16 January 2021

News Flash

गर्जा मराठीचा जयजयकार : मराठीची पताका फडकत राहो!

‘मराठी भाषा दिन’ किंवा ‘महाराष्ट्र दिन’ आल्यावर मराठीचे गोडवे गाणारे आपण पाल्यांना मराठी शाळेत घालताना मात्र कचरतो.

इंग्रजी उत्तम येण्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमाच्याच शाळेत घालणं गरजेचं नसतं, हे या सदरानं वारंवार अधोरेखित केलं.

मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

‘मराठी भाषा दिन’ किंवा ‘महाराष्ट्र दिन’ आल्यावर मराठीचे गोडवे गाणारे आपण पाल्यांना मराठी शाळेत घालताना मात्र कचरतो. आधुनिक जगातील वाढत्या स्पर्धेत इंग्रजी उत्तम आलं तरच मूल तरून जाईल, असं पालकांना वाटणं साहजिक आहे. पण इंग्रजी उत्तम येण्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमाच्याच शाळेत घालणं गरजेचं नसतं, हे या सदरानं वारंवार अधोरेखित केलं. मराठी माध्यमात शिकून पुढे उत्तम यश मिळवलेल्या अनेक मंडळींही या सदरातून त्याला दुजोरा दिला. हे सदर या लेखाबरोबर संपत असलं तरी मराठीचा जयजयकार नुसता तोंडी न करता कृतीतून झाला तर या सदराचं ईस्पित साध्य झालं, असं म्हणता येईल.

‘गर्जा मराठीचा जयजयकार’ या लेखमालेतील हा शेवटचा लेख. बघता बघता वर्ष सरलं. मराठी भाषेबद्दलचं प्रेम, तिची गेल्या काही वर्षांतील अवहेलना आणि मराठी शाळांच्या रोडावणाऱ्या संख्येबद्दल वाटणारी खंत, याबद्दल गेली काही र्वष आम्ही दोघी नेहमी बोलत होतो. आपल्याकडे ही स्थिती असताना पेरूसारख्या देशात लोकांना आपल्या भाषांविषयी किती प्रेम आहे आणि त्या भाषा पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांचे काय प्रयत्न चालू आहेत, वसाहतवादाचा फटका बसून नामशेष झालेल्या स्थानिक भाषांतील शाळा आता पुन्हा कशा चालू करण्यात आल्या आहेत, आपली मुलं त्या शाळेत शिकतात हे लोक किती अभिमानानं सांगतात हे मुग्धानं तिथल्या भेटीत  प्रत्यक्ष अनुभवलं. या विषयावर पुढे वाचन करताना न्यूझीलंड, इस्रायलची, त्यांच्या भाषाप्रेमाची, भाषा पुनरुज्जीवनाची उदाहरणं पुढे आली, ज्यामुळे मनातील खंत अधिकच प्रबळ झाली. एकीकडे ही उदाहरणं आणि दुसरीकडे शुभांगीची मुलं मुंबईतील ज्या शाळेत शिकली, ती मराठी शाळा बंद पडली अशी दुसऱ्या टोकाची परिस्थिती! दर वेळी ‘जागतिक मराठी दिन’ किंवा ‘महाराष्ट्र दिन’असला की मराठीची महती गाणारे मेसेजेस वाचून त्यातील पोकळपणाही आम्हाला जाचत असे. त्या अस्वस्थतेतून या लेखमालेचा जन्म झाला.

इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणं आणि त्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे, या समजाला काटशह देण्यासाठी मराठी माध्यमातून शिकून आपापल्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी झालेल्या अनेक लोकांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. त्यांचे अनुभव, अडचणी आणि त्यावर त्यांनी मात कशी केली, हे जाणून घेऊन आपल्यापुढे  मांडलं. त्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील, शहरी आणि ग्रामीण अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींचा समावेश होता. तसंच जाणीवपूर्वक गेल्या पंधरा वर्षांत, म्हणजे मराठी शाळांची पीछेहाट वेगानं होऊ लागली त्या काळात मराठी शाळांतून उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींचा समावेश केला होता. या सगळ्यांनी माध्यमामुळे कसलीही अडचण आली नाही हे ठासून सांगितलं. इंग्रजीवर, विशेषत: इंग्रजी संभाषणावर प्रभुत्व कसं मिळवायचं, शब्दसंग्रह कसा वाढवायचा किंवा माध्यमामुळे आपल्या मुलांना न्यूनगंड येऊ नये यासाठी काय करता येईल, याविषयी काही छान कल्पनाही आपल्यापुढे आल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या मराठी व्यक्तींनी नुसतं इंग्रजी येण्यापेक्षा विषय समजणं आणि संवाद साधणं महत्त्वाचं असतं असं सांगितलं. तर युवक- युवतींनी नवीन तंत्रज्ञानाचा (‘अ‍ॅप्स’चा) वापर करून पालक आपल्या मुलांना इंग्रजी संभाषण सहज शिकवू शकतात, हे सांगितलं. पालक मुलांना आपण मातृभाषेतून शिकतो म्हणजे काही प्रवाहाविरुद्ध जाऊन विशेष करतो आहोत, असाही आत्मविश्वास देऊ शकतात, पण त्यांना स्वत:ला त्याची खात्री असणं आवश्यक आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला.

काही मराठी शाळा आजही स्पर्धेला यशस्वीरीत्या तोंड देत उभ्या आहेत. यातील काही विनाअनुदानित प्रयोगशील शाळा आहेत तर काही अनुदानित शाळा आहेत. आम्ही त्यांच्या संचालकांच्या, मुख्याध्यापकांच्या मुलाखती घेतल्या. हेतू असा, की इतर मराठी शाळांनाही यशस्वी शाळांनी हे कसं साध्य केलं हे समजावं. त्यातून त्यांच्याही समस्या लक्षात आल्या. एकीकडे शाळा आधुनिक करण्यासाठी, सुविधा पुरवण्यासाठी करावा लागणार खर्च आणि दुसरीकडे रोडावणारी पटसंख्या, हे गणित कसं जमवायचं? सर्व सुविधा अधिक पैसे खर्च न करता मिळाव्यात ही पालकांची अपेक्षा, शिवाय शिक्षकांचं प्रशिक्षण आणि गुणवत्तावर्धन अशा किती तरी गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो. शासनाचे नवनवीन नियम पाळून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचं काम करत राहाणं म्हणजे खरोखरच तारेवरची कसरत. पण त्यातूनही काही संस्थांनी कसा मार्ग काढला, माजी विद्यार्थ्यांचं सहाय्य या कामी कसं मोलाचं ठरू शकतं, हे आपण पाहिलं. याशिवाय आम्ही शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यांच्याही मुलाखती घेतल्या. त्यातून मुलं भाषा आणि इतर गोष्टी कशी शिकतात, शिक्षणातील भाषेचं महत्त्व, इंग्रजी ही भाषा म्हणून शिकणं आणि ती शिक्षणाचं माध्यम असणं यातील फरक, या गोष्टी स्पष्ट झाल्या. इतर देश जागतिकीकरणामुळे वाढणाऱ्या इंग्रजीच्या रेटय़ाला तोंड देत असतानाच मातृभाषेतून शिक्षण देऊनही मुलांना इंग्रजी बोलता येईल याची कशी काळजी घेतात, हेही आपण पहिलं.

वाचकांचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. काहींना या मुलाखती वाचून धीर आला. काहींनी हे लेख पुस्तकस्वरूपात प्रसिद्ध करायची विनंती केली. ज्यांना प्रश्न, अडचणी होत्या त्यांची योग्य त्या व्यक्तीशी गाठ घालून द्यायचा आम्ही प्रयत्न केला. काही मतभेद व्यक्त करणाऱ्या ई-मेलही आल्या. प्रत्येक ई-मेलला उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न राहिला. वाचकांच्या प्रतिसादातून काही मुद्दे लक्षात आले. पालकांचे जे प्रश्न आम्हाला माहीत होते ते अधोरेखित करणाऱ्या ई-मेल आल्या. समविचारी पालकांचा गट (सपोर्ट ग्रुप) असणं, त्यांना एकमेकांशी विचारविनिमय करता येणं आवश्यक आहे, ज्यायोगे मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालून आपण चूक केलेली नाही याची त्यांना खात्री पटत राहील. अशा गटांमुळे त्यांच्या मुलांनाही खेळायला सवंगडी असतील याची त्यांना शाश्वती मिळू शकेल. जे पालक मराठी माध्यमाचा विचार करतात,  पण ओळखीतलं इतर कु णीच मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालत नसल्यानं कचरतात, अशा पालकांची मराठी माध्यमात शिकणाऱ्यांच्या पालकांशी गाठ घालून देता येईल अशी सध्या सोय नाही. मराठी माध्यमातून शिकू न अलीकडेच बाहेर पडलेल्या मुलांचा महाविद्यालयीन आणि त्यापुढचा प्रवास, त्यांचे अनुभव जर नव्या पालकांना सोदाहरण दाखवता आले, तर हे आणि इतरही पालक मराठी माध्यमाकडे वळण्याची जास्त शक्यता आहे, हेही आमच्या लक्षात आलं.

मग आम्ही या गोष्टी शिक्षण क्षेत्रातील काही अनुभवी मंडळींच्या कानावर घातल्या. त्यावर काही कृती व्हायला हवी, असं त्यांचंही मत होतं. या क्षेत्रात गेली अनेक र्वष तळमळीनं काम करत असलेल्या ‘मराठी अभ्यास केंद्रा’शी याबाबत संपर्क साधावा असं ठरलं. मराठी अभ्यास केंद्र हे गेली कित्येक र्वष मराठी भाषा आणि समाजाच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या कृतिगटांमार्फत काम करत आलं आहे. शिक्षक, पालक, शासन, समाज अशा सर्व घटकांना बरोबर घेऊन त्यांचं काम चालू असतं. त्यांच्या कार्याचा आवाका संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्यामुळे त्यांना आमच्या लक्षात आलेल्या गोष्टी कदाचित फार छोटय़ा, जुजबी वाटतील अशीही शंका मनात होती. परंतु या केंद्रानं अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. आजच्या युगात समाजाचा इंग्रजीकडे ओढा आणि उदासीन शासन यामुळे मराठी शाळा चालवणं आणि टिकवणं जिकिरीचं झालं आहे. अशा वेळी एकाकी पडलेल्या संस्थाचालकांना एकत्र आणणं आणि पालक, संस्थाचालक आणि शासन यात समन्वय साधणं आवश्यक आहे हे केंद्रानं ओळखलं आहे. त्यानुसार संस्थाचालकांसाठी केंद्र एक नवा कृतिगट स्थापन करत आहे. त्याद्वारे एकमेकांशी विचारविनिमय, कल्पनांची देवाणघेवाण करता येईल. एकमेकांच्या, विशेषत: यशस्वी शाळांच्या चालकांच्या अनुभवांचा फायदा इतर शाळांना करून घेता येईल. याशिवाय शाळांची गुणवत्ता सुधारणं किंवा शासनाशी संबंधित बाबींवरही एकत्रितपणे मार्ग काढता येईल.

‘मराठी अभ्यास केंद्रा’चे पालकांसाठीही अनेक उपक्रम आहेत. त्यांच्या वार्षिक मराठीप्रेमी पालक संमेलनाला खूप मोठा प्रतिसाद मिळतो. या वर्षीचं संमेलन नुकतंच ‘ऑनलाइन’ स्वरूपात १८ ते २१ डिसेंबरदरम्यान पार पडलं. त्याची लोकप्रियता लक्षात घेऊन अशा संमेलनांची संख्या वाढवण्याचा त्यांचा मानस आहे. वर उल्लेखल्याप्रमाणे समविचारी पालकांसाठी आणि संस्थाचालकांसाठी जिल्हावार गट तयार करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यानुसार सुशील शेजुळे यांच्या नेतृत्वाखाली त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. पालकांशी अधिक संवादशील राहून त्यांच्या गरजेनुसार शैक्षणिक माहिती, लेख, व्हिडीओ केंद्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा मानस आहे. पाल्याच्या भविष्याविषयी, मराठी शाळांविषयी, त्यांच्या गुणवत्तेविषयी पालकांच्या मनात असणाऱ्या शंकांचंही निरसन करणारं साहित्य केंद्रातर्फे विविध माध्यमांचा उपयोग करून दिलं जाईल. त्याचा उपयोग द्विधा मन:स्थितीत असलेल्या पालकांना मराठी माध्यमाकडे वळवण्यात होईल अशी अपेक्षा आहे.

आम्ही दोघी शिक्षणतज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ नाही. पण आजूबाजूला दिसणारी मराठीची अवहेलना आणि पीछेहाट बघून वाटणाऱ्या तळमळीतून आम्ही हे सदर लिहिलं.  यातून काही चमत्कार घडेल किंवा लगेच मराठी शाळांची संख्या वाढेल अशी आमची स्वप्नरंजित भूमिका नक्कीच नाही. पण यातून नवीन पालकांच्या मनात असलेली मराठी शाळांबद्दलची नकारात्मकता किंचित तरी कमी व्हावी, मराठी शाळेत घालू इच्छिणाऱ्या पालकांना धीर यावा, अगदीच काही नाही तर निदान शिक्षणाच्या माध्यमाबाबत असलेल्या पूर्वग्रहांचा तळ  ढवळला जावा, एवढीच माफक अपेक्षा आम्ही ठेवली होती. निदान नुसते सुस्कारे ना सोडता आपण आपल्याकडून काही केलं, एवढं तरी समाधान मिळेल असा आमचा विचार होता.

बोलणं सोपं  होतं, पण लिहिणं, तेही नियमितपणे एका वर्षांसाठी, ही मोठी जबाबदारी होती. काही जणांनी आम्हाला विचारलं, की तुमच्यापैकी एक जण अमेरिकेत आणि एक जण भारतात राहून कसं जमवता हे सगळं? जरा अडचणीचं होतं खरं. पण आधुनिक तंत्रज्ञान आणि आमची प्रबळ इच्छाशक्ती यावर सहज निभावलं. त्यातून आमची मैत्री दृढ झाली हा आणखी एक फायदा. आमचा हा पहिलाच प्रकल्प. आमच्या कुवतीनुसार आम्ही तो पार पडला. ‘लोकसत्ता’सारख्या वैचारिक वृत्तपत्रानं आमच्यासारख्या नवोदितांना संधी दिली, याबद्दल आम्ही ‘लोकसत्ता’ आणि ‘चतुरंग’ पुरवणीचे ऋणी आहोत. लेखमालेला मिळालेल्या वाचकांच्या प्रतिसादामुळे आमचा उत्साह द्विगुणित झाला. आता या लेखमालेतून पुढे आलेल्या मुद्दय़ांवर मराठी अभ्यास केंद्रातर्फे पुढेही कृती  होत राहील ही दुधात साखर!  हे समाधान आणि वाचकप्रेमाचं संचित बरोबर घेऊन, आपणा सर्वांचे मनापासून आभार मानून आता निरोप घेत आहोत.

(सदर समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 1:07 am

Web Title: keep marathi flourish garja marathicha jayjaykaar dd70
Next Stories
1 हेल्पलाइनच्या अंतरंगात : जीवनदायी मदत
2 हेल्पलाइनच्या अंतरंगात
3 चित्रकर्ती : परंपरेतून नवता जपणारी चित्रसंस्कृती
Just Now!
X