28 October 2020

News Flash

गर्जा मराठीचा जयजयकार : मुलांना शाळेत घालताना!

काही तरुण पालकांशी साधलेल्या संवादातून मुलांना शाळेत घालताना ते किती विविध गोष्टींचा विचार करतात हे लक्षात आलं.

मुलांना शाळेत घालण्याचा निर्णय जे घेतात- त्या पालकांचं या विषयातलं मत सर्वात महत्त्वाचं ठरतं.

मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

इंग्रजीतून शिक्षण घेणं फायद्याचं, की मातृभाषा मराठीतून, या प्रश्नावर आतापर्यंत भरपूर ऊहापोह झाला आहे. मराठी माध्यमातून शिकलेल्या अनेक यशस्वी व्यक्ती, शिक्षणतज्ज्ञ, समुपदेशक आणि  शिकत असलेल्या बऱ्याच मुलांशी केलेल्या गप्पांमधून मराठीतून शिकणं फायद्याचंच ठरलं, असं त्यातल्या बहुतेकांनी सांगितलं. परंतु मुलांना शाळेत घालण्याचा निर्णय जे घेतात- त्या पालकांचं या विषयातलं मत सर्वात महत्त्वाचं ठरतं. कारण एका अर्थी अप्रत्यक्षपणे मराठी शाळा टिकायला हेच पालक मदत करत असतात. अशा काही तरुण पालकांशी साधलेल्या संवादातून मुलांना शाळेत घालताना ते किती विविध गोष्टींचा विचार करतात हे लक्षात आलं.

मातृभाषेतून शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि यशाला बाधक नाही, असं आतापर्यंत आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते शिक्षणतज्ज्ञ, शाळा आणि महाविद्यालयांचे संचालक यांनी पुन्हा-पुन्हा सांगितलं. पण प्रत्यक्षात मराठी शाळांना विद्यार्थ्यांच्या अभावामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरात टिकाव धरणं कठीण झालं आहे. मुलांच्या शिक्षणाचा निर्णय ज्यांच्या हातात असतो, त्या तरुण पालकांचे या बाबतीत काय विचार आहेत आणि आपल्या पाल्याच्या आयुष्यातील हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ते कसा घेतात हे समजून घ्यायला आम्ही काही पालकांशी संवाद साधला.

‘शिक्षण इंग्रजी की मराठी माध्यमातून?’ या विषयाच्या विविध बाजू जाणून घेता याव्यात, यासाठी  सुरुवातीला पाल्याला इंग्रजी माध्यमात घालायचा निर्णय घेतलेल्या समृद्धी जोशी-स्वप्निल कोटीभास्कर आणि पूजा आणि मंगेश वेंगसरकर  यांना बोलतं के लं.  समृद्धी आणि स्वप्निल यांनी आपल्या मुलीला- श्राव्याला ‘सी.बी.एस.सी. बोर्डा’च्या (के ंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं आहे. पूजा आणि मंगेश यांचंही इंग्रजी माध्यमावर एकमत आहे, पण बोर्ड कु ठलं असावं यावर त्यांची सध्या चर्चा चालू आहे. पालक जर इंग्रजी माध्यमातून शिकलेले असले, तर ते अर्थातच आपल्या पाल्यासाठी मराठी माध्यमाचा विचार करत नाहीत. पण मराठी माध्यमातून शिकलेल्या पालकांनाही माध्यमबदलाचा त्रास झाला असेल, तर आपल्या मुलाला तो होऊ नये अशीच त्यांची इच्छा असते. या पालकांनी स्वत:चे काही अनुभव सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीपासूनच इंग्रजीत शिकल्यावर मुलांना पुढे इंग्रजी शब्द शिकण्याची कसरत करावी लागत नाही, इंग्रजीतून बोलायचा विश्वास येतो. नाही तर कित्येक वेळा मुलांना विषय येत असला तरी तो इंग्रजीत मांडता येत नाही, असा समृद्धीचा महाविद्यालयात शिकवतानाचा अनुभव आहे. मंगेशही त्याच्या अकरावी-बारावीच्या प्रवेश परीक्षांच्या तयारी वर्गात हेच बघतो. पूजा स्वत: मराठी माध्यमातून शिकली, पण तिला माध्यमबदल जड गेला. पुढे ती अमेरिकेत जाऊन ‘मास्टर्स’ पदवी घेऊन आली आणि आता ‘आय. बी. बोर्डा’च्या (इंटरनॅशनल बेकालॉरेट) शाळेत जीवशास्त्र शिकवते. आता जरी इंग्रजीवर तिचं उत्तम प्रभुत्व असलं तरी स्वानुभवावरून इंग्रजी माध्यमातून शिकणं उत्तम, अशा निर्णयाप्रत ती आली. या सगळ्या कारणांबरोबरच मराठी शाळांचा दर्जा, सुविधा याबद्दलचं असमाधान हेही एक कारण असतं. आजच्या काळात इंग्रजी येणं ही गरज आहे आणि त्यासाठी इंग्रजी माध्यमाला पर्याय नाही, अशी मानसिकता असते. आपल्या समाजातही अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्यांकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो. शिवाय आजूबाजूची, नातेवाईकांची मुलं इंग्रजी माध्यमात जात असल्यानं तिथेही आपल्या पाल्याला कमीपणा वाटू नये, असाही विचार पालकांच्या मनात असतो.

मराठी कु टुंबात आपल्या पाल्याला मराठीही उत्तम बोलता, लिहिता, वाचता यावं, संस्कृतीशी नाळ तुटू नये, यासाठी हे पालक जागरूक आहेत. बऱ्याच वेळा इंग्रजी माध्यमात जाणाऱ्या मुलांचे व्यवहार मराठीतच चालतात. यामुळे आपलीही मुलं  मराठीशी जोडलेली राहतील, असा त्यांना विश्वास आहे. शाळा निवडताना कोणते निकष लावायचे यावर मात्र मतैक्य दिसत नाही. प्रत्येक शिक्षण मंडळाचे (बोर्डाचे) फायदे-तोटे असतात. आपापल्या मतांप्रमाणे पालक वेगवेगळ्या बोर्डाना प्राधान्य देतात. समृद्धीच्या मतानुसार आपल्या संस्कृतीला महत्त्व देणारी,  मुलांकडे आपलेपणाने लक्ष देणारी शाळा त्यांना हवी होती. परंतु ‘एस.एस.सी. बोर्डा’पेक्षा त्यांनी श्राव्याला ‘सी.बी.एस.सी. बोर्डा’च्या इंग्रजी माध्यमात घालणं पसंत केलं.

मातृभाषा किंवा परिसर भाषेतून न शिकवता इंग्रजीतून शिक्षण सुरू केल्यानं मुलांवर ताण येत असेल का, हे विचारल्यावर पालकांनी सांगितलं, की आजच्या मुलांच्या कानावर इंग्रजी पडतच असतं, त्यामुळे शाळेत गेल्यावर ती काही अगदी नवीन भाषा नसते. त्यामुळे मुलांचा मेंदूही त्याला लवकर सरावत असेल आणि त्यावर इतका ताण येत नसेल, असं वाटतं.

मीनल कटके ही द्विधा मन:स्थितीत असणाऱ्या पालकांची प्रतिनिधी आहे. मीनलची मुलगी मेधावी आता पूर्वप्राथमिक शाळेत जायच्या वयाची होत आहे आणि शाळेची निवड हा सध्या त्यांच्या घरात महत्त्वाचा विषय आहे. मीनलला मुलीला मराठी माध्यमात घालायचं आहे, पण इतर अनेक पालकांप्रमाणे मराठी शाळांच्या दर्जाबाबत ती साशंक आहे. मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे तिला पटतात. स्वत: विधि सल्लागार (लीगल अ‍ॅडवायझर) म्हणून काम करतानाच्या अनुभवावरूनही तिला वाटतं, की इंग्रजीचा एवढा बाऊ करायचं कारण नाही. व्याकरणात्मकदृष्टय़ा तिच्या इंग्रजीत कधी त्रुटी असतील, हेही ती मान्य करते. पण त्यामुळे तिचं काम कुठेही अडत नाही आणि संवाद साधण्यातही अडचण येत नाही. त्यामुळे मुलीला मराठी माध्यमात घालण्याची तिची इच्छा आहे. पण चांगल्या सुविधा असलेल्या, मुलांच्या शिक्षणात नवीन पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शाळेच्या ती शोधात आहे. तशा शाळेत प्रवेश न मिळाल्यास ती नाइलाजानं मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणार आहे- पण एस.एस.सी. बोर्डाच्या. म्हणजे मुलीला दहावीपर्यंत मराठी शिकावंच लागेल.

मुक्ता भावे- चेतन केतकर या दोघांनी आपल्या मुलाला पुण्यातील एका नामवंत प्रयोगशील (अक्षरनंदन) मराठी शाळेत घातलं आहे. आदित्य-तन्मयी आणि रेश्मा-अपूर्व यांनीही आपल्या मुलांना मराठी शाळांत घातलं आहे. माध्यमाचा निर्णय त्यांनी कसा घेतला हे त्यांनी सांगितलं. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमाबद्दल निर्णय घेण्यापूर्वी याविषयी नीट जाणून घेतलं, त्यावरील लेख, तज्ज्ञांचे प्रबंधही वाचले. मातृभाषेतून शिक्षण हेच आपल्या पाल्यासाठी योग्य आहे, याची त्यांना खात्री आहे. मुलाला इंग्रजी संभाषण येईल, त्याला न्यूनगंड- मग तो भाषेमुळे असो किंवा बोर्डामुळे- येऊ नये यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहेत. हल्ली मोठय़ा शहरांतून मुलांच्या कानावर इंग्रजी पडतच असतं. खेळायला येणारी मुलं, टी.व्ही., असं सगळीकडे इंग्रजी असतंच. त्यावर आणखी जाणीवपूर्वक मेहनत घेतली, तर मुलांना इंग्रजी संभाषण शिकवणं सहज शक्य आहे. याउलट मराठी अक्षरं लिहिलेली साधी खेळणीसुद्धा मिळत नाहीत. शिवाय आजूबाजूच्या मराठी कुटुंबातील मुलांना बोललेलं साधं-सोपं मराठी समजत नाही, अशी परिस्थितीही काही ठिकाणी आहे.  त्यामुळे मराठी बाहेरून शिकवायचं म्हटलं तर अधिक कठीण आहे. त्यामुळे आपली भाषा यायला हवी असेल आणि शिक्षण सहज, आनंददायी व्हायला हवं असेल, तर ते मातृभाषेतूनच व्हावं यावर या पालकांचं एकमत दिसलं. इंग्रजीही भाषा म्हणून यायला हवी, यावरही त्यांचं दुमत नव्हतं, पण तिचा माध्यम म्हणून स्वीकार करावा का, यावर त्यांनी बराच विचार केलेला जाणवला. बोर्डाच्या बाबतीतही त्यांच्या विचारांत सारखेपणा आढळला. एस.एस.सी.खेरीज इतर बोर्डाच्या शाळेत मुलं अभ्यासात बुडून जातात, अभ्यासक्रम काहीसा अधिक काठिण्यपातळीचा असल्यानं शिकवण्या लावाव्या लागतात. शिवाय या शाळांतून स्पर्धा, चढाओढ यावर अधिक भर असतो, असं मत असल्यामुळे या पालकांना एस.एस.सी. बोर्डाची शाळा हवी होती.

मुक्ता अभिनेत्री आहे आणि ती अभिनयाचे प्रशिक्षण वर्ग घेते, तर चेतनचा स्वत:चा व्यवसाय आहे. दोघंही मराठी माध्यमातून शिकले आहेत. इंग्रजीची त्रुटी त्यांना कधी विशेष जाणवली नाही. उलट अभिनय क्षेत्रात वावरताना, विशेषत: शिकवताना मुक्ताला जाणवलं, की  इंग्रजी माध्यमाच्या अनेक मुलांची परस्थिती ‘ना घर का, ना घाट का,’ अशी विचित्र असते. त्यांना धड मराठी वाचायला येत नाही, इंग्रजी वाचता येतं तरी त्यात व्यक्त होता येत नाही. मातृभाषेतून व्यक्त होता आलं, भाषेचे बारकावे समजले, तर इतर भाषांचे बारकावे समजून घेऊन व्यक्त होणं सोपं जातं. प्रयोगशील शाळेत प्रवेश मिळाला नसता, तर इंग्रजी माध्यमाकडे वळला असता का, असा प्रश्न  विचारला असता दोघांनीही सांगितलं, की मराठी माध्यम हा एकच पर्याय त्यांनी ठेवला होता.

आदित्य-तन्मयीला श्रेयनसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देणारी प्रयोगशील शाळा हवी होती. प्रयोगशील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील बाकीची मूल्यं त्यांच्या मूल्यांशी जुळणार नाहीत असं त्यांना वाटलं. आदित्यला असंही वाटतं, की आजचं शिक्षण मुलाला कारकुनी करण्यासाठी तयार करतं. त्याबाहेर जाऊन मुलाच्या ज्ञानकक्षा रुंदावण्याचं काम पालकांना करायला पाहिजे. मुलांची वेगवेगळ्या गोष्टींशी, अनुभवांशी ओळख करून द्यायची तर त्यासाठी वेळ हवा, जो त्यांना एस.एस.सी. बोर्डाच्या शाळेत मिळेल असं वाटतं.

मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यावर मुलाची मित्रमंडळी सर्व स्तरातील असतील, या शंकेनेही काही पालक आपल्या मुलांना मराठी माध्यमात घालायला कचरतात. त्यावर बोलताना अपूर्व म्हणाला, की बाहेरच्या जगात सर्व प्रकारची माणसं असतात. त्याची आरवला लहानपणापासून सवय झाली तर काही गैर नाही. त्यातून तो ‘लाइफ  स्किल्स’ शिकेल. अपूर्व आणि रेश्मानं आरव लहान असतानाच या गोष्टीचा विचार करून त्याच्या वयाच्या मुलांच्या पालकांचं वर्तुळ तयार केलं. त्यांना नियमित भेटल्यानं शाळेत संगतीचा प्रश्न आल्यास या बाहेरच्या मित्रांची त्याला मदत होईल, असा त्यांचा विचार होता. मुलं लहान वयात अनेक भाषा पटकन आत्मसात करतात. इंग्रजी कानावर पडत  असल्यानं आरवला इंग्रजी संभाषणात पारंगत करणं मुद्दाम मराठी शिकवण्यापेक्षा सोपं जाईल. पुढच्या दोन-तीन वर्षांंत त्याला मराठी उत्तम येईल आणि इंग्रजीची दरीही भरून निघाली असेल, त्यामुळे उलट त्याला फायदाच होईल, असा विचार ते बोलून दाखवतात.  त्यांनी आरवला ठाण्यातील ‘सरस्वती मंदिर’च्या मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं आहे. या शाळेनं पारंपरिक शिक्षणपद्धत सोडून प्रयोगशीलता अवलंबली आहे. अशा शाळेत जाऊन आरव वेगळा विचार करायला शिकेल आणि ‘रॅट रेस’मध्ये अडकून पडणार नाही, अशी त्यांना आशा आहे. या पालकांनी मराठी शाळांसाठी आणि इतर इच्छुक पालकांसाठी काही सूचनाही केल्या. शाळेतील सुविधा आणि दर्जा सुधारण्यासाठी पालकांकडून स्वेच्छेनं वार्षिक देणगी गोळा करावी. इंग्रजी माध्यमाची फी भरायला तयार असणाऱ्या पालकांनी चांगली मराठी शाळा हवी असेल, तर अधिक शुल्क किंवा देणगी देण्याची तयारी ठेवावी, नुसतीच तक्रार करू नये, असंही त्यांचं मत आहे.

या पालकांचे विचार आजच्या समाजाचं प्रतिबिंब आहेत. प्रत्येक पालक आपल्या पाल्याचं भवितव्य उज्ज्वल व्हावं यासाठी प्रयत्नशील असतात. उद्दिष्ट तेच असलं, तरी ते साध्य करायला ते मार्ग वेगवेगळे अवलंबतात. तरीही आजच्या प्रचंड स्पर्धेच्या आणि इंग्रजीच्या प्रभावाच्या जगात काही विशिष्ट विचारानं मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालणारे आणि त्यांचं इंग्रजी सुधारण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करणारे पालक आजूबाजूला दिसत आहेत, ही मराठीच्या दृष्टीनं एक स्वागतार्हच बाब म्हणायला हवी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 2:12 am

Web Title: kids school admission garja marathicha jayjaykar dd70
Next Stories
1 हेल्पलाइनच्या अंतरंगात : स्त्रियांची संरक्षक ‘सखी’
2 चित्रकर्ती : केरळची भित्तिचित्र परंपरा
3 महामोहजाल : ‘ऑनलाइन मीटिंग्ज’ची सुरक्षितता
Just Now!
X