डॉ. नागेश टेकाळे

एके काळी शेतकऱ्यांच्या बांधावर हक्काने उभे असणारे शमी आणि आपटा असे वृक्ष आता शोधूनही मिळत नाहीत. विजयादशमीला आपण सीमोल्लंघन करताना शमी वृक्षाचेच असे ‘कायमचे सीमोल्लंघन’ होणे ही पर्यावरणाची शोकांतिका आहे. दसऱ्यानिमित्त खेजरी आणि चिपको या प्रेरणादायी आंदोलनांना उजाळा देत शमी आणि आपटा वृक्ष जपण्या-जगवण्याचे हे आवाहन..

दसरा, साडेतीन मुहूर्तापैकी एक सण. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ याचा प्रत्येक क्षणी प्रत्यय देणारा. आनंदाची उधळण या सणापासूनच सुरू होते आणि दीपावलीच्या प्रकाशमान दीपोत्सवात तर ती परिसीमाच गाठते. पण का कुणास ठाऊक, दसऱ्याचा विजयोत्सव जवळ आला, की माझे मन नकळत थोडे उदास होऊ लागते.

माझी ही उदासी या सणाशी निगडित असलेल्या ‘शमी’ वृक्षाशी आणि तो जगावा म्हणून बलिदान देणाऱ्या व्यक्तींशी आहे. लोक धर्मरक्षणासाठी, राष्ट्ररक्षणासाठी प्राणाचा त्याग करतात पण एखादा वृक्ष जगावा यासाठी एवढय़ा मोठया संख्येने प्राणांची आहुती देणारा हा प्रसंग जगाच्या पाठीवर एकमेव आहे. घटना १७३० ची म्हणजे २९० वर्षांपूर्वीची. राजस्थान मधील ‘थर’ वाळवंटामध्ये वैष्णोई जमातीची अनेक छोटीछोटी गावे एकमेकाजवळ खेटून वसलेली आढळतात. यामधील एक लहान गाव म्हणजे ‘खेजरी.’

जोधपूर शहरापासून दक्षिण पूर्व दिशेस अंदाजे २६ किलोमीटर अंतरावर वसलेले, हजारो शमी म्हणजेच ‘खेजरी’ वृक्षाच्या शीतल छायेत लुप्त झालेले हे गाव म्हणून याचे नाव ‘खेजरी’ पडले. गावातील लोक शमी वृक्षास पूजनीय मानत. या जमातीत वृक्ष आणि प्राणी पूजन कित्येक पिढय़ांपासून वारसा हक्काने पाळले जाते. शांततेत जीवन जगणाऱ्या या गावामध्ये भाद्रपद महिन्यामधील शुक्ल दशमीस म्हणजे सप्टेंबर महिन्यातील गणेशोत्सवाच्या काळात भल्या पहाटे अस्वस्थ कोलाहल उठला. जोधपूरचे महाराज अभयसिंह यांना दुसरा राजमहाल बांधायचा होता आणि त्याच्या बांधकामासाठी लागणाऱ्या चुन्याची भाजणी करण्यासाठी त्यांना शमीचे दणकट लाकूड हवे होते. राजाच्या सेनापतीचा शोध ‘खेजरी’ गाव आणि त्या सभोवतीच्या शमीच्या गर्द, दाट हिरव्या जंगलापाशी येऊन थांबला. महाराजांची आज्ञा घेऊन सेनापती गिरिधर दास भंडारी हातात वृक्ष कापण्यासाठी धारदार कुऱ्हाडी घेतलेल्या फौजफाटय़ासह भल्या पहाटे उंटावरुन खेजरीमध्ये दाखल झाला. सनिकांच्या हातातील लखलखत्या कुऱ्हाडी आणि शमी वृक्षाचे दुर्दैवी भवितव्य पाहून ‘खेजरी’मधील लहान मुले आणि स्त्रियांनी आकांत सुरू केला. गावावर शोककळा पसरली. हा सर्व कोलाहल ऐकून लहानशा झोपडीत राहणारी अमृतादेवी ही वैष्णोई स्त्री आपल्या तिन्ही मुलींना घरातच ठेवून बाहेर आली. तिने ते वृक्ष-संकट ओळखले. शमीच्या खोडावर घाव घालणाऱ्या व्यक्तीचा हात तिने वरच पकडला व शमीस मिठी मारून, ‘प्रथम माझ्यावर घाव घाल,’ असे त्या सनिकास म्हटले. ‘‘मी माझा प्राण गेला तरी तुला हे झाड तोडू देणार नाही! एका शिरच्छेदामुळे गावाचे रक्षण करणारा हा पवित्र वृक्ष वाचणार असेल तर त्या त्यागास माझी तयारी आहे.’’

अमृतादेवीचे हे रौद्र अवतारी रूप आणि एका वृक्षासाठी प्राण देण्याची तयारी पाहून सनिकाने आज्ञेसाठी सेनापतीकडे पाहिले. सेनापती क्षणभर गांगरला पण त्याच्या पाषाणहदयास पाझर मात्र फुटला नाही. त्याच्या आज्ञेनुसार शमीस मिठी मारलेल्या अमृतादेवीच्या मानेवर कुऱ्हाडीची धार पडली. संकटात सापडलेल्या आपल्या आईकडे जिवाच्या आकांताने धावणाऱ्या तिच्या तिन्ही मुलीचा ‘आई’ हे घायाळ उद्गार कानावर पडण्याआधीच अमृतादेवीची मान धडावेगळी झाली होती. शमीच्या साक्षीने सुरू झालेल्या या आक्रोशात आईबरोबर तिच्या तिन्हीही मुलींचीही पाठोपाठ हत्या केली गेली.

चार मस्तके आणि शमीचे झाड धारातीर्थी पडले. हे कळताच मोठाच गहजब उडाला. ‘खेजरी’ आणि आजूबाजूच्या लहान-मोठय़ा वस्त्यांमधील वैष्णोई आक्रमक झाले. शमीचा संहार चालू असतानाच सर्वानी वृक्षांना मिठय़ा मारून ‘यांना तोडू नका’ अशी सनिकांना विनंती केली. यामध्ये तरुण स्त्री, पुरुष, वृद्ध, लहान बालके असा कुठलाही भेदभाव हातातील कुऱ्हाडीने केला नाही कारण तिला रक्ताची तहान लागली होती. सर्व आसमंत आक्रोशाने भरून गेला. तब्बल ३६३ शिरविरहित धडांचा खच आणि सर्वत्र रक्ताचे पाट पाहून सेनापती घाबरला व सन्यासह त्याने जोधपूरला पलायन केले. शमीप्रेमी वैष्णोईंनी वृक्षांसाठी केलेल्या प्राणत्यागाची जगावेगळी बातमी ऐकून महाराज अभयसिंहाचे ह्रदय पिळवटून निघाले. त्यांनी त्या समाजाची जाहीर क्षमा मागून वैष्णोई गाव व परिसरात शमी वृक्ष कापण्यास व प्राण्यांची शिकार करण्यास बंदी केली. आजही ही प्रथा चालू आहे पण यासाठी ३६३ माणसांच्या आहुत्या पडल्या होत्या.

तब्बल २९० वर्षांपूर्वी आपले गाव उजाड होण्यापासून वाचवण्यासाठी अमृतादेवीने शमी वृक्षास मारलेली मिठी १९७० मध्ये टेहरी गढवाल भागातील हजारो अदिवासी स्त्रियांना चंडिकाप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली ‘चिपको आंदोलन’ करण्यासाठी प्रेरणास्थान ठरली. यामध्ये सुद्धा गौरी देवी या स्त्रीचाच सिंहाचा वाटा होता. ‘चिपको आंदोलना’तून भट्ट आणि गौरीदेवी यांनी हजारो देवदार, पाईन, अ‍ॅश व ओक वृक्षांना जीवदान तर दिले. सोबतच अलकनंदा नदीलासुद्धा वृक्ष श्रीमंतीमुळे महापुरातही नियंत्रित ठेवता आले. चंडिकाप्रसाद भट्ट यांनी स्त्रियांच्या सहकार्याने फक्त चिपको आंदोलनच केले नाही तर टेहरी गढवाल, उत्तरकाशी, चामोली, पौरी भागात एक दशलक्षापेक्षाही जास्त वृक्ष लावले. हे सर्व स्त्रियांच्या सहभागातून झाले. दोन वर्षांपूर्वी त्यांना मिळालेला ‘पद्मश्री पुरस्कार’ याचसाठी मोलाचा वाटतो.

अमृतादेवी आणि गौरीदेवीच्या ‘वृक्ष वाचवा’ आंदोलनात मिठी एकच होती फक्त वृक्ष वेगळे होते. अमृतादेवीने शमीला वाचवण्यासाठी आपल्या तीन गोजिरवाण्या मुलींसह स्वत:चाही बळी दिला मात्र ‘चिपको आंदोलना’त तसे कुठेही घडले नाही. स्त्री-शक्तीचा हा फार मोठा विजय होता हे आता जगानेही मान्य केले आहे. इतिहास तुम्हाला खूप शिकवतो आणि घडवतोसुद्धा. इतिहास माहीत असूनही आपण त्यापासून काहीही शिकण्याचा प्रयत्न करत नाही ही आजची खरी शोकांतिका आहे. ज्या पवित्र वृक्षासाठी अमृतादेवीने प्राणांचा त्याग केला त्या वृक्षाची आज विकासाच्या नावाखाली खेजडीसह सर्व राजस्थानात आणि इतर राज्यांतही दुर्दशा झाली आहे. महाराष्ट्र तरी याला कसा अपवाद असणार?

एके काळी शेतकऱ्यांच्या बांधावर हक्काने उभे असणारे शमी आणि आपटा असे वृक्ष आता शोधूनही मिळत नाहीत. विजयादशमीला आपण सीमोल्लंघन करताना शमी वृक्षाचेच असे ‘कायमचे सीमोल्लंघन’ होणे ही पर्यावरणाची शोकांतिका आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यामधील सराफ लोकांच्या संघटनेने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला शमीचे रोप भेट म्हणून दिले होते. शमी वृक्षसंवर्धनाचा हा एक अनोखा प्रयत्न त्या वेळी खूपच यशस्वी झाला होता.

एका स्तुत्य उपक्रमात सामाजिक वनीकरण विभागाने पुण्याजवळच ‘अमृतादेवी शहीद उद्यान’ उभारत त्यात जवळपास चारशे शमी वृक्षांचे संवर्धन करून वृक्षलागवडीचा एक आगळावेगळा पायंडा पाडला. अमृतादेवी आणि तिच्या तीन मुलींच्या बलिदानाची स्मृती म्हणून आपण आपल्या शहरात, गावात, अशा ‘शहीद अमृतादेवी शमी वाटिका’ सहज निर्माण करू शकतो. यासाठी दसऱ्याचाच मुहूर्त पाहिजे असे नव्हे. शमी वृक्ष पाहिला, की माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतात. आनंद याचा, की तो कुठे तरी जिवंत आहे आणि अश्रू मात्र अमृतादेवीसाठी, जिने स्वत:च्या मुली आणि ३५९ बिष्णोईंसह हा पवित्र, लोकोपयोगी वृक्ष जगवण्यासाठी आत्मबलिदान केले. म्हणूनच दसरा जवळ आला की शमीच्या ऱ्हासाच्या भीतीने मन उदास होते. जास्तीत जास्त वृक्ष लावले जावेत ही इच्छा प्रबळ होत जाते.

nstekale@gmail.com

chaturang@expressindia.com