News Flash

जोतिबांचे लेक  : नोकरीचं आश्वासक ठिकाण

ताकद गोळा करून तिनं त्याच्यापासून  स्वत:ची सुटका करून घेतली आणि घरी परतली.

हरीश  सदानी saharsh267@gmail.com

स्त्रिया जवळजवळ सर्व क्षेत्रांत कार्यरत असल्या तरी कामाच्या ठिकाणचं वातावरण सुरक्षित असेल ना? ही भीती त्यांना असतेच. वकिलीचं शिक्षण घेतलेल्या धरणी कोटा सुयोधन यांना एका मैत्रिणीच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगानं कृतिशील होण्यास भाग पाडलं.  नोकरीच्या ठिकाणी स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दलच्या कायद्यांचा अभ्यास त्यांनी सुरू के ला आणि गेली १८ वर्ष ते जनजागृती करत आहेत. त्याचा फायदा खासगी व शासकीय संस्थांच्या व्यवस्थापनांतील स्त्री कर्मचाऱ्यांना होतो आहे. 

स्त्रियांसाठी कामाचं ठिकाण सुरक्षित असावं यासाठी देशात कायदा आहे. परंतु सर्व आस्थापनांमध्ये त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असल्याचं चित्र अजून तरी दिसत नाही.

हा कायदा सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगून त्याच्या तरतुदींचं पालन नीट होण्यासाठी आणि वेगवेगळ्या खासगी व शासकीय संस्थांच्या व्यवस्थापनांना कृतिशील बनवण्यासाठी हैदराबाद येथील एक ध्येयवादी तरुण गेली १८ वर्ष काम करीत आहे. त्याचं नाव धरणीकोटा सुयोधन ऊर्फ  धरणी. त्यांनी या संदर्भात के लेल्या व्यापक प्रयत्नांची ही गोष्ट.

कायदा आणि त्याची अंमलबजावणी या विषयाची मनापासून आवड असल्यामुळे धरणी यांनी ‘एल.एल.बी.’ आणि ‘एल.एल.एम.’चं शिक्षण घेतलं. वयाच्या २३ व्या वर्षी एका खासगी कंपनीतल्या आपल्या पहिल्या नोकरीतला एक प्रसंग धरणी सांगतात, तो असा, ‘‘आमच्याबरोबर काम करणारी एक मैत्रीण एके दिवशी  काम संपल्यावर ऑफिसमध्येच एका ठिकाणी शून्य नजरेनं बसलेली पाहिली. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला आलीच नाही. तिसऱ्या दिवशी ती दिसल्यावर मी दुपारी जेवणासाठी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये तिला बोलावलं. तिच्या गप्प गप्प असण्याचं कारण विचारलं तेव्हा ऑफिसमधील एका वरिष्ठ सहकाऱ्यानं त्या दिवशी ऑफिस संपल्यावर थांबवून ठेवलं आणि नंतर  घट्ट मिठी मारत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असं तिनं सांगितलं. ताकद गोळा करून तिनं त्याच्यापासून  स्वत:ची सुटका करून घेतली आणि घरी परतली. दुसऱ्या दिवशी तिनं घडला प्रसंग कंपनीच्या मॅनेजरच्या कानावर घातला, परंतु त्यांनी ते अजिबात गंभीरपणे घेतलं नाही, शिवाय त्या ‘जंटलमन’च्या विरोधात काही पावलंही उचलली नाहीत. उद्विग्न होऊन माझ्या त्या मैत्रिणीनं नोकरीचा राजीनामा दिला आणि खासगी क्षेत्रात कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला.’’ आपल्या मैत्रिणीच्या बाबतीत घडलेल्या या कटू अनुभवानं धरणी यांना विचार करायला भाग पाडलं. अनेक प्रश्नांचं काहूर त्यांच्या मनात माजलं. ‘‘लैंगिक छळाबद्दल कायदा काय म्हणतो? माझ्या मैत्रिणीबाबत जो प्रसंग घडला तो इतर कोणत्याही स्त्रीबाबत घडू नये म्हणून मी काय करू शकतो? या प्रकरणी नेमकं  काय करणं आवश्यक आहे?’’

दरम्यान, धरणी यांनी राजस्थानच्या भंवरी देवी प्रकरणानिमित्त दाखल जनहित याचिकेवर (कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाबद्दल) सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या (विशाखा) मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास सुरू के ला. संपूर्ण निवाडय़ाचा सारांश सोप्या भाषेत लिहून तो जनहितार्थ प्रसारित करून जनजागृती करण्याचं काम धरणी यांनी सुरू के लं. खासगी व शासकीय संस्था- कार्यालयं, अनेक प्रख्यात व्यवस्थापनविषयक, तंत्रज्ञानविषयक महाविद्यालयं/ विद्यापीठं, सामाजिक संस्था, सोसायटय़ा, नागरिक संघ हे सारे त्यांना शनिवार-रविवारी व सुट्टीच्या दिवसांत मार्गदर्शनपर बोलण्यासाठी निमंत्रित करू लागले. काही संस्था लैंगिक छळ प्रकरणात तपास करण्यासाठी बोलावू लागल्या. या प्रश्नाची व्याप्ती धरणी यांच्या लवकरच लक्षात आली कारण अनेक संस्थांचे अनेक पुरुष संचालक या संदर्भातील काही गोष्टी गृहीतच धरून चालत होते, ते यानिमित्तानं कळलं.

‘कामाच्या ठिकाणी स्त्रियांवरील लैंगिक छळ -प्रतिबंध, अटकाव व निवारण’ असा कायदा ९ डिसेंबर २०१३ पासून देशभरात लागू झाला आणि या विषयाला कलाटणी मिळाली. या कायद्याच्या मसुद्यावर देशात वेगवेगळ्या ठिकाणी चर्चेच्या फेऱ्या झाल्या, त्यामध्ये धरणी यांनादेखील तज्ज्ञ म्हणून निमंत्रित केलं गेलं. हा कायदा येण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे फारसं गांभीर्यानं कोणी पाहात नव्हतं. आता नव्या कायद्याप्रमाणे सर्व लहानमोठय़ा आस्थापनांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाबाबत रीतसर धोरण आखून तक्रार निवारणासाठी अंतर्गत समिती स्थापन करणं, सर्व कर्मचाऱ्यांकरिता जाणीव-जागृतीपर संवादसत्रं आयोजित करणं अनिवार्य होतं. काही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांनी धरणींना कंपनीचं धोरण- मसुदा तयार करण्याबरोबरच सर्व कर्मचाऱ्यांचं टप्प्याटप्प्यानं प्रबोधन कसं करता येईल, निवडक प्रशिक्षक व्यवस्थापकांचं प्रशिक्षण कसं करता येईल यासाठी चर्चा-विनिमय करायला बोलावलं.

या सर्व गोष्टींमध्ये धरणी स्वत:चा वेळ, कौशल्य यांची गुंतवणूक करत असताना अनेक आव्हानं समोर येत होती. आतापर्यंत या प्रश्नावर स्त्रियाच प्रामुख्यानं बोलत असल्यामुळे काही कंपन्यांतील व्यवस्थापक आणि अगदी स्त्री कर्मचारीदेखील धरणी यांच्याकडे ‘या तिशीतल्या पुरुषाला या विषयावर बोलायची काय आवश्यकता पडली असावी, यात काहीतरी काळंबेरं आहे,’ म्हणून संशयित नजरेनं बघू लागले. काही जण हा कायदा  पुरुष-विरोधी कसा आहे, यावर मुद्दे मांडू लागले. धरणी यांना धमकीवजा निनावी फोन येणं, त्यांच्या मोटारीचा पाठलाग करणं, त्यांच्याविषयी कॉर्पोरेट जगतामध्ये बदनामी करणं, या सगळ्याला खंबीरपणे सामोरं जात धरणी यांनी आपले प्रयत्न सतत चालू ठेवले. आपल्या वकिली ज्ञानाचा उपयोग करून अनेक प्रसंग चातुर्यानं हाताळले. या सर्व प्रतिकूल वातावरणात धरणींच्या डॉक्टर पत्नीची, डॉ. हिमा दीप्ती यांची त्यांना मोलाची साथ लाभली. त्यांनी स्वत: जगभर फिरून स्त्री-पुरुष विषमता कशी ठायी ठायी भरलेली आहे याचा जवळून अनुभव घेतला असल्याने धरणी यांच्या कामाचे महत्त्व त्यांना माहीत होते.

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या मुद्दयावर  युरोपीय आणि अमेरिकी कंपन्यांबरोबर काम करताना धरणींच्या लक्षात आलं, की हा प्रश्न जागतिक पातळीवरचा असून भारतातील कायदा जास्त व्यापक आणि सखोल आहे. गरज आहे ती त्याचं पालन करण्यासाठी सर्वाच्या एकत्रित प्रयत्नांची. गेल्या १८ वर्षांत अनेक प्रकारच्या लैंगिक छळासंदर्भातील प्रकरणं धरणी यांनी जवळून पाहिली. ज्येष्ठतेचा गैरफायदा घेणारे व्यवस्थापक, ऑफिसच्या कामानिमित्त हॉटेलमध्ये राहावयास लागलं तर रात्री उशिरा बोलावून ड्रेस आणि इतर वैयक्तिक मुद्दयांवर शेरेबाजी करणारे पुरुष, घरगुती कारणांसाठी रजा मागितल्यावर ‘आज काय खास बात आहे!’ यासारखी शेरेबाजी करून खजील करण्याचा  प्रयत्न करणारे, दुपारच्या जेवणासाठी कुणा मित्रासोबत बाहेर गेल्यास दुखावणारे जोक्स करणारे, समाजमाध्यमावर मैत्रीच्या प्रस्तावास प्रतिसाद न देणाऱ्या स्त्रीला दुसऱ्या समाजमाध्यमांद्वारे वारंवार त्रास देणारे, ऑनलाइन ‘स्टॉकिंग’ करणारे, अशी अनेक उदाहरणं देऊन धरणी हे पुरुष सहकाऱ्यांत दडलेल्या, किडलेल्या मनोवृत्तीकडे लक्ष वेधतात. एका कंपनीत- जिथे एक तथाकथित उच्चजातीय वरिष्ठ अधिकारी वर्चस्ववादी दृष्टिकोन ठेवून इतर कर्मचाऱ्यांवर दहशत ठेवून असायचा, तिथे काही उपक्रम घेण्यासाठी धरणींना विचारण्यात आलं. हा अधिकारी स्त्री कर्मचाऱ्यांना सगळ्यांसमोर खासगी प्रश्न विचारून द्वयर्थी विनोद व शेरेबाजी करत असल्यानं कामाच्या ठिकाणचं वातावरण कसं कलुषित होत होतं, ते काही स्त्री कर्मचाऱ्यांनी धरणींना त्या वेळी सांगितलं. वॉशरूममध्ये स्त्रिया किती वेळ घालवतात यासाठी मॅनेजरनं वॉशरूमबाहेर पाळत ठेवणं कसं चुकीचं आहे, एखादी कर्मचारी ऑफिसच्या डेस्कवर जास्त वेळ दिसत नाहीये याबद्दल विचारणा करणं गैर नसलं, तरी ‘ती वॉशरूममध्ये अधिक वेळ घालवते’ अशी टिपण्णी करून, तिच्याविषयी अफवा पसरवून तिचं चारित्र्यहनन करणं कसं चुकीचं आहे, ते धरणींनी संवाद सत्रांमध्ये समजावलं आणि नवा दृष्टिकोन देऊन कंपनीतील वरिष्ठांना त्यांची कार्यपद्धती बदलायला लावली.

धरणी यांच्या उपक्रमात सहभागी झालेल्या अनेक स्त्रियांनी त्यांच्या सांगण्यामुळे दिलासा मिळाल्याचं सांगून त्यांच्या मनातल्या खदखदणाऱ्या विचारांसाठी मंच उपलब्ध करून दिल्याची भावना व्यक्त केली आहे. हैदराबाद येथील एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीनं महिला दिनानिमित्त बीजभाषण करण्यासाठी धरणींना

४ वर्षांपूर्वी बोलावलं होतं. ती आपल्या कामाची मोठी पावती असल्याचं ते सांगतात.

आज आपण स्त्रियांना लक्षणीय संख्येनं खासगी क्षेत्रात काम करताना बघतो, पण जिथे त्या निर्णय घेऊ शकतील, अशी उच्चपदांची जबाबदारी दिल्याची उदाहरणं तुलनेनं कमी दिसतात. ती विविधता व सर्वसमावेशकता प्रत्यक्ष दिसण्यासाठी स्त्री कर्मचाऱ्यांना बोलतं करण्यास्तव नियमित चर्चासत्रं घेऊन आश्वासक वातावरण निर्माण करायला हवं. हे आस्थापनांनी केल्यास लैंगिक छळ- प्रतिबंध व समानतेच्या दिशेनं ते महत्त्वाचं पाऊल ठरू शकेल, अशी आशा धरणी व्यक्त करतात.

लैंगिक छळ तक्रार निवारणाच्या अंतर्गत समितीमध्ये निम्म्या सदस्य स्त्रिया असाव्यात, असं कायदा म्हणत असेल, तरी पुरुषांना उर्वरित सदस्यांमध्ये घेण्यासाठी आस्थापना प्रयत्न करताना दिसत नाहीत. संवेदनशील, समंजस पुरुष सदस्य समितीवर असण्यानं एक सकारात्मक वातावरण पूर्ण संस्थेत तयार होऊ शकतं, असंही धरणींना वाटतं. कुठल्याही संस्थेच्या कार्यस्थळाविषयी धोरण बनवताना एका बाबीचा अंतर्भाव असण्याविषयी धरणी आग्रही आहेत- ती म्हणजे तक्रार करणाऱ्या पीडित स्त्रीनं किंवा तिच्या साक्षीदारानं किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यानं स्वत:बाबत गोपनीयता बाळगून, पुढे येऊन जर काही गोष्टी मांडल्या आणि त्यानंतर तपास यंत्रणेला ठोसपणे काही सिद्ध करता आलं नाही, तरी वरीलपैकी कुणालाही कुठल्याही प्रकारे नकारात्मक कारवाईला वा भेदभावाला सामोरं जावं लागणार नाही, याची ग्वाही संस्थेच्या धोरणात असावी.

‘पेगा सिस्टिम्स’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कायदेविषयक व अनुपालन विभागाची धुरा गेली ३ वर्ष धरणी सांभाळत आहेत. कंपनीच्या भारतीय उद्योगातील सर्व कायदेविषयक बाबींचं पालन करण्याबरोबर कामाचं ठिकाण हे सर्वासाठी कसं सुरक्षित, प्रतिष्ठेचं ठिकाण असावं, यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न आहेतच. या विषयावर इतर कुठेही प्रबोधन व मार्गदर्शन करण्यासाठी जाण्यास धरणी यांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्या कक्षा रुंदावण्यासाठी त्यांची कंपनी सर्वतोपरी प्रोत्साहन देत आहे. धरणी यांच्या वैशिष्टय़पूर्ण, चिकाटीने काम करण्याच्या वृत्तीमुळे प्रेरित होऊन पुरुष वाचक आपापल्या कामाच्या ठिकाणी स्त्रियांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी एखादं ठोस पाऊल नक्की उचलतील, अशी मी आशा बाळगतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 1:02 am

Web Title: lawyer dharanikota suyodhan work for women safety at workplace zws 70
Next Stories
1 गद्धेपंचविशी : नाटक नावाचा तराफा
2 विस्तारल्या कुटुंब कक्षा
3 आहे अटळ, तरीही..
Just Now!
X