|| डॉ. अंजली जोशी

anjaleejoshi@gmail.com

कुणाल एका नामांकित कंपनीत काम करतो. करिअर विकासासाठी त्यानं वर्षभरात एक ऑनलाइन कोर्स पूर्ण करावा असं त्याच्या वरिष्ठांनी सुचवलंय. या कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी त्याला एक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. कोर्सच्या अभ्यासाची सर्व माहिती त्यानं जमवली आहे. पण प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करणं त्याला जमत नाही. त्याला वाटतं, ‘किती किचकट आहे या कोर्सचा अभ्यासक्रम! प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी रोज कमीत कमी एक तास अभ्यास करावा लागेल. बाप रे! एक तास! ऑफिसच्या कामात रोज एक तास काढणं मुश्कील आहे. जेव्हा काम कमी असेल तेव्हा अभ्यासाला सुरुवात करेन.’ परंतु काम कमी असण्याचा एकही दिवस ऑफिसमध्ये अजून उजाडलेला नाही.

अभ्यास करणं लांबणीवर टाकल्यामुळे त्याला दिलासा तर मिळतच नाही, पण जाणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर आपण तो करू शकत नाही, ही जाणीव त्याला छळतेय. हल्ली त्याला वाटतं की आपण एवढे दिवस वाया घालवले. हातात थोडाच कालावधी उरलाय. आता तर एक तासाऐवजी रोज दोन तास अभ्यास करावा लागेल. ते तर अशक्यच आहे. परिणामी अनेक महिने लोटूनही तो प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करू शकत नाही. कामाच्या निमित्ताने सीमाला बाहेरगावी जावं लागतं. प्रवासाहून घरी परतल्यानंतर बॅग लगेच रिकामी करणं आवश्यक आहे हे तिला पटतं. ती स्वत:शी म्हणते, ‘‘बॅग आवरायला किमान तासभर तरी लागेल. किती कंटाळवाणं आहे ते. आत्ताच तर मी प्रवासाहून दमून आलेय. लगेच कुठं कामाला लागू? उद्या आवरू की!’’ हा ‘उद्या’ नेहमी पुढं पुढं ढकलला जातोय. दुसऱ्या दिवशी तिचं दुसरंच कुठलं तरी काम निघतं व बॅग तशीच पडून राहते. शेवटी पुढल्या प्रवासाची वेळ येते तेव्हा नाइलाजानं तिला ती रिकामी करावी लागते; पण तोपर्यंत तिचं काम दुप्पट झालेलं असतं. त्यातले कपडे किंवा इतर चीजवस्तू खराब झालेल्या असतात. मग ती स्वत:शी चरफडत म्हणते, ‘‘बॅग वेळीच आवरायला हवी होती.’’ पण पुढच्या  प्रवासाहून परतल्यानंतरही हीच पुनरावृत्ती घडते.

कुणाल व सीमाची मुख्य समस्या आहे, चालढकल करणं. सीमाची चालढकल करण्याची सवय आळसातून उद्भवलेली आहे. तात्कालिक सुख महत्त्वाचं वाटल्यामुळे कष्टाचं काम तिला पुढे ढकलावंसं वाटतं. कुणाल चालढकल करतो. कारण त्यानं मनात ठरवलेल्या निकषास (रोज एक तास) पूर्णपणे अनुकूल परिस्थिती मिळण्याची तो वाट पाहतो. कारणं कुठलीही असली तरी चालढकल करणं दोघांपकी कुणालाच ना सुखावह ठरतं, ना फलदायी! चालढकल करण्याच्या सवयीचा नायनाट करण्यासाठी अनेक मार्ग सुचवले जातात. व्यवस्थापनशास्त्रात प्रचलित असणारा मार्ग म्हणजे वेळेचं सुनियोजन (टाइम मॅनेजमेंट) करणं. कामांची जर उपलब्ध वेळेनुसार सुयोग्य आखणी केली तर कामं लांबणीवर टाकणं टाळता येतं. यासाठी आयसेन हॉवर यांनी शोधलेल्या ‘अत्यावश्यक-महत्त्वपूर्ण’ अशा चार श्रेणींमध्ये कामांचं विभाजन केलं जातं. सर्व कामं एका वेळी अंगावर न घेता अत्यावश्यक व महत्त्वाची कामं आधी पूर्ण करावीत व नंतर पायरीपायरीनं अत्यावश्यक नसलेल्या किंवा महत्त्वपूर्ण नसणाऱ्या कामांकडे वळावं, असं यात सुचवलं जातं. १९८० च्या सुमारास फ्रान्सिस्को सिरिलो या संशोधकांनी अजून एक तंत्र शोधून काढलं. त्याचं नाव आहे- पोमोडरे तंत्र. काम सलगपणे न करता ते टायमर लावून छोटय़ा छोटय़ा मध्यंतरांत विभागावं व काम करताना मध्यंतरातल्या छोटय़ा उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावं, असं हे तंत्र सांगतं. या तंत्रावरून विस्तारित केलेलं एक तंत्र बोधात्मक मानसशास्त्रात वापरलं जातं. त्याचं नाव आहे- ‘पाच मिनिटांचं तंत्र’.

‘पाच मिनिटांचं तंत्र’ चालढकल करण्याच्या सवयीच्या मुळावरच घाव घालतं. नावडतं काम करताना आपल्याला खूप मोठय़ा कालावधीपर्यंत त्रास होत आहे, असं नकोसं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिल्यामुळे त्या कामात आपण चालढकल करतो. ऑफिसमधल्या कामानंतर आराम करण्याऐवजी आपण एक अख्खा तास किचकट प्रश्न सोडवत बसलो आहोत, असं चित्र कुणालच्या डोळ्यांसमोर येतं. तसंच प्रवासाहून दमून आल्यावर बॅग आवरण्याचं कंटाळवाणं काम तासभर करतोय, हे चित्र सीमाच्या डोळ्यांसमोर येतं. त्यामुळे ते काम सुरू करण्याची दोघांचीही इच्छा नाहीशी होते. यावर हे तंत्र सांगतं की, कामाची सुरुवात करताना अंतिम टप्प्यात होणाऱ्या त्रासाचा मोठा कालावधी डोळ्यांसमोर आणूच नका. छोटय़ा कालावधीचाच विचार सर्वप्रथम करा. अगदी छोटा टप्पा म्हणजे फक्त पाच मिनिटांचा कालावधी समोर ठेवा. नावडत्या कामाचा कालावधी कमी केला तर ते काम आधी वाटतं तितकं अवघड वाटत नाही व त्यामुळे काम सुरू करण्यास व्यक्ती अनुकूल होते. म्हणजे कुणाल स्वत:शी जर असं म्हणाला की, मी रोज फक्त पाच मिनिटं अभ्यास करणार आहे, तर ते त्याला सहज आवाक्यातलं वाटेल. पाच मिनिटांचं ध्येय गाठणं फारसं अवघड नाही. या तंत्रामुळे अभ्यासाला अजिबात हात न लावण्याऐवजी निदान अभ्यासाची सुरुवात तरी होऊ शकते.

कामाला सुरुवात करणं हा एक अवघड टप्पा असतो. तो पार पडला की पुढचे टप्पे गाठणं तितकं अवघड नसतं. कुणालनं पाच मिनिटांच्या अभ्यासाला सुरुवात केली की आपल्या हातून थोडा का होईना अभ्यास होतोय, असं वाटून त्याचा आत्मविश्वास वाढीला लागेल. त्यामुळे पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ अभ्यास करण्यासाठी तो स्वत:ला प्रोत्साहित करेल. पाच मिनिटांचा कालावधी तो टप्प्याटप्प्यानं वाढवत, म्हणजे हळूहळू दहा मिनिटं, मग पंधरा मिनिटं, असा नेऊ शकेल. सीमानंही ‘मी फक्त पाच मिनिटं बॅग आवरणार आहे’, असं म्हटलं तर अजिबात न आवरण्यापेक्षा ती निदान सुरुवात तरी करेल. कदाचित एकदा आवरायला घेतल्यावर ती पूर्ण आवरेलही. नाही तर बॅग आवरण्याचा कालावधी हळूहळू वाढवत नेऊ शकेल.

पाच मिनिटांच्या तंत्राचं वैशिष्टय़ असं की. ते व्यक्तीला ‘पूर्ण वा शून्य’ (All or None) प्रभावातून बाहेर काढतं. चालढकलीच्या सवयीमागं अनेकदा हा प्रभाव कार्यरत असतो. कुणालला वाटतं की रोज एक तास मिळाला तरच मी अभ्यास करणार. नाही तर नाही. त्यामुळे त्याला जर एका तासापेक्षा कमी वेळ मिळाला तर मिळालेला वेळ सत्कारणी लावण्याऐवजी तो पुरेसा नाही, असं वाटून त्या वेळाचा तो उपयोग करत नाही. या तंत्रामुळे एक तासापेक्षा कमी वेळातही अभ्यास होऊ शकतो, हा पर्याय त्याला उपलब्ध होतो. बॅग आवरतानाही आवरेन तर पूर्ण, नाही तर बॅगेला हात लावणार नाही, असं म्हटल्यामुळे सीमाचं बॅग आवरणं लांबणीवर पडतं. ती थोडी का होईना आवरता येईल, हा पर्याय हे तंत्र तिला उपलब्ध करून देतं.

हे तंत्र अनेकांना उपयोगी पडलं आहे. इन्स्टाग्रामचा सी.ई.ओ. केव्हिन सिस्ट्राम यानं स्वत:च्या चालढकल करण्याच्या सवयीचा बीमोड करण्यासाठी हे तंत्र यशस्वीपणे वापरलं. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस हे महाविद्यालयीन जीवनात नावडत्या विषयाचा अभ्यास करण्यात दिरंगाई करीत. या तंत्राचा वापर करून त्यांनी या सवयीवर मात केली. अर्थात फक्त चालढकल करणाऱ्यांनाच हे तंत्र उपयुक्त आहे, असं नाही. तर दैनंदिन जीवनातील अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठीही ते तितकंच उपयोगी पडतं. व्यवस्थापन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या विकास शिरोडकर यांनी त्यांच्या कॉलेजवयीन जीवनात घडलेला एक प्रसंग ब्लॉगवर लिहिला आहे. तो या संदर्भात उद्बोधक आहे.

त्या काळच्या अ‍ॅम्बेसिडर गाडीमधून त्यांचं कुटुंब मुंबईहून गोव्याला चाललं होतं. गाडी माणसांनी खचाखच भरली होती. वडिलांना बरं वाटेनासं झाल्यामुळे ड्रायिव्हग करण्याची जबाबदारी शिरोडकरांवर पडली. त्या वेळी त्यांना नुकतंच ड्रायिव्हग लायसन्स मिळालं होतं, पण ड्रायिव्हगचा फारसा सराव नव्हता. त्यांनी कशीबशी खोपोलीपर्यंत गाडी नेली. पण अवघड वळणं आणि तीव्र चढ-उतार असलेला मुंबई-पुण्याच्या जुन्या रस्त्यावरचा घाट जवळ यायला लागला तशी त्यांना धडकी भरली. त्यांनी गाडी थांबवून वडिलांना सांगितलं की, मला घाटात ड्राइव्ह करणं जमणार नाही. तुम्हीच ती चालवा. तेव्हा त्यांचे वडील म्हणाले, ‘‘हे बघ, साडेनऊ किलोमीटरचा घाट मला चढायचाय, हे तू आत्ता डोक्यात ठेवू नकोस. तू सुरुवातीला फक्त वीस फुटांवरच लक्ष केंद्रित कर. आणि स्वत:ला सांग की मला गाडी फक्त वीस फुटांपर्यंतच सुखरूप न्यायची आहे. वीस फुटांचं अंतर पार झालं की पुढल्या वीस फुटांकडे लक्ष दे. मला खात्री आहे की तू हा घाट यशस्वीपणे पार पाडशील.’’ शिरोडकरांनी लिहिलं आहे की, वडिलांनी दिलेला तो कानमंत्र मला फक्त त्याच वेळी उपयोगी पडला असं नाही, तर पुढील काळात व्यावसायिक जीवनातली अनेक आव्हानं समर्थपणे पेलायला त्यानं मला मदत केली. या मंत्रानं मला वर्तमानकाळात राहायला शिकवलं.

त्यांच्या वडिलांनी दिलेला हा कानमंत्र म्हणजे हेच ‘पाच मिनिटांचं तंत्र’ होतं. या तंत्राचा उपयोग करून तुम्हीही अनेक आव्हानं पार करू शकता. त्यासाठी फार मोठय़ा गुंतवणुकीची गरज नाही. हवीत फक्त पाच मिनिटं.