तुम्ही खरोखर आनंदी असा किंवा आनंदी असण्याची कल्पना करा. तुमच्या मेंदूला ते कळतं, पण शरीराला कळत नाही. त्यामुळे हसायला सुरुवात केली की शरीरातील ग्रंथीतून वेदनाशमन करणारा स्राव पाझरायला सुरुवात होते. याच शारीरिक चक्राचा वापर करत अनेक वृद्धांच्या आयुष्यात वेदनारहित आनंद देणाऱ्या ‘हास्ययोग’चे आज ७२ देशांत १६ हजार हास्यक्लब जोमाने कार्यरत आहेत. ज्येष्ठांसाठी वरदान ठरलेल्या हास्ययोगाविषयी.

‘हंसते हंसते कट जाए रस्ते’ असं सुरेल स्वरांत म्हणत ज्येष्ठांना कण्हायला लावणारं वृद्धत्व हसत हसत पार करायला लावणाऱ्या योग्याचं नाव आहे, डॉ. मदन कटारिया!  मुंबईतील एक प्रथितयश डॉक्टर असलेले डॉ. कटारिया नामांकित रुग्णालयात ते वैद्यकीय व्यवसाय करत असताना एका वैद्यकीय नियतकालिकासाठी लेखनही करत असत. एकदा त्यांनी हास्ययोग शास्त्रावर लेख लिहायचा ठरवला व त्यासाठी संशोधन सुरू केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपण रोजच्या आयुष्यात फारसं हसतच नाही. पण, गुडघेदुखी, मधुमेह, उच्च रक्तदाब अशासारख्या वृद्धत्वात सख्य करणाऱ्या अनेक व्याधींवर ‘हास्ययोग’ हा रामबाण उपाय आहे.
डॉक्टरांनी अंधेरीतल्या एका बागेत जाऊन पाचजणांना गोळा केलं. त्यांना ही कल्पना आवडली. रोज कोणीतरी विनोद सांगे व त्यावर सगळे मनमुराद हसत. दहा दिवसांत चांगले विनोद संपले आणि अश्लील विनोदांची सुरुवात झाली. तेव्हा एक ज्येष्ठ ताडकन म्हणाले, ‘‘डॉक्टरसाब ये दुकान अब बंद करो!’’ डॉक्टर कटारिया चमकले. पण त्या ज्येष्ठांना शांतपणे म्हणाले, ‘‘मला फक्त चोवीस तास द्या!’’ दुसऱ्या दिवशी त्यांनी नुसतंच एकत्र जमून हसायला सुरुवात केली आणि एकमेकांना हसताना पाहून त्या कृत्रिम हास्यातून उत्स्फूर्तपणे नैसर्गिक हास्य सर्वाच्या चेहऱ्यावर उमललं. ‘हास्यक्लब’ या संकल्पनेने इथेच जन्म घेतला आणि डॉ. मदन कटारिया व त्यांच्या पत्नी माधुरी कटारिया या उभयतांनी अथक परिश्रम करून ही संकल्पना आज जर्मनी, जपान, कॅनडा, अमेरिका इत्यादी बहात्तर देशांत लोकप्रिय केली.
 डॉ. कटारिया म्हणतात, ‘‘तुम्ही खरोखर आनंदी असा किंवा आनंदी असण्याची कल्पना करा. तुमच्या मेंदूला ते कळतं, पण शरीराला कळत नाही. त्यामुळे हा:हा:, ही:ही, हु:हु अशा स्वरांत हसायला सुरुवात केली की शरीरातील ग्रंथीतून एंडॉर्फिन हा स्राव पाझरायला सुरुवात होते. ज्यायोगे आपोआप तुमचं मन प्रसन्न होतं. हा स्राव वेदनाशमन करतो. त्यामुळे हसण्याच्या क्रियेतून शरीरातील वेदनांचं शमन होतं व चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. अर्थात आपण जेव्हा एखाद्या विनोदावर हसतो तेव्हा जेमतेम ते हसू २ ते ३ सेकंद टिकतं. पण शरीरस्वास्थ्यासाठी मात्र जेव्हा आपण मनमुराद, मोकळेपणाने किमान पंधरा मिनिटे हसतो तेव्हाच त्याचा फायदा होतो. हसण्याच्या या अनुभवसिद्ध फायद्यामुळे आज ‘हास्ययोगा’चे ७२ देशांत सोळा हजार हास्यक्लब जोमाने कार्यरत आहेत. हळूहळू आम्ही त्यात प्राणायाम व व्यायामाचे प्रकार अंतर्भूत केले व अशा प्रकारे हास्ययोगाची निर्मिती झाली.’’
डॉक्टरांनी हाती घेतलेल्या या हास्यव्रताच्या दिंडीत अनेक जण सामील झाले आहेत. या सर्व हास्ययोग प्रशिक्षकांनी हेच तत्त्व अंगिकारलं आहे, ‘‘मी स्वत: हसत राहीन. दुसऱ्यांना हसवीन, पण दुसऱ्यांना हसणार नाही.’’ भल्या सकाळी हे हास्ययोग प्रशिक्षक जागोजागच्या हास्यक्लबांना भेटी देतात. त्यांना हास्ययोगाचे नवनवीन प्रकार शिकवतात व ते त्यांच्याकडून करवून घेतात. ठाण्यातील सुप्रसिद्ध हास्ययोग प्रशिक्षक डॉ. माधव म्हस्के सांगतात, ‘‘भारतवर्षांत हसणं हे आपल्या संस्कृतीतच होतं. म्हणून राजदरबारात बिरबल, तेनालीराम, गोपाळ भांड, गेनु झा यांना मानाचं स्थान होतं. संस्कृत नाटकातील विदूषक, तमाशातील नाच्या पोऱ्या याचं काम हेच लोकांना मनमुराद हसवण्याचं होतं. आजच्या आधुनिक युगात
हास्यक्लबांतील हास्ययोगाने समूहात कसं हसायचं ते शिकवलं व याचा सर्वात अधिक फायदा ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. हसणं संसर्गजन्य आहे. इतरांना हसताना पाहून आपोआप आपल्यालाही हसू फुटते. हे हसू निरागस बालकाच्या हास्यासारखं निव्र्याज असतं. त्यामुळे व्यायाम म्हणून सुरू झालेलं हास्यप्रकारातून नैसर्गिक हास्य कधी आणि कसं फुलतं तेच कळत नाही व त्याचा परिणाम शरीरावर होऊ लागतो. हसल्यामुळे डायफ्राम वर-खाली जातो व आतील अवयवांना व्यायाम मिळतो. हास्ययोगांत सिंहमुद्रा, प्राणायाम, कपालभाती, दीर्घश्वसन या सर्वाचा अंतर्भाव असल्याने आपोआप अशुद्ध वायूचं निर्वाहन व शुद्ध प्राणवायूचं शरीरात आवाहन या क्रिया होतात. ज्यामुळे शरीर व मन ताजंतवानं होतं. ‘हास्यक्लब’ हे नेहमी मोकळ्या जागेत, बागेत वा वड-पिंपळ वृक्षांच्या छायेत प्रात:काळी घेतले जातात. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. मनाला प्रसन्नता लाभल्याने अनेक ज्येष्ठांच्या शारीरिक व्याधींना उतार पडलेला आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेतून बाहेर पडून त्यांना आनंदी व उत्साही वाटतं. उतारवयातील निद्रानाशावर ‘हास्ययोग’ हा अक्सीर इलाज आहे. एकूणच सकाळच्या प्रहरी केलेल्या हास्ययोगामुळे ज्येष्ठांचे शारीरिक/ मानसिक आरोग्य सुधारते व त्यांच्या कुटुंबातही आनंदी वातावरण राहाते, असे अनेक ज्येष्ठ आवर्जून नमूद करतात.’’
हास्ययोग प्रशिक्षक डॉ. म्हस्के या प्रशिक्षणाच्या निमित्ताने सातत्याने ज्येष्ठांच्या सहवासात येत असतात. या सर्व प्रशिक्षकांनी अनेक नवनव्या कल्पना लढवून ज्येष्ठांचं मन रमेल व त्यांना व्यायामही मिळेल असे हास्यप्रकार शोधून काढले आहेत. त्यातील एका प्रकारात गोफण फिरवून पाखरे उडविण्याची क्रिया आहे, ज्यामुळे ‘फ्रोझन शोल्डर’ ही व्याधी बरी होते. ‘पतंग हास्य’ या क्रियेत  पतंग उडवण्याची क्रिया आहे, ‘पाणीपुरी हास्य’ यात बोटांच्या स्नायूंना व्यायाम देण्याची क्रिया आहे तर ‘ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहिए’ या गाण्यावरील हास्यक्रियेत हात, पाय, कंबर व पाठ या सर्वानाच योग्य तो व्यायाम होत असतो. हास्ययोगात कोणतेही बंधन नाही. कडक नियम नाहीत. त्यामुळे ती केवळ कवायत न राहता, हसत-खेळत करण्याचा हलका-फुलका व्यायाम होत ज्याचा आनंद आबालवृद्ध सर्वच घेऊ शकतात.
‘श्रीजी व्हिला’ हास्यक्लबमधील सत्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ रामकृष्ण गुप्ता हे सर्वात नियमित वेळेवर हजर होणारे व सर्वात उत्तम हास्ययोगाचे प्रकार करणारे सभासद आहेत, असं सर्वजण त्यांच्याबद्दल सांगतात. ते म्हणतात, ‘‘सणवार असो की रविवार मी इथे येतोच. त्यामुळे या वयातही मी तंदुरुस्त आहे.’’ उद्योजिका शीतल म्हणतात, ‘‘इतकी वर्षे या सोसायटीत राहूनही कोणाची फारशी ओळख नव्हती. ती ‘हास्यक्लब’मुळे झाली. इथे आम्ही जे हास्यप्रकार करतो त्यामुळे माझे दिवसभरांतले ताण खूप कमी होतात.’’
  मंजुबेन राज या सिद्धिविनायक हास्यक्लबमध्ये येतात. त्या म्हणतात, ‘‘आम्ही गुजराती, मराठी, बंगाली सगळ्या भागिनी इथे एकत्र येतो. इथे भाजीवालीपासून डॉक्टपर्यंत सर्व स्तरांतल्या स्त्रिया येतात. इथे कोणाचाही दर्जा, वय, जात-पात बघितली जात नाही.’’ संध्याताई सनेर या ‘हास्यक्लब’च्या जुन्या सदस्य! त्या म्हणतात, ‘‘आमचा ‘हास्यक्लब’ फक्त स्त्रियांचा आहे. मेनोपॉजच्या काळांत स्त्रियांना जो मानसिक ताण येतो तो हास्ययोगाने दूर होतो. इथे अल्पकाळात एकमेकांतील औपचारिकता दूर होते. अहंकार गळून पडतो. मैत्रीचा असा घट्ट गोफ विणला जातो की, त्यातून आपोआप आमचा सपोर्ट ग्रुप तयार होतो.’’ मंगला नारखेडे स्वानुभव सांगतात, ‘‘मी निवृत्त झाले. पती निवर्तले. दोन्ही मुली परदेशी. मी घरात एकटी. अत्यंत निराश मन:स्थितीत दिवस ढकलत असे. कोणीतरी सांगितलं म्हणून ‘हास्यक्लब’ जॉइन केला. सुरुवातीला मला हसताच येत नव्हतं, पण इतरांचं मोकळं हसू हळूहळू माझ्या मनाच्या तळापर्यंत झिरपलं. मनाच्या तळाशी दु:ख, निराशा होती. त्याची जागा या प्रसन्न हास्याने घेतली आणि मला एकटीने जगण्याची उभारी आली.’’
 ‘हास्यक्लब’मधील प्रवेश विनामूल्य आहे, पण जो हास्यक्लब मोकळय़ा जागेत अथवा बागेत घेतले जातात. त्यांची पावसाळ्यात खूप गैरसोय होते. अनेक फेऱ्या मारूनही महानगरपालिका पालिका शाळांमध्ये ‘हास्यक्लब’चे वर्ग घेण्याची परवानगी देत नाही. शेवटी ‘हास्यक्लब’ ही सामाजिक चळवळ आहे. चांगल्या सामाजिक कार्याला परवानगी नाकारणं योग्य नाही, असं मत अनेक ज्येष्ठ चिडून व्यक्त करतात.
या संदर्भात डॉ. हेमलता हुंकारे यांचा अनुभव खूप बोलका आहे. त्या म्हणतात, ‘‘आम्ही ठाणे-शिर्डी पदयात्रा करायची ठरवली. सहा तासांनी माझ्या मैत्रिणीच्या पायाला फोड आले. तिला चालवेना. नंतर माझ्या पायात गोळे आले. असह्य़ वेदना सुरू झाल्या. आम्ही इतर पदयात्रींपेक्षा खूप मागे पडलो. मग आम्ही हास्ययोगाला सुरुवात केली. खूप हसायला लागलो. हळूहळू वेदना शमली व घाटातला कठीण रस्ता सहज पार केला. आम्ही सतत दोघी हसत होतो. आश्चर्य म्हणजे आमचा ताण पूर्ण जाऊन शिर्डीला आम्ही दोघी सर्वात प्रथम पोहोचलो. ‘हास्ययोगा’ची खरी जादू आम्ही त्या दिवशी अनुभवली.’’    
संस्थेचे नाव- ‘लाफ्टर योगा इंटरनॅशनल  फाऊंडेशन बंगळुरू’
डॉ. मदन कटारिया
९८१९८२२२२६
http://www.laughteryoga.org
योगशिक्षक -डॉ. माधव म्हस्के
९८३३५४६३६२
madhuri.m.tamhane@gmail.com