18 November 2019

News Flash

‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : उंच टाचेचा जाच

इंग्लंडमध्ये तीन वर्षांपूर्वी निकोला थॉर्प हिला उंच टाचेच्या चपला न घातल्यामुळे नोकरीला मुकावे लागले होते.

(संग्रहित छायाचित्र)

मानसी होळेहोन्नूर

कोणत्याही गोष्टीची सक्ती झाली की त्याचे बंधन वाटायला लागते आणि जेव्हा या बंधनाची जाणीव होते तेव्हा ते झुगारावेसे वाटते. असेच काहीसे जपानी स्त्रियांच्या बाबतीत होत आहे. कामावर येताना उंच टाचेच्या चपला वा बूट घालणे सक्तीचे आहे. त्याविरुद्ध तिथल्याच एका अभिनेत्रीने, युमी इशिकावा हिने #KuToo असा हॅशटॅग वापरत आवाज उठवला आहे. #MeToo वरून प्रेरित होऊन #KuToo सुरू केले असले तरी त्यातला #Ku हा कुत्सू या शब्दावरून आला आहे. जपानी भाषेत कुत्सू म्हणजे शूज. आपल्याकडेदेखील उंच टाचेचे बूट हे अभिमानाने मिरवले जातात. मॉडेल्स, चित्रतारका, उच्चपदस्थ स्त्री अधिकारी या सगळ्यांमध्ये देखील उंच टाचेची पादत्राणे घालणे हा जणू अलिखित नियम असतो. केवळ उंची वाढवण्यासाठी म्हणून उंच टाचा वापरल्या जात असतील तर पाश्चिमात्य जगात देखील स्त्रियांनी उंच टाचेच्या चपला, बूट घालणे हा एक सामाजिक संकेतच समजला जातो.

इंग्लंडमध्ये तीन वर्षांपूर्वी निकोला थॉर्प हिला उंच टाचेच्या चपला न घातल्यामुळे नोकरीला मुकावे लागले होते. मग ज्या ठिकाणी जिने चढा-उतरायचे असतात, सामान खाली-वर करायचे असते अशा ठिकाणी देखील स्त्रियांना उंच टाचेच्या चपला घालाव्याच लागतात. २०,००० स्त्रियांनी निकोलाला पाठिंबा देऊनही तिथल्या सरकारने याविषयी काही करण्याचे टाळले.

त्यांचे म्हणणे आहे २०१० मध्ये झालेल्या कायदा बदलात या गोष्टीचा समावेश केला जाऊ शकतो, त्यासाठी वेगळ्या कायदा बदलाची गरज नाही. पण आज तीन वर्षांनंतरही अशा अनेक निकोला असूच शकतात ज्यांची नोकरी केवळ उंच टाचेच्या चपला घातल्या नाहीत म्हणून गेली आहे.

‘कान्स’ या चित्रपटांची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठिकाणीसुद्धा २०१५ पर्यंत उंच टाचेची पादत्राणे न घातलेल्या स्त्रियांना प्रवेश दिला जात नव्हता. त्याबद्दलची नाराजी दाखवण्यासाठी पुढच्या वर्षी, २०१६ ला ज्युलिया रॉबर्ट रेड काप्रेटवर चक्क अनवाणी चालत गेली होती. मुळात ज्या गोष्टी आरामदायक नाहीत त्या वापरण्याचा खटाटोप का करावा? गबाळे राहणे वेगळे आणि सामाजिक संकेत आहे म्हणून न साजेसे, न सांभाळता येणारे कपडे, पोशाख करणे वेगळे. वैद्यकीयदृष्टय़ा उंच टाचेच्या चपला घालणे स्त्रियांच्या आरोग्याला घातक आहे हे अनेक डॉक्टर सांगतात. पण तरीही सौंदर्य आणि सामाजिक प्रतिष्ठेचे मानक बनलेल्या उंच टाचेच्या चपलांना खाली खेचण्याच्या प्रयत्नांना अजून तरी यश आलेले नाही हेच खरे.

भगिनीभाव

गोष्ट २०१७ मधली गोष्ट. नाओमी ही पश्चिम ऑस्ट्रेलियामधली एक सर्वसामान्य स्त्री. नियम तोडला म्हणून तिला दंड झाला होता. पण तिच्याकडे दंड भरायला पैसेच नव्हते. त्यामुळे तुरुंगात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच तिच्याकडे नव्हता. ती सांगते, ‘‘ते तीन दिवस तिच्या आयुष्यातले सगळ्यात वाईट दिवस होते.’’ नाओमी ही त्या भागातली ‘अ‍ॅबओरिजिनल’ म्हणजे मूळ रहिवासी आहे. नाओमीसारख्या अनेकजणी पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचे ठोस साधन नाही, पदरी मुलेच नव्हे तर नातवंडेदेखील आहेत. अशा वेळी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न निर्माण होतो. पश्चिम ऑस्ट्रेलियात आजही आर्थिक दंड न भरल्यास तुरुंगवासाची तरतूद आहे.

नाओमीसारख्या अनेक जणींचे तुरुंगवास वाचवण्यासाठी ‘सिस्टर्स इनसाइड’ ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने लोकांमधून पैसे जमवायला सुरू केले आणि ते पैसे अशा गरजू स्त्रियांचे दंड भरण्यासाठी वापरले जातात. आजवर या संस्थेने ४ लाख डॉलर्सहून अधिक निधी गोळा केलाय. ही संस्था डेबी किलरोय हिने सुरू केलेली आहे. या डेबीची स्वत:चीसुद्धा अशीच शोकांत कहाणी आहे. तिला १९८९ मध्ये अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली ६ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तेव्हा तिने हे तुरुंगातले जीवन अगदी जवळून पाहिले. तुरुंगात जाण्यापूर्वी डेबीला स्वत:चे घर, कुटुंब, मुलं होती. हे सगळे अर्थातच या तुरुंगवासानंतर तिने गमावले. तुरुंगात तिने एक खूनही पाहिला. या सगळ्या अनुभवानंतर बाहेर आल्यावर तिने कायद्याचे शिक्षण घेतले आणि आता ती मानवी हक्कांसाठी लढणारी ऑस्ट्रेलियामधली एक धडाडीची वकील म्हणून ओळखली जाते. दंड भरला नाही म्हणून तुरुंगात जाणाऱ्या स्त्रियांचे विश्वच उद्ध्वस्त होऊ शकते याची जाणीव असल्यामुळे तिने तिच्या ‘सिस्टर्स इनसाईड’ संस्थेमधून आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली आहे.

ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी निश्चितच दंड भरावा. पण ‘दंड भरता येत नाही म्हणून तुरुंगवास’ हा निव्वळ अन्याय आहे, हा कायदा बदलला पाहिजे, ही मागणी जोर धरत आहे. सरकारनेदेखील आम्ही लवकरच या कायद्यात दुरुस्ती करू, असे म्हटले आहे.

स्वत:ला आलेल्या अनुभवातून इतरांना शहाणे करणे स्त्रियांना जास्त सहज जमते. डेबीने संस्था उभारली. त्याद्वारे ती अनेक जणींना मदतही करते आहे आणि तिलादेखील अनेक जणी आर्थिक, भावनिक मदत करत आहेत. भगिनीभाव प्रत्येकीकडे असतो. प्रत्येक जण कळत-नकळत तो जोपासतच असतो. हेच डेबी तिच्या ‘सिस्टर्स इनसाईड’च्या माध्यमातून आपल्याला दाखवते.

उबदार ‘वॉर्मलाइन’

कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्याची मायेने विचारपूस करून त्याला त्याचा निर्णय बदलवणारे लोक केवळ पुस्तकात, चित्रपटांमध्येच असतात असा जर तुमचा समज असेल तर ‘इंटेल’ या जगप्रसिद्ध कंपनीने तो मोडून काढला आहे. २-३ वर्षांपूर्वी ‘इंटेल’ला लक्षात आले की अनेक स्त्रिया, अल्पसंख्य समूहातले त्यांचे कर्मचारी काम सोडून जाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यावर काही तरी केले पाहिजे, असे त्यांना मनापासून वाटले. बार्बरा व्हे या त्यांच्या व्हाइस प्रेसिडेंटने ‘वॉर्मलाइन’ची कल्पना मांडली. माणसाला कायम स्थर्य हवे असते, मग हातातली पक्की नोकरी सोडून जेव्हा लोक जायचा निर्णय घेतात तेव्हा त्यामागे नक्कीच कुठली तरी असुरक्षितता असणार. हा कयास करत बार्बरा यांनी एका ‘हॉटलाइन’ची संकल्पना समोर ठेवली. कंपनीतल्याच वेगवेगळ्या विभागांमधल्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश असतो. ज्या कोणा कर्मचाऱ्याला काही खटकत असेल, नोकरीत काही असमाधान असेल किंवा ते तणावात असतील तर त्यांनी या सेवेचा लाभ उठवत या फोनवर आपला असंतोष व्यक्त करावा, अशी यामागची संकल्पना आहे.

ही सेवा कंपनीच्या उपयोगाचीच ठरली, कारण इथे तक्रार नोंदवलेल्या १० जणांपैकी ८ जणांचे समाधान झाले आणि त्यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय बदलला. ते आजही कंपनीत नोकरी करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा, वास्तव, कंपनीच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा या सगळ्यांचा मेळ घालणे या हॉटलाइनमुळे सहज शक्य झाले. सध्या अमेरिका आणि कोस्टारिकापुरतीच मर्यादित असलेली ही सेवा ‘इंटेल’ लवकरच त्यांच्या जगभरातल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे. या हेल्पलाइनमधून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून घेत ‘इंटेल’ने आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वाना एकत्र घेऊन काम कसे करता येऊ शकते यासाठी खास प्रशिक्षण देखील दिले. असे करणे एखाद्या स्त्रीलाच सुचू शकते.

कोणतीही कंपनी ही फक्त मालकाच्या भूमिकेतून किंवा कर्मचाऱ्याच्या भूमिकेतून चालत नसते. जेव्हा त्या दोघांचेही दृष्टिकोन जुळतात आणि ही आपली कंपनी आहे असे त्यांना वाटायला लागते तेव्हा कामाचा दर्जा सुधारत असतो. हीच गोष्ट बार्बरा यांनी हेरली आणि नाराज लोकांची नाराजी कोणत्या कारणासाठी आहे हे जाणून घेतले. त्यानंतर ती नाराजी दूर करायचा प्रयत्न केला. त्यामुळेच कंपनी सोडून जाणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले. घर चालवताना घरातली स्त्री अगदी हेच तर करत असते. काम टाळणाऱ्या कुटुंबीयांना ते काम आवडत नाही हे समजून घेऊन त्यांना जे काम आवडते ते काम देते त्यामुळे काम अगदी सहज होऊन जाते. याच कारणामुळे कदाचित बार्बरा यांना ‘वॉर्मलाइन’ची कल्पना सुचली असावी. ‘सेल्स फोर्स’ या सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रेसिडेंट आणि चीफ पीपल ऑफिसर सिंडी रॉबिन्स देखील म्हणतात, ‘‘जास्तीत जास्त स्त्रिया मोठय़ा पदांवर आल्या पाहिजेत. स्वयंपाक करताना, फोनवर बोलता बोलता मुलांचा अभ्यास घेणाऱ्या स्त्रिया आपल्याला घराघरांत दिसतात. सहजगतीने चार कामे करणे स्त्रियांना नैसर्गिकरीत्या जमते, त्यामुळे संधी मिळाली तर स्त्रिया नक्कीच त्याचे सोने करून दाखवतात. इंद्रा नुई, ‘आयबीएम’ची सीईओ जिनी रोमेटी, ‘ओरॅकल’ची सीईओ साफ्रा कात्झ अशी अनेक बोलकी उदाहरणेदेखील आहेतच.

manasi.holehonnur@gmail.com

chaturang@expressindia.com

(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे)

First Published on June 22, 2019 1:02 am

Web Title: kutsu shoes high heels nicola thorp abn 97
Just Now!
X