20 September 2020

News Flash

व्वाऽऽ हेल्पलाइन : अडण्याच्या पलीकडलं..

हल्ली कुणाचंच कुणाशिवाय आणि कशावाचूनही अडत नाही, असा अनुभव येतो. एक गोष्ट नसेल तर लगेच त्यासारखे दुसरे पर्याय समोर असतातच.

अडणार नसेल कुणाचं, तिथे अडवणारंही कुणी नसेल.. तर मात्र गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते..

मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

हल्ली कुणाचंच कुणाशिवाय आणि कशावाचूनही अडत नाही, असा अनुभव येतो. एक गोष्ट नसेल तर लगेच त्यासारखे दुसरे पर्याय समोर असतातच. मित्र नाहीत खेळायला? इंटरनेट गेम्स आहेत. आजी नाही गोष्ट सांगायला? अनेक अ‍ॅप्स आहेतच तयार. भूक लागलीय, घरी मनासारखं नाही?, अनेक हॉटेल्स घरपोच पाठवतात तुम्हाला हवं ते खायला. काहीच अडत नाहीए कुणाचंच.. अगदी माणसांचं माणसांशिवायही. पण.. असं अडणार नसेल कुणाचं, तिथे अडवणारंही कुणी नसेल.. तर मात्र गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते..

‘‘कशाची ओल्ड लेडी, कशाची गोल्ड लेडी,

पम्पकिन एक्स्प्रेस चालली ऽ टुणुक-टुणुक’’

बालकथेतल्या म्हातारीला माफक आधुनिक रूप देत-देत जिजींनी नातवाला सांगायची गोष्ट संपवली. बराच वेळ हुंकार देणारा तो पठ्ठय़ा मध्येच ‘निद्रादेवी एक्स्प्रेस’वर चढला होता. मात्र हातात जिजींचा पदर घट्ट धरून आणि दोन्ही पाय खुशाल त्यांच्या मांडीवर, कमरेवर आडवेतिडवे टाकून तो झोपेतही जिजींवरचा हक्क बजावून सांगत होता.

त्या गोड बंधनातून स्वत:ला हलकेच मोकळं करताना जिजींना मात्र  सारखे कढ येत होते. ही मंडळी जाणार उद्या. उद्यापासून आपल्या- सारख्या मोकाट ‘मेड टू ऑर्डर’ गोष्टी कुठे मिळतील बिचाऱ्याला? (जिजींच्या गोष्टीतली म्हातारी ‘एक्स्ट्रा चीज पिझ्झा’ खायला लेकीकडे चालली होती आणि वाघोबा तूर्तास खऱ्या फॉरेस्टमधून बाहेर येऊन ‘ब्लॅक फॉरेस्ट’वर ताव मारत होता. ब्लॅक फॉरेस्ट खाल्ल्यावर लग्गेच दात ब्रश केल्याशिवाय त्याची आई त्याला ‘ओल्ड लेडी’ खाऊच देणार नव्हती. बालसाहित्य झालं तरी जीवनाचा आरसाच तो!) जावई बदलीच्या गावी जाणार म्हणून लेक आणि नातू गेले पंधरा-वीस दिवस जिजींकडे आले होते. जावयानं कंपनीच्या फ्लॅटचा ताबा घेऊन माफक मांडामांड केल्यावर त्यांना नव्या घरी बोलावलं होतं. नवं शहर, नवा शेजार, नव्या ओळखी, यांच्यात नातवाची आबाळ होऊ नये म्हणून जिजींनी खाण्यापिण्याच्या नाना डबे-बाटल्या भरून तयार ठेवल्या होत्या. त्या आवरायला जाताना लेकीच्या खोलीत डोकावून त्या म्हणाल्या, ‘‘उद्यापासून अशा गोष्टी कोण गं सांगेल लेकराला?..’’

‘‘अगं जिजी, ‘वीकेण्ड स्टोरीज’, ‘ग्रॅण्डमाज् स्टोरीज’, ‘गुबलूबॉय अ‍ॅडव्हेंचर’,  ‘किडोफाईल’ वगैरेंची थप्पी लागलीये बरं आमच्या घरी!’’ लेकीचं उत्तर.

‘‘म्हणजे लॅपटॉपवर वगैरे का?’’

‘‘सगळीकडे. कॉम्प्युटर, मोबाइल, यू-टय़ूब.. आता गोष्टींसाठी या मुलांचं कुठ्ठे काही अडत नाही बघ.’’

जिजींनी मान डोलावली. लॅपटॉपवर आजीच्या सुरकुतलेल्या पोटाच्या स्पर्शाची ऊब मिळते का, मोबाइलवर तंगडय़ा टाकता येतात का, असले नसते प्रश्न न विचारता भराभरा खाऊचे डबे भरून त्यांनी लेकीच्या सामानाजवळ आणून ठेवायला सुरुवात केली. लेक त्रासून म्हणाली, ‘‘अगं, केवढं हे जिजी? सामान का चेष्टा?’’

‘‘असू दे. जरा जम बसेपर्यंत खाण्यापिण्याची नड नको.’’

‘‘छ्या.. नड कशाला होत्येय? ‘झोमॅटो’, ‘स्विगी’ आणि कोणकोण बसल्येत की पोटं भरायला आमच्यासारख्यांची.’’ लेकीनं ‘स्विगी सर्व सुखी’ चेहऱ्यानं म्हटलं.

जिजी पडक्या आवाजात म्हणाल्या, ‘‘बरं, त्या सगळ्यांनी आपापली पोटं भरा, पण हे सगळं घेऊन जाऊन माझं मन भरा.. मात्र विरजण आणण्यासाठी तरी शेजाऱ्यांकडे जावंच लागेल तुला.’’

‘‘कुठल्या जमान्यात वावरत्येस जिजी?.. आता असलं काही मागण्याइतकंही शेजाऱ्यांसाठी अडत नाही आमचं. समू आठ दिवस राहतोय तिथे, पण त्याला शेजारी कोण राहतं ते अजून कळलंच नाहीये.’’

समू म्हणजे समीर- जावई. त्याला म्हणे शेजारी कोण राहतंय हेच कळलेलं नाही. जिजींनी आयुष्यात अनेकदा प्रवासावरून आल्यावर शेजारून विरजण मागून आणलेलं होतं. तेही असंच काही एवढं तेवढं मागत जिजींकडे. त्यानिमित्तानं गाठभेट होई, एकमेकांची खुशाली कळे. आपल्या अनुपस्थितीतल्या गोष्टी समजत. विरजण मागणं बंद झाल्यानं अशा चिमुकल्या आनंदावर विरजण पडणार! आज किती जणांना त्याचं महत्त्व जाणवेल बरं?.. जिजींनी हा विचारही मागे टाकला.

सकाळी लवकर ड्रायव्हर येणार होता. पाच-सहा तासांच्या अंतरावरच्या शहरात लेकीला सोडायला घरची चारचाकी जाणार होती. सकाळ झाली; पण ऐन वेळी ड्रायव्हर महाराज उगवले नाहीत. जिजींचा जीव खालीवर. लेक शांत. स्वत: वाहन हाकत जाण्याचीही तयारी पठ्ठीची. नाव, गाव, ठावठिकाणा, ओळखीचा पत्ता कशासाठीही तिचं अडणार नव्हतं. ‘जीपीएस’ होतंच ना?.. ‘‘नको बाई. तुझ्या ‘जीपी’नं माझं ‘बी.पी.’ वाढेल,’’ अशा युक्तिवादावर जिजींनी तिचा तो बेत हाणून पाडला; पण कुणाचंच काही अडलं नाही. दोनचार ‘टॅक्सी सेवा’ सहज उपलब्ध होत्या. केवळ एका फोनवर काम झालं आणि एकदाची लेकीची भाडय़ाच्या टॅक्सीनं घरपोच रवानगी झाली. बघताबघता आपली लेक कशी छान विकसित, आत्मनिर्भर झाली आहे, या विचारानं जिजींचा जीव सुखावला.

सुखरूप पोहोचल्याचा तिचा फोन आल्यापासून पुढचे विचार सुरू झाले. नातू आता ‘सीनिअर के.जी.’त जाणार. मग रीतसर प्राथमिक शिक्षण. एखाद्या चांगल्या शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळायला हवा, उमद्या शाळू सोबत्यांमध्ये जीव रुळायला हवा. केवढी देवघेव होत असते त्या सगळ्यातून आणि योग्य माणसं भेटली नाहीत तर पुढे केवढी चुकामूकही होऊ शकते. दोनचारदा फोनवर जिजींनी नातवाच्या शाळेचा, शिक्षकांचा, मित्रमंडळींचा मुद्दा लावून धरल्यावर एकदाची त्यांची लेक समजावून सांगायला लागली, ‘‘जिजी, तुझी काळजी बरोबर आहे; पण या सगळ्याच बाबतीत आता परिस्थिती खूप बदललीये. इथे आल्या आल्या हा पठ्ठय़ा लगेच व्हिडीओ गेम्स खेळायला लागला. त्याचं काही अडलं नाही खेळगडय़ांसाठी.’’

‘‘हो, ती तात्पुरती सोय चांगलीच असणार, त्यात शंका नाही; पण चांगल्या संस्थेच्या छत्राखाली, एका ध्येयानं एकत्र आलेली मुलं खूप पुढे जाऊ शकतात ना गं.. म्हणून आपलं वाटलं.’’

‘‘जिजी, आता तू डायरेक्ट ‘गुरुकुल सिस्टीम’पर्यंत जाऊन पोहोचू नकोस बाई.’’

‘‘छे! तेवढं मागे कशाला जायचं? पण रिकामं बसलं की पुढचे विचार येणारच ना..’’

‘‘तेच म्हटलं, फार पुढेही नको जाऊस. म्हणजे त्याची कोणत्या कुलगुरूंच्या विद्यापीठात वर्णी लागेल वगैरे.. आता लोक शिक्षणाबाबत तुमच्यापेक्षा पुष्कळ जास्त ‘कूल’ राहू शकतात. हवा तो गुरूविकत घेऊ शकतात. जगभरातलं ज्ञान नाना मार्गानी  मिळवता येतं आता.. समजलं?’’

‘‘समजतंय हळूहळू.. म्हणजे जसं, मित्रांसाठी खेळणं अडत नाही, आजीसाठी गोष्टी ऐकणं अडत नाही, तसंच शिक्षकांसाठी शिक्षणाचंही अडत नाही.. असंच ना?’’

‘‘असंच नाही अगदी, पण तुमच्या ‘सेट’ कल्पना आता बदला जिजी! आजचे लोक अडून बसणारे नाहीत. वुई कॅन फाइंड मेनी वेज.’’ लेक आत्मविश्वासानं म्हणाली. जिजींनी निमूट ऐकून घेतलं. हळूहळू लेकीची नव्या जागी घडी बसत्येय हा विश्वासही पुरेसा होता त्यांना. कुणासाठी अडून राहात नव्हती पठ्ठी!

पण अवघ्या दोन-तीन दिवसांमध्येच जावयाला अतितातडीनं परदेशी जावं लागण्याची वार्ता आली आणि पुन्हा मन डहुळलं. अभावितपणे मुलीशी बोलून गेल्या, ‘‘हे काय गं?.. एवढे दिवस तू नव्हतीस.. आणि आता तो.’’

‘‘नोकरी आहे जिजी. अशा गोष्टी चालणारच.’’

‘‘कबूल आहे, पण इतक्या लगेच.. त्यापेक्षा तू इथून गेलीच नसतीस तरी चाललं असतं ना?’’

‘‘का? मी नवऱ्याशिवाय राहू शकत नाही? एकटी.. असहाय्य.. अबला वगैरे! मला कोणता वाघ खाणारे?’’

‘‘दोघं एकत्र असता नव्या जागी तर बरं नसतं झालं?’’

‘‘झालं असतं; पण एकेकटय़ानंही आपापली ‘स्पेस’ एन्जॉय करता येतेच की. आता आमच्यातल्या कित्त्येकांचे ‘वीकेण्ड हजबंड’, महिन्यातून एकदाच भेटणारे नवरे असतातच की! मग त्या काय लगेच ‘याद पिया की आये’ म्हणतात का? काय तूपण जिजी..’’ लेकीनं हसून म्हटलं. तिच्या विनोदात लगेच भर घालत जिजींनीही सुनावलं, ‘‘याद पिया की आये, आळवायला सांगत नाहीये मी; पण ‘ब्याद पिया की जाये’ इतपत सुटकेचा भावही नसावा ना अशा स्थितीतल्या बाईचा?’’

यावर माफक हसाहशी होऊन संवाद थांबला; पण जिजींच्या मनातली खळबळ कुठली थांबायला? आता नवरा-बायकोचंही एकमेकांसाठी काही अडत नाही? कुणाचंच, कुणासाठीच, काहीच अडत नसण्याचा हा काळ! माणसाचं माणसासाठी अडत नाही आणि माणूस हे अधूनमधून वाजवून दाखवल्याशिवाय राहातही नाही. एके काळी ‘आमची कुठेही शाखा नाही’ अशी पाटी एखाद्या दुकानावर लटकावण्यात जसा रुबाब असायचा तशाच रुबाबानं एक अदृश्य पाटी माणसांच्या वेगवेगळ्या व्यवहारांवर जणू काही लागलेली – ‘आमचं कुणासाठीही अडत नाही’. हे खरं आहे का? बरं आहे का? का काही तरी झाकण्यासाठी चाललेली धडपड आहे ही?.. जिजींचा जीव विचारानं नुसता घुसमटायला लागला. किमानपक्षी वत्सलावहिनींजवळ तरी मन मोकळं करावं म्हणून त्यांनी ‘वत्सला वहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाइस’ अर्थात ‘व्वा’ हेल्पलाइनला फोन लावला. निदान हे जे आपल्याला खुपतंय तेच इतरांनाही डाचतंय का, त्याची चाचपणी करायची ठरवली.

‘‘व्वा हेल्पलाइन. आम्ही आपल्याला काय मदत करू शकतो?’’ यावर जिजींनी आपलं म्हणणं ऐसपैसपणे निवांत सांगायला सुरुवात केली. वत्सलावहिनींना वाटलं, ही आपली नेहमीची म्हातारपणातली कुरकुर असावी. आपल्यासाठी कुणाला काही वाटत नाही, कुणी अडत नाही वगैरे वगैरे. त्यांनी उलटाच सूर लावून सांत्वन सुरू केलं. ‘‘अहो, मग चांगलं आहे की! तुमच्यावर कुणाची जबाबदारी नाही, कुणाचा त्रास नाही.’’

‘‘माझं सोडा हो, मी माझ्यासाठी- एकटीसाठी नव्हतेच म्हणत. माझं अडून राहणं, अडवून ठेवणं, झालंय करून बरंचसं. दोन्हीचीही मजा घेतलीये आजवर मी. आताच्या कर्त्यांधर्त्यांबद्दल मात्र थोडा प्रश्न वाटतो. इतकं असं बेटांवर जगून चालणार आहे का त्यांचं?’’ जिजी.

‘‘नवनवी माध्यमं, अ‍ॅप्स, सव्‍‌र्हिसेस, साइट्स येताहेत त्यांच्या मदतीला. घेऊ देत फायदा. करू देत स्वयंपूर्णतेची नशा!’’ वत्सलावहिनी म्हणाल्या.

‘‘पण काही नशा उतरल्यावर डोकं गरगरतं असंही ऐकलंय मी. तसं व्हायला नको ना, म्हणून..’’ जिजी.

‘‘पण ही सृष्टी मुळात अडण्याच्या तत्त्वावर चाललेलीच नाहीये ना? हिला पोकळी मंजूरच नाही.’’ वत्सलावहिनी.

‘‘असली पुस्तकी तत्त्वज्ञानं नका हो सांगू. आम्हीही पोथ्या वाचल्या आहेत, जग पाहिलंय तितपत; पण जर आपण समूहातच राहतोय, जागा, पैसे, वस्तू, साधनं, अगदी माणसंही आपापसात वाटून घेतोय, तर मग नुसतं अडण्याच्या पलीकडलं समजून घ्यायला, निदान थोडी गरज भासायला काय हरकत आहे?..’’ जिजी.

‘‘भासेल हो, अगदी गळ्याशी आल्यावर. गळा आवळला गेल्यावर.’’ वत्सलावहिनी.

‘‘पण तेवढं का ताणायचं? अटीतटीच्या अगोदर, खेळीमेळीनं का म्हणता येऊ नये, की बुवा किंवा बाई, इथे माझं थोडं अडलंय बरं का तुझ्यासाठी.. सारख्या न अडण्याच्या वल्गना का?’’ जिजींनी मुद्दा मांडला.

‘‘अहो, पॉवर सप्लाय, मोबाइल रेंज जरा जाऊ देत, ऑफलाइन होऊ दे.. माणसं पुढचा श्वास घेऊ शकत नाहीत आताशा. इतकं अडतं त्यांचं या गोष्टींवाचून.’’ वत्सलावहिनी.

‘‘हे आणखी वाईट ना हो? माणसाचं यंत्रांसाठी अडतं, माणसांसाठी अडत नाही.. काय ही अवस्था?’’ जिजींना पटत नव्हतंच.

‘‘जरा दमानं घ्या मॅडम. माणसांवर, म्हणजे त्यांच्या दुबळेपणावर जरा विश्वास टाका. तुमची ती कुठेही शाखा नसण्याची ऐट उतरलीये ना आता, तशीच ही ऐटही उतरेल लवकरच. होईलच साक्षात्कार कधी तरी, की ‘अ‍ॅपवर अ‍ॅप’ एकीकडे, ‘आपलेआप’ एकीकडे. जे ते त्या-त्या जागी हवेतच. बरं जरा थांबवू या हा संवाद? आज एक मेजर केस आलीये हो दुपारपासून. तरुण यशस्वी पोरगी, जीव द्यायला निघालीये तिकडे. आम्ही आमच्यापरीनं खूप लढवतोय; पण तिचा प्रश्न..’’

‘‘तिचंही कुणासाठी काही अडलं नसेल ना आजवर?’’ जिजी अभावितपणे म्हणाल्या आणि चपापल्याच. समस्येची दोन्ही टोकं नकळत त्यांच्यासमोर आली होती न् काय? ज्यांचं कुणासाठी अडणार नाही, त्याला कुणी अडवणारही नाही. हेच पुढच्यांच्या लक्षात आणून द्यायचं जमेल तेव्हा. बाकी वत्सलावहिनींचा आणखी वेळ आता घेण्यात काय अर्थ होता?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 12:17 am

Web Title: kids in todays world wwa helpline dd70
Next Stories
1 अपयशाला भिडताना : थोडं जास्त बरोबर!
2 निरामय घरटं : निराशेतून आशेकडे
3 ‘राहत’ देणारा माणुसकीचा झरा
Just Now!
X