03 August 2020

News Flash

मी मॅडमचा साथीदार

‘‘नाटक हा माझा धर्म आहे, तर नाटय़ माध्यम हा अनेकांना मोक्षाकडे नेण्याचा खेळकर मार्ग आहे, असं ‘मॅडम’कडे बघून मला पटलं आहे.

| March 29, 2014 01:01 am

‘‘नाटक हा माझा धर्म आहे, तर नाटय़ माध्यम हा अनेकांना मोक्षाकडे नेण्याचा खेळकर मार्ग आहे, असं ‘मॅडम’कडे बघून मला पटलं आहे. विद्यार्थी म्हणून वेगवेगळ्या वळणांवर सोबत आलेल्यांचे कलेच्या, सांस्कृतिक क्षेत्रातले मार्ग प्रशस्त झालेले बघून मला नितांत समाधान वाटतंय; तर ‘मॅडम’नी अनेक बाधित मुलांना पुनर्जन्म दिला, त्यांचं स्वत्व मिळवून दिलं असं जेव्हा सभांमधून, व्याख्यानांतून आणि पुस्तकांतून मुलांचे पालक लिहितात तेव्हा ‘मॅडम’च्या जीवनात आपण त्यांचे साथीदार आहोत याचा दिगंत आनंद वाटतो. हे भाग्य किती लोकांच्या वाटय़ाला येत असेल.’’ आपल्या पत्नीला आदराने ‘मॅडम’ म्हणणारे प्रा. कमलाकर सोनटक्के सांगताहेत ‘नाटय़शाले’च्या माध्यमातून गेली ३२ वर्षे अनेक अस्थिव्यंग, मूक-बधिर, अंध आणि मतिमंद विद्यार्थ्यांना नाटय़प्रशिक्षण देणाऱ्या आपल्या पत्नी कांचन सोनटक्के यांच्याविषयी..आज माझा कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वावर केवळ जीवनगौरव पुरस्कार देण्यासाठी किंवा सांस्कृतिक परिसंवादाचं अध्यक्षपद भूषवण्यापुरता मर्यादित झाला आहे. ‘कृतार्थ सन्मान’, ‘माझा कलाप्रवास’, ‘माय लाइफ इन थिएटर’सारख्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्वस्मृतींना उजाळा देण्यात अधिक जातो. माझ्या आणि कांचनच्या सहजीवनाचा विचार करताना याच स्मृती सोबत आहेत..
माझ्या लग्नाचा विषय काढल्यावर धाकटय़ा भावाचं लग्न लावून द्या, मला सध्या लग्न करायचं नाही असं मी सांगितलं होतं. दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात आणि दिल्लीच्या नाटय़ वर्तुळात माझी एक कल्पक दिग्दर्शक, अष्टपलू नट म्हणून ख्याती होती. अभिनय आणि दिग्दर्शन विषयाचा शिक्षक म्हणून लोकप्रियता होती. मी प्रचंड कामात असे. तर गावाकडील नातेवाईक आणि मित्रपरिवारात माझं लग्न झालं आहे, अशी समजूत बळावली होती. दरम्यान, ‘अमृतनाटय़ भारती’ या मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटय़ प्रशिक्षण शाळेत शिडशिडीत बांध्याची, बुद्धिमान, मनस्वी कांचन कीर्तिकर यांची माझ्याशी एक विद्यार्थिनी म्हणून ओळख झाली आणि मनोमन आम्ही एकमेकांचे झालो. आमच्या संबंधाला एक प्रतिष्ठा, मर्यादा दिली ती कांचनच्या शालीन वृत्तीनं.
ब्रिटिश कांऊ न्सिलच्या शिष्यवृत्तीवर इंग्लडला असताना आमचा अधूनमधून पत्रव्यवहार सुरू झाला. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात नाटय़शास्त्र विभागाचं प्रमुखपद घेतलं आणि नंतर रीतसर लग्न करण्याचा निर्णयच घेतला. माझ्या घरच्यांच्या इच्छेसाठी अगदी मागणी घालून, गावी मुलगी दाखवून, साखरपुडा करून काही महिन्यांनी मुंबईत विधिवत लग्न करून आमच्या खेडेगावात दोन बसेस भरून वरात गेली आणि कांचन रीतसर माझ्या आयुष्यात आली. गावाकडील लग्नात पावला पावलाला उखाणे घेणे, गावातील बाप्याबापडय़ांच्या साक्षीनं हालत्या-डोलत्या बंगईवरील ते न्हाणं, एकमेकांच्या हातातील सुपाऱ्या सोडणं, हालत्या बंगईवर ‘द्वाड नणंदाच्या’ गराडय़ात नवऱ्याच्या तोंडातील विडा काढून घेणे. मला बहुधा धमाल मजा येत होती. कांचन बिचारी मात्र रडकुंडीला येऊन तिची गोरी कांती अधिकच कमनीय झाल्याचं मला आजही स्मरतं. त्या रूपाची मोहिनी आजही जैसे थे अबाधित आहे हे मान्य करतांना, तिनं साऱ्या कामाच्या, संसाराच्या धबडग्यात स्वतला जपलं सुदृढ ठेवलं हे रहस्य असावं. आमच्या गावाकडील मंडळींच्या अपेक्षा, पारंपरिक रीतिरिवाज, अघळपघळ वागणं, बोलणं, भरभरून प्रेम करणं या साऱ्यांत कांचनचा नाही म्हटलं तरी मोठा कोंडमारा होत होता. पण धीरानं या साऱ्या प्रसंगांना सामोरं जात ती सर्वाची लाडकी सूनबाई, वहिनी, काकू झाली. आज गावाकडचे सारे नातेवाईक आपलं सुख-दु:ख माझ्यापेक्षा कांचनकडे हक्कानं व्यक्त करतात. वेळ कमी देता आला तरी ती आज माझीच नाही तर माझ्या साऱ्या नातेवाइकांची ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड आहे!’
कुठल्याही ग्रामीण भागातून आलेल्या, भविष्याची अनिश्चितता असलेल्या नाटय़ क्षेत्रातील तरुण साथीदाराबरोबर ७०च्या दशकात संसार मांडताना आणि तोही माझ्यासारख्या आग्रही, निर्भीड, करडय़ा शिस्तीच्या व्यक्तीबरोबर- म्हणजे कांचनची थोडी ओढाताण निश्चित झाली. पण कांचननं धीरानं, जिद्दीनं सारं जपलं. माझ्या धाकटय़ा दोन भावांचं विश्वविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. दोन्ही मुलींचा जिवापाड सांभाळ केला. त्या काळापासून आजतागायत ती इतरांबरोबर माझीही ‘मॅडमच’ आहे. त्यांचा मोबाइल नंबरही माझ्याकडे ‘मॅडम’ नावानंच आरक्षित आहे. एकच सांगता येईल, आमचं वैवाहिक जीवन आमच्या कलाजीवनाएवढंच संतुलित आणि समाधानी आहे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रात्रंदिवस काम करून नाटय़शास्त्र विभाग पाच वर्षांत नावारूपाला आणल्यावर फारसा विचार न करता मी तडकाफडकी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावर आमचा विचारविनिमय वगरे तर सोडा साधी चर्चा झाल्याचंही मला आठवत नाही. बिनातक्रार कांचन, तीन वर्षांची मानसी आणि तीन महिन्यांची मथिली यांना घेऊन माझ्यापाठोपाठ मुंबईला पोचली. मी ललितकलादर्शच्या ‘आनंदी गोपाळ’ या व्यावसायिक नाटकातील मध्यवर्ती भूमिका स्वीकारली. नंतर ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘दूर्वाची जुडी’ या व्यावसायिक नाटकातली मध्यवर्ती भूमिका करीत दौऱ्यावर जायचो. कांचन मालाडला दोन्ही मुलींना घेऊन बिनातक्रार- आज मी बिनातक्रार म्हणतोय खरा, पण कांचनच्या मनाची काय अवस्था असेल याची मी कधी साधी विचारपूसही केली नाही, या जाणिवेनं आज स्वत:ची कीव वाटते आणि कांचनचे धीरोदात्तपणा, परिपक्वता हे गुण अधोरेखित होतात.
दीडदोन वर्षांत व्यावसायिक नाटकांचे २००-२२५ प्रयोग केल्यानंतर आय.एन.टी.त थिएटर ट्रेिनग अकादमी सुरू करून मी पुन्हा माझ्या पहिल्या प्रेमाच्या, नाटय़प्रशिक्षणाच्या क्षेत्रात आलो. मालाडची जागा सोडून वरळीच्या गॅलक्सी येथील आमच्या छोटय़ा जागेत आलो. मानसी, मथिली कांचनच्या प्रिय सेंट कोलंबा शाळेत जाऊ लागल्या. तिथंच आवड म्हणून अर्धवेळ शाळेतल्या मुलींना अभिनय शिकवायला लागली आणि कांचनला आपला सूर गवसला. वसंत निनावे, अशोक पाटोळे यांची बालनाटय़े आता कांचन दिमाखात ‘नाटय़शाले’तर्फे सादर करायला लागली आणि प्रा. कमलाकर सोनटक्के तिच्या नाटकांचे तंत्र दिग्दर्शक, साहाय्यक आणि हितचिंतक झाले, आणि नाटय़ दिग्दíशका कांचनची झेप दिवसेंदिवस उंचवायला लागली.
मला वाटतं, आमचं आपापल्या कामाशी एका वेगळ्या तीव्रतेचं, घट्ट बांधीलकीचं नातं जुळलेलं होतं, उत्तरोत्तर ते नवनवी रूपं घेत होतं आणि त्यांच्या ऊर्मीत, त्यांच्या झपाटलेपणात आमचं नातं, अगदी वैवाहिक नातंही अधिक घट्ट होत होतं. कामातील अडचणी, त्यावर मात करण्याच्या, उपाययोजना करण्याच्या आमच्या प्रयत्नांवर, वेळप्रसंगीच्या छोटय़ामोठय़ा चिडचिडींवर, ताणतणावांवर आमचं भावजीवनही िहदोळत असावं. एकमेकांविषयी भावना व्यक्त करण्यासाठी ना आमच्याकडे कधी वेळ होता, ना त्याची आम्हाला कधी गरज वाटली. ‘ती फुलराणी’, ‘चू चू चू’, ‘गोल गोल राणी’, ‘पाण्या तुझा रंग कसा’ ही नाटय़शाळेची बालनाटय़े म्हणजे बालनाटय़ाच्या क्षेत्रातील बालप्रेक्षकांना पर्वणी ठरत होती. उत्तरोत्तर नाटय़शाळा लोकाभिमुख होत होती. कांचनच्या यशाचा मला अभिमान वाटायचा.
राष्ट्रीय नाटय़ विद्यालय, अमृत नाटय़ भारती, आय.एन.टी, सांस्कृतिक कार्य संचालनालय, दक्षिणमध्य सांस्कृतिक केंद्र, नेहरू सेंटर कुठेही मी सुट्टय़ांसाठी किंवा खासगी कामांसाठी रजा काढल्याचं आठवत नाही. माझं अहíनश काम, त्या कामानिमित्ताने दौरे हाच माझा विरंगुळा असायचा. ‘दक्षिणमध्य सांस्कृतिक केंद्रा’च्या जबाबदारीत असतांना कांचन आणि मुली मुंबईलाच असायच्या. मुलींनी कुठलीही शिकवणी न लावता आपलं शिक्षण क्रमांकात येऊन पूर्ण केलं. मानसीनं जे.जे.मधून आíकटेक्चर आणि पुणे विद्यापीठातून भरतनाटय़ममध्ये एम.ए. केलं. मथिलीने मानसशास्त्रात मुंबई विद्यापीठातून पहिल्या वर्गात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं हे सांगताना मला अभिमान वगरे वाटत असला तरी त्याचं सारं श्रेय कांचनला. मी सहा वर्षे नागपूरला असताना मुलीचं नाजूक भावविश्व जपत त्यांची सुदृढ वाढ करून त्यांना आपापल्या क्षेत्रात काम करण्याची उभारी कांचननंच दिली.
आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमांची प्रखर समीक्षाही करतो आणि यशापयशाचे वाटेकरीही होतो. केवळ व्यक्तिगत सुखासमाधानासाठी बहुधा आमचं वैवाहिक जीवन नसावं, अशी आमची दृढ श्रद्धा आहे. अडचणी आल्या, अगदी पावलापावलावर आल्या, विशेषत: ‘नाटय़शाले’च्या नाटय़निर्मितीच्या वेळी. पण त्यातून कांचननं एक दिग्दíशका, निर्माती म्हणून सुटसुटीत, बाह्य़ साधनसामग्रीविना, केवळ कलावंताच्या शरीराचं, आवाजाचं, अंगचलनाचं आणि कल्पक समूहांकनाचा वापर करणारी एक वेगळी रंगभाषा ‘नाटय़शाले’साठी विकसित केली, रुजवली आणि प्रचलित केली. आज नाटय़शाळेचा व्याप प्रचंड वाढलाय..
तत्पूर्वी, आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही मराठवाडा विद्यापीठाच्या फ्लॅटमध्ये राहायला गेलो. मी १० वाजताच जेवून कार्यालयात जायचो. विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत, परिसर सौंदर्यीकरण असो, गरीब विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे, विशेष अनुदानाचे प्रश्न असोत किंवा विद्यापीठ अनुदान मंडळाकडे विद्यापीठातर्फे पाठवण्याचे संकलित प्रस्ताव तयार करणे असो, सोनटक्के सरांचा सहभाग हा आग्रहानं आणि हक्कानं घेतला जायचा. या विद्यापीठाच्या कार्यव्यापाला सांभाळून सायंकाळी ६ ते रात्री ९-३० नाटय़शास्त्र विभागाची एकशिक्षकी शाळा ७-८ विषयांचं सद्धांतिक, प्रात्यक्षिक प्रशिक्षण, साधनांची, साहित्याची जुळवाजुळव आणि वर्षांला दोन मोठय़ा नाटकांची निर्मिती या साऱ्यांत घरासाठी, कांचनसाठी, भावजीवनासाठी वेळ कुठला? पण सकाळी कामावर गेलेला नवरा रात्री १० वाजता परतल्यावर त्याच्या समाधानाची, तृप्तीची अंगभाषा कांचनला कळत असावी. घराव्यतिरिक्त विद्यापीठात आणि आमच्या नाटय़शास्त्र विभागात येणारे पाहुणे अतिथी निवासात उतरायचे, पण त्यांचा पाहुणचार कांचन आनंदानं करायची. यात बा. भ. बोरकर, सुहासिनी मुळगावकर, डॉ. अशोक रानडे, पुष्पा भावे, दादा केळकर, भालबा केळकर ही मंडळी नेहमीची. प पाहुणे, आगंतुक अगदी नाटय़शास्त्राच्या तालमीनंतर १०-१० लोकांचं अवेळी जेवणदेखील ती बिनतक्रार करायची. कुठला तरी अवलिया विद्यार्थी अर्धा तास आधी वर्दी द्यायचा- ‘मॅडम, ८-१० लोकांची खिचडी’! कांचन रात्री ११ वाजता खिचडी करून जेवायला घालायची. औरंगाबादला असेच एकदा माझे वडील आप्पासाहेब गावाकडील काही पाहुण्यांना घेऊन पोचले. मॅडम सोनटक्केंनी दुपारच्या जेवणाविषयी विचारलं. चतुर्थीचा उपवास असल्याचं कळल्यावर फराळ वगरे झाला. वडिलांनी रात्री उशिरा चतुर्थीचा उपवास सोडण्याविषयी सांगितलं. माझ्या भावांपुढे संकट उभं ठाकलं, वहिनी आता पुरणपोळ्यांचा नवेद्य वगरे कसा करणार? कांचननं न डगमगता पुरणाचा घाट घातला आणि रात्री १० च्या सुमारास मी नाटय़शास्त्र विभागातून परत येताच नवेद्य दाखवून पंगत बसली. कांचनच्या हातच्या पुरणपोळ्यांनी वडिलांना माझ्या आजीच्या हातच्या पुरणपोळ्यांची आठवण झाली. त्यांनी कौतुक केलं. मग काय साऱ्या नातेवाइकांकडे या मुंबईच्या सूनबाईंचं कौतुकपर्व सुरू झालं.
सामान्यपणे संसार सुखी वगरे करण्यासाठी लोक प्रवासाला जातात. एकमेकांना समजून घेतात. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून खरेदी करतात. आम्ही वेळ काढून, खरेदीसाठी-घरच्या खरेदीसाठी- गेल्याचं मला फारसं आठवत नाही. हां, पण वेगवेगळ्या नाटकांसाठी लागणारी सुयोग्य प्रॉपर्टी आणि वेशभूषेची जुळवाजुळव करण्यासाठी मात्र आम्ही सराफ बाजार, मोंढा बाजार, अगदी शुक्रवारचा शहागंजचा चोरबाजारदेखील िपजून काढायचो. वेशभूषेबाबत आमचे कलात्मक वादही व्हायचे, पण अंतिम शब्द कांचनचा असायचा. याचं कारण त्यात एक तटस्थ कलादृष्टी असायची आणि वेळप्रसंगी दूषणं द्यायला मला एक सोईस्कर संधी पण मिळायची!
आय.एन.टी.च्या काळात मी मराठी व्यावसायिक नाटकांपेक्षा प्राधान्य दिलं ते िहदी नाटकांच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाला. ‘इप्टा’साठी मुन्शी प्रेमचंदांचं ‘गोदान’ बसवलं. ए. के. हनगल, रोहिणी हट्टंगडी यांच्या मध्यवर्ती भूमिकांनी विक्रम केला. रोहिणीची रिचर्ड अॅटनबरो यांनी ‘गांधी’ चित्रपटासाठी निवड केली. याच काळात कांचन सोनटक्के यांनी ‘नाटय़शालेची’ स्थापना करून रीतसर कामाची दिशा सुनिश्चित करून सर्वसामान्य मुलांच्या ऐवजी अस्थिव्यंग, मूक-बधिर, अंध आणि मतिमंद विद्यार्थ्यांबरोबर कामाला सुरुवात केली. त्यांचा भर सतत व्यक्तिमत्त्व विकासावर होता. बाधित मुलांना त्यांच्या व्यक्तिगत न्यूनगंडातून मुक्त करून शरीर, मनानं आणि एकाग्रतेनं अभिव्यक्त करायला त्या शिकवत होत्या. त्यांच्यातील संघभावना वाढवत होत्या. श्वसन, अंगचलन, लय-ताल या नृत्यात्मक आयुधांचा त्या परिणामकारक वापर करून मुलाकडून ‘चू चू चू!’, ‘उंदराचं लगीन’, ‘चल रे भोपळ्या’सारख्या प्रभावी नाटय़कृती सादर करून प्रशंसा मिळवीत होत्या. कांचन सोनटक्के यांच्या नाटकांची कथानकं नेहमी बोधपर, रचनात्मक, मानवी जीवनमूल्यांचा आदर करणारी, करणाऱ्यांना आणि बघणाऱ्यांनाही आनंद देणारी असतात. त्यांच्या नाटकात नेपथ्याचा कधीच बडेजाव नसायचा. त्यापेक्षा कल्पकतेला चालना देणारी त्यांची चित्रमय, रंजक रंगभाषा असायची.
आज मागे वळून बघताना आमच्या दोघांच्या सहजीवनाचा पट नजरेसमोर आणताना विश्वास बसणार नाहीत इतका सुखद, समाधान व कर्तव्यपूर्तीचा आनंद देणारा वाटतो. आम्ही एकमेकांच्या सुख-दु:खात न सांगता सहजपणे सामावून जातो. शब्दांपेक्षा कृतीतून व्यक्त होतो. एकमेकांबाबत सदैव आश्वस्त आणि निर्धास्त असतो. माझ्या अस्थिरतेचा, धडाधड निर्णय घेऊन हातची स्थिरता सोडून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेण्याच्या वृत्तीला पत्नी म्हणून कांचननं प्रतिरोध केला असता तर दोन ते तीन जन्मांत पूर्णपणे मिळाला नसता असा नाटय़ प्रशिक्षक, नाटय़ दिग्दर्शक, अभिनेता, कलासंयोजक, कला प्रशासक म्हणून मिळवलेला प्रदेश, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचा अनुभव मला कदाचित घेता आला नसता. कांचननं मला, माझ्या नातेवाइकांना, माझ्या कामाला पूर्णपणे आपलंसं केलं नसतं तर मला झेप घ्यायला बळच मिळालं नसतं. अर्धवट मनासारखं अर्धवट मनाविरुद्ध-जगण्यासाठी आवश्यक ते मन, जीवनविषयक दृष्टिकोन आजही माझ्यात नाही. पुढे अंगीकरण्याचा प्रश्नच नाही.
एकमेकांसाठी असणं, एकमेकांना पूरक होणं यासाठी आम्ही नेहमी सजग असतो. नव्हे तो आमच्या दैनंदिन जगण्याचा भाग बनलाय. माझ्या बायपासपासून, ते अगदी सर्दी-खोकल्यापर्यंत आणि दररोजच्या औषधपाण्याच्या साऱ्या जबाबदाऱ्या कांचनच्या. मला भरपूर भाजीपाला, फळं आणण्याची सवय, एवढचं नाही तर अगदी कुर्त्यांचे, कपडय़ांचे सेट आणण्याचंही वेड. आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी झाली की मॅडम खरंच रागावतात. मी निर्ढावल्यासारखा मख्ख तरी राहतो, नाहीतर वैतागतो. पूर्वी मी जाईन तिथून एकदोन साडय़ा आणायचो. मॅडमनी दम देऊन माझ्या या पत्नी-प्रेमाला आळा घातला. त्यांच्या मते नाटकाच्या पात्रांची वेशभूषा ही फार सोपी असते. घरात ती दृष्टी लागू पडेलच असं नाही. त्यामुळे आमचा उत्साह मावळतो. ‘चलता है! इतना सब कुछ पाने के लिए छोटा मोटा हठ तो छोडना ही पडेगा ना!’
काळाच्या प्रवाहात आम्ही खूपसे एकमेकांसारखे झालोत. मुळात नसलेला कणखरपणा कांचनमध्ये आलाय, तर थोडय़ाशा परावलंबीपणामुळे असेल, मार्दव, मृदुता माझ्यात आली आहे, असं वाटतं. माझा पूर्वीचा दरारा जाऊन एका हटवादी बालमनानं माझा ताबा घेतलाय असं वाटतं.
नाटक हा माझा धर्म आहे, तर नाटय़ माध्यम हा अनेकांना मोक्षाकडे नेण्याचा खेळकर मार्ग आहे, असं मॅडमकडे बघून मला पटलं आहे. धर्म, मोक्षाची भारतीय संस्कृतीत आणि अध्यात्मात अजोड सांगड आहे. त्यांचं एक आगळं महत्त्व आहे. हे आम्हाला पदोपदी जाणवतं. विद्यार्थी म्हणून वेगवेगळ्या वळणांवर सोबत आलेल्यांचे कलेच्या, सांस्कृतिक क्षेत्रातले मार्ग प्रशस्त झालेले बघून मला नितांत समाधान वाटतंय; तर मॅडमनी अनेक मुलांना पुनर्जन्म दिला, त्यांचं स्वत्व मिळवून दिलं असं जेव्हा सभांमधून, व्याख्यानांतून आणि पुस्तकांतून मुलांचे पालक लिहितात तेव्हा ‘मॅडम’च्या जीवनात आपण त्यांचे साथीदार आहोत याचा दिगंत आनंद वाटतो. हे भाग्य किती लोकांच्या वाटय़ाला येत असेल.
मॅडमना त्यांच्या आगळ्या कामासाठी ‘दलित मित्र’ पुरस्कार मिळाला, ‘हिरकणी’ पुरस्कार मिळाला. गोमंतकाच्या कर्तृत्ववान कन्यकांमध्ये लता मंगेशकर, किशोरी आमोणकर, प्रफुल्ला डहाणूकर यांच्याबरोबर गौरव झाला. त्यांना त्यांच्या बाधित मुलांच्या, त्यांच्या पालकांच्या आनंदापुढे कुठल्याही पुरस्काराचं मोल गौण वाटतं, आम्ही दोघेही प्रसिद्धीच्या या रगाडय़ापासून दूर राहण्यात समाधान मानतो.
आज ११ वर्षांच्या बाधित मुलांच्या राज्यस्तरीय बालनाटय़ स्पध्रेला विराम देऊन त्यांनी या वर्षी १५० बाधित मुलांच्या १४ दिवसांच्या पाच कार्यशाळा पूर्ण केल्या. आता बाधितांना नाटय़ आणि व्यक्तिमत्त्व विकास शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी एक वर्षांचा अभ्यासक्रम राबवण्याच्या तयारीत त्या आहेत. एक खटकतं, मॅडम स्त्री असल्यानं त्यांचं नेतृत्व मान्य करणे अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीच्या पचनी पडत नाही. अगदी राज्यस्तरीय कार्यक्रमातही नाटय़शाळेचं श्रेय प्रा. कमलाकर सोनटक्के आणि कांचन सोनटक्के यांच्यात वाटून देण्याचं औदार्य अगदी जाणकार दाखवतात तेव्हा खरंच विषाद वाटतो आणि संकोचही.
पतीनं पत्नीविषयी किंवा पत्नीनं पतीविषयी फारसं बोलू नये, पण आमचं हृद्य, तृप्त नातं हे अभिव्यक्तीपलीकडचं आहे. हां, हेवा वाटलाच तर तो आम्हाला एकमेकांच्या समजूतदारपणाचा वाटतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2014 1:01 am

Web Title: kamlakar sontakke and kanchan sontakke
टॅग Marathi Drama
Next Stories
1 बटवारा
2 सत्कृत्याची साधना
3 आणखी प्रयत्नांची गरज
Just Now!
X