07 December 2019

News Flash

 शंभर पद्म ज्याच्या घरी..

निराधार, दीनदुबळ्यांना तसेच आर्थिक मिळकत जेमतेम असलेल्यांना कायमस्वरूपी हक्काचा निवारा मिळावा

| August 15, 2015 01:05 am

निराधार, दीनदुबळ्यांना तसेच आर्थिक मिळकत जेमतेम असलेल्यांना कायमस्वरूपी हक्काचा निवारा मिळावा, म्हणून आपल्या कोटी कोटी रकमेच्या जमिनीचं दान करणाऱ्या नगरमधील उद्योजक आबाजी ऊर्फ बलभीम सखाराम पठारे या अवलियांच्या सत्पात्री दानाची ही ओळख.
स्वत:साठी एक सुंदर घर असावं. हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण निराधार, दीनदुबळ्यांसाठी कायमस्वरूपी हक्काचा निवारा मिळावा, म्हणून आपल्या सोन्याचं मोल असलेल्या जमिनीचं दान करून त्यांच्या मनात घर करण्यापेक्षा सुंदर काय असू शकेल? हा प्रेरणादायी धडा आपल्या आचरणातून देणारी दानशूर व्यक्ती म्हणजे अहमदनगरचे उद्योजक आबाजी ऊर्फ बलभीम सखाराम पठारे.
पठारे यांनी अलीकडेच शहरातील, माऊली सेवा प्रतिष्ठान या बेघर, अनाथ, मनोरुग्ण स्त्रियांचा मायेने सांभाळ करणाऱ्या संस्थेला भेट दिली. त्या वेळी त्यांची जागेची निकड लक्षात आल्यावर, पठारे यांनी त्याच दिवशी संस्थेला स्वत:ची नगर-शिर्डी महामार्गाजवळील ३ एकर बागायती जमीन देण्याचा निर्णय घेतला. याआधीही त्यांनी नगरमधील रोजंदारीवर काम करण्याऱ्या कामगारांची घरे व्हावीत म्हणून आपल्या एम.आय.डी.सी. परिसराजवळील सहा एकर जमिनीचं दान दिलंय. शून्यापासून सुरुवात करून आज कोटी रुपयांची उलाढाल करणारा हा तरुण उद्योजक (४७ वर्षे) भूदानाबरोबर ‘अक्षर विचार प्रतिष्ठान’ या आपल्या संस्थेच्या माध्यमातून गेली तीन वष्रे नगरच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचं योगदान देत आहे.
खातगाव या नगर जिल्ह्य़ातील अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मॅट्रिकनंतर फार्मसीचा डिप्लोमा घेतल्यावर नगरपालिकेत कम्पाऊंडरची तात्पुरती नोकरी लागली. शालेय वयातच वडील गेल्यानंतर नोकरीबरोबर पापड, खारे दाणे अशा वस्तू दारोदार फिरून विकल्या. पण त्यातही त्यांनी आपलं नाटकाचं वेड मात्र जपलं, नव्हे त्या वेडानेच त्यांना जगवलं. आयुष्याचा जोडीदारही नाटकामुळेच मिळाला, पण तेव्हाही त्यांचं दातृत्व अढळ होतं.
त्या दिवसातील एक किस्सा त्यांच्या पत्नी मेघमालाताईंनी सांगितला. आबाजींच्या एका मित्राच्या बहिणीचं लग्न होतं. तो मित्रही कंगाल. लग्न चार दिवसांवर आलं तरी घरात धान्याचा दाणा नाही. आबाजींच्या घरची परिस्थितीही तीच. शेवटी त्यांनी हिय्या करून १६०० रुपयांचा किराणा उधारीने मित्राच्या घरी भरला. नंतर मित्राने हात वर केल्याने ७०० रुपयांच्या पगारातून हे कर्ज फेडायला त्यांना वर्ष लागलं. मात्र पुढे जिद्द, दूरदृष्टी व अफाट कष्ट करण्याची तयारी या भांडवलावर त्यांनी यश, संपत्ती व प्रतिष्ठा खेचून आणली. आबाजी म्हणतात, ‘‘एखादं संकट आलं की समजायचं त्याबरोबर संधी आलीच. कारण संकट हे संधीशिवाय एकटं कधीच प्रवास करीत नाही. म्हणून संकटावर मात करा, संधी तुमचीच वाट पाहात असते.’’
आज आबाजी पठारे यांचे नगरमध्ये क्रीडाविषयक साहित्य बनविण्याचे स्वतंत्र कारखाने आहेत. पुण्यात ‘कोझी होम्स’ नावाने गृहबांधणी प्रकल्प सुरू आहे. एकेकाळी घरोघर फिरून पापड विकणाऱ्या मुलाने आज हजारो घरांची विक्री केलीय. तरीही स्वत:ची राहती जागा, फक्त वन बेडरूम किचनएवढीच! कारण काय तर आधी लगीन गरजवंताचं, हे आयुष्याचं सूत्र.
नगर शहरापासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावरील आबाजींच्या गावात, पाणीटंचाई पाचवीलाच पूजलेली. चार वर्षांपूर्वी खातगाव-टाकळी [जोडगाव] यांच्यामधून वाहणाऱ्या नदीवर बंधारा घालण्यात आला होता. परंतु अत्यल्प पाऊस, जमिनीतील चुनखडीचा थर आणि बंधाऱ्याची बेताचीच उंची यामुळे बंधारा घातल्यापासून त्यात कधी पाणी साठलेलं गावकऱ्यांनी पाहिलंच नाही. पाण्यासाठी चालणारी ग्रामस्थांची वणवण पाहून आबाजींनी आपल्या ‘अक्षर विचार प्रतिष्ठान’च्या माध्यमातून २ वर्षांपूर्वी या बंधाऱ्याचे बळकटीकरण केले. पाणी जिरण्यास अडथळा ठरणारा चुनखडीचा थर काढून ३० फूट खोल, १०० फूट रुंद व १५०० फूट लांब असा शिरपूर पॅटर्न बंधारा नव्याने बांधण्यात आला. २३ लाख रुपये खर्चून उभारलेल्या या अक्षर सागर बंधाऱ्यामुळे खातगाव-टाकळी येथीलच नव्हे तर जखणगाव, िहगणगाव अशा पंचक्रोशीतील ५-६ गावांतील सव्वाशे विहिरी गेल्या वर्षी पाण्याने भरल्या. ज्याचा फायदा दीड ते दोन हजार एकर शेतीला झाला. गेल्या १० वर्षांत या परिसरात गव्हाची लागवड झाली नव्हती, पण या बंधाऱ्यामुळे आसपासची गावं तर टँकरमुक्त झालीच शिवाय आता ज्वारी, बाजरी, कांद्याबरोबर शेतकरी गव्हाचे पीकही घेऊ लागलेत.
‘अक्षरधाम’ स्मशानभूमी ही आबाजींनी आपल्या गावासाठी दिलेली आणखी एक सुविधा. वर्षांनुवष्रे या गावातील अंत्यविधी नदीच्या काठी उघडय़ावरच केले गेले होते. गावातील पिसे कुटुंबीयांनी दिलेल्या नऊ गुंठे जागेवर आबाजींनी गेल्याच वर्षी सर्व सोयींनी युक्त असं ‘अक्षरधाम’ उभारलं.
नगरमध्ये पद्मशाली समाज मोठय़ा प्रमाणावर आहे. यातील बहुतेक स्त्री-पुरुष विडय़ा वळण्याचं किंवा कापड व्यावसायिकांकडे रोजंदारीचं काम करतात. दिवसभर कष्ट करूनही अत्यंत हलाखीत जीवन जगणाऱ्या या समाजातील स्त्रियांना पाहून आबाजींचं हृदय द्रवलं आणि त्यांनी त्यातील शंभर अत्यंत गरजू स्त्रिया निवडून त्यांना दरमहा हजार रुपये पेन्शन द्यायला सुरुवात केली. गेली ४-५ वष्रे महिन्याच्या पहिल्या शनिवारी या पशांचे काटेकोरपणे वाटप केलं जातंय.
कष्टाळूपणासोबत या पद्मशाली जातीचा आणखी एक गुण म्हणजे त्यांची प्रामाणिक वृत्ती. त्यामुळेच आज आबाजींच्या कारखान्यात कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत अनेक पदांवर याच समाजातील मुलं काम करताना दिसतात. सुरेश, देवीदास, श्रीनिवास, प्रवीण, राजू, राकेश अशा जिवाला जीव देणाऱ्या शंभर मावळ्यांची फौज आज आबाजींपाशी आहे. ते अभिमानाने सांगतात की, लोकांना एक नाही तर दोन पद्म पुरस्कार मिळतात, पण माझ्याकडे शंभर खणखणीत पद्म आहेत! ‘शंभर पद्म ज्याच्या घरी, लक्ष्मी तिथे वास करी’ हे त्यांच्याबाबतीत तंतोतंत जुळतंय.
नगरजवळील मनगावमधील ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ला जमीन दान करण्यासाठी कारणीभूत ठरली ती याच समाजाच्या पेन्शन योजनेतील ‘गंगूबाई’ नावाची अपंग स्त्री. दोन्ही पाय नसलेल्या उतारवयीन गंगूबाईला कोणीच वाली उरला नसल्याचं जेव्हा आबाजींच्या मावळ्यांना कळलं तेव्हा तिला हक्काचा निवारा देण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. सगळ्यांनी अव्हेरलेल्या गंगूबाईला, ‘माऊली प्रतिष्ठान’ने मात्र प्रेमाने सामावून घेतलं. हे कानावर येताच आबाजी संस्थाचालकांचे आभार मानण्यासाठी सपत्नीक तिथे गेले. तिथल्या बेवारस मनोरुग्ण स्त्रियांची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेणाऱ्या डॉ. धामणे दाम्पत्याला पाहून विलक्षण बेचैन झाले. बोलता बोलता डॉक्टरांनी, माऊलींच्या विस्तारासाठी कुठे अल्प दराने जागा मिळू शकले का, अशी विचारणा केली. त्याक्षणी ते काही बोलले नाहीत, पण परतताना वाटेतच उभयतांचा निर्णय झाला आणि त्याच रात्री डॉ. धामणेंना आबाजींचा फोन गेला- ‘जागेचा शोध थांबवा.’ त्यानंतर केवळ आठच दिवसांत सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून संस्थेच्या आताच्या मनगाव प्रकल्पापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या देहरे गावातील तीन एकराची बागायती जमीन माऊली प्रतिष्ठानच्या नावे झालीसुद्धा (किंमत अंदाजे दीड कोटी रुपये). एवढं करूनही स्वत:च्या नावनिशाणीचीही अपेक्षा नाही. अलीकडेच म्हणजे २८ फेब्रुवारीला आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या हस्ते या जागेचं भूमीपूजनदेखील पार पडलं.
अर्थात आबाजींना हे सारं शक्य झालं ते सहधर्मचारिणीच्या संपूर्ण साथीमुळेच. त्यांच्या तिन्ही मुलांवरही हेच संस्कार आहेत. पठारे पती-पत्नी दोघेही नाटय़प्रेमी. अभिनयाच्या आवडीतून एकत्र आलेले. आबाजींनी तर राज्य नाटय़ स्पध्रेतून सलग ९ र्वष पुरस्कार मिळवले. त्यांनी रंगमंचावर नुसती एन्ट्री घेतली की टाळ्या आणि शिटय़ा यांचा पाऊस पडे. नाटय़ चळवळीने समाज घडतो ही त्यांची धारणा. ही चळवळ जिवंत राहावी, तसेच उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळावं यासाठी त्यांनी डिसेंबर २०१२ पासून नगरमध्ये ‘अक्षर करंडक’ नावाने राज्यस्तरीय एकांकिका स्पध्रेच्या आयोजनाला सुरुवात केली. स्पर्धकांसाठी घरगुती जेवणाची व राहण्याची मोफत व्यवस्था, आकर्षक बक्षिसांची खैरात, भव्य रंगमंच, स्वागतासाठी शहरभर कमानी, सेलेब्रिटींच्या हस्ते पारितोषिक वितरण अशा आकर्षणामुळे स्पध्रेची लोकप्रियता बघता बघता वाढली. गेल्या वर्षीपासून या स्पध्रेत, बाहेरच्या राज्यांतील स्पर्धक भाग घेऊ लागल्याने नगरच्या रसिकांसाठी ही एक मेजवानी ठरल्यास नवल नाही.
अभिनयाच्या प्रेमातून पडलेलं आबाजींचं पुढचं ंपाऊल म्हणजे अलीकडेच (७ ऑगस्ट २०१५) प्रदíशत झालेल्या ‘निळकंठ मास्तर’ या चित्रपटाची निर्मिती. गजेंद्र अहिरे यांचे लेखन-दिग्दर्शन व अजय-अतुल यांचे संगीत लाभलेला हा चित्रपट म्हणजे आबाजींच्या मर्मबंधातली ठेव आहे. पुढच्या पिढीने काय पाहावं ते कळण्यासाठी तरी स्वातंत्र्य लढय़ातील पाश्र्वभूमी असलेला हा सिनेमा चुकवू नये असं ते म्हणाले.
या चित्रपटातून जे पसे मिळतील त्या पशांच्या विनियोगाची योजनाही त्यांच्या डोक्यात तयार आहे. अहमदनगरमधील गोरगरिबांना हक्काची घरं मिळवून देण्याच्या कामी हा पसा यावा असं त्यांना वाटतं. यासाठीची पूर्वतयारी केव्हाच झालीय. ज्याला कुठेही घर नाही आणि ज्यांची महिना मिळकत ५ ते ६ हजार रुपयांच्या आत आहे अशा ४१६ कामगारांची ‘व्यंकटेश्वरा गृहनिर्माण संस्था’ २०१२ मध्ये स्थापन करण्यात आली आहे. या संकुलासाठी आबाजींनी स्वत:ची अहमदनगर एम.आय.डी.सी. परिसरातील लागून असलेली ६ एकर जमीन संस्थेला दिली. या लोकोपयोगी प्रकल्पाला शहरातील व्यापारी, कारखानदार, बिल्डर्स या मंडळींचाही पाठिंबा आहे. अडसर आहे तो फक्त, ही जमीन निवासी क्षेत्र म्हणून बदलून मिळण्याचा. त्यासाठी आबाजींचा गेले दीड वर्ष सतत पाठपुरावा सुरू आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या हक्काच्या घराचं स्वप्न दाखवणारं आपलं सरकार, एका सहृदयी माणसाच्या या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेईल? waglesampada@gmail.com
संपर्क आबाजी पाठारे -९४२०४७०००१
rushirajsuresh@gmail.com

First Published on August 15, 2015 1:05 am

Web Title: land doner man
टॅग Land
Just Now!
X