काही :  भाज्यांची काळजी
* चवळी, माठ, राजगिरा, मेथी या भाज्या साफ करून, भाज्यांना पाणी असल्यास थोडावेळ पसरून नंतर कापडाच्या पिशवीत घालून प्लॅस्टिक बॅगेत ठेवाव्यात. झेंडूची फुलंही अशाच पद्धतीने ठेवावीत. ६-७ दिवस चांगली राहतात.

* भाज्यांच्या ट्रेमध्ये भाज्या ठेवताना तळाला फळवर्गातल्या भाज्या उदा. कोबी, फ्लॉवर, वांगी, दुधी, सुरण या भाज्या ठेवाव्यात. त्यावर शेंगभाज्या, कारली, पडवळ यासारख्या भाज्या ठेवाव्यात. अगदी वर पालेभाज्या, टोमॅटो ठेवावेत. यावर एक कपडा टाकून ट्रे फ्रिजमध्ये ठेवावा. भाज्यांचा ताजेपणा टिकून राहतो.
* टोमॅटोही जाळीच्या पिशवीत ठेवून नंतर प्लॅस्टिकच्या बॅगेत ठेवावेत, खूप दिवस टिकतात.
* फ्रिजमध्ये भाज्या ठेवताना सर्व भाज्या एकाच प्लॅस्टिक बॅगेत ठेऊ  नयेत. प्रत्येक भाजीला वेगळी बॅग वापरावी. गवार, फरसबी, चवळी, मटार, तूर, भेंडी या शेंग वर्गातल्या भाज्या नेटच्या पिशवीत (फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी प्लॅस्टिकच्या जाळीच्या पिशव्या मिळतात)घालून ती प्लॅस्टिक बॅगेत ठेवावी.
* हिरव्या मिरच्यांचे देठ काढून धुऊन घ्याव्यात. कपडय़ाने कोरडय़ा करून एका प्लॅस्टिकच्या डब्यात तळाला कागद टाकून त्यावर मिरच्या घालाव्यात मिरच्यांच्या वर दुसरा कागद ठेवून झाकण लावावं. ८-१५ दिवस मिरच्या हिरव्या ताज्या राहतात. मिरच्या धुतलेल्या असल्यामुळे आयत्या वेळी काढून फोडणीत टाकल्यावर तेल तडतड करून उडत नाही.
* कोथिंबीर नीट करून पानांचा गुच्छ आणि दांडय़ाकडील भाग कापून घ्यावा. मिरच्यांप्रमाणेच खाली वर कागद टाकून प्लॅस्टिक डब्यात ठेवावे. (वरण, भाजी, कोशिंबीर यासाठी वापरता येते.) कोथिंबीरीचे दांडे कागदात गुंडाळून प्लॅस्टिक पिशवीत ठेवावेत. हिरवी चटणी, कांद्या- खोबऱ्याचे किंवा तत्सम वाटणासाठी उपयोगी पडतात.
९. लांब लांब किसलेलं गाजर, बीट, लांब लांब चिरलेला कोबी, लांब चिरलेली भोपळी मिरची, वाफवलेले मटारचे दाणे हे वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ठेवावेत. (हे सर्व मेयोनिजमध्ये मिक्स करून ब्राऊन ब्रेडला लावून पोटभरू हेल्दी सँडविच होऊ  शकते किंवा पिझ्झासाठी ही वापरता येते.)
संकलन – उषा वसंत