिती देणार. एखाद्या ठिकाणी विष्ठा दिसली, तर ती कोणाची असेल, यावर चर्चा करणार. इतकी वर्षं जंगलात काम करून त्यांची नजर तयार झालेली. छोटीशीही हालचाल नजरेतून सुटत नाही. कधी तेंदू फळांवर ताव मारणारं अस्वल दाखवतील, कधी पानांत दडलेलं घुबड, तर कधी दगडाखालचा विंचू. बेडूक आणि पाली विशेष प्रिय!

वाघाशी लपाछपी तर रोजचीच.  त्या एक आठवण सांगतात,‘‘एकदा आम्ही एका पाणवठ्यावर कॅमेरा ट्रॅप तपासत होतो. मेमरी कार्ड काढलं आणि कार्ड रीडरमध्ये टाकत होते. इतक्यात माझा सहकारी रोशनदाला कसलासा आवाज आला. तो म्हणाला,‘ लगेच गाडीत बसा.’ आम्ही गाडीत बसलो आणि त्या पाणवठ्याभोवती चक्कर मारली. अवघी दोन मिनिटं लागली आम्हाला मूळ जागेवर परत यायला. पाहाते, तर मी जिथं बसले होते, बरोबर त्याच ठिकाणी वाघीण येऊन बसली होती! म्हणजे एवढा वेळ ती मला बघत होती. अगदी जवळून!’’

‘ताडोबा’त मला भेटली आणखी एक अशीच ‘डेअरडेव्हिल’ तरुणी. वनरक्षक शीतल कुडमेथे. चंद्रपूरचीच गोंड आदिवासी. लहान चणीची, चुणचुणीत. धावण्याचं वेड होतं. वनरक्षकाच्या परीक्षेत तीन किलोमीटर धावायचं होतं. स्पर्धा मानून सहभागी झाली आणि दुसरी आली. पहिल्या निवड यादीत नाव लागलं. तेसुद्धा खुल्या प्रवर्गात. पहिलीच पोस्टिंग ताडोबा रेंजमध्ये. वाघांच्या या घनगर्द अधिवासात कसं काम करायचं? सुरुवातीचे दिवस अक्षरश: रडून, भेदरून घालवले. त्याच शीतल आता जंगलाच्या कानाकोपऱ्यात बिनधास्त फिरतात. त्यांच्या मोटारसायकलची फायरिंग ऐकली की त्यांचे सहकारी कौतुकानं म्हणतात, ‘‘आली आमची लेडी सिंघम!’’

जंगलात दररोज गस्त घालणं हे वनरक्षक म्हणून शीतल यांचं मुख्य काम. वन्यप्राणी, वनस्पती यांची सुरक्षितता ही प्रमुख जबाबदारी. गस्तीदरम्यान वाघाशी सामना होण्याचा प्रसंग वारंवार येतो. एकदा शीतल आणि त्यांचा मदतनीस दुचाकीवरून निघाले होते. एका वळणावर रस्त्याच्या कडेला बसलेला वाघ त्यांना दिसला नाही. त्यांना येताना बघून वाघ दचकला. उठून त्यांच्या दिशेनं धावायला लागला. मदतनीसानं घाबरून पटकन ब्रेक दाबला आणि दुचाकी घसरली. दोघंही खाली पडली. तसा वाघ जागीच थबकला आणि पुन्हा मागे गेला. ही दोघं सावकाश उठली. दुचाकी उचलून माघारी जायला वळली. तसा वाघ पुन्हा यांच्या दिशेनं यायला लागला. दोघं लगेच जवळच्या मचाणावर चढली. वाघ काही वेळ त्यांच्याकडे बघत राहिला. नंतर निवांत चालत निघून गेला. तेव्हा कुठे दोघांच्या जिवात जीव आला.

पर्यटक गाड्यांची तपासणी करणं, गाड्या वाघाच्या अनावश्यक जवळ जाणार नाहीत याची काळजी घेणं, हासुद्धा शीतल यांच्या कामाचा भाग. या कामादरम्यान आलेला एक अनुभव त्या सांगतात, ‘‘छोटा मटका वाघ तलावात बसला होता. त्याला बघत पर्यटकांच्या जिप्सी गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या. मी गाड्यांची तपासणी करत होते. अचानक मटका उठला आणि माझ्या दिशेनं यायला लागला. मी पटकन जवळच्या जिप्सीमध्ये चढले. तो गाडीजवळ आला. माझ्याकडे बघत उभा राहिला. वाघाच्या नजरेला थेट नजर भिडण्याचा माझ्या आयुष्यातला तो पहिलाच प्रसंग. नखशिखान्त शहारले! तो माझ्यापासून अवघ्या दीड-दोन फुटांवर उभा. मनात आणलं तर कधीही पंजा मारू शकत होता. पुढच्या गाड्यांनी जागा करून दिली. त्यामुळे ड्रायव्हरनं जिप्सी थोडी पुढे घेतली. तसा तोसुद्धा मागे गेला. पण तोवर मी त्याच्या नजरेआड झाले होते. मग तो गाडीखाली मला शोधू लागला. दिसले नाही. मग पुन्हा जाऊन पाण्यात बसला. माझी अवस्था अशी होती, की स्वत:च्या गाडीकडे चालत जाण्याची हिंमत झाली नाही. संध्याकाळी घरी गेल्यावर कुणाशी काहीच बोलले नाही. मूकपणे जेवले आणि झोपले.’’

आता मात्र शीतल यांचं वाघांवर प्रेम जडलंय. जंगल आवडायला लागलंय. डोळ्यांमध्ये नवी स्वप्नं उमलू लागलीत. आता त्यांना वनविभागाच्या परीक्षा देऊन अधिकारी बनायचंय आणि जंगलासाठी, वाघासाठी जोमात काम करायचंय.

ताडोबातल्या माया, माधुरी, सोनम वगैरे वाघिणी सर्वच व्याघ्रप्रेमींना ठाऊक आहेत. पण मनीषा, प्राजक्ता आणि शीतलसारख्या त्यांच्यासाठी काम करणाऱ्या ‘वाघिणीं’चं कर्तृत्वही सर्वांसमोर यावं, यासाठीच हा लेखप्रपंच. या तिघींसारख्या आणखीही अनेक स्त्री अधिकारी, वनरक्षक वाघांच्या संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न करतायत. इथल्या १३ स्थानिक स्त्रिया गाईड म्हणून जंगल आणि पर्यटकांमधला दुवा बनतायत. फक्त एक दिवस जंगलात राहिलात, तर लक्षात येईल यांचं काम किती कठीण आहे ते. त्यांचं कौतुक व्हायला हवं. या सर्वच जंगलकन्यांच्या कामाला सलाम!

वाघाला मी रोज पाहाते. पण मन भरत नाही. किती देखणा, रुबाबदार प्राणी. तरी किती बिचारा! कोणीच त्याला पूर्णपणे समजावून घेऊ शकत नाही. ताडोबाविषयी, वाघाबद्दल कोणी काही नकारात्मक बोललं तर मला सहन होत नाही.– मनीषा जाधव

निसर्गाबद्दलच्या असीम प्रेमामुळे मी वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात आले. वाघाचा अभ्यास करणं, त्याचा मागोवा घेणं रोमांचक तर आहेच, पण त्यात एक अवीट तृप्तीही आहे. म्हणून हे काम मी मनापासून करते. – प्राजक्ता हुशंगाबादकर

माझी आता वाघाविषयीची भीती गेली. त्याच्यावर प्रेमच जडलंय. रोज दिसला तरी त्याला पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं. मात्र वाघाच्या नजरेला थेट नजर भिडण्याचा क्षण नखशिखांत शहारून टाकणारा असतो. – शीतल कुडमेथे

(लेखक ‘इंडियन इकोलॉजिक फाउंडेशन’चे संस्थापक सदस्य आहेत.)

sonawane.anant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2021 12:06 am

Web Title: jungle girl tiger tadoba forest rfo biologist forester guide work akp 94
Next Stories
1 सर्वंकष मूल्यमापनाचं बाळकडू
2 स्मृती आख्यान : हृदय पळेल, तर मेंदू धावेल!
3 जगणं बदलताना : आजच्या समंजस ‘अहो आई’!
Just Now!
X