04 December 2020

News Flash

माझ्या मनातलं गोकुळ

अद्भुत-विस्मयकारी संचिताचं भान हरवलंय का आज? भलत्याच फोलपट गोष्टी ‘मोठय़ा’ झाल्या आहेत का आज?.. या असल्या प्रश्नांनी मन गोते खातं अनेकदा.. पण दूरवर एक गोकुळ

| July 18, 2015 01:01 am

ch25अद्भुत-विस्मयकारी संचिताचं भान हरवलंय का आज? भलत्याच फोलपट गोष्टी ‘मोठय़ा’ झाल्या आहेत का आज?.. या असल्या प्रश्नांनी मन गोते खातं अनेकदा.. पण दूरवर एक गोकुळ उभं राहतं मनात.. ज्ञात-अज्ञात मित्रांचं गोकुळ. साहित्य- कला- संस्कृती यांच्या घुसळणीतून माणूसपणाचा वेध घेणारं, निर्मिती क्षमतेच्या उन्मेषांसहित माणुसकीसाठी धपापणारं, माणूसपणाच्या सर्व सकारात्मक शक्यता धुडाळणारं, माझ्या विलक्षण मित्रांचं गोकुळ..
वळणा-वळणांच्या रस्त्याने पुढे चालत राहतो आपण.. खरं तर ‘पुढे-मागे’ असं काही जाणवत नसतं आपल्याला. आवेगाचा वेग पकडून, कधी उतारावरून खाली, तर कधी चढावरून वर.. कधी पावलं घेऊन गेली आडवं तिडवं, तर तसे चालत राहतो आपण सवयीनं. लहानपणी तर ‘पुढे मागे’ असं काहीच नसतं. प्रत्येक क्षण त्या त्या क्षणापुरता जिवंत होऊन उजळून टाकतो स्वत:ला. मग या उजेडात इवलाली मनं अधीर होऊन उठतात, पुढच्या येणाऱ्या क्षणासाठी..
मी मागे वळून पाहते तेव्हा वाटा काहीशा धुंदल्या दिसतात मला.. मधली काही ठाणी ओळख दाखवतात. पण या सगळ्याकडं पाहण्याआधी नजर अगदी धावत सुटते त्या आरंभबिंदूकडे. समुद्रातील दीपगृह असावं तसं माझं घर दिसतं मला, जणू स्वयंप्रकाशित, भोवतालच्या लाटांवर आपला प्रकाश उधळणारं. नाही. हे भावुक वर्णन नाहीय. आज इतक्या वर्षांनंतर तर ते अधिकच उजळून निघाल्यासारखं दिसतं मला.. आज पुस्तकी वाटतील कदाचित अशा स्वातंत्र्य- बंधुता- समतेच्या जाणिवांनी भारलेलं!
माणसाकडे फक्त ‘माणूस’ म्हणून बघू शकणाऱ्या स्वच्छ- उदार- हसऱ्या डोळ्यांचं घर. ते कायम आमच्या आई-वडिलांच्या (आणि पुढे आमच्याही) सहकाऱ्यांनी, मित्रमंडळींनी भरलेलं असायचं. रहिमतपूरसारख्या छोटय़ा गावाचं मन मोठं करायच्या मागे लागले होते ते सगळे. शाळा, वाचनालय सुरू करणं, चालवणं, वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये बालवाडय़ा सुरू करणं, महिला मंडळ, मुला-मुलींसाठी मैदानी खेळ, कलापथक शिबिरे, व्याख्यानमाला अशा अनेक उपक्रमांचा दणका उडालेला असे सदैव. माझ्या जन्माआधी साने गुरुजी येऊन गेलेल्या त्या घरात, एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, महर्षी कर्वे, ना. ग. गोरे अशांसारखी अनेक मोठी माणसं माझ्या लहान डोळ्यांनी पाहिली मी तिथे. वसंत बापट, निळू फुले, सुधा वर्दे, आवाबेन आणि सेवादल परिवारातील अगदी घरचेच वाटावेत अशा अनेक कलावंत- कार्यकर्त्यां मंडळींच्या वावरानं ते घर कायमच स्वागतासाठी उत्सुक असलेल्या हसतमुख यजमानासारखं दिसायचं..
.. तर अशा या घरातून मला काय काय मिळालं याची मोजदाद आपण करू या नको. पण वाट कुठून सुरू होते ते कळण्यासाठी हा प्रपंच. शाळेच्या दिवसांतच राष्ट्र सेवादलाच्या कलापथकातील अस्सल जातिवंत कलावंतांचा सहवास मिळाला. सुधा वर्दे, आवाबेन देशपांडे या फक्त नृत्य नव्हत्या शिकवत, साक्षात चैतन्याच्या पुतळ्या होत्या या स्त्रिया. पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, वसंत बापट अशी लेखक-कवींची फळी होती कलापथकाकडे. सर्वसामान्य माणसाचं ‘लोकरंजनातून लोकशिक्षण’ करण्यासाठी कटिबद्ध. त्या काळात निळूभाऊ फुले पुणे कलापथकाचा म्होरक्या होता. व्यंगात्मक विनोदाची कारंजी उडवणारी त्याची लेखणी आणि त्याच्यासह राम नगरकर आणि इतर अनेक जणांचा सदाबहार अभिनय या माझ्या लहानपणीच्या खजिन्यातल्या अनमोल गोष्टी आहेत. सातारा-पुणे अशी ये-जा करत मी या मंडळींमध्ये सहभागी झाले. निळूभाऊंचं लेखन-दिग्दर्शन आणि राम नगरकरांसह त्याचा उत्स्फूर्त अभिनय यांची घनदाट छाप पडली माझ्या लहानशा मनावर.
ch23याच दरम्यान बापट- सुधाताई- लीलाधर हेगडे- आवाबेन या सर्वानी उभ्या केलेल्या ‘महाराष्ट्र दर्शन’ या भव्य आणि विशाल सांस्कृतिक प्रकल्पात सहभागी होता आले. यामुळे एक फार महत्त्वाची गोष्ट माझ्या बाबतीत घडली.. ती म्हणजे संस्कारक्षम वयात शरीर- मन- गळा- वाणी कायम हलती बोलती राहिली. सतत अभिव्यक्त होत राहणं म्हणजेच जिवंत असणं असं काही तरी त्या वयात माझ्या मनानं घेतलं असावं.. हा फार अमूल्य, अनोखा संस्कार घडला..
कॉलेज जगतात पाऊल पडेपर्यंत हे सर्व अव्याहत चालू होतं. मॅट्रिकपर्यंत साताऱ्यात शिकत होते तरी पुणं मला नवीन नव्हतं. प्रोसिनियम नाटकं थोडी फार सातारा-पुणे इथे पाहिली होती.. पण हातात अनुभव होता ‘खुल्या’ वगनाटय़ाचा.. याला म्हटलं तर एकच अपवाद झाला त्या काळात. शाळेत असताना, स्नेहप्रभा प्रधानांच्या अभिनयामुळे गाजलेलं ‘राणीचा बाग’ हे नाटक सरांनी गॅदरिंगसाठी बसवलं होतं. त्यात मुख्य भूमिका करण्याची संधी मला मिळाली आणि आंतरशालेय स्पर्धेत ‘शाहू कलामंदिरा’ची फिरती ढाल मला, म्हणजे अर्थातच आमच्या शाळेला मिळाली.
मी डिग्रीला पुण्यात एस.पी.त प्रवेश घेतला. पण ‘सगळ्या’ विषयात ‘एकदम’ पास होण्याची डाळ शिजली नाही. मग आवाबेननं मला नृत्य शिकण्यासाठी बडोद्याला म. सयाजीराव विद्यापीठात पाठवायचं ठरवलं. (आवाबेन- माझी काकू- देशपांडय़ांच्या घरात मिसळून गेलेली पारशी मुलगी. जी स्वत: मणिपुरी शिकलेली होती. तेही ‘शांतीनिकेतन’मध्ये.) आवाबेनबद्दल सांगायचं तर खूपच कुठल्या कुठे सांगावं लागेल.. तिच्या चौघडीनं आयुष्यभरासाठी मला गुरफटून ठेवलंय इतकंच सांगते इथं.
तर.. बडोदा हे एक महत्त्वाचं पाऊल होतं. बडोद्यात ‘भरतनाटय़म’च्या गुरू अंजली मेहर यांच्याकडून किंवा त्यांच्यायोगे, एक शास्त्रोक्त कलात्म शिस्तीची, काटेकोर नियमावलीची चाकोरी जवळून अभ्यासण्याची संधी मिळाली. कलाविश्वातल्या आखीव-रेखीवतेची खोल आणि गंभीर जाणीव प्रथम ‘भरतनाटय़म’नं करून दिली. भारतीय अभिजात कला आणि तत्त्वज्ञान यांच्यातील अन्योन्य नात्याचं अंधुकसं भान मनाला जाणवू लागलं.
बडोद्यातल्या चार वर्षांत इतकं काही वेगवेगळं घडत गेलं.. वेगळी भाषा, वेगळी माणसं याबरोबरच ‘नाटक’ही माझ्या परिघात आलं किंवा खरं तर मी रंगभूमीच्या विस्तृत जगात ओढली गेले. दोन वर्षांच्या भरतनाटय़मच्या अभ्यासानंतर थायरॉइडच्या त्रासामुळे नृत्य थांबवावं लागलं. नृत्याचा चार वर्षांचा अभ्यासक्रम कसाबसा पुरा करताना नाटकानं मला तारलं. प्रा. यशवंत केळकर नाटय़विभागात व्याख्याता, दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी- गुजराती- हिंदी अशा तिन्ही भाषांतून अभिनय करण्याची संधी मिळाली.
याच काळात सई परांजपे ‘नांदा सौख्यभरे’ हे अभिनव फॉर्ममधलं तिचं नाटक घेऊन बडोद्याला आली. केळकर सर व सई-अरुण हे एन.एस.डी.तले सहाध्यायी. त्यांच्या गप्पांमधून ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या दूरस्थ, कधी तरी काही कानावर पडलेल्या संस्थेविषयी पुन्हा नव्याने ऐकून अधिरं कुतूहल जागृत झालं.. आणि नेमक्या याच कालावधीत, ज्यांना रंगभूमीचे महागुरू असं सार्थपणे म्हणता येतील अशा इब्राहिम अल्काझी यांच्याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’त एक विस्तृत लेख छापून आला. त्यांचा जागतिक रंगभूमीचा अभ्यास, रंगभूमीसाठीची समर्पण वृत्ती पाहून मन दिपून गेलं.
ch24एन.एस.डी.त प्रवेश घेणं हे त्यानंतरचं एक स्वाभाविक वळण होतं. सुप्रसिद्ध नाटककार, विचारवंत गो. पु. देशपांडे, माझे वडिलबंधू ते दिल्लीतच असल्यानं एक हक्काचा समर्थ मार्गदर्शक कायमच उपलब्ध होता. दिल्लीचा- एन.एस.डी.चा अनुभव आमूलाग्र आणि सकारात्मक उलथापालथ घडविणारा होता. शाळेत म्हणजे एन.एस.डी.त प्रवेश केला आणि जागतिक रंगभूमीचा विशाल नकाशा मनावर अवतरू लागला. पुढच्या तीन वर्षांत हळूहळू अल्काझींनी कोरीव काम करत या सर्व थोर नाटककारांच्या, जणू सजीव वाटाव्या अशा मूर्ती आमच्या मनात उभ्या केल्या. अल्काझी सरांचा आवाज, त्यांचा वाचीक अभिनय, एखाद्या नाटकातील नाटय़गुणांचं शब्दातीत मोल मुलांसमोर मांडण्याची हातोटी, या आणि इतर अनेक गोष्टी केवळ अवर्णनीय आहेत.
रंगभूमीशी असं नातं जोडण्याच्या धडपडीत असतानाच एका वेगळ्या मोठय़ा- वास्तव जगात मी फेकली गेलीय असंही काहीतरी मनाला जाणवू पाहात होतं. रंगभूमीचं जग आणि वास्तव जगणं या दोन्हीला एका समान उंचीवर पाहणारी, तोलणारी जाणीव या काळात माझ्या नेणिवेत तयार होत होती. ही एक नवीनच आणि महत्त्वाची अनुभूती होती. जगण्यातून रंगभूमीकडे नेणारी आणि रंगभूमीतून जगण्याकडे घेऊन येणारी. ‘अंधायुग’, ‘तुघलक’चे दिल्लीतील ‘पुराना किल्ल्यात’, किल्ल्याच्या भग्न अवशेषांच्या पाश्र्वभूमीवर झालेले प्रयोग, चेकॉव्हचं ‘थ्री सिस्टर्स’, इब्सेनचं ‘डॉल्स हाउस’ आणि आयनेस्कोचं ‘दि लेसन’ यांचे शाळेच्या छोटय़ा सभागृहात झालेले प्रयोग, गुजराथी भवाई- ‘जस्मा ओडन’चे चंडीगढच्या एका भव्य उद्यानात झालेले प्रयोग, जपानी ‘काबुकी’चे हिंदीत झालेले ‘इबारागी’चे प्रयोग.. आणि अर्थात ब्रेख्तचं ‘थ्री पेनी ऑपेरा’ व ‘कॉकेशियन चॉक सर्कल’ (ज्यांनी मराठीतही इतिहास घडविला.).. मनातल्या मोठय़ा जमघटातून दिसणारी ही काही चित्रं.. या सगळ्यात निळूभाऊनं लिहिलेलं, माझं गावरान ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ हे वगनाटय़ स्कूलच्या ओपन एअरमध्ये मी दिग्दर्शित केलेलं.. तेही लक्षात राहिलंय.
दिल्लीत तीन वर्षे प्रशिक्षण अधिक एक वर्ष एन.एस.डी.ची रिपेरटरी अशी चार सोसाटय़ाची र्वष पुरी होता होता मनातला धुरळा हळूहळू खाली बसतोय असं काहीतरी वाटू लागलं. महाराष्ट्रात परतताना काहीसं सावध आणि एकचित्त झालं मन. ‘काही तरी’ करून दाखवू या आवेगासोबतच मराठी व्यावसायिक रंगभूमीचा ओ की ठो आपल्याला माहीत नाही. या अंधूक जाणिवेची धाकधूक होतीच. खूप र्वष घाटत असलेलं माझं लग्न होऊन मी आता- सुभाषची बदली होईपर्यंतचा काळ तरी पुण्यात असणार होते. त्यामुळे ‘होईलच की काही तरी’ असा अजाण विश्वास होता.
.. यानंतरची सात-आठ वर्षे खूप महत्त्वाची ठरली माझ्या जडणघडणीत. आपल्याच मुलुखात परतले होते तरीही नव्यानं एकचित्त झालेल्या मनाला आसपासचं जग, यातली माणसं नव्यानंच, नवी नवी दिसायला लागली. माणसातलं भलं-बुरं खूप काही अंगावर येऊन आदळू लागलं. सुभाष व माझ्या दोन मुलांनी एका अनोख्या तृप्तीचा अनुभव मला बहाल केला होता ते खरंच.. पण ‘संसार’ नावाच्या विलक्षण वैचित्र्यपूर्ण जायंट व्हीलमध्ये बसून आम्ही गरागरा फिरतोय असं काही तरी वाटू लागलं मला.. काही सापडतंय.. काही निसटतंय असं होत राहिलं काही काळ.. सात-आठ वर्षांची फिरस्ती संपवून आम्ही परत पुण्याला आलो आणि मी खऱ्या अर्थाने ‘नाटक’ या मूळ मुद्दय़ाला हात घाला. मुलांबरोबर माझीही शाळा पुन्हा सुरू झाली.
.. पुण्यात आल्या आल्याच कुणीही झडप घालून घ्यावी अशी संधी गोविंददादामुळे (गो.पु.देशपांडे) चालून आली. त्याचे मित्र पं. सत्यदेव दुबे, गिरीश कर्नाडाचं ‘तुघलक’ हे नाटक मराठीत करत होते, पुण्यातल्या ‘ड्रॉपर्स’ या प्रायोगिक नाटय़संस्थेबरोबर. त्यातलं ‘सौतेली माँ’ हे एकमेव आणि महत्त्वाचं स्त्रीपात्र. ही भूमिका मी एन.एस.डी.च्या हिंदी-उर्दू प्रयोगात केली होतीच. पण दुबेजींसारख्या भन्नाट व्यक्तिमत्त्वाबरोबर काम करण्याचा अनुभव पुन्हा पहिलटकरणीसाखाच ठरला- वेदनेतून जाणारा असला तरी निखळ समाधान देणारा. पुन्हा एकदा वाटचाल सुरू झाली. या वाटेचा प्रशस्त रस्ता करावा असं कधी वाटलं नाही मला. त्यामुळे निवडक, मोजकंच काम करत राहिले.. आणि ते फायद्याचंच ठरलं असं वाटतं. आज मराठी रंगभूमीवरील महत्त्वाच्या, दिग्गज मानल्या गेलेल्या अधिकतम नाटककार, दिग्दर्शक, कलावंत यांच्याबरोबर काम करण्याचा, विलक्षण आनंदाचा अनुभव माझ्या पदरात पडला आहे आणि काहीशा भावूकपणे तो मी मनाच्या गाठीत बांधून ठेवला आहे.
याबरोबरच माझे स्वत:बरोबरही काही प्रयोग चालू राहिले. मराठी भाषेची जातिवंत साहित्य परंपरा, कथा-कविता- ललित लेखन या सगळ्यांविषयी मला लहानणपणापासूनच प्रेम व आस्था आहे, त्यामुळे मराठी साहित्याच्या अभिवाचनाचे, वेगवेगळ्या रूपांत मंचस्थ करण्याचे प्रयोग, आम्ही काही समविचारी मंडळी करत गेलो. हा अनुभवही फार संस्मरणीय आहे. विशेषत: ‘संत साहित्यातील रंगमंचीय प्रस्तुतीच्या शक्यता’ असा अभ्यास विषय घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललितकला केंद्रातील विद्यार्थ्यांसह केलेला प्रयोग फार मोठा अनुभव देणारा ठरला. लिखित शब्दांचा लळा मला माझ्या आईनं आणि रंगभूमीनं लावला. त्यात माझे वडिलबंधू नाटककार. या सगळ्यांच्या सावलीत, तशी बऱ्यापैकी आळशी असूनही मी मला आवडलेल्या काही नाटकांचे अनुवाद केले. एक दीर्घाकही लिहिला. या गोष्टींनी मला निर्भेळ आनंद दिला.
पुण्यात हे असं सर्व चालू असताना मुंबईत दाखल होणं हेही ओघानंच आलं. सुभाषच्या जिवावर आणि इतर हक्काच्या गोतावळ्याच्या आधारानं पुणे- मुंबई- पुणे सुरू झालं. दोन्ही मुलांना दोन हातांनी ओढत, धडपडत चाललीय मी कुठे तरी.. असं काही तरी मिटल्या डोळ्यांना दिसत राहायचं.. आणि ‘सिनेमा’ नावाचं आणखी एक मोठं प्रेमप्रकरण सुरू झालं.. याच काळात सुमित्रा-सुनीलबरोबर माझं सिनेमात ‘असणं’ सुरू झालं.. आणि आता तर नव्या दमाच्या संवेदनशील लेखक दिग्दर्शक तरुण मित्रांची फौजच तयार झाली आहे. यांच्यातील जवळपास सगळ्यांबरोबर मला काम करायला मिळतं यासाठी मला माझाच हेवा वाटतो..
..नाटक-चित्रपटातून वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून स्वत:ला लपेटत, उलगडत असताना खूप अद्भुत क्षण गवसले मला.. पण माझ्या गाण्याला मी वाऱ्यावर सोडलं ही दुखरी जाणीव सतत राहिलीय मनात. एक चांगला सुरेल गळा मी वाया घालवला.. यासाठी माझ्या प्रिय आईची व माझी स्वत:ची मी सदैव माफी मागीन- कारण आता तेवढंच करणं शक्य आहे.
ch22बाकी, चौखूर उधळलेल्या कोलाहलयुक्त भोवतालात, सांस्कृतिक- सामाजिक- राजकीय रेटारेटीत, एखाद्या गरगरणाऱ्या ठिपक्यासारखी दिसते मी मला. खूप धास्तावलेली, गोंधळलेली, किंकर्तव्यमूढ.. आदिम मानव समूहांनी प्रज्ञा, बुद्धी आणि भावनिक ऊर्जेच्या बळावर मानवी मनाचा तळ ढवळून काढला. संगीत- कला- साहित्य- विज्ञान यांसारख्या मानवी जगण्याशी अतूटपणे संलग्न असणाऱ्या तत्त्वांचं निरंतर चिंतन केलं.
.. किती युगं लोटली, माणसानं पारलौकिक, दैवी भासावं असं अद्भुत संगीत निर्माण केलं.. आंतरिक प्रेरणेतून पिढय़ान् पिढय़ा अजोड स्थित्यंतरं घडवत गेला माणूस. भारतीय संगीताच्या अगाध, नितळ, शास्त्रशुद्ध, साक्षात् सौंदर्यापुढे कितीक मोठमोठे प्रतिभावान कलावंत आजही नतमस्तक होतात, आजही ज्याची व्याप्ती पुरतेपणानं माणसाच्या कवेत येत नाही..
.. या सगळ्या अद्भुत-विस्मयकारी संचिताचं भान हरवलंय का आज? भलत्याच फोलपट गोष्टी ‘मोठय़ा’ झाल्या आहेत का आज?.. या असल्या प्रश्नांनी मन गोते खातं अनेकदा.. पण दूरवर एक गोकुळ उभं राहतं मनात.. ज्ञात-अज्ञात मित्रांचं गोकुळ. साहित्य- कला- संस्कृती यांच्या घुसळणीतून माणूसपणाचा वेध घेणारं, निर्मिती क्षमतेच्या उन्मेषांसहित माणुसकीसाठी धपापणारं, माणूसपणाच्या सर्व सकारात्मक शक्यता धुंडाळणारं, माझ्या विलक्षण मित्रांचं गोकुळ. मला दिसताहेत ते सर्वजण याच कामात गढलेले.. आज तेच आहेत माझं श्रद्धास्थान.
ज्योती सुभाष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2015 1:01 am

Web Title: jyoti subhash
Next Stories
1 खसखस
2 मायक्रोवेव्ह ओव्हन वापरताना…
3 कशासाठी? पोटा (नोटा)साठी…
Just Now!
X