भारतीय बृहन् महाराष्ट्र मंडळाचे ७५वे अधिवेशन लखनौ येथे झाले. त्या वेळी संगीत ‘संशयकल्लोळ’ या नाटकाचे निवेदन मला करायचे होते. वेगळे करण्याच्या दृष्टीने नटी आणि सूत्रधार या संकल्पनेवर आधारित एक छोटासा अंकच सादर करायचे ठरवले. सगळ्यांना तो खूपच आवडला. खूप कौतुक झाले. माझ्या मते, माझ्या आयुष्यातील हा एक टर्निग पॉइंट..
मला लहानपणी नभोनाटय़, नृत्य, नाटक अशा सांस्कृतिक गोष्टींची आवड होती. शालेय जीवनात अशा बऱ्याच गोष्टी मी केल्याही, पण कॉलेज सुरू झाले आणि माझे हे सगळे उपक्रम बंद झाले. मग त्यानंतर नोकरी, लग्न, मुले-बाळे, संसार यात मी मला विसरून गेले आणि अशातच यांची लखनौला बदली झाली आणि आम्ही तिथेच राहायलाही गेलो.
नोकरी नसल्याने घरी बसून काय करायचे हा प्रश्न होताच, पण मुले लहान होती त्यामुळे त्यांचे संगोपन, त्यांचा अभ्यास घेणे यात रमू लागले, अर्थात काही तरी करायची इच्छा तीव्र होती. त्याच वेळी तिथल्या महाराष्ट्र समाजाचे आम्ही सदस्य झालो. महिला मंडळाचीही मी सदस्य झाले आणि माझ्या आयुष्याला एक वेगळे वळण लागले. महाराष्ट्र समाजात गणेशोत्सवात दहा दिवसांनिमित्त खूप वेगवेगळे कार्यक्रम होत. मी पुण्याहून आलेली आणि माझे मराठी एकदम चांगले असल्याने मला बरेच वेळा आवर्जून निवेदनासाठी, सूत्रसंचालनासाठी बोलावणे येऊ लागले. मला अजूनही आठवतेय, प्रशांत दामले आणि कविता लाड यांचे ‘चार दिवस प्रेमाचे’ हे नाटक होते. मला त्या नाटकाचे निवेदन करायचे होते. मनावर थोडे दडपण होतेच शिवाय मी निवेदन करत असतानाच अरुण नलावडे यांनी मध्येच मला एक कागद आणून दिला आणि म्हणाले, ‘आमचे प्रयोग कुठे कुठे झाले आहेत हे तुम्हीच सांगा?’ माझ्या सारख्या नवशिक्या निवेदिकेला ते थोडे अवघड गेले पण जमलेही, इतकेच नव्हे तर ‘तुमचे निवेदन छान झाले’ असे प्रशांत दामले यांनी आवर्जून सांगितले आणि तसा मला लेखी अभिप्रायही दिला. तो कागद आणि अरुण नलावडे यांच्या सुंदर हस्ताक्षरातील कागद मी माझ्या संग्रही जपून ठेवला आहे.
यानंतर तिथे अनेक व्यावसायिक नाटके आली आणि त्यांचे निवेदनही मी केले. स्मिता तळवळकर आणि विनय आपटे यांचे ‘डॅडी आय लव्ह यू,’ उपेंद्र लिमये आणि रसिका जोशी यांचे अतिरेकींच्या जीवनावरच नाटक, सुकन्या कुलकर्णी- गिरीश ओक यांचे ‘कुसुम मनोहर लेले’ अशी अनेक नाटके तिथे आली. त्या नाटकाचे निवेदन करायची संधी मला मिळाली आणि या सर्व प्रसिद्ध कलाकारांबरोबर बोलण्याची, त्यांना थोडेफार जाणून घेण्याची संधी मला मिळाली.
कार्यक्रमाचे निवेदन करणे, सूत्रसंचालन करणे हे तर माझे चालूच होते, पण या बरोबरच लहान मुलांचे कार्यक्रम बसवणे त्यांचे नाटक बसवणे हेही मी करू लागले. हे करत असताना मला माझ्यातल्या एका वेगळय़ाच गोष्टीची ओळख झाली. हळूहळू मी कविता करू लागले, वेगवेगळ्या विषयांवर लिहू लागले. त्याने माझा आत्मविश्वास आणखीनच वाढला.
याच दरम्यान भारतीय बृहन् महाराष्ट्र मंडळाचे ७५वे अधिवेशन लखनौ येथे झाले. त्यासाठी तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले होते. मग वेगवेगळ्या समित्यांची स्थापना झाली आणि मला निवेदन समितीत घेतले गेले. पहिलेच नाटक, तेही संगीत ‘संशयकल्लोळ’. या नाटकाचे निवेदन मला करायचे होते. काही तरी वेगळे करावे असे ठरले. त्यानुसार नटी आणि सूत्रधार या संकल्पनेवर आधारित एक छोटासा अंकच सादर करायचे ठरवले. कित्येक वर्षांनी मोठय़ा रंगमंचावर पुन्हा एकदा मी छोटेसे का होईना पण नाटय़ सादर करणार होते आणि तेसुद्धा यापूर्वी कधी ही मी पुरुष सहकलाकारांबरोबर काम केले नव्हते. माझ्या निवेदनाची कसोटी लागणार होती. आमचीही ती निवेदनाची वेगळी कल्पना त्या वेळी सगळ्यांना खूपच आवडली. खूप कौतुक झाले. माझ्या मते माझ्या आयुष्यातील आणखी एक टर्निग पॉइंट म्हणता येईल.
त्यानंतर आम्ही पुन्हा पुण्यात आलो. आता पुन्हा नोकरी न करता काही नवीन करायचे हेच ठरवले होते. माझे लिखाण पुन्हा नव्याने सुरू झाले. त्याला वर्तमानपत्रात, मासिकांत, दिवाळी अंकांत प्रसिद्धी मिळू लागली. पुण्यात आपण आपल्या वयोगटातील स्त्रियांना एकत्र करून काही तरी नव्याने आणि वेगळे सुरू करावे, असे वाटू लागले आणि मग मी ‘उदयना’ या ग्रुपची स्थापना केली. सामाजिक बांधीलकी जपण्याच्या या प्रयत्नाला यशही मिळाले. लिखाणाबरोबरच मी आकाशवाणीवरही कार्यक्रम भरू लागले. शालेय जीवनात अनेक नभोनाटय़ ऐकली होती. मी लिहिलेले माझ्या दिग्दर्शनाखाली सादर केलेले नभोनाटय़ आकाशवाणीवरून ज्या वेळी प्रसारित झाले त्या वेळी डोळ्यात पाणी आले. मग त्यानंतर अनुभवकथन, कथाकथन आणि दहा लेखांची मालिका असे अनेक कार्यक्रम मी करत गेले. लेखनाबरोबर थोडेफार वाचन चालू होते. एकदा माझ्या वाचनात एक विनोदी ‘अस्सा नवरा’ हा काव्यसंग्रह आला. आणि मनात वेगळाच विचार आला. आणि त्या कवयित्रीची परवानगी घेऊन मी नव्याने ‘अस्सा नवरा’ असा एकपात्री  कार्यक्रम सादर करायला सुरुवात केली.
सुरुवातीला छोटय़ा-छोटय़ा महिला मंडळात कार्यक्रम केले. मग त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ,  रोटरी क्लब, गणेशात्सव अशा विविध ठिकाणी कार्यक्रम केले. त्यानंतर अनेक वृत्तपत्राच्या महिला मंचातर्फे माझे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मला एका प्रसंगाबद्दल आवर्जून सांगावेसे वाटते. एका महिला मंचातर्फे माझा प्रथम मोठा कार्यक्रम कराड येथे होता आणि त्याच दरम्यान माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली. तो काळ माझ्यासाठी परीक्षेचा होता. पण माझ्या सासरच्या पाठिंब्याने मी तो कार्यक्रम यशस्वीरीत्या करू शकले. यातून अडचणीतून मार्ग कसा काढायचा हे मी शिकले. आता मी वेगवेगळ्या विषयांवरचे पाच ते सहा कार्यक्रम करते. यात शालेय विद्यार्थ्यांसाठी ही कार्यक्रम आहेत. आता पुण्यात व पुण्याबाहेरही अनेक ठिकाणी कार्यक्रम करते. एकपात्री कलाकार परिषदेची मी आता सभासद आहे. गेली काही वर्षे मला अनेक ठिकाणी वक्तृत्त्व स्पर्धा, नाटय़वाचन, एकांकिका, नाटय़प्रवेश स्पर्धा श्रावण मोहोत्सव अशा ठिकाणी परीक्षक म्हणून बोलावणे येते. तो एक वेगळाच आनंद असतो. आता माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
माझ्या न कळतच माझा कला क्षेत्रातील काही वर्षे थांबलेला प्रवास पुन्हा सुरू झाला याचा मला आनंद वाटतो. आता यापुढे मी याच क्षेत्रात काम करायचे ठरवले आहे. कारण मला माझ्यातल्या  ‘मी’चा शोध लागला आहे.