09 July 2020

News Flash

महामोहजाल : ऑनलाइन गेम्सचं मानांकन

विविध गेम्सना विश्वासार्ह संस्थांनी दिलेलं आशयाबद्दलचं मानांकन तपासलं आणि त्याचं महत्त्व मुलांना पटवून दिलं तर कदाचित ही समस्या सुटू शकेल.

पालकांच्या अनुपस्थितीत मुलं त्यांना हवे ते गेम्स खेळतातच.

मंजुला नायर – responsiblenetism@gmail.com

लहान मुलांना जेव्हा आपण ‘पबजी’ किंवा ‘काऊंटर स्ट्राईक’सारखा गेम त्यांच्या वयासाठी योग्य नाही, असं सांगतो तेव्हा मुलं  विचारतात,‘‘काय फरक पडतो? सगळेच तर हे गेम्स खेळत असतात.’’ पालकांना या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देणं शक्य नसल्यानं मुलांच्या हातून मोबाइल काढून घेण्याच्या धमकीनं अशा संवादांचा शेवट होतो. अशा वेळी पालकांच्या अनुपस्थितीत मुलं त्यांना हवे ते गेम्स खेळतातच. विविध गेम्सना विश्वासार्ह संस्थांनी दिलेलं आशयाबद्दलचं मानांकन तपासलं आणि त्याचं महत्त्व मुलांना पटवून दिलं तर कदाचित ही समस्या सुटू शकेल.

ऑनलाइन जगतातले गेम्स कल्पकतेनं बनवलेले, आकर्षक आणि गुंगवून ठेवणारे असतात. त्यामुळे साहजिकच मुलांना त्यांचं वाढतं आकर्षण असतं. आपली मुलं या ऑनलाइन जगतात सुरक्षित असल्याबाबत पालकांना खात्री करून घ्यायची असेल तर त्यांनाही इंटरनेटच्या जगताबद्दल माहिती असणं अत्यंत जरुरीचं आहे. इंटरनेटबद्दल व्यवस्थित जाणून घेतलं तरच पालक आपल्या मुलांचं या आभासी जगतात संरक्षण करू शकतील. सायबर विश्वात स्वत:ची सुरक्षितता कशी बाळगावी याबाबतचं शिक्षण मुलांना शक्य तितक्या लहान वयात दिलं पाहिजे.

सहसा मुलं आपले मित्रमैत्रिणी जो गेम खेळत असतात तोच निवडतात. कधी कधी एखादा अन्य लोकप्रिय ऑनलाइन गेमही ती खेळण्यासाठी निवडू शकतात. मात्र त्यांना आपण कुठला गेम निवडावा हेच मुळात ठाऊक नसतं. म्हणजेच आपल्या वयोगटासाठी कोणता गेम योग्य आहे याची कल्पना नसते. हा गेम खेळल्यानं नेमकं काय साध्य होणार आहे हे ठाऊक नसतं. त्यासाठी आवश्यक आहे ते गेमचं मानांकन माहीत करून घेणं.

प्रत्येक गेमला एक ‘रेटिंग’ म्हणजे मानांकन दिलेलं असतं. तो गेम खेळल्यानं कोणती कौशल्यं शिकता येतात, या गेममध्ये लैंगिक आशय कितपत आहे, हिंसाचार कितपत आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून गेमला असं रेटिंग दिलेलं असतं. ‘प्ले स्टोअर’ वा अन्य माध्यमांतून गेम डाऊनलोड करण्याआधी त्या गेमला कोणतं रेटिंग दिलेलं आहे ही गोष्ट पालकांनी (आणि मुलांनीही) पहिल्यांदा पाहायला हवी. ज्या गेमला अधिकाधिक लोकांनी पसंती दिलेली आहे आणि ज्याबद्दलची परीक्षणं अधिक सकारात्मक आहेत, असेच गेम डाऊनलोड करण्यासाठी निवडावेत. दुर्दैवानं भारतीय वापरकर्त्यांसाठी अशा प्रकारचे गेम्स किंवा आशयाचं नियंत्रण करणारं कोणतंही मंडळ नाही. त्यामुळे बहुतेक भारतीय पालक आणि मुलं अशा गेमची निवड करण्याबाबत जागरूक नसतात. त्याचमुळे आशयाची निवडदेखील चुकीच्या पद्धतीनं केली जाते.

आपण ऑनलाइन जगतात ज्याप्रकारे वागतो त्याचे परिणाम काय होतील हे मुलांना ठाऊक नसतं. पालक म्हणून आपल्यालाही त्याचं नीटसं स्पष्टीकरण देता येत नाही. मग मुलांना आपल्या सूचना पटल्या नाहीत तर त्यात नवल ते काय!

एका घरातला हा संवाद वाचा –

वडील म्हणतात, ‘‘ऋषभ, तू हा भयंकर ऑनलाइन गेम खेळणं ताबडतोब बंद कर पाहू..’’

‘‘पण का?’’ ऋषभचा सवाल.

‘‘तो तुझ्यासाठी वाईट आहे.’’बाबा.

‘‘वाईट कुठंय? माझे सगळेच मित्र हा गेम खेळतात.’’ -ऋषभ

‘‘एकदा बंद कर म्हणून सांगितलं ना.. लगेच बंद कर, नाही तर मी तुझ्या हातातला फोन काढून घेईन,’’ बाबांच्या दरडावणीनं बऱ्याचदा अशा संवादांचा शेवट होतो. पण मुलांच्या हातातून स्मार्टफोन किंवा कुठलंही स्मार्ट उपकरण काढून घेणं ही त्यांच्यासाठी मोठी अडचणीची गोष्ट असते. अशा धमकीनंतर मुलं तो गेम पालकांसमोर खेळणं थांबवतात. पण ते घरी नसताना मात्र खेळतच राहतात.

एखादा गेम खेळण्यासाठी बंदी घालण्यामागचं कारण पालकांना नीटपणे आकलन झालं नाही तर मुलांना ते पटवून देणं त्यांनाही जड जातं.

पालकांनी आणि मुलांनी ऑनलाइन गेम्स खेळताना पुढे दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घ्यायला हव्यात, असं सुचवावंसं वाटतं. मुलांच्या हातात पहिल्यांदा स्मार्ट उपकरण दिल्यापासूनच या सूचना अमलात आणायला हव्यात –

अगदी लहान मुलांना- म्हणजे सहा वर्षांच्या आतल्या मुलांना ऑनलाइन गेम्सची अजिबात जरूर नसते. त्यांच्याकरिता कविता, कार्टून मालिका यांसारखं मनोरंजन मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे.

जर या वयाच्या मुलांना स्मार्ट उपकरण वापरायला दिलं असेल, तर तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्या हातात एकच उपकरण देत असल्याची खात्री करून घ्या. त्या उपकरणात पालकांनी आशयावर नियंत्रण ठेवण्यासाठीची सर्व फीचर्स अद्ययावत (अपडेट) केलेली असायला हवीत.

मुलांनी व्हिडीओ पाहण्यासाठी ‘यूटय़ूब किडस्’ (Youtube Kids) हा व्हिडीओ ब्राऊझर वापरायला हवा. माहिती शोधण्यासाठी त्यांना Kiddle.com हे सर्च इंजिन वापरता येईल.

सहा र्वष आणि त्यावरच्या मुलांसाठीही पालकांनी मुलांना यातल्या पहिल्या दोन सूचनांचं पालन करण्यास सांगायला हवं.

पालकांनी www.esrb.org  किंवा  www.pegi.org  या संकेतस्थळांना भेटी देऊन ऑनलाइन गेम्सना असणारं रेटिंग ते डाऊनलोड करण्याआधी तपासावं. ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची आणि वयानुसार आशयाचं मानांकन करणारी संकेतस्थळं आहेत. मुलांच्या वयानुसार आशयाचं मानांकन करताना पुढील गोष्टींचा विचार केलेला असतो. एखाद्या गेममध्ये लैंगिक आशय किंवा नग्नता किती आहे, आक्रमकता आणि हिंसाचार किती आहे, कायदेशीर बाबी कोणत्या आहेत आणि तो गेम खेळल्यानंतर मुलं काय शिकतील, या साऱ्याच गोष्टींचा विचार रेटिंग देताना केला जातो.

वर उल्लेख केलेल्या संकेतस्थळांवर गेमचं नाव टाकून त्यांचं रेटिंग तपासता येतं. ते रेटिंग किती आहे हे पालकांनी स्वत: समजावून घ्यावं आणि त्याचा अर्थ आपल्या मुलांना समजावून सांगावा. ‘पबजी’, ‘काऊंटर स्ट्राईक’ हे गेम वय र्वष १६ किंवा त्यांसारखे काही गेम तर १८ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींनीच खेळायचे असतात. मुलांना जेव्हा आपण ‘पबजी’ किंवा ‘काऊंटर स्ट्राईक’सारखा गेम त्यांच्या वयासाठी योग्य नाही, असं सांगतो तेव्हा मुलं नेहमी म्हणतात,‘‘काय फरक पडतो? सगळेच तर हे गेम्स खेळत असतात. पोलीस गेम्स बनवणाऱ्यांना का नाही पकडत? गेम्स खेळून कुणी तुरुंगामध्ये जात नाही. सरकार काय करणार आहे?’’ या साऱ्याचं उत्तर एकच आहे, जर प्रत्येक जण चुकीची गोष्ट करत असेल तर तुम्हीदेखील त्यांना सामील होणार का? काही नियमांचं पालन केलं पाहिजे. हे नियम मार्गदर्शक सूचनांच्या स्वरूपात असतात. ते सक्तीनं लादले जाऊ शकत नाहीत. स्मार्ट उपकरणाचा वापर करणाऱ्या व्यक्तीनं ते समजावून घेतले पाहिजेत आणि मगच वेगवेगळ्या ‘अ‍ॅप्स’चा वापर केला पाहिजे. मुलांना मनापासून हे गेम्स खेळायचे असल्यानं त्यांना यांसारख्या स्पष्टीकरणांनी फारसा फरक पडत नाही. शिवाय जी मुलं असे नियम मोडतात त्यांच्यावर पालक कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे ‘सब कुछ चलता है’ असा मुलांचा दृष्टिकोन बनतो. जर पालकांनी मुलांना नीट समजावून सांगितलं आणि त्यांच्यात चांगल्या सवयी रुजवल्या, तर मग मुलांची ऑनलाइन जगतातली सुरक्षितता आणि तिथं जबाबदारपणे वागणं या गोष्टींची निश्चिती होईल. या स्तंभातल्या आधीच्या लेखांमध्ये उल्लेख केलेल्या काही प्रकरणांमध्ये त्या मुलांना आपण करत असलेल्या चुकांची जाणीव कशी झाली याबद्दल सांगितलं होतं. अशी मुलं आपल्या वर्तनात बदल करतात आणि त्यांच्या वयाला योग्य नसणारे गेम्स खेळत नाहीत. आपल्या मित्रमैत्रिणींनाही त्याबाबत जागरूक करतात.

जेव्हा तुमचं मूल आपल्या मित्रमैत्रिणींच्या गटात खेळले जाणारे गेम्स खेळायला विचारीपणानं नकार देतं, त्याच्या वयाला योग्य नसणारे गेम स्वत:हून नाकारतं, तेव्हा त्याला कौतुकानं जवळ घ्या. त्यानं दाखवलेल्या धैर्याचं कौतुक करा आणि आम्हालाही त्याबद्दल जरूर कळवा. आम्हाला अशा निश्चयी आणि इतरांनाही चांगल्या गोष्टी सांगणाऱ्या मुलांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मुलांमध्ये अशा प्रकारच्या चांगल्या सवयी टिकवून ठेवणं अवघड असतं. त्याकरिता खूप चिकाटी आणि मोठय़ा प्रमाणावर संयम बाळगण्याची गरज असते.

मूल १२ वर्षांचं होईपर्यंत तुम्ही स्वत: त्याच्यासोबत बसा आणि त्याला गेम्सच्या निवडीसाठी मदत करा.

मुलांसोबत तुम्ही स्वत:देखील काही गेम्स खेळून पाहा.

मुलांनी नवीन गेम डाऊनलोड करण्याआधी त्यांना तुमच्याकडून परवानगी मागण्याची सवय लावा.

मुलांना (‘व्हॉटस्अ‍ॅप’सारख्या) कुठल्याही ‘इन्स्टंट मेसेंजर’ सेवेचा वापर करू देऊ नका.

कुठल्याही गेममध्ये त्यांना अनोळखी व्यक्तींच्या किंवा गटांच्या ‘फ्रें ड रिक्वेस्ट’चा स्वीकार करू देऊ नका.

मुलाच्या हातात असणाऱ्या स्मार्ट उपकरणासोबत डेबिट किंवा क्रेडिट कार्ड लिंक करू नका. अशानं काही वेळा मुलं स्वत:च ऑनलाइन गेम्स खरेदी करू शकतात आणि मग अडचण उद्भवू शकते.

जर तुमचं मूल एखादा ‘चॅट’ची सोय असणारा ‘ऑनलाइन ग्रुप गेम’ खेळत असेल, तर तो गेम खेळणारी अन्य मुलं त्यांच्याशी कशा प्रकारे वागू किंवा बोलू शकतात याची मुलांना कल्पना द्या.

एखाद्या गेममध्ये जर वाईट वागणूक मिळत असेल- म्हणजे तिथं धमक्या दिल्या जात असतील, अर्वाच्य भाषेचा वापर केला जात असेल किंवा दादागिरी केली जात असेल तर त्यामुळे मनावर येणारा ताण ओळखायला मुलाला शिकवा.

मुलांना अशा गेम्सच्या संचालकांकडे तक्रार कशी करायची हे शिकवा.

दादागिरी करणाऱ्या लोकांना अजिबात प्रतिसाद द्यायचा नाही हे शिकवा.

असं झाल्यास प्रौढ व्यक्तींना- खासकरून पालकांना किंवा शाळेतल्या शिक्षकांना त्याची माहिती देण्यास त्यांना सांगा.

ज्या मुलांना तंत्रज्ञानात रस आहे, त्यांना ‘प्रोग्रामिंग’ शिकण्यास प्रोत्साहन द्या.

ऑनलाइन जगतातल्या चुकांमुळे होणाऱ्या परिणामांबद्दल मुलांना सजग करा आणि ठरावीक काळानं पुन:पुन्हा त्यांना आठवण करून द्या. अशा प्रकारचं शिक्षण त्यांना आयुष्यभर कामी येईल.

त्यांना जबाबदार पद्धतीनं गेम्स खेळण्यास प्रोत्साहन द्या. सकारात्मक, परिणामकारक आणि वयाला योग्य असणारे गेम्स खेळल्यामुळे मुलांमध्ये धोरणीपणा आणि विश्लेषण करण्याची क्षमता हे गुण विकसित होतात.

तंत्रज्ञानाचा वापर इथून पुढं कायमच होत राहणार आहे. ऑनलाइन गेमिंग हे कदाचित मुलांसाठी पुढील आयुष्यात व्यावसायिक करिअरदेखील बनू शकेल. त्यामुळे वैयक्तिक सुरक्षितता पाळणं, आदर आणि जबाबदारी राखणं हे गुण तुम्ही स्वत:च्या उदाहरणातून त्यांना दाखवून देणं, ही मूल्यं त्यांच्यात रुजवणं जरुरीचं आहे. तुम्ही असं केलंत तरच मुलं सगळ्या ऑनलाइन गोष्टी जबाबदारपणे वापरतील. इतकंच नव्हे, तर आपल्या मित्रमैत्रिणींनाही ऑनलाइन जगतात जबाबदारीनं वागण्याबाबत शिकवतील.

अनुवाद – सुश्रुत कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 12:17 am

Web Title: kids and online games mahamohajal dd70
Next Stories
1 चित्रकर्ती : ‘मांडणा’चं तत्त्वज्ञान!
2 सायक्रोस्कोप : ‘सम्यक’ आनंद
3 शरीर-मनाच्या एकतानतेसाठी ‘योग’
Just Now!
X