निखळ, निर्मळ हास्य हे मानवाला मिळालेलं वरदान आहे. ज्याचं हास्य कुठल्याही प्रसंगात टिकून रहातं तो योग्य तो निर्णय घेऊ शकतो आणि म्हणूनच स्थिर आयुष्य जगू शकतो. उद्याच्या जागतिक हास्य दिनानिमित्त नामवंत व्यक्तींनी सांगितलेले हे काही खास संदेश.

* जगावर राज्य करण्यासाठी बॉम्ब आणि बंदुका वापरण्याची काही गरज नाही. त्यापेक्षा प्रेम आणि सहवेदना, सहानुभूती मनात बाळगूया. शांतता प्रस्थापित करण्याचा आरंभ चेहऱ्यावरील प्रसन्न हास्याने होतो. ज्या व्यक्तीकडे बघून कधीही हसू नये, असं तुम्हाला वाटतं, त्याच्याकडेच बघून दिवसातून पाच वेळा हसा. शांततेसाठी एवढं नक्की करा.
– मदर तेरेसा

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

* एखादा माणूस अंतर्बाह्य़ समजून घेण्याची तुमची इच्छा असेल, तर तो कसा चालतो, बोलतो, वागतो, शांत कसा राहतो किंवा चांगल्या गोष्टी त्याच्या संवेदना कशा जागृत करतात, हे सारं जाणून घ्याच. पण त्याहीपेक्षा तो कसा हसतो, याचं निरीक्षण केलंत, तर तुम्हाला तो माणूस अधिक चांगल्या पद्धतीने ‘कळेल.’ जर तो मनमोकळं हसत असेल तर माणूस नक्कीच भला आहे.
– फियोदोर दोस्तोयवस्की, प्रसिद्ध कादंबरीकार

* भरपूर हसा.. वेळोवेळी हसा. वाईट काळात, संकटाच्या प्रसंगात मनमुराद हसणंच तुम्हाला तारून नेईल.
– जीम बुचर, बेस्टसेलर पुस्तकांचा लेखक

* मानवाजवळ असणारं एकमेव परिणामकारक अस्त्र – हास्य!
– मार्क ट्वेन, विख्यात लेखक

* जोवर हसू आहे, तोवरच जीवन जगण्यात मजा आहे.
– एल. एम. माँटगोमेरी, प्रसिद्ध लेखिका

* हास्य आणि विनोद यांच्या इतकी कमालीची संसर्गजन्य गोष्ट या जगात दुसरी कोणतीही नाही.
– चार्ल्स डिकन्स, विख्यात लेखक

* जी व्यक्ती हसत नाही, तिच्यावर मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही.
– माया अँजेलू, लेखिका व कवयित्री

* जे लोक मला हसवतात, ते मला फार आवडतात. हसणं मला मनापासून प्रिय आहे. अप्रिय, वाईट गोष्टी त्यामुळे दूर पळतात. हसणं हे प्रत्येक व्यक्तीमधलं खास असं वैशिष्टय़ आहे.
– ऑड्री हेपबर्न, प्रसिद्ध अभिनेत्री

*  शक्य असेल, त्या प्रत्येक वेळी दिलखुलास हसा. कारण हास्य हे सर्वात स्वस्त औषध आहे.
– लॉर्ड बायरन, प्रसिद्ध कवी

* मनापासून रडणं, अश्रू ढाळणं ज्यांना जमत नाही, त्यांना मनसोक्त हसायचं कसं, हेही कळत नाही.
– गोल्डा मेयर, इस्राएलच्या भूतपूर्व पंतप्रधान

*  आपण हसणं हरवून बसलो, तर आपण निश्चितपणे वेडे होऊन जाऊ.
– रॉबर्ट फ्रॉस्ट, प्रसिद्ध कवी

* हसणं म्हणजे फक्त मजा नसते तर त्यापलीकडेही बरंच काही असतं. जेव्हा चार व्यक्ती एकत्र येऊन मनमुराद हसतात, त्या वेळी त्यांच्यात बोलणं होतं, एकमेकांचा सहवास मिळतो, एकमेकांना जाणून घेता येतं. मजेबरोबरच हास्य मनांना जोडतं.
– ग्रेचेन रुबीन, लेखिका व ब्लॉगर

* आत्म्याची ऊर्जा म्हणजे हास्य! हास्य.. मग ते स्मितहास्य असो वा गडगडाटी, आनंदाचं असो वा कारुण्याची झालर असणारं! हे जीवन जगण्यात आनंद आहे, हा विश्वास देणारा मानवी आविष्कार म्हणजे हास्य!
– सिअन ओ’केझी, आयरिश नाटककार

* आशावादी माणूस कटू गोष्टी विसरण्यासाठी हसतो, तर निराशावादी माणूस हसायचंच विसरतो.
– टॉम नॅन्सबरी

* हास्य माणसामाणसांना जोडतं. जेव्हा तुम्ही मनसोक्त हसता, तेव्हा एकमेकांत अंतर ठेवणं किंवा सामाजिक श्रेणीची बंधनं पाळणं असल्या गोष्टी कुठल्या कुठे पळून जातात. लोकशाहीची खरी ऊर्जा म्हणजे हास्य होय!
– जॉन क्लीस, अभिनेता, चित्रपट निर्माता

* हसणं एखाद्या ‘ब्लॉकिंग एजंट’प्रमाणे काम करतं. ते एखाद्या बुलेटप्रूफ जॅकेटसारखं असतं. नकारात्मक भावना, विचार यांच्यापासून ते तुमचं रक्षण करतं आणि तुम्हाला निरोगी, सुदृढ ठेवतं.
– नॉर्मन कझिन्स, ख्यातनाम पत्रकार

* ज्या व्यक्तीसमवेत आपण कधीही हसलो नाही, अशा व्यक्तीवर आपण कधीही मनापासून प्रेम करू शकत नाही किंवा ती व्यक्ती आपल्याला मनापासून आवडू शकत नाही.
– अ‍ॅग्नेस रेप्लीयर, प्रसिद्ध लेखक

* वेगवेगळ्या भाषेतला माणसू हसतो मात्र एकाच पद्धतीने! कारण हास्य हा समस्त विश्वाला जोडून ठेवणारा समान धागा आहे.
याकोव्ह स्मरनॉफ, पेंटर, शिक्षक व विनोदी अभिनेता.

* या जगात सर्वाधिक गरजेच्या अशा दोनच गोष्टी म्हणजे प्रेम आणि हास्य! प्रत्येक माणसाला याच गोष्टी हव्या असतात, म्हणूनच नेहमी एका हातात प्रेम हवं अन् दुसऱ्या हातात हसू!
– ऑगस्ट विल्सन, पुलित्झर सन्मानप्राप्त नाटककार

* वृद्ध झालात, म्हणून तुम्ही हसणं थांबवता असं होत नाही. उलट हसणं थांबवलंत की तुम्ही म्हातारे होता.
– मायकेल प्रिटचर्ड

* डॉक्टरांच्या पुस्तकातले दोन सर्वोत्तम उपचार – पुरेशी शांत झोप आणि
खळखळून हसणं!
आयरिश म्हण!

* विनोद आपल्याला ठरावीक चौकटी मोडून विचार करायला शिकवतो. सर्वसामान्यपणे एखादं लहान मूल दिवसभरात ४०० वेळा हसतं आणि एखादी प्रौढ व्यक्ती १५ वेळा! उरलेली ३८५ हास्य कुठं अदृश्य झाली, हा विचार आपण प्रत्येकानेच केला पाहिजे.    – अनामिक