जागतिक पत्रकारितेचा एक मानिबदू गणल्या जाणाऱ्या आणि जवळजवळ २०० वर्षांची परंपरा सांगणाऱ्या ‘गार्डियन’ या मूळ ब्रिटिश पण आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशांतही पोहोचलेल्या वृत्तपत्राच्या प्रमुख संपादकपदी नुकतीच कॅथरीन व्हायनर यांची नेमणूक झाली; मात्र आजही जगभरातील वृत्तपत्राच्या प्रमुखपदाची, वरिष्ठपदांची जबाबदारी फारच अभावाने स्त्रियांकडे दिली जाते. काय असावीत याची कारणे, त्याचा ऊहापोह करणारा लेख, ज्येष्ठ पत्रकार व माजी संपादकाच्या नजरेतून.

जागतिक पत्रकारितेचा एक मानिबदू गणल्या जाणाऱ्या आणि जवळजवळ २०० वर्षांची परंपरा सांगणाऱ्या ‘गार्डियन’ या मूळ ब्रिटिश पण आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा इतर देशांतही पोहोचलेल्या वृत्तपत्राच्या प्रमुख संपादकपदी नुकतीच एका महिलेच्या नावाची घोषणा झाली, आणि ही ब्रिटनमध्ये मोठीच बातमी ठरली.
      या घटनेकडे ब्रिटिशांनी किती कौतुकाने पाहावे? वास्तविक वैमानिक, वैज्ञानिक, अभियंता, वास्तुतज्ज्ञ अशी आताआतापर्यंत पुरुषी वर्चस्वाची समजली जाणारी अनेक क्षेत्रे व्यवसायकुशल आधुनिक महिलांनी सर केल्यानंतर वृत्तपत्राच्या प्रमुख संपादकपदी एखाद्या महिलेला नेमायला ‘गार्डियन’ने १९५ वष्रे घ्यावीत, हे प्रगत समजल्या जाणाऱ्या राष्ट्रांत सुद्धा अजून महिलांच्या कार्यक्षमतेवर तेथील पुरुषांचा पूर्ण विश्वास नाही, हे सिद्ध करणारे उदाहरण आहे. गेल्या महिन्यात (मार्च २०१५) कॅथरीन व्हायनर यांना गाíडयन आणि ऑब्झर्वरच्या संपादकीय खात्यात काम करणाऱ्या सुमारे हजार पत्रकारांनी ५३ टक्के पहिल्या पसंतीची मते देऊन त्यांना अ‍ॅलन रस्ब्रिजर यांच्यानंतर प्रमुख संपादकपदी निवडले. अंतिम टप्प्यात कॅथरीन व्हायनर यांची स्पर्धा फक्त एकाशीच होती. बी.बी.सी. टेलिव्हिजनवर ‘न्यूज-नाइट’ नावाचा लोकप्रिय कार्यक्रम सादर करणाऱ्या इयान कात्झ या ‘गार्डियन’चेच भूतपूर्व साहाय्यक संपादक असलेल्या अनुभवी पत्रकाराशी. पण अखेरीस कॅथरीन व्हायनर यांची नवे प्रमुख संपादक म्हणून नेमणूक झाली. या नेमणुकीचे अप्रूप हे की ब्रिटनच्या प्रदीर्घ वृत्तपत्रीय इतिहासात अनोखा असा हा प्रसंग आहे. एखादी महिला प्रमुख संपादकपदी नेमली गेली आहे. खरे तर एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात लंडनमध्ये रेचेल ससून बिअर या मुंबईकर डेव्हिड ससून कन्येला हा मान दिला गेला पाहिजे. पण रेचेल होती वृत्तपत्रांची मालकीण. पत्रकारितेच्या शिडीच्या पायऱ्या एकेक करून चढत सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेली व्यावसायिक पत्रकार म्हणून कॅथरीनचेच नाव घ्यायला हवे.
वास्तविक या घटनेने आश्चर्याचा धक्का बसायचे कारण नव्हते. कधी न् कधी अशी घटना घडणारच होती. पुरुषांपेक्षा आपण कोणत्याही बाबतीत कमी नाही, तोडीस तोड आहोत, किंबहुना काही बाबतीत सरस आहोत, हे आत्मभान आलेला महिला वर्ग पूर्वी पुरुषी क्षेत्र म्हणून गणली जाणारी क्षेत्रे एकेक करून पादाक्रांत करून ती आपल्या वर्चस्वाखाली आणत असता, वृत्तपत्राच्या संपादक विभागाचा प्रमुख का असू नये, हा प्रश्न पूर्वीच विचारावयास हवा होता. किंबहुना तो तसा खासगी बठकांत विचारला गेलाही असेल. आताच्या जमान्यात प्रमुख संपादक या पदावर महिला न बसणे हे अन्यायकारक आणि समानतेच्या तत्त्वाला न जागणारे होते. एवढे काही ते पद ‘पुरुषालाच झेपेल’ अशा प्रकारचे नाही. म्हणूनच या घटनेचे स्वागत व्हावे अशाच प्रकारची ही घटना आहे. ते तसे जगभर झाले.
कॅथरीन ही एका शिक्षक जोडप्याची मुलगी. यॉर्कशायरमध्ये ती वाढली. वयाच्या १६ वर्षांपासून वृत्तपत्रासाठी ती लिहायला लागली तरी पत्रकारिता हा व्यवसाय करण्याची तिची मनीषा अजिबात नव्हती. पण पत्रकारितेकडे ती आकृष्ट झाली आणि स्थानिक वृत्तपत्रात तिने पत्रकारितेचे प्रारंभीचे धडे गिरवले. वयाची तिशी तिने ओलांडली आणि इतर काही वृत्तपत्रांत काम करत करत तिला ‘गार्डियन’ वृत्तपत्राच्या महिला-पुरवणीचे संपादकपद मिळाले तरी ‘हे क्षेत्र सुटा-बुटातल्या पुरुषांसाठीच आहे’ असाच तिचा ग्रह होता. करिअर म्हणून तिने पत्रकारितेचा विचार केलाच नव्हता. प्रवासाची आवड असल्यामुळे तिने भरपूर भटकंती केली आणि सुटीचे सारे दिवस मध्य-पूर्वेत म्हणजे लेबेनन, सीरिया, इस्रायल, वेस्ट बँक अशा अशांत टापूत व्यतीत करायला तिला आवडे. मे २०१३ मध्ये कॅथरीन ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे ‘गार्डियन’च्या नव्याने सुरू केलेल्या डिजिटल आवृत्तीची प्रमुख झाली, तेथून तिच्या करियरमध्ये महत्त्वाचे बदल व्हायला सुरुवात झाली. सप्टेंबर २०१४ मध्ये तिला न्यूयॉर्क येथे ‘गार्डियन’च्या ‘ऑनलाइन’ आवृत्तीचे प्रमुख नेमले गेले. आणि आता ‘गार्डियन’च्या प्रमुख संपादकपदी नेमणूक झाली.
आजमितीस कॅथरीन व्हायनर  यांचे वय ४४-४५ आहे. याचा अर्थ त्या निवृत्तीपर्यंत पदावर टिकल्या तर पुढच्या १५-२० वर्षांत त्यांना ‘गार्डियन’वर आपला खास ठसा उमटवता येऊ शकतो. चांगल्या व सुदृढ परंपरा असलेल्या वृत्तपत्रांच्या व्यवसाय-नीतीत बसणारी ही बाब आहे. प्रत्येक संपादकाला दहा-बारा वष्रे कार्यकाल मिळाला तर तो त्या वृत्तपत्रावर निश्चित असा आपला ठसा उमटवू शकतो या सत्यतेवर आधारित असा हा निर्णय. संपादकाला अल्पकालिक किंवा अस्थिर खुर्चीत बसविले तर तो कसे आणि कोणत्या अर्थाने वृत्तपत्राला स्थिर करणार? ब्रिटिश वृत्तपत्र मालक इतर अनेक परांपरांबरोबर हीही परंपरा जपताना आढळतात.
एक काळ असा होता की महिलांना नाजूक, दुर्बल अशा प्रकारची विशेषणे लावून त्यांना अनेक बाबींपासून वंचित ठेवणाऱ्या समाजाला महिलांच्या वंचित राहण्याने समाजाने केवढी शक्ती वाया दवडली, याचे भान आपल्या समाज-सुधारकांनी आणून दिले. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी म्हटल्याप्रमाणे –By keeping our women in ignorance we have wasted half our intelligence and resources.  सुधारणा ही नेहमी शिक्षणाच्या मार्गाने जाते हे ध्यानी आलेल्या जगभरच्या सुधारकांमुळेच शिक्षण, उच्च शिक्षण, विचार-बदल, आचार-स्वातंत्र्य, निर्णय-स्वातंत्र्य, अर्थ-प्राप्ती अशी एकेक पायरी पार करत महिलांनी सुधारणा केली. आपले अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष केला. मुलांना दिले जाणारे शिक्षण आपल्यालाही दिले जावे यासाठी, मतदानाच्या अधिकारासाठी, व्यवसाय-स्वातंत्र्यासाठी, समान वेतनासाठी जगभरच्या, स्वतचे निर्णय स्वत घेण्याचा अधिकार मिळावा यासाठी, वारसा हक्क मिळण्यासाठी, आणि आता निर्भयतेने वावरण्यासाठी महिलांनी संघर्ष केला. प्रगत राष्ट्रातील महिलांचे समाजातील स्थान प्रगत विचारांना अनुसरून होते असेही नव्हे. कित्येकदा मागास समजल्या जाणाऱ्या समाजात महिलांना कित्येक बाबतीत यथायोग्य स्थान होते आणि तथाकथित प्रगत समाजात महिलांना दुय्यम स्थान असे.
  कोन्रेलिया सोराबजीचे उदाहरण घेता येईल. कोन्रेलिया ही मुंबई विद्यापीठाची पहिलीवहिली महिला पदवीधर. ती पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये असताना वर्गात असणारी एकमेव विद्याíथनी. तिला कॉलेजमध्ये किती अडचणी सहन कराव्या लागल्या, मुलांनी कसे छळले, प्रोफेसरांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, याचा उल्लेख आपल्या आत्मवृत्तात दिला आहे. तिला स्कॉलरशिप नाही, बक्षिसे नाहीत असा सारा प्रकार. पण निदान मुलांबरोबर वर्गात बसू दिले होते. ती इंग्लंडमध्ये शिकायला गेल्यावर तिला मुलांबरोबर वर्गात बसायला परवानगी नव्हती. तिला कायद्याची पदवी दिली, पण वकिली करायला परवानगी दिली गेली नव्हती. मग महिलांबाबतचा दृष्टिकोन कोणाचा सुदृढ, व्हिक्टोरिया राणीच्या अमलाखालील ब्रिटनचा की परदेशी राज्यकर्त्यांच्या अमलाखालील िहदुस्तानचा. पण सर्वसाधारणपणे दुसऱ्या महायुद्धात युरोपमधल्या राष्ट्रांमध्ये महिलांनी जे कर्तृत्व गाजविले आणि नाना प्रकारची अवघड आणि गुंतागुंतीची कामे केली त्यामुळे तेथील पुरुषांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असे म्हणता येते.
मग महिला प्रमुख संपादकपदी बसण्यासाठी एवढा कालावधी का लागला? त्याचे उत्तर पुरुषी मानसिकतेत आहे. प्रमुख संपादकाचे पद जबाबदारीचे आहे. या व्यवसायात गुप्तता राखण्याची आवश्यकता असते. हा ‘हाय प्रेशर जॉब’ ch04आहे, वगरे कारणे तयार असत. संपादकपदाचे ताण-तणाव प्रत्येक पत्रकाराला झेपतील असे नाही असा समज असण्याचा एक काळ होता. मालक, राजकीय नेते, जाहिरातदार, वाचक आणि आम समाज अशा नाना गटांच्या, संप्रदायांच्या दबाव-गटांना सामोरे जाणे प्रत्येकाला जमेलच असे नाही, त्यासाठी कणखरपणा आवश्यक. मग नाजूकपणासाठी, दुबळेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या महिलांना ते कसे जमणार. संपादकाला सुटी मिळणे दुरापास्त होते. मग घराची सारी जबाबदारी असणाऱ्या महिलेला हे कसे जमणार? असाच विचार केला जाई. पूर्वीच्या पत्रकारितेत अडचणीही फार होत्या. सहकारी कमी, तंत्र जुनाट, त्यामुळे संपादकाला अधिक मेहनत आणि तीही दिवसाकाठी अधिक काळ करावी लागे. जागरणे फार होत. आता तसे राहिलेले नाही. सर्व बाबतीत स्पेशलायझेशन झाले आहे, कामात शिस्त आली आहे, कामाचे वाटप झालेले आहे, संपादकाने दिवस-रात्र काम करण्याची गरज राहिलेली नाही. प्रधान संपादक, प्रबंध संपादक, कार्यकारी संपादक अशी अनेक पदे निर्माण केली गेली आहेत. सहकारी वर्गही बराच वाढलेला आहे. कंपोिझग आणि छपाई तंत्राने तर जणू क्रांती केली आहे. पण नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अस्तित्वाची लढाई खेळावी लागत आहे, नव्या माध्यमांशी स्पर्धा करावी लागत आहे. व्यवसाय-नीती सोडून अल्प आणि तात्कालिक यशासाठी तडजोडी करताना कुचंबणा होत आहे. पण आव्हाने नाहीत अशी पत्रकारिता असूच शकणार नाही. त्यामुळे आपल्याला पुढे कशाचा सामना करावा लागणार आहे याची कॅथरीन व्हायनर यांना पुरेपूर कल्पना असणार. त्यांचा आतापर्यंतचा अनुभव आणि वृत्तपत्राला दिग्दर्शन करण्याची त्यांची क्षमता, मालक वर्गाचा पािठबा आणि सहकाऱ्यांचे सहकार्य यांच्यावर त्यांचे यश अवलंबून असेल. प्रमुख संपादकपदी एखादा पुरुष बसला असता तरी त्यालाही हेच आवश्यक होते.
प्रत्येक पुरुषातसुद्धा जी क्षमता असत नाही ती स्त्रियांत कशी असणार, अशी काहीशी जुनी विचारपद्धती होती. आपल्याकडेच ती होती असेही नाही. अगदी पुढारलेल्या देशांतही ती तशीच होती. कित्येक प्रगत देशांत ती अजूनही आहे. पूर्वी जे. आर. डी. टाटा यांच्यासारखी विचारी व्यक्तीही महिलांना जबाबदारीची पदे देण्याविरुद्ध होती. पण पुरुष करतील ती सारी कामे त्यांच्या इतक्याच कुशलतेने आपण करू शकतो अशी हमी सुधा मूर्ती यांनी दिल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास पाहून टाटांनी आपले मत बदलले होते. जगातील सर्वानीच आपल्या गरसमजाला फेकून दिले असे नव्हे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी अजून एकही महिला बसली नाही, महिलेला त्या पदावर अद्यापि बसू दिले गेले नाही, याची खंत आज काही अमेरिकनांना निश्चित आहे. अशी खंत वाटणाऱ्या अमेरिकनांची संख्या प्रतिवर्षी वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी एखादी महिला बसणे हा आता केवळ उपचार राहिला आहे, आणि तो पार पडण्याचेच बाकी आहे. या समाज-बदलासाठी तेथील जन-मन नक्कीच तयार झाले आहे. आजही कित्येक क्षेत्रात महिलांना पुरुषांइतके मानधन अथवा वेतन दिले जात नाही. समान वेतनाचा कायदाही अनेक राष्ट्रांत नाही. या व अशा बदलांना आजही ‘मोठय़ा सुधारणा’ मानले जात असेल तर स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व आजही मृगजळासारखेच आहे असे मानावे लागेल. या प्रकारचे बदल यापुढे सहजपणे होणे अपेक्षित नाही का?
डॉ. अरुण टिकेकर -aroontikekar@gmail.com