सामाजिक
स्त्रीची रात्रपाळी या शब्दासह विचार येतो तो तिच्यावर शारीरिकदृष्टय़ा वाढणारा ताण, आरोग्याचा प्रश्न आणि तिच्या सुरक्षिततेचा. मात्र त्याचबरोबर कौटुंबिक मानसिकता आणि समाजरचनेमध्येही या स्त्रीच्या रात्रपाळीचा स्वीकार झालेला दिसत नाही. याचा प्रतिकूल परिणाम तिलाच नव्हे तर कुटुंबालाही भोगावा लागतो आहेच म्हणूनच आता काळाची गरज म्हणून स्त्रीच्या रात्रपाळीचा स्वीकार आधी मानसिकदृष्टय़ा व्हायलाच हवा.

स्त्रीमुक्ती आंदोलनाने स्त्रीला अनेक अधिकार आणि हक्क मिळायला मदत झाली. तिला माणूस म्हणून ओळख मिळण्यास काही अंशी यश मिळाले आणि समाजरचनेतही थोडे अनुकूल बदल झाले, पण स्त्रीच्या मूळ पारंपरिक भूमिकेत मात्र फारसा बदल झाला नाही. स्त्री ही वस्तू म्हणून ती संपत्ती असा भाव समाजात कायम राहिला. त्यामुळे तिला सामाजिक, राजकीय  वा धार्मिक प्रतिष्ठा आणि माणूस म्हणून प्रतिष्ठा कशी मिळेल हा महत्त्वाचा प्रश्न समाजापुढे आणि कायद्यापुढे आहे.
स्त्रियांना सगळय़ाच कार्यक्षेत्रात समान संधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तो स्तुत्यच आहे, कारण परंपरेच्या आणि धर्म व संस्कृतीच्या शृंखलांमध्ये स्त्री वर्षांनुवर्षे अडकलेली होती हे सर्वज्ञात आहे. ते ज्ञात असूनही पूर्वी कधी तिच्या स्वातंत्र्याची धुरा उचलण्यासाठी जे थोडे समाजसुधारक पुढे आले त्यांना थोडे यश मिळाले. पण स्वातंत्र्योत्तर परिवर्तनाच्या काळात कायद्याने बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या. त्यात स्त्रियांसाठी बरेच कायदे आले व येताहेत.
नुकताच राज्य मंत्रिमंडळाने कारखाना अधिनियम १९४८ मध्ये महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतलाय. त्यात महिला कामगारांना कारखान्यांमध्ये रात्रपाळीत काम करण्याची परवानगी देण्याचा आणि अतिकालिक म्हणजेच ओव्हरटाइमची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कारखाना अधिनियमाच्या कलम ६६ (१) (ब)मधील तरतुदीनुसार स्त्रियांना रात्रपाळीस काम करण्यास बंदी होती. ती बंदी उठवण्याचा विचार होतो आहे. कामगार मंत्रालयाच्या २६ जुलै २००३च्या आदेशानुसार स्त्री कामगारांना रात्री दहा वाजेपर्यंत काही ठरावीक उद्योगांमध्ये काम करू दिले जात होते पण कित्येक स्त्रियांना अतिरिक्त कामाची गरज आहे हे लक्षात घेऊन आता हे पाऊल उचलले जात आहे.
वास्तविक रात्रपाळी आणि स्त्री ही कायम वादग्रस्त गोष्ट आहे. याची आवश्यकता आणि सत्यता पडताळण्यासाठी राष्ट्रीय महिला आघाडीने सर्वेक्षणही घेतले होते. त्यांचे निष्कर्ष वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केले होते. त्यानुसार जवळजवळ ९३ टक्के स्त्रियांची रात्रपाळी करण्याची तयारी आहे. रात्रपाळी या शब्दासह विचार येतो तो तिच्यावर शारीरिकदृष्टय़ा वाढणारा ताण आणि तिच्या सुरक्षिततेचा. आपल्याकडे स्त्री सुरक्षिततेचे कितीही कायदे केले किंवा पोलीस संरक्षणही दिले तरीही बलात्कार व छेडछाडीचे प्रकार थांबलेले दिसत नाहीत.
राज्य मंत्रिमंडळाने उद्योगांना चालना देण्याचे ध्येय समोर ठेवून हा बदल करताना स्त्री कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कंपनी व्यवस्थापनावर टाकली आहे. लष्करांमध्येही स्त्रियांना वेगवेगळय़ा पदावर पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणाऱ्या सशस्त्र तुकडय़ांमध्ये स्त्रियांचा समावेश होऊ शकत नाही, असे नुकतेच संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. यामागचे कारण शत्रूकडून त्या युद्धबंदी झाल्या तर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे आहे. एकूणच स्त्रीचे स्त्रीत्व व तिची शारीरिक  दुर्बलता हा भाग प्रामुख्याने विचारात घेतला जातो आहे तर मार्कसिस्ट विचारवंताच्या मते स्त्रिया प्रामाणिक असल्यामुळे मालकांचा आर्थिक फायदा होतो, हा दृष्टिकोन आहे.
कायद्याने स्त्री-पुरुष समता हा एकमेव उच्च विचार मनात ठेवला आहे. पण समसमानांमध्ये आणायची समता आणि असमानांमध्ये आणावयाची समता यात दोन वेगळे घटक आहेत. कारण स्त्री हा दुर्बल घटक आहे हे कायद्यालाही मान्य आहे. म्हणून कुठलाही नवा कायदा करण्यापूर्वी किंवा बदल करण्यापूर्वी त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार आवश्यक आहे. सुरक्षितता कशी दिली जाईल, याचा सखोल अभ्यास करून उपाययोजना करायला पाहिजे व समाजाने ती कृती मान्य केली पाहिजे. कारण कायदा अनुकूल परिस्थिती निर्माण करतो. अधिकार देतो किंवा रस्ता खुला करतो पण त्याच्या उपयोगितेची क्षमता देत नाही. याचे उदाहरण म्हणजे सर्वेक्षणाच्या अहवालात जवळजवळ १४ टक्के स्त्रियांना भीती वाटते की त्यांना सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागेल. अधिकार गाजवण्याची क्षमता कायदा देत नसल्याने ती शक्ती सामाजिक परिस्थितीने निर्माण केली पाहिजे.
आज स्त्रिया बीपीओ, प्रक्रिया उद्योग, उपयोगी उत्पादनांच्या उद्योगात काम करताहेत. डॉक्टर-नर्सेस यांना तर तात्कालिक सेवेत दिवस-रात्रीचा भेद करता येत नाही. स्त्री इंजिनीअर्स एकेकटय़ा परदेशी जाऊन येताहेत. त्यांनाही अवमान वा बलात्काराचे भय आहेच. समाजात स्त्री ही पीडित असली तरी समाज तिलाच दोषी मानतो हे सत्य आहे. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी त्यांच्या पुस्तकात मृदुला साराभाईंचे उदाहरण याबाबत दिले आहे. एकटीने लांब पल्ल्यांचे प्रवास करण्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘बलात्कार नावाचा अपघात माझ्या शरीरावर होऊ शकतो, पण म्हणून मी या भीतीने स्वातंत्र्य गमावून भीत भीत जगू की काय? अशाने तर मी माझे स्वातंत्र्यच गमावून बसेन.’’
या कायदेबदलात वरील वाक्य विचार करायला लावणारे आहे. पोलीस संरक्षण असले तरीही समाजाने सुरक्षिततेचे उत्तरदायित्व घ्यायला हवे. त्याचप्रमाणे स्त्रीचे संरक्षण करणे आवश्यक आहे. यास्तव नुसता कायदा न करता समाजाने आपली मानसिकता बदलावयास हवी.
स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी पिक-अप आणि ड्रॉप अशी केंद्रे काढून प्रश्न सुटणार नाही. तिचे राहण्याचे ठिकाण व तिचे समुदायाने शक्यतो जाणे-येणे हेही पाहिले पाहिजे. कामाच्या जागी स्वच्छतागृहे व कपडे बदलण्याची जागाही सुरक्षित असणे आवश्यक आहेत. याबाबत अरुणा शानबाग यांचे उदाहरण ताजे आहे. कोलकाता, मुंबई, गोवा यासारख्या ठिकाणी छुप्या कॅमेऱ्यांचे उपयोग उघडकीस आलेले आहेत.  हासुद्धा शारीरिक शोषणाचा प्रकार आहे व नव्या डिजिटल तंत्राने चालू आहे. या सगळय़ा प्रकारात समाजाची जबाबदारी वाढते आहे आणि ती घ्यायला समाज तयार आहे का, हा खरा प्रश्न आहे.
स्त्रीला कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत म्हणून कामाच्या जागी बालसंगोपन केंद्रेही आवश्यक आहेत. काही उद्योगांमध्ये असणारी ही व्यवस्था सार्वत्रिक होणे गरजेचे आहे. कुटुंबासाठी स्त्री करते ते कष्ट नैसर्गिकच समजले जातात पण वास्तवात हे बिनामेहनतान्याचे काम आहे. या कायद्यात कुटुंबसंस्थेचा विचार नाही. कारण स्त्री रात्रपाळीला गेली तर तिच्यावर अवलंबून असलेल्या संसाराचे काय? दिवसभर मुलाबाळे, अपंग, वृद्धांची जबाबदारी सांभाळून रात्रपाळीसाठी किती क्षमता व शक्ती शिल्लक रहात असेल? यामुळे स्त्री ‘आ बैल मुझे मार’ असा आततायीपणा करीत नाही, ना असा विचार मनात येतो. शहरातून पुरुष घरकामात सहभागी होण्याची उदाहरणे समोर येतायेत. यात जाणीवपूर्वक वाढ झाली पाहिजे. कुटुंबसंस्था ही माणसांना संरक्षण देते व सहजीवनाचा धडा शिकवते. ही संस्था, विवाहसंस्थेसारखी आपल्या देशात उत्तम पद्धतीने स्थिर आहे. पण या संस्थेला धक्का लागण्याची शक्यता आहे. यामुळे समाजाने स्त्रियांसाठी अत्यंत सहानुभूतीची भूमिका ठेवणे गरजेचे आहे आणि ही दया नव्हे हेही जाणले पाहिजे.
फार पूर्वी नर्सिगसारख्या व्यवसायाला प्रतिष्ठा कमी होती. यामुळे कुटुंबाची बदनामी होईल अशी भीती सतत होती, हे त्यामागचे कारण होते. तेच गायन, नृत्य-नाटक, सिनेमा या क्षेत्रात काम करणाऱ्या  कलावंतांचेही होते. आज त्यांना सामाजिक मान्यता व प्रतिष्ठा आहे. मुलींनी कलावंत व्हावे यासाठीची धडपड टी.व्ही. वरील मालिका व स्पर्धामधून दिसते.
हे सर्व पाहता रात्रपाळी करणाऱ्यांना या पद्धतीच्या टीकेला सामोरे जावे लागले तरी काही काळाने समाज ते स्वीकारेल. त्याचे मुख्य कारण ‘अर्थकारण’ आहे. गरजेमुळे असो, चंगळवादाचे बळी म्हणून असोत पैशांचा स्रोत आवश्यक आहे हे सगळेच जाणतात. म्हणून गरीब, आर्थिकदृष्टय़ा कमकुवत, परित्यक्ता, एक मालक, निराधार स्त्रियांसाठी हा कायदा स्वागतार्ह आहे. यात सक्ती नाही हे महत्त्वाचे ते स्वेच्छेवर अवलंबून आहे.
परदेशातही रात्रपाळी करणाऱ्या स्त्रिया आहेत. त्या समाजाने किंवा देशाने त्यासंबंधी कोणते उपाय योजले आहेत याचा तुलनात्मक अभ्यास करणेही योग्य राहील. स्त्रियांसाठी आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणासाठी जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी जोरकसपणे झाली तर स्त्रियांकडे बघण्याची सामाजिक, मानसिकता बदलू शकेल. म्हणून अशा बदलांचे सकस विचारमंथनही आवश्यक ठरते.
डॉ. छाया महाजन – drchhayamahajan@gmail.com

आरोग्य
सुनीता, नाश्त्याला काय आहे आज?, आई, माझा प्रोजेक्ट राहिलाय, कधी करू या?.., सूनबाई, आज हळदीकुंकवाला जायचं हं!, कामावरून, सकाळी साडेसातला, अर्थात रात्रपाळी करून दमून आलेली सुनीता हे सारे सगळे प्रश्न सफाईदारपणे झेलत, हातपाय धुऊन पटापट कामाला लागते. तिला त्या वेळी ना आपल्या शरीराची पर्वा असते ना मानसिक स्वास्थ्याची. ती कामाला जुंपून घेते. आपल्या आजूबाजूलाही अशा व्यग्र सुनीता पाहायला मिळत असतीलच. अर्थात अद्याप तरी त्यांची संख्या कमी आहे, कारण काही मर्यादित क्षेत्रातच आज स्त्रियांना रात्रपाळी दिली जाते.
मात्र, स्त्रियांना कामगार क्षेत्रात रात्रपाळी देण्याचा, गेली जवळ जवळ १०० वर्षे जगभरातला बहुचíचत विषय आता भारतीय कामगार कायद्यामध्ये डोकावतो आहे.  अर्थातच िलगभेद कुठल्याही क्षेत्रात नसावा, हा स्तुत्य विचार त्यामागे आहे. युरोप, अमेरिका इत्यादी देशांत हा कायदा जारी आहेच आणि पर्यायी त्या देशात अपेक्षित औद्योगिक प्रगतीसुद्धा दाखविली गेली आहे. आज स्त्रिया सर्व क्षेत्रांत आगेकूच करीत आहेत आणि बऱ्याचदा घर आणि कुटुंब यापलीकडे स्वत:चे एक अस्तित्व अनुभवणे हा विचारही त्यामागे असतो. म्हणूनच या कायद्याची अंमलबजावणी झाली तर स्त्रियांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करणे गरजेचे आहे.
रात्रपाळी ही पुरुष व स्त्री या दोघांच्याही आरोग्यास हानिकारक ठरू शकते. आपल्या शरीरात एक जैविक लय किंवा बायलॉजिक ऱ्हिदम असतो, ज्यायोगे झोप, नाश्ता, जेवण, दैनंदिन शारीर विधी आपण ठरावीक वेळीच करत असतो. रात्रपाळीमुळे ही लय बिघडते आणि आपले शरीर गोंधळून जाते. शिवाय रात्री अंधारात शरीरात मेलाटोनीन नावाचे द्रव्य निर्माण होते, जे आपल्या झोपेचे नियमन करते. हेच द्रव्य शरीरातील विविध हार्मोन्स अथवा आंतरद्रव्य संतुलित प्रमाणात राखते. रात्रपाळी केल्यावर सुरुवातीला शरीराची लय बिघडल्यामुळे आंतरद्रव्यांचे संतुलन बिघडते, पर्यायी दिवसा झोपणे, रात्री सतर्क राहणे, अवेळी खाणे हा शरीराचा नवा जैविक नियम बनतो. या सर्व गोष्टी साहजिकच शरीराला हानिकारक ठरतात. मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयरोग इत्यादी सर्व विकार अनियमित दिनचर्या असणाऱ्यांमध्ये ३० ते ४० टक्के जास्त प्रमाणात दिसून येतात. माझी मत्रीण अर्चना कॉल सेंटरला काम करीत असे. परवा खूप दिवसानंतर भेटली आणि मी तिला अजिबात ओळखू शकले नाही! सडसडीत बांधा असलेली अर्चना चांगली गलेलठ्ठ झाली होती. रात्रभर काम करणे, अवेळी जागे राहण्यासाठी चहा, अरबट चरबट खाणे, अपुरी झोप या सर्व मंडळींनी तिच्यावर एकत्र हल्ला केला होता. अधूनमधून धूम्रपानही करत होती. वयाच्या चाळिसाव्या वर्षी मधुमेहाची शिकार झालेली होती अर्चना! कामावरून सुट्टी घेऊन तिला माझ्या समोर बसवली आणि लांबलचक लेक्चर ठोकले. ‘काम महत्त्वाचे की आपली तब्येत?’ हे समजावले.
स्थूलपणा आणि मधुमेह हे अनियमित दिनचय्रेशी फार जवळचा संबंध ठेवतात हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. शिवाय झोपमोड, डोकेदुखी, पोटदुखी, अपचन, दुर्बलता, नराश्य अशा सर्वच तक्रारी रात्रपाळी करणाऱ्या ३० ते ४० टक्के व्यक्तींमध्ये दिसून येतात. (संदर्भ – असोचॅमतर्फे केलेला शोधनिबंध व वूमन्स कॉलेज हॉस्पिटल हेल्थ बुलेटिन, टोरॅन्टो.) पुरुषही अर्थातच याला अपवाद नाहीत. कदाचित म्हणूनच रात्रपाळीनंतर दीड दिवस सक्तीची विश्रांती, थोडे जास्त वेतन इत्यादी आमिषे दाखविली जातात.
स्त्रियांचे शरीर, त्यांची मानसिकता व शरीरक्रियांची लय ही पुरुषांपेक्षा वेगळी असते. मासिक पाळी आणि गर्भधारणा या दोन गोष्टी पुरुषांमध्ये नसतात. त्याही पलीकडे, डोकेदुखी, पाठदुखी, नराश्य इत्यादी विकार स्त्रियांमधील ठरावीक वयातील हार्मोन्स बदलामुळे जास्त प्रमाणात आढळतात. सक्तीच्या रात्रपाळीने हे विकार जास्त प्रमाणात उद्भवू शकतील या व अशा अर्थाचे शोधनिबंध पाश्चात्त्य देशात हल्ली मोठय़ा प्रमाणात आढळतात. एक काळजी करण्याची बाब म्हणजे ‘जर्नल ऑफ नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट, युके’तर्फे २००१ मध्ये प्रकाशित झालेला शोधनिबंध. त्यांनी १० हजारांहून जास्त परिचारिकांवर संशोधन केले असता, तीस अथवा जास्त वष्रे रात्रपाळी करणाऱ्यांमध्ये स्तनाचा कर्करोग ३० टक्के जास्त प्रमाणात दिसून आल्याचा निष्कर्ष काढला गेला. विशेष म्हणजे यातही आधी उल्लेखिलेल्या या मेलाटोनीन या द्रव्यावर दोषारोप लावला गेला आहे. शरीरावर आणि खास करून डोळ्यांवर प्रकाश पडतच राहिला तर हे द्रव्य निर्माण न होता इस्ट्रोजेन नावाचे हार्मोन मोठय़ा प्रमाणात निर्माण होते. स्तनाच्या कर्करोगाच्या कारणमीमांसेमध्ये इस्ट्रोजेन या हार्मोनचा मोठा कार्यभाग असतो. या लेखात आणि इतर काही शोधनिबंधांत असेही सांगितले गेले की, रात्रपाळी करून परत येताना काळा चष्मा घालून परतीचा प्रवास केल्यास शरीराला झोपण्यास मदत होते. पर्यायी हानिकारक हार्मोन्स कमी प्रमाणात निर्माण होतात. हार्मोन बदलामुळे अनियमित पाळी, वंध्यत्व, अकाली रजोनिवृत्ती इत्यादी बाबीसुद्धा रात्रपाळी करणाऱ्यांमध्ये वाढीव प्रमाणात आहेत का, यावर सध्या मोठय़ा प्रमाणात शोध चालू आहे. गर्भवती स्त्रियांमध्ये पहिल्या तीन महिन्यांत रात्रपाळी केल्यास गर्भपाताची शक्यता वाढते, असेही शोधनिबंध उपलब्ध आहेत. मात्र या व अशा निबंधांमध्ये ‘हे केवळ तर्क असू शकतील’ असेही नमूद केले आहे. सुदैवाने जगभर आणि भारतातही, गर्भवती स्त्रिया रात्रपाळीसाठी अयोग्य मानल्या आहेत. स्त्री कर्मचारी म्हटला की, इतर काही गोष्टींचा विचार करणेही अपरिहार्य ठरते. सध्या स्वच्छ भारत आंदोलन जोरात चालू आहे. ‘शौचालय बांधा आणि वापरा’ अशा जाहिराती हल्ली जागोजागी दिसतात. रात्रपाळीच्या संदर्भात हा मुद्दा जास्त महत्त्वाचा ठरतो. स्त्री कर्मचारी असतील तर शौचालय कामाच्या क्षेत्रात असणे व त्या जागी वाहते मुबलक पाणी असणे हे आवश्यक आहे. शौचालय कामाच्या क्षेत्राबाहेर असेल, तर तिथे रात्री पोचतानाची सुरक्षा त्यांच्या कंपनीने घ्यावी लागते. या सुविधा नसतील तर लघवी तुंबून धरण्याकडे स्त्रियांचा कल असतो ज्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. माझ्या व्यवसायात मी फार मोठय़ा प्रमाणात मूत्राशयाचे विकार बघते. अगदी परवाच मुंबईतल्या एका मोठय़ा रुग्णालयातली एक परिचारिका आली होती. गेली ५ वर्षे रात्रपाळी करते आहे. ३५व्या वर्षीच मधुमेह सुरू होऊन त्याचा मूत्राशयावर परिणाम झाल्याने तिची मूत्रविसर्जनाची क्रिया पूर्ण होऊ शकत नाही. अर्थातच जंतुसंसर्ग जवळजवळ कायमस्वरूपी तिला चिकटलाय.
स्वच्छ शौचालयाच्या अभावाने भारतीय समाजात स्त्रियांमध्ये लघवी दाबून ठेवण्याची प्रवृत्ती फार मोठय़ा प्रमाणात दिसून येते. याउलट काही स्त्रिया स्वच्छ शौचालय दिसले की धावत जाऊन ते वापरतात. पर्यायी लघवी कधी दाबून धरावी आणि कधी नाही या बाबतीत मूत्राशय गोंधळून जाते. यात एक आणखी वेगळा दिसणारा प्रकार म्हणजे जवळजवळ ५० टक्के स्त्रियांमध्ये लघवीची तक्रार ही मूत्राशयातील विकारामुळे नसून मानसिक आजाराचे लक्षण असते, आपल्या दमलेल्या शरीराकडे लक्ष वेधून घेण्याचा हा त्यांचा प्रयत्न असतो! या व अशा तक्रारी केवळ स्वच्छ शौचालय कामाच्या क्षेत्रात उपलब्ध केल्याने टाळता येतील. शिवाय मासिक पाळीच्या दिवसांत काही महिलांना पाठदुखी, पोटदुखी इत्यादी तक्रारी होतात. त्या वेळी त्यांना विश्रांती घेण्याची सोय उपलब्ध असणे हितावह आहे. नाही तर पाळीच्या दिवसांत रात्रपाळी नको, अशी विनंती करणारी स्त्री स्वत:ला दुर्बल समजते अथवा मासिक पाळीची जाहिरात किंवा भांडवल करते असा अर्थ निघू शकतो!

स्त्री ही काळाची प्रेयसी अथवा पत्नी आणि अनंत काळाची माता असते याचा प्रत्यय मला माझ्या इंग्लंडमधील वास्तव्यात आला. अगदी भारतीय स्त्रीसारखीच इंग्लंडमधील स्त्री घर आणि नोकरी यात फरफटली जाते. घरोघरी मातीच्याच चुली. तिथेही रात्रपाळी करून घरी आलेल्या स्त्रिया ताबडतोब घरच्या कामाला लागतात. याविरुद्ध पुरुष सकाळी दमून घरी आल्यावर त्यांचे लाड जास्त होऊ शकतात व त्याच्या सरबराईत अथवा विश्रांतीसाठी सगळे घर झटू शकते. आपल्या सामाजिक रूढी व विचारधारांना स्त्रियाच बळी पडतात. अशा वेळी दमणूक, झोपमोड, नराश्य अशा अनेक शारीरिक, मानसिक तक्रारींचे प्रमाण वाढू शकते. इथे घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींनी व खास करून पतीने समजून घेऊन कामाची समान वाटणी केली तर स्त्रीच्या रात्रपाळीचा फायदा तिला व घरच्या सर्वानाच होऊ शकतो. अर्थात आज आपल्या आजूबाजूच्या अनेक स्त्रिया रात्रपाळी करत आहेत आणि बरीच वर्षे रात्रपाळी केलेल्याच्या शरीराला त्याची सवय होऊ शकते आणि विशेष दुष्परिणाम होत नाहीत अशाही अर्थाचे शोधनिबंध इंटरनेटवर उपलब्ध आहेतच.
वरील सर्व बाबी लक्षात घेता, कामगार क्षेत्रामध्ये स्त्रियांची रात्रपाळी कायदेमान्य केली तर या सर्व गोष्टींवर सर्वागाने विचार होणे किती महत्त्वाचे आहे हे जाणवते. भारतीय सरकार त्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलेल ही खात्री आहे. शिवाय या सर्व गोष्टींची अंमलबजावणी खास नेमलेल्या स्त्री अधीक्षकांच्या देखरेखीखाली होईल ही आशा आहे. स्त्रियांचे आरोग्य व सुरक्षा ही बाब त्यांच्या रात्रपाळीच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची आहे. वरील दुष्परिणामांची लांबलचक यादी वाचता या लेखाचा हेतू रात्रपाळी वाईटच आहे अथवा ती फक्त पुरुषांनीच करावी हे सांगण्याचा आहे, असा गरसमज होऊ शकतो. मात्र तसे नसून रात्रपाळीचे स्त्रियांच्या आरोग्याबाबतीत काही खास दुष्परिणाम कसे दिसू शकतात आणि त्यासाठी वेळीच आणि योग्य काळजी घेणे कसे आवश्यक आहे, हे नमूद करणे एवढाच यामागे हेतू आहे. एकदा का ती सर्व काळजी घेतली गेली की, स्त्री-स्वातंत्र्याचे आणखी पान उघडले जाईल हे नक्की.
डॉ. अनिता पटेल – 63anitapankaj@gmail.com