03 August 2020

News Flash

संदर्भ जगण्याचे

कावळा-कावळीचं घरटं रिकामं झालं होतं..पिलंही दिसेनात की कावळ्यांची जोडीही.

| August 22, 2015 02:20 am

कावळा-कावळीचं घरटं रिकामं झालं होतं..पिलंही दिसेनात की कावळ्यांची जोडीही. ‘एम्टी नेस्ट सिंड्रोम’ त्यांच्याही वाटय़ाला आलं की काय ? हल्ली आपल्याकडेही अनेक घरात मुले आपल्या आई वडिलांना मागे ठेऊन कायमची परदेशात निघून जातात, पण म्हणून तेच दु:ख जिव्हारी लावून घ्यायचं की आनंदाने जगायचं हे ज्याचं त्यानं ठरवायला हवं.
आमच्या ऋतू टॉवर्सच्या कंपाऊंडमध्ये असलेलं सप्तपर्णीचं झाड आता बऱ्यापकी उंच झालेलं आहे. माझ्या बाल्कनीच्या बरोबर समोर असलेल्या सप्तपर्णीच्या शेंडय़ावरच्या बेचक्यात महिन्याभरापूर्वीच एक कुटुंब राहायला आलंय. अगदी सहजगत्या माझ्या किचनच्या खिडकीतून नाहीतर बाल्कनीतून या नवागतांच्या घरातील, अर्थात घरटय़ातील ‘भानगडी’ न्याहाळण्याची सवय लागलीय मला हल्ली. सुरुवातीच्या काळात नव्यानं घर लावणं चालू होतं.. मनासारखं घरटं सजवण्यासाठीची त्यांची धडपड बघून माझाच जीव घायकुतीला आला होता. कावळे महाशय जिवाचा आटापिटा करून इकडून तिकडून काडीकुटका चोचीतून आणत होते खरे, पण कावळीणबाईंना काही पसंत पडेल तर शप्पथ! या बाईंची ऐटच निराळी! उगाचच उचक-पाचक सुरूच. अखेरीस या जोडप्याचं घर आठवडय़ाभरात लागलं एकदाचं..! आणि नकळत मीच हुश्श केलं..!
दोन दिवसांनी पाहिलं तर अहो कावळे एकटेच या फांदीवरून त्या फांदीवर फुदकत होते, कावळीनबाई मात्र पंख दुमडून घरटय़ातच विसावलेल्या दिसल्या. बहुधा अंडी दिली असावीत.. त्यानंतर मात्र बहुतेक वेळी त्या घरटय़ातच दिसायच्या. कावळ्याला खरं तर रान मोकळं होतं पण इकडं तिकडं फिरून परत घरटय़ाशी यायचा परतून.. कधीमधी चोचीतून आणलेला चटक-मटक खाऊ स्वत:च्या चोचीने तिला भरवताना दिसायचा.. कधीतरी कावळेबाबा राखणीला बसायचे आणि कावळीनबाई एखादी चक्कर मारून, पंख मोकळे करून यायच्या..! कसा दृष्ट लागेल असा संसार होता दोघांचा..आदर्श पती-पत्नीप्रमाणे एकमेकांना समजून घेत, आनंदाने सहजीवन सुरू होतं.. काही म्हणा, मला तर फारच अप्रूप वाटायला लागलं होतं त्या दोघांचं..!
अगदी पंधरा दिवसांतच घरटय़ात हालचाल दिसायला लागली.. कावळा-कावळीचं कुटुंब आता चांगलं चौकोनी कुटुंब झालं होतं. इवल्या इवल्या चोची पसरून दोन इवलुशा जिवांनी जगण्याचा धडा गिरवायला सुरुवात केली होती. दोघांची लगबग अतोनात वाढली..पिलं वाढायला लागली.. त्या लालसर गोळ्यांची सदैव आ वासलेली तोंड कलकलाट करायला लागली आणि बघता बघता काळ्या रंगांची पिसं लेवून कावळ्यांची पिलं मोठी झाली .. कावळा-कावळीच्या जोडीनं काव काव करायला लागली.
एका संध्याकाळी मी आमच्या या शेजाऱ्यांच्या घरात डोकावलं.. पण काही चाहूलच लागेना.. सगळं चिडीचूप झालेलं होतं.. कावळा-कावळीचं घरटं रिकामं झालं होतं..पिलंही दिसेनात की कावळ्यांची जोडीही. रिकामं घरटं भकासपणे माझ्याकडे डोळे वटारून पाहात होतं.. ‘गेली वाटतं त्यांची पिलं उडून. पण कावळा-कावळी का बरं दिसत नसावी? घर अगदीच सुनं-सुनं वाटत असणार ‘एम्टी नेस्ट सिंड्रोम’ त्यांच्याही वाटय़ाला आलं वाटतं हेच दुखणं! बाकी हल्ली जिकडं पाहावं तिकडं हेच घडताना दिसतंय. शहरातल्या अनेक घरटय़ांतील मुलं परदेशीच असतात, पण पिलं उडून गेल्यानंतर घरटं सोडून कावळा-कावळीनं का जावं ते मात्र मला कळत नव्हतं. गेली पोरं सोडून तर एकटय़ानं मजेत राहायचं की, छानं जोडीनं आयुष्य एन्जॉय करायचं. चुकलंच या कावळा-कावळीचं. मला उगाचच वाईट वाटायला लागलं. मुलं उडून गेल्यानंतरचं दु:ख जिव्हारी लागतंच! मी नाही का मोठय़ा बंगल्यातील एकटेपणामुळे छोटय़ा फ्लॅटमध्ये राहायला आले! गाव सोडलं, घर सोडलं, घराभोवतीची बाग सोडली..पण मनातलं एकटेपण गेलं नाही ते नाहीच! एक मात्र झालं, या एकटेपणामुळे आयुष्याचे संदर्भ मात्र बदलून गेले. पक्ष्यांच्या जगात काय होतं मला ठाऊक नाही. पंख फुटल्यावर उडून जाणारी पिल्लं त्यांच्या आई-वडिलांच्या घरटय़ाकडे परत येतात की नाही याची कल्पना नाही. पण माणसाच्या जगात मात्र पाश तुटत नाहीत. एकीकडं आई-बाप बदललेल्या आयुष्यातील वाटेवरून निमूटपणे वाटचाल चालू ठेवतात, पण त्यांना त्यांच्या सोयीनं जगायला देत नाहीत मुलं! उमेदीच्या काळात हालअपेष्टा सहन करीत ज्या पोराबाळांना आधार देऊन मोठं केलं त्यांच्या आधाराची गरज वाटत असते मनोमन, पण मुलांना ती दिसतच नाही. मग एकटय़ानेच एकमेकांचा आधार बनत जगणं अपरिहार्य होऊन जातं. त्यांच्या गरजेच्या वेळी यायला मुलांना वेळ मिळत नाही. वेळ असला तरी पसे खर्च करून येणं परवडत नाही. मात्र त्यांना गरज असते तेव्हा आवर्जून आई-वडिलांना परदेशी बोलावलं जातं. इच्छा असो वा नसो.. यात मुलीच्या आणि सुनेच्या बाळंतपणाचं कारण घरोघरी असतं. पण भारतात राहाणाऱ्या बाबांना हार्टअ‍ॅटॅक येतो. अँजिओप्लॅस्टी करायची असते, तेव्हा मुलगा तातडीने पसे पाठवतो, आईला म्हणतो, ‘‘आई, माझी गरज असेल तर येतो.’’
आई डोळ्यांतील पाणी पुशीत म्हणते, ‘‘अरे नको. आहेत ना सगळेजण. उगाच कशाला यायचा-जायचा त्रास तुला..’’ मात्र हे बोलत असतानाच लटपटत्या शरीराला आधार देण्यासाठी ती हॉस्पिटलच्या खांबाचा आधार घेऊन उभी असते! मग फोनवर होणाऱ्या कोरडय़ा चौकशा..
‘‘बाबा, काळजी घ्या स्वत:ची..! आई, बाबांचं पथ्यंपाणी व्यवस्थित होतयं ना.?’’
‘‘हो रे.. मी आहे ना..! घेतेय मी तुझ्या बाबांची काळजी, अरे बाबा, आमचं सगळं ठीक आहे. नको काळजी करू..’’ असं बोलणाऱ्या तिच्या मनात मात्र चालू असतं.. ‘‘होत नाही रे हे सगळं आता एकटीच्याने. माझाही जीव थकलाय आता. वाटतं, कुणीतरी मलाही विचारावं, आई, थकलीस ना तू?
मी करतो तुझ्यासाठी चहा, तू बस गं शांतपणे..’’ पण असं म्हणणारं आजुबाजूला कुणी नसतं याचं भान तिला येतं आणि तीच उभी राहाते कसाबसा स्वत:चाच आधार घेत.
माणसांचं जग वेगळं असतं. मायेची गुंतवळ जरा जास्तच अवघड असते. त्यांना रिकामी झाली तरी घरटी सोडून जाता येत नाही. त्यांचं मन तिथेच घुटमळत असतं. श्वास तिथेच अडकलेले असतात. प्राण्यांमधला फक्त माणूसच जन्मभर आठवणींना उराशी कवटाळून रडत राहतो. त्यातही सुख चटकन विसरलं जातं. दु:खाचे कढ वरचेवर येत राहातात. ज्यांची पोरं परदेशी राहातात त्या आई-बापांचं दु:ख तसं स्फटिकासारखं नितळ..पारदर्शी.. परदेशात राहाणारा मुलगा त्याच्या संसारात रमलेला असतो याचा आनंद वाटत असतो, पण त्याच्या नसण्यानं जीवनाची होणारी होरपळ सहन होत नसते. हे दु:ख बोलताही येत नाही आणि सहनही होत नाही.
परदेशातून मुलगा बायको-पोरांना घेऊन भारतात येतो. त्याला आई-वडिलांना भेटायची ओढ असते. आपल्या मुलांनी आपल्या आजी-आजोबांच्या बरोबर राहावं असं त्यालाही मनापासून वाटत असतं. इकडे आई-बाप तर दिवाळीच साजरी करायच्या तयारीत असतात. मुलगा येणार, नातवंडं येणार, काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. वेडी माया उतू जात असते, पण तिकडं राहायची सवय झालेल्या नातवंडांना इथलं काहीच आवडत नसतं. फॉरेन रिटर्न सुनेला काम करावंसं वाटत नाही, कारण परदेशात कामं करून ती कंटाळलेली असते. भारतात आल्यावर तिला सुख हवं असतं. आईचा जीव मुलात अडकलेला असतो, ती मायेपोटी मरमर करत राहते. त्याच्या आवडी- निवडी सांभाळत स्वयंपाकघरातच रेंगाळत राहते. बाबा धडपडत असतो नातवंडांसाठी हे कर.ते कर..! नवऱ्याला त्याच्या आईबरोबर राहायला सोडून सून हक्काच्या माहेरपणासाठी स्वतच्या आई-वडिलांकडे जाते. अशातच सुट्टी संपते. मुला-नातवंडांचा ब्रेक संपतो. उसनं अवसान आणून मुलंबाळं आली म्हणून सण साजरा करणाऱ्या आई-बाबांच्या चेहऱ्यावर मात्र उदासीनतेचं सावट उमटायला लागतं. जास्तीचे कष्ट करून शरीर थकलेलं असतं. त्यातच मारून मुटकून गोळा केलेली मनाची उभारी कोमेजायला येते. मग बांधाबांध, मुलाला आवडतं म्हणून हे बांधून दे, नातवाला आवडतं म्हणून ते बांधून दे. मायेची उलाघाल संपत नाही.. शेवटी निघायची वेळ येते..
‘‘बाबा, तुम्ही सोडायला एअरपोर्टला येऊ नका हो. मी जाईन टॅक्सी करून.’’ मुलगा समजावायचा प्रयत्न करतो, पण बापाचं मनं वेडं असतं. तो बोलून दाखवत नाही, पण अजून तासभर मुला नातवंडांचा सहवास मिळेल ही मनाची हाव संपत नसते. पुन्हा कधी भेट होईल का नाही याचं मनात भय असतं. पुन्हा भेटायला येतील तेव्हा आपण असू का हा प्रश्न मन पोखरीत असतो.
माय मात्र घरटय़ाच्या दारातूनच निरोप देते. डोळ्यांत येणारं पाणी निर्धारानं पापण्याआड रोखण्याचा प्रयत्न करीत राहाते. ‘‘आई, आता तू आणि बाबा या ना तिकडेच. तुमच्या ग्रीनकार्डासाठी अर्ज करीन मी.’’ पण आईच्या मनात येतं .. ‘‘नको रे बाबा, तुझ्या तिथे येऊनही कामंच करायचं असतं. ते इथंच करीन बाबा. कुणी नाही तरी शकू- शेवंता हातातलं काम काढून घेतील, ‘आजी बस गं. मी करतीयं नव्हं. किती धडपडशील.’’ म्हणत मलाच रागावतील.. मोलानं काम करत असल्यातरी वेळेला बाजूला उभ्या राहतील. मी इथंच बरी आहे रे. तुम्ही सुखी राहा म्हणजे झालं. आमच्यासाठी आता आपला देश आणि आपलं घरंच योग्य आहे बाळा. तू सांभाळ स्वत:ला..’’
उघडपणे, मोठय़ानं म्हणते, ‘‘तू बोलावशील तेव्हा येऊच आम्ही. काळजी नको करूस..’’ मोठमोठाल्या बॅगा घेऊन गाडी दारातून हलते आणि इतका वेळ पापण्यांशी ओठंगून राहिलेली, आषाढाची झड मायेच्या डोळ्यांतून कोसळू लागते. सगळंच धूसर होऊन जातं. घरादारात एक अमिट शांतता भरून राहिलेली असते. डोळ्यांतील पाणी खळत नाही. ती मूकपणे उंबऱ्यात उभी राहून गाडी गेल्या दिशेला पाहात राहाते. मग कंटाळून घरात येऊन घायाळ पक्षिणीसारखी घरभर भिरभिरत राहाते.
तिचं मन बाहेर मोकळ्या आकाशात उडू पाहात असतं, पण पंखात तेवढं बळ नसतं. घराचे पाश सोडून उडण्याइतकं अवसान नसतं. उदासवाण्या घरात बापुडवाणी होऊन ती फडफडत राहाते. तिच्या मनाची तडफड ऐकायला कोणीही नसतं. आठवणींचे लोंढे फुटतात. मनाची तगमग सहन होत नाही. मग पंख मिटून ती घराच्या एखाद्या कोपऱ्यात पडून राहाते. जोडीदाराची वाट पाहात राहाते. तो येतो. ‘‘अगं, वेळेत पोहोचलो बरं का एअरपोर्टला!’’ त्याला हसताना पाहून तीही उसनं हसत म्हणते..
‘‘झालं, गेली एकदाची पाहुणे मंडळी त्यांच्या त्यांच्या घरी. हे पाहुणे पक्षी आले की आपली मात्र धावपळच होते हल्ली. झेपत नाही हो, या पाहुण्या पक्ष्यांचा पाहुणचार करणं आताशा.’’ हे असे संदर्भ बदलून जातात आयुष्याचे. पोटची पोरं स्थलांतरित पक्षी होऊन जातात. त्यामुळे रिकाम्या घरटय़ांचेसुध्दा आताशा संदर्भच वेगळे वाटायला लागतात..

-radhikatipre@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2015 2:20 am

Web Title: lead reference
Next Stories
1 ‘सा’ ची आराधना..
2 शक्यता दुर्बीण वापराच्या
3  संघटित स्त्रीकार्याचा आविष्कार
Just Now!
X