गेल्या १० वर्षांमध्ये ‘ऑनर किलिंग’ला कडवा विरोध करत खलिदा ब्रोहीने शेकडो मुलींचे प्राण वाचवले आहेत. ग्रामीण पाकिस्तानातील जवळपास २३ गावांमध्ये महिला सक्षमीकरणाचा यशस्वी कार्यक्रम राबवत त्यांच्या आयुष्यात आशेची पहाट आणली आहे. ‘ऑनर किलिंग’च्या विरोधात लढण्यासाठी ‘सुघर’ या संस्थेची स्थापना करणाऱ्या पाकिस्तानातल्या आधुनिक, पुरोगामी विचारांच्या पंचविशीच्या खलिदा ब्रोही हिच्याविषयी.
पाकिस्तानातील ‘सुघर’ उपक्रमाची प्रवर्तक खलिदा ब्रोही ही तरुण वर्गासाठी काम करणारी एक कार्यकर्ती! ‘सुघर’चा अर्थ आहे, ‘विविध कौशल्य असणारी आत्मनिर्भर स्त्री’. खलिदा नेतृत्व करत असलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश आहे, ‘ऑनर किलिंग’ची प्रथा बंद करणे, त्यासाठी समाजातल्याच काही अनुकरणीय परंपरांचा पुरस्कार करणे आणि सामाजिक-आर्थिक सबलीकरणाची सुविधा आदिवासी स्त्रियांना उपलब्ध करून देणे.
‘दोन सर्वकालीन बदल घडवून आणणाऱ्या स्फूर्तिदायी लोकांपासून मी प्रेरणा घेतलीय,’ असे ती म्हणते आणि ते दोन लोक म्हणजे तिचे आई-वडील. खलिदा म्हणते, ‘मी ज्या समाजात राहते तिथे एका मुलीसाठीचे आयुष्य म्हणजे सतत चालणारा लढा असतो. काही तरी वेगळे करायचे ठरवणाऱ्या मुलींच्या वाटय़ाला अधिकच कठीण संघर्ष येतो आणि बहुतेक वेळा त्याची मोठी किंमत चुकवावी लागते. माझ्या बहुतेक लढाया माझ्या आईवडिलांनी केल्या, त्यांनी सामाजिक बंधनांविरुद्ध लढा दिला आणि आज मी जिथे आहे, तिथे मला पोहोचवले.’
तिची आई पाकिस्तानातल्या बलुचिस्तानमधील एका छोटय़ाशा खेडय़ातली, लग्नही फार कोवळ्या वयातच झालेले. बाहुल्यांबरोबर खेळण्याच्या वयात तिला घरातल्या कामात अडकावे लागले. ती स्वत: कधीच शाळेत गेली नव्हती, तरी तिने तिच्या सहाही मुलींना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. खलिदाचे वडील म्हणजे एका छोटय़ा शेतकऱ्याचा मुलगा, पण लहानपणीच त्यांनी त्यांच्या आयुष्याचे चित्र एका वेगळ्याच पद्धतीने रेखाटायला सुरुवात केली. त्या वेळेला ते व्यवहार्य वाटत नसले, तरी दिवस बदलतील असा त्यांना विश्वास होता. शाळकरी विद्यार्थी असतानाच कुटुंबाच्या आग्रहामुळे त्यांचा विवाह करून देण्यात आला, पण त्यांनी त्यांची स्वप्ने सोडली नाहीत. एक दिवस शाळेतून येताना त्यांनी पुस्तके आणली आणि पत्नीलाही शिकवायला सुरुवात केली.
खलिदा मानते की तळमळ, विश्वास आणि चिकाटी या तीन गुणांमुळे बदल घडवून आणणारा यशस्वी होतो. बदल घडवून आणायचा असेल तर प्रश्नांबद्दल तळमळ पाहिजे. तुम्हाला जे करायचेय, ते अतिशय ज्वलंत आहे, असे तुम्हाला प्रकर्षांने जाणवले पाहिजे. दुसऱ्यांना होणाऱ्या यातना तुम्हालाही तंतोतंत तशाच जाणवल्या तर तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळते. जगात असाध्य असे काही नाही यावर जर तुमचा ठाम विश्वास असेल, तर तुम्ही तुमची उद्दिष्टे साध्य करू शकता. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वत:ला तयार केले पाहिजे. तेव्हाच सगळ्या शक्यता वाढतात आणि अडथळे सूक्ष्म बिंदूसारखे होतात.
एवढय़ा तरुण वयात खलिदाच्या विचारांची प्रगल्भता अचंबित करते. खलिदा जेव्हा १६ वर्षांची होती, तेव्हा तिची मैत्रीण प्रियकराशी लग्न केल्यामुळे ऑनर किलिंगला बळी पडली होती. हीच घटना खलिदाला स्त्रियांसाठी ‘सुघर’च्या स्थापनेची प्रेरणा देणारी ठरली. ‘ऑनर किलिंग’च्या विरोधात उभे ठाकल्यावर परिस्थिती कित्येकदा फारच आव्हानपूर्ण होत गेली. पाकिस्तानच्या विशेषत: आदिवासी भागात, इतर प्रथांबरोबर ‘ऑनर किलिंग’ला काहींची मान्यता असल्याने त्या भागात कार्य करताना प्रश्न अधिकच उग्र स्वरूप धारण करत गेला.
खलिदा सांगते, ‘‘१६व्या वर्षी ‘ऑनर किलिंग’च्या विरोधात काम सुरू केल्यावर धोका किंवा विरोध काही असतो, याची मला जाणीवच नव्हती. २००८ मध्ये माझ्या समाजातील आदिवासी नेते आणि ‘ऑनर किलिंग’चे पुरस्कर्ते जेव्हा माझ्या विरोधात उभे ठाकले, आणि त्यांनी मला कडवा विरोध केला, तेव्हा मला माझे जन्मागाव सोडून कराचीला पळून जावे लागले.. मला आणि माझ्या टीमला तेव्हा पराकोटीचे अपयश वाटले, पण आमच्या ज्ञानाचा तो एक पाया ठरला. आमच्या कामात पीछेहाट होते, हे आम्ही स्वीकारले, पण त्याचाच उपयोग पुन्हा उभे राहण्यासाठी करता येतो, हेदेखील आम्ही शिकलो. त्या घटनाक्रमानंतर सहा महिन्यांतच ‘सुघर’ने आकार घेतला. या खेपेस आम्ही एका नवीन कार्यप्रणालीसह आदिवासी समाजाला सामोऱ्या गेलो आणि यश तिथेच आमची वाट बघत होते..’’
लोकांच्या क्षमतेविषयी खलिदाला प्रचंड विश्वास आहे. प्रत्येक व्यक्तीकडे, काही तरी देऊ करण्याची आणि दुसऱ्यांचा आदर करण्याची क्षमता असते. याच विश्वासाच्या जोरावर तिने अनेक लोकांचा पाठिंबा मिळवला. लोकांना तुम्ही एकदा का पटवून दिलेत की उद्दिष्टे गाठल्यानंतर त्यांचे आणि भोवतालच्या इतरांचेही आयुष्य अधिक चांगले व्हायला मदत होईल, तेव्हा ते त्यांचा वेळ आणि ऊर्जा तुम्ही सांगितलेल्या कामासाठी खर्च करायला मागेपुढे बघत नाहीत. हा खलिदाचा अनुभव आहे.
तिच्या डोळ्यांपुढे एकत्र खेळणाऱ्या लहान मुलांचे उदाहरण असते. त्यांचे तत्त्व असते, ‘फरगिव्ह अ‍ॅण्ड फरगेट.’ ती भांडतात आणि लगेच भांडण विसरून पुन्हा नव्याने खेळ चालू करतात, तेच तत्त्व तुम्हीदेखील अंगीकारले पाहिजे. खालिदाकडे प्रत्येक गोष्टीत ‘चमत्कार’ बघण्याची क्षमता आहे. भविष्यातल्या स्त्रीकडून तिच्या वेगळ्याच अपेक्षा आहेत. ५० वर्षांतच आपण आता ज्या प्रश्नांबद्दल बोलतोय, ते गतकाळात जमा होतील, असा तिला आज विश्वास आहे.
‘सुघर’ म्हणजेच कौशल्ये असलेली आत्मविश्वासी स्त्री घडवण्यासाठी खलिदाने केलेल्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. ‘फोर्ब्स’ लिस्टच्या ‘अंडर थर्टी’मध्ये ७ जानेवारी २०१४ त मलाला युसुफझाई, शिझा शाहिद यांच्याबरोबर तिचा समावेश करण्यात आला. समाजाला त्यांनी एवढय़ा तरुण वयात दिलेल्या योगदानाची दखल घेण्यात आली.
ग्रामीण पाकिस्तानच्या अनेक गावांत, ना नफा तत्त्वावर, स्त्रियांना स्वयंपूर्ण करण्यासाठी, पारंपरिक भरतकामाला आधुनिक साज चढवत त्याला फॅशनेबल उत्पादनांचे स्वरूप देण्यासाठी, ती कौशल्ये विकसित करण्याचा सहा महिन्यांचा एक प्रशिक्षण कार्यक्रम तिने सुरू केला. स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी लहान प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देणे आणि बाजाराशी संपर्क साधणे यासाठी तिने स्त्रियांना मदत केली. तसेच विकास आणि वाढ याला पूरक वातावरणात त्यांचे नेतृत्वगुण विकसित होतील, यावर भर दिला.
खलिदा आता पंचविशीची आहे, या कामाविषयीची तिची जाणीव पहिल्या दिवसाइतकीच तीव्र आहे. किंबहुना ती अधिक प्रगल्भ झाली आहे. समाजात विशेषत: स्त्रियांसाठी उपजीविकेला पूरक ठरतील अशी कौशल्ये विकसित करावीत व त्याविषयी त्यांच्यात जागरूकता पसरवावी यासाठी जास्तीतजास्त काम केले पाहिजे, हीच नव्या काळाची हाक असल्याचा विश्वास तिला आहे. म्हणूनच ‘सुघर’मार्फत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा तिचा मानस आहे.
ग्रामीण भागातील स्त्रियांना त्यांचे मत असावे, आपल्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवावा यासाठी ती त्यांच्या पंखांत बळ भरण्याचे काम करत आहे. म्हणूनच घराच्या, शेतीच्या जमिनींच्या मालकी हक्कांवर महिलांचेही नाव असावे, यासाठी ती धडपडते आहे. शेती हा ग्रामीण लोकजीवनाचा, पर्यायाने महिलांचा, जगण्याचा पोत सुधारू शकते हे लक्षात आल्याने तिने प्रगतशील शेतकी तंत्राचे प्रशिक्षण देण्याची सोय गावपातळीवरच करून दिली आहे, त्यासाठी लागणारे लघुकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी झटते आहे.
ती बलुचिस्तानमधील एका लहानशा खेडय़ात जन्मली होती. मात्र ऑनर किलिंग, बालविवाह आणि बळजबरीने होणारे विवाह यांना विरोध करण्याच्या तिच्या लढय़ामुळे अनेकदा तिच्या जिवावर बेतले आहे, तरीही तिचा इरादा पक्का आहे. गेल्या १० वर्षांमध्ये ऑनर किलिंगला कडवा विरोध करत तिने शेकडो मुलींचे प्राण वाचवले आहेत. ग्रामीण पाकिस्तानातील जवळपास २३ गावांमध्ये महिला सक्षमीकरणाचा यशस्वी कार्यक्रम राबवत त्यांच्या आयुष्यात आशेची पहाट आणली आहे.
स्वत:मध्ये कौशल्य भिनवलेली आत्मनिर्भर व आत्मविश्वासू महिला, सुयोग्य मार्गदर्शन मिळाले तर नेतृत्वगुण शिकण्याच्या अशा संधीचे सोने करू शकते. सामान्य स्त्रीची रणरागिणी होऊ शकते व तीच ऑनर किलिंगसारख्या समाजविघातक प्रथा मोडीत काढण्यासाठी पुढाकार घेऊ शकते यावर खलिदाचा ठाम विश्वास आहे.
पाकिस्तानातल्या प्रभावी १०० स्त्रियांपैकी खलिदा ब्रोही एक आहे. ‘२५ अंडर २५’ या ‘न्यूजविक’ मासिकाच्या यादीतही ती आहे. पाकिस्तान सरकारने दिलेल्या विमेन एक्सलन्स अवॉर्डबरोबरच गेल्याच वर्षी तिला ‘विमेन इन द वर्ल्ड’ फाऊंडेशनचा प्रतिष्ठेचा ‘वुमेन ऑफ इम्पॅक्ट’ पुरस्कार मिळाला.
खलिदाने जागतिक पातळीवरच्या मंचावरच्या चर्चेत तिचे विचार व्यक्त केले आहेत.
इतर मान्यवरांबरोबरच ऑप्रा विनफ्रे, सीएनएन कॉरस्पॉन्डन्ट क्रिस्टिएक अमनपोर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी खलिदाच्या कामाची दखल घेऊन तिला प्रत्यक्ष भेटून तिची प्रशंसा केली आहे. खलिदाने क्लिंटन ग्लोबल इनिशिएटीव्ह, टोयोटा सोल्युशन्ससारख्या अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर महिलांना आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा देते. तीव्र इच्छाशक्ती असलेली, दूरदृष्टीने काम करणारी खलिदा पुरोगामित्वाचा नवा चेहरा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.